सुशिक्षित अडाणी

आम्ही द्राक्षछाटणीचा मुहूर्त बघायला एका मित्राकडे चाललोय. त्याच्या मोबाइलवर एक ॲप आहे
सुशिक्षित अडाणी

गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. त्या दोन्हीही घटना माझ्या डोक्यात घर करून राहिल्या. कारण त्या गोष्टी अशा आहेत की, त्या कोणत्याही विवेकी विचार करणाऱ्या माणसांना निश्चितपणे विचार करायला लावतील. त्यापैकी पहिली घटना आहे, महाराष्ट्रातील द्राक्षबागाच्या पट्ट्यातली तर दुसरी आहे थेट गडचिरोली जिल्ह्यातील. सध्या द्राक्षबागांचा फळछाटणीचा हंगाम चालू आहे. तिला ऑक्टोबर छाटणी असंही म्हणतात. आजपर्यंतच्या शेतकरी वर्गाच्या चालीरीती बघितल्या तर असे दिसते की, शेतकरी हा शेतीतील महत्त्वाची कामं मुहूर्त बघून करतो. त्या रीतीरिवाजाप्रमाणे मग फळछाटणीला मुहूर्त बघणे आलेच. गावातल्या कुठल्या तरी लिहिता-वाचता येणाऱ्या माणसाकडून कॅलेंडर बघून चांगला दिवस आहे का? याची खातरजमा करून, कधी एकमेकाला विचारून शेतकरी छाटणीचा मुहूर्त करतात. मला परवा दोन द्राक्षबागायतदारांची तरुण मुलं भेटली. ते म्हणाले की, आम्ही द्राक्षछाटणीचा मुहूर्त बघायला एका मित्राकडे चाललोय. त्याच्या मोबाइलवर एक ॲप आहे. तिथं हवामान कळतंय. ज्या दिवशी हवामान चांगले असेल, पाऊस पडण्याची शक्यता नसेल, आकाश निरभ्र असेल, त्या दिवशी मुहूर्त करायचं ठरवलं आहे. मला त्या दोघांचे खूप कौतुक वाटले. कोणत्याही कर्मकांडाच्या/पोथी पुराणांच्या नादी न लागता ते थेट विज्ञानाच्या नादी लागले आहेत, याचं मला समाधान झालं. मी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. कमी शिकलेली शेतकरी मुलं विज्ञानवादी बनल्यामुळे मी जाम खूश झालो. डॉ नरेंद्र दाभोलकरांना ‘डॉ. तुम्ही जिंकलात,’ असं ओरडून सांगावेसे वाटले अन‌् त्याच वेळी दुसरी बातमी येऊन थडकली. विदर्भातील शेवटचं टोक म्हणजे गडचिरोली जिल्हा. मागासलेपणाचा शिक्का असलेला हा भाग. डोंगराच्या रांगात विसावलेला, जल-जंगल यांची जीवापाड जपणूक करणारा; पण भौतिक सुधारणापासून लांब असणारा जिल्हा. आदिवासीबहुल आणि नक्षलवादाचा शाप असणारा हा भूभाग. इथं सुधारणा व्हाव्यात म्हणून शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले आहे. त्या विद्यपीठाचे नाव गोंडवाना विद्यापीठ असे आहे.

त्या विद्यापीठात कैकजन शिक्षण घेत आहेत. माणसांचा अडाणीपणा घालवण्याचा शिक्षण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे तिथं शिक्षण या विषयांवर जोर देण्यात आला आहे. या विद्यापीठात संशोधन करणारे अनेक जण आहेत. त्यात पीएच.डी करणारेही आहेतच. पीएच.डीसाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी पात्र संशोधकांची तोंडी मुलाखत घेतली जाते. त्यास ‘व्हाय व्हा’ असं म्हटलं जातं. तारीख २५ व २६ सप्टेंबर २०२२ रोजी ती व्हाय व्हा प्रस्तावित केली होती. त्यादिवशी आमावास्या होती. तीसुद्धा साधीसुधी नव्हती तर ती सर्वपित्री आमावस्या होती. कुठल्या तरी सनातनी डोक्याने ही बाब विद्यपीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डीच्या मुलाखती रद्द केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सहीने मुलाखती रद्द केल्याचे थेट परिपत्रकच काढले. त्यात चक्क असे नमूद केले की, तारीख २५ व २६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री आमावस्या असल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याने त्या दिवशी होणाऱ्या मुलाखती रद्द करण्यात येत आहेत. उच्चशिक्षित अधिकाऱ्यानी केलेला हा अडाणीपणा आहे. एका बाजूला कमी शिकलेली माणसं विवेकी व विज्ञानवादी होत चाललीत. अशा घटना घडत असताना अशा अविवेकी व अवैज्ञानिक घटना घडल्यामुळे या शिकलेल्या; पण अडाणी माणसांची कीव करावी असे वाटते. तसं पाहिलं तर गोंडवाना विद्यापीठ हे अत्यंत पुरोगामी विचारांचा प्रसार करणारे विद्यापीठ आहे. डॉ दाभोलकर यांच्या हौतात्म्यानंतर आपल्या सरकारने संमत केलेला जादूटोणाविरोधी कायदा त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. इतक्या चांगल्या पुरोगामी विचारसरणीच्या विद्यापीठात सर्वपित्री आमावस्येच्या निमित्ताने मुलाखती रद्द करणे. ही बाब चिंतनीय आहे. नक्कीच तिथं कोणीतरी झारीतला शुक्राचार्य असणार आहे. त्यानेच हे कारस्थान केले असण्याची शक्यता आहे. शिकलेल्या लोकांनी हा मुद्दाम व जाणूनबुजून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा पराभव केलेला आहे. कमी शिकलेल्या शेतकरी पोरांच्या मुहूर्त बघण्याच्या शास्त्रीय पद्धतीमुळे डॉ. दाभोलकर जिंकले, असं मला वाटलं; पण बक्कळ शिकलेल्या विद्यापीठस्तरीय माणसांच्या कृतीतून डॉ. दाभोलकर यांचा व त्यांच्या विचारांचा पराभव झाल्याचे दिसते. याचा अर्थ कमी शिकलेल्या माणसांनी दाभोलकर व त्यांचे विचार स्वीकारले; पण जास्त शिकलेल्या माणसांनी ते स्वीकारले नाहीत. असेच म्हणावे लागेल. हा लेख लिहिताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकलेल्या माणसाविषयीच्या मताची आवर्जून आठवण झाल्याशिवाय राहत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘पढे लिखे लोगोने मुझे धोका दिया हैं।’ असं मत व्यक्त केलं होतं. ते डॉ. दाभोलकर यांच्या बाबतीत खरं ठरलं आहे. कमी शिकलेले शहाणे निघाले आणि जास्त शिकलेले ठार अडाणी निघाले, असंच काहीसं म्हणावं लागेल. शिकलेल्याच माणसांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा पराभव केला आहे आणि त्यांच्या विचारांना धोका दिला आहे, असं म्हणावं लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in