हुरहूर वाढवणारा फाल्गुन

हिंदू कालगणनेची सुरुवात चैत्रापासून होते, तर अखेर फाल्गुन महिन्याने होते. स्वाभाविकच या काळात मनात अनेक भावभावनांची आंदोलने सुरू असतात.
हुरहूर वाढवणारा फाल्गुन

- उर्मिला राजोपाध्ये

प्रासंगिक

हिंदू कालगणनेची सुरुवात चैत्रापासून होते, तर अखेर फाल्गुन महिन्याने होते. स्वाभाविकच या काळात मनात अनेक भावभावनांची आंदोलने सुरू असतात. बदलत्या वातावरणाप्रमाणेच आयुष्य बदलवून टाकणारे काही दिवस, काही नाती स्मरत आपण पुढे जात असतो.

निसर्ग बदलत असल्याच्या, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सदासर्वकाळ उकाड्याचे साम्राज्य अनुभवावे लागणाऱ्या आजच्या काळातही ऋतूपालट दुर्लक्षित राहात नाही. तो ठळकपणे जाणवतो आणि त्याचे कौतुकही होते. कारण आजचे आधुनिक जग आणि त्यात राहणारा अत्याधुनिक माणूस निसर्गापासून फारकत घेऊन जगत असला तरी मुळात त्याच्यामध्ये सामावलेला निसर्ग दूर करणे काही त्याला शक्य होत नाही. त्यामुळेच बदलते वातावरण, बदलता महिना, बदलणारे वर्ष आणि या सर्व बदलांनिशी साजरे होणारे सणवार यातील निखळ आणि निर्भेळ आनंद उपभोगण्यास त्याचे मन आसुसलेले असते. म्हणूनच हिवाळ्याला निरोप देत उन्हाळ्याचे स्वागत करत असताना उंबऱ्यावर येऊन थबकलेला फाल्गुनही आपल्याला रमणीय वाटतो.

वर्षभरात आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांची, आठवणींची पोतडी बांधताना भावनिक गुंत्यात अडकवून टाकणारा असा हा काळ आहे. काहींशी नव्याने नाते जुळलेले असते, तर काही नात्यांना चिराही गेलेल्या असतात. आत्तापर्यंतच्या प्रवासात साथ देणारे कोणी अचानक हात सोडून निघूनही गेलेले असतात. सहाजिकच एकीकडे नवीन वर्षाची उत्सुकता, नवे संकल्प, नवा संघर्ष तर दुसरीकडे हातून निसटलेल्या क्षणांच्या आठवणी, अशा मिश्र भावनांच्या भोवऱ्यात अडकलेला काळ म्हणजे फाल्गुन.

या महिन्यात भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळे महोत्सव आयोजित होतात. छोट्या-मोठ्या देवळा-राऊळांमध्ये खास पूजाअर्चा संपन्न होतात. फाल्गुन शुक्ल अष्टमी हा असाच एक दिवस. या दिवशी लक्ष्मीची अर्थात सीतेची पूजा केली जाते. दक्षिण भारतात फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी ‘उत्तिर’ नामक एका महोत्सवाचे आयोजन होते. हा मंदिरोत्सव या महिन्यातील प्रमुख आकर्षण असते. फाल्गुन मासात द्वादशीला श्रवण नक्षत्र असल्यास या तिथीला फाल्गुन श्रवण द्वादशी म्हणतात. या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म करून हा दिवस साजरा करतात.

वसंत ऋतूमुळे फाल्गुन गंधयुक्त असतो असे म्हटले तर वावगे ठरत नाही. हा सगळा काळ वसंतोत्सवाने भारलेला असल्यामुळे विशेष रम्य भासतो. सगळीकडे पाना-फुलांचा मोहोर लगडलेला असतो. त्यामुळेच या काळात साजरे होणारे उत्सव केवळ आनंदासाठी नसून त्यामागील दृष्टिकोन आणि शास्त्रीय बैठकही नोंद घेण्याजोगी असते. म्हणून या महिन्याला नवोन्मेषाचा महिना म्हणूनही संबोधले जाते.

या काळात सृष्टी कात टाकून नव्या नव्हाळीने रूप बदलत असते. एक सुरेल ताजेपणा चराचरात भरून राहिलेला असतो. संपत आलेली थंडी आणि सुरू होणारा वैशाख वणवा याच्या धुसरशा सीमारेषेवर वातावरण रम्य बनते. त्यात होळी आणि रंगपंचमी हे उत्सव निर्मळतेने आणि विविध रंगांना स्वच्छ अंत:करणाने सामावून घेणारे ठरतात. ‘जुने जाऊ दे मरणालागून’ म्हणत नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या वृत्तीला होळीच्या उत्सवाने चालना मिळते आणि त्यानंतर प्रकटणाऱ्या रंगपंचमीने नवनिर्मितीला रंगीत-संगीत केले जाते. ही रंगपंचमी किंवा होळी हे मानवाच्या परिपक्व विचारांचे द्योतक आहे. चांगले ते घ्यावे, इतरांना वाटावे आणि वाईट ते संपवून टाकावे, असा संदेश देणारे हे उत्सव सहाजिकच मानवी संस्कृतीच्या इतिहासातले महत्त्वाचे टप्पे म्हणावे लागतील. निसर्ग, त्याच्या आधारे राहणारा माणूस आणि त्याच्या सर्वांशी असणाऱ्या सहचर्यातून उलगडत जाणारे भावविश्व हे सगळे या उत्सवांमधून, लोककला-संगीताच्या माध्यमातून उलगडत जाते.

फाल्गुन महिना लक्षात राहतो तो मुख्यत्वे होळीमुळे. त्याची होळी, हुताशनी महोत्सव, शिमगा इत्यादी नावे आहेत. होळीमधला मूळ शब्द आहे ‘सुग्रीष्मक’. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत होळीचा हा उत्सव चालतो. काही ठिकाणी नवमीपासूनच सुरुवात होते. हा वसंताच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याचा उत्सव आहे. वसंत आगमनोत्सवच म्हणा ना! पौर्णिमेला सर्वत्र होळी पेटवण्याची पद्धती आहे. लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, होलाका, ढूंढा, पुतना या राक्षसींना अग्नी पेटवून पळवून लावण्याचा हेतू त्यामागे आहे. प्राचीन अग्निपूजक पूर्वजांच्या परंपरेचा हा अवशिष्ट भाग आहे, असे मानण्यास हरकत नाही. या महिन्यात बंगालमध्ये ‘दोलायात्रा’ असते. फल्गु म्हणजे गुलाल, तो कृष्णमूर्तीवर उधळून होळी खेळतात. उत्तर प्रदेशमध्ये लाल, पिवळी वस्त्रे परिधान करून टिपऱ्या खेळतात. महाराष्ट्रात आंबा, केळी, माड, पोफळ, एरंड या वृक्षांची होळी उभारतात. गोव्यामध्ये होळी केवळ उभी करतात; जाळत नाहीत. ग्रामदेवतेच्या देवळासमोर ती उभी रहाते. उभा वृक्ष हेरून, यथोचित पूजा करून, फांद्या तोडून तो वाजत-गाजत खांद्यावरून मिरवत गावात आणला जातो. त्याला आंब्याच्या पानांनी सजवतात. टोकावर असोला नारळ बांधतात. कागदी झेंडे लावतात. या महिन्यात महाराष्ट्रात लोक कॉफी, भांग, मद्य, अफू यांचे सेवन करतात. गंजिफा, पत्ते, सोंगट्या यांचे खेळ करतात, गाणी म्हणतात. अनेक प्रकारची सोंगं काढली जातात. गोमूचे नाच होतात. देवाची निशाणे वाजत-गाजत घरोघरी जातात. राधाकृष्णाचे नाच काढतात, खेळ्ये खेळतात. एकूणच हा नवनिर्मितीचे दिलखुलास स्वागत करण्याचे संकेत देणारा महिना आहे. माणसांच्या मनात असणाऱ्या सर्व क्षुद्र भावना जाळून टाकून रंगांची उधळण करत नवजीवनाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होण्याचा संदेश आपल्याला फाल्गुन मास देतो. तेव्हा या मासाचा मनमुराद आनंद लुटू या. पुरणपोळीने आणि नाचगाण्यांनी त्याचे स्वागत करू या.

logo
marathi.freepressjournal.in