

शिक्षणनामा
रमेश बिजेकर
शिक्षणाचा इतिहास समजून घेण्यासाठी भारताच्या समाजविकासाचा क्रम लक्षात घ्यावा लागतो. इतिहासकारांच्या मते स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था, पुरुषसत्ताक वर्णव्यवस्था, पुरुषसत्ताक जातीव्यवस्था, जातवर्ग पुरुषसत्ताकव्यवस्था असा समाजविकासाचा क्रम राहिला आहे. या चारही टप्प्यातील शिक्षणाचे उद्दिष्ट, सिद्धांत, स्वरूप कसे होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण स्त्रीसत्ताक काळातील शिक्षण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
क्षणातील सार्वत्रिकीकरणाचा भीषण प्रश्न अंतर्मुख करायला लावणारा आहे. या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकत नाही. इतकेच नव्हे, तर अवरुद्ध झालेला पुरोगामी चळवळीचा मार्गही मोकळा होऊ शकत नाही. म्हणून शिक्षण बंदीचे मूळ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. हे समजून घेताना आपण पुढील सूत्राचा आधार घेणार आहोत. 'शिक्षण व्यवस्था स्वयंभू स्वायत्त नसते, तर व्यापक समाजव्यवस्थेचा भाग म्हणून कार्यरत असते.' हे सूत्र आपल्याला शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट, तत्त्व, सिद्धांत, रचना समजून घेण्यास मदत करते. इतकेच नव्हे, तर त्याचा इतिहास जाणण्यास भाग पाडते.
शिक्षणाचा इतिहास समजून घेण्यासाठी भारताच्या समाजविकासाचा क्रम लक्षात घ्यावा लागतो. इतिहासकारांच्या मते स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था, पुरुषसत्ताक वर्णव्यवस्था, पुरुषसत्ताक जातीव्यवस्था, जातवर्ग पुरुषसत्ताक व्यवस्था असा समाजविकासाचा क्रम राहिला आहे. ढोबळमानाने हे प्रमुख चार टप्पे इतिहासाचे मानले जातात. या चारही टप्प्यातील शिक्षणाचे उद्दिष्ट, सिद्धांत, स्वरूप कसे होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण स्त्रीसत्ताक काळातील शिक्षण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जगभर शेतीचा शोध स्त्रियांनी लावला याबद्दल इतिहासकारांत एकमत आढळते. शेतीच्या शोधातून अन्न सुरक्षा मिळाली. मानवी समाजाची भटकंती अवस्था संपली व स्थिरवस्ती अस्तित्वात आली. उत्पादनाचे साधन व स्वरूप बदलले व नव्या संस्कृतीने जन्म घेतला. उत्पादन प्रक्रियेतून (सृजन) संस्कृती जन्म घेते व त्याचवेळी उत्पादन प्रक्रियेवर संस्कृती प्रभाव गाजवत असते. उत्पादन प्रक्रिया व संस्कृतीचे हे आंतरद्वंद समाजव्यवस्थेचा मूलाधार असतो. स्वाभाविकपणे तो शिक्षणाचाही मूलाधार असतो. स्त्रीसत्ताक काळात शिक्षणाचे स्वरूप कसे होते? हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू या!
स्त्रीसत्ताक काळात औपचारिक शिक्षणाची स्वतंत्र शाखा म्हणून अस्तित्वात आलेली नव्हती. समाज जीवनात ते एकात्मपणे कार्यरत होते. या काळात उत्पादन (सृजन), अन्नधान्य आणि जमिनीचे वाटप (वितरण) व संस्कृती या प्रमुख घटकांशी निगडित ज्ञानप्रणाली एकात्मपणे कार्यरत होती. मानवी समाजाचे पुनर्उत्पादन व अन्नधान्याचे (भौतिक) उत्पादन (सृजन) घडत होते. स्त्रीसत्ताक काळात अतिरिक्त उत्पादन नव्हते, त्यामुळे भौतिक शोषण नव्हते. परंतु स्त्री-पुरुष विषमता होती. सर्वच क्षेत्रात स्त्रिया नेतृत्व स्थानी होत्या. स्त्री केंद्रित निर्णय प्रक्रिया होती. पुरुष संतती निर्मितीस निमित्यमात्र असायचे. अपत्याची ओळख आईपासून व्हायची. वडील कोण हे सांगता येत नसे, असे शरद पाटील सांगतात.
स्त्रीसत्ता आकस्मिक वा अपवादात्मक नव्हती, तर मानव समाजाच्या नैसर्गिक विकासाचे अपत्य होती. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, राजकारण, समाजकारण, ज्ञान-विज्ञान, भूमिती, तत्त्वज्ञान, भाषा, व्याकरण, युद्धकौशल्य या ज्ञानांचा उदय त्या व्यवस्थेत झाला होता. परंतु या स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून अस्तित्वात आल्या नव्हत्या. या समाजव्यवस्थेच्या मुख्य दोन गरजा होत्या. मानव वंशाचे व अन्नधान्याचे पुनर्उत्पादन घडवणे. स्त्रियांनी शेतीचा शोध लावल्यामुळे स्वाभाविकपणे स्त्रिया उत्पादन व वितरण व्यवस्थेत नेतृत्वस्थानी होत्या व शेतीचे ज्ञान स्त्रियांना होते. 'स्फ्य' काठीचा वापर करून स्त्रिया जमिनीला चिरा पाडत. पेरणी, वखरणी, नांगरणी, पीक काढणे ही सर्व कामे स्त्रिया करत होत्या. निरीक्षण, अनुभव, प्रयोग यातून शेतीचे ज्ञान-विज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. शेती समूहाने केली जात होती. स्वाभाविकपणे शेतीची सामूहिक चर्चाही घडत असणार. त्यातून उत्तरोत्तर शेतीचे ज्ञान विकसित होऊन ते पुढच्या पिढीकडे हस्तातंरित होत होते. शेतीची दुय्यम कामे पुरुष करत. जमिनीची साफसफाई व अशीच अन्य कामे पुरुष करत असत. स्त्रिया निसर्गत: जननक्षम असल्यामुळे स्त्रियाच शेती चांगली पिकवू शकतात ही धारणा समाजात काम करत होती. आद्य समाजाचे हे उत्पादक ज्ञान व संस्कृती म्हणजे शिक्षण आशय व शेती म्हणजे शाळापूर्व शाळा होती.
स्त्रीराज्यात गण व कुलात जमिनीचे व अन्यधान्याचे वाटप होई. कुलात सामूहिक जमीन कसल्या जात. या जमिनीचे व अन्नधान्याचे समान वाटप केले जाई. समान वाटपासाठी अक्ष (फासे) वा चौपटचा वापर केला जाई. अधिकच्या चिन्ह आकाराचा ९६ घरांचा हा फास असायचा. जमिनीची उत्तम, मध्य व कनिष्ठ सुपीकता दर्शवण्यासाठी चौपटात तीन घरे दर्शवलेली असायची. चौपटाच्या आधारे जमिनीचे व अन्नधान्याचे वाटप गणात व गण कुलात वाटप करायचे. जमिनीचा पोत लक्षात घेऊन जमिनीचे समान वाटप व अन्नधान्याचे समानवाटप हे चौपटाचा वापर करून साध्य करी. या तंत्रात मोजमापाचे भौमितिक व गणिताची सूत्रे अंतर्भूत होती. या तंत्राच्या शोधाच्या मुळाशी समतेचे तत्त्व अंतर्भूत होते. समूहाने राहणे, समूहाने उत्पादन करणे, समूहाने ज्ञान निर्मिती व वापर करणे, समूहाने जगणे ही स्त्रीराज्याची वैशिष्ट्ये होती. भौतिक व सांस्कृतिक समता अस्तित्वात असल्याशिवाय जैविक समूहभान अस्तित्वात येऊ शकत नाही. याचे भान प्राचीन आद्य समाजातील स्त्रीसत्ताक समाजाला होते. समतेचे व उत्पादनाचे हे शाश्वत मूल्य अनौपचारिक व जगण्याच्या एकात्म पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवले जात होते.
ज्ञान निर्मिती, संकलन व हस्तांतरणात भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. इतकेच नव्हे, तर भाषा त्या समूहाचे व त्या व्यवस्थेचे दर्शनही घडवते. प्राचीन भाषेचा उल्लेख होताना सर्वात प्राचीन भाषा संस्कृत असल्याचे सांगितले जाते. संस्कृत सर्व भाषांची जननी, देवभाषा असाही प्रचार केला जातो. शरद पाटील प्राच्यविद्येच्या अभ्यासातून वेगळी मांडणी करताना दिसतात. त्यांच्या मते, स्त्रीराज्याची भाषा आर्षभाषा होती. या भाषेला सचित्र लिपी व त्याचे व्याकरणही अस्तित्वात आले होते. इतकेच नव्हे, तर आर्षभाषेत वैदिकी श्रृतीपूर्वी तांत्रिकी श्रृती रचल्या होत्या. तांत्रिकी श्रृती वैदिक श्रृतीच्या आधी निर्माण झाल्या. त्यामुळे स्वाभिकपणे संस्कृतपूर्व भाषा आर्षभाषा होती हे शरद पाटील सिद्ध करतात. हा अत्यंत महत्त्वाचा ठेवा काळाच्या ओघात नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.
स्त्रीसत्ताक व्यवस्थेच्या पतनानंतर वर्णव्यवस्था उदयाला आली. या दोन व्यवस्थांमध्ये गुणात्मक फरक होता. स्त्रीराज्य (वैराज्य) सापेक्ष समतेवर उभा होता, तर वर्णव्यवस्था गुलामगिरी प्रथेवर आधारित होता. स्त्रीराज्यातील आर्षभाषा सापेक्ष समतावादी समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब होती, तर वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व संस्कृत भाषा करत होती. या दोन व्यवस्थांच्या स्थित्यंतरात व संघर्षात प्राचीन काळातील ज्ञानशाखांचे दर्शन दडलेले आहे. ज्याचा निकटचा संबंध शिक्षण व्यवस्थेच्या प्रवाहाशी जोडलेला आहे. शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते. शिक्षणातील माध्यम भाषेचा विचार करताना वा एखाद्या भाषेचा पुरस्कार करताना आज जो एकांगी व अतिरेकी विचार केला जातो त्या पार्श्वभूमीवर हा प्राचीन ठेवा समजून घेणे आपली गरज बनते. त्यातून भाषा शिक्षणाचे व शिक्षणातील भाषेचे राजकारण समजून घेण्यास मदत होईल. (क्रमश:)
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र. ramesh.bijekar@gmail.com