

शिक्षणनामा
रमेश बिजेकर
स्त्रीसत्ताक काळात शेतीच्या मूलभूत तंत्रांचा शोध लागला, शरीरशास्त्र व तत्त्वज्ञान विकसित झाले, तसेच समतावादी समाजरचनेत लोकशाही संकल्पना मूळ धरू लागल्या. या लेखात सांख्य तत्त्वज्ञानाच्या निर्मितीपासून राष्ट्र संकल्पनेच्या विकासापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे. यातून भारतीय समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या योगदानाची ऐतिहासिक दखल घेण्याचा प्रयत्न आहे.
वेदांतिक श्रृती आद्यतम असून, भारतातील ज्ञान शाखांचा उदय वेदांपासून झाल्याचा दावा ब्राह्मणी छावणीकडून केला जातो. अब्राह्मणी छावणीचे इतिहासकार व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक हा दावा फेटाळतात आणि स्त्रीसत्ताक काळात श्रृती रचल्या गेल्या, सांख्य (वृद्ध) तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली असे सांगतात. इतकेच नव्हे, तर तांत्रिक श्रृतीची उसणवारी करून त्यावर ब्राह्मणी पुट चढवला गेला, असा त्यांचा दावा आहे. या दोन्ही छावणीचा दावा-प्रतिदाव्याचा संबंध वर्तमान शिक्षण व्यवस्थेशी निकटचा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मध्ये वेदांतिक ज्ञान प्रणाली आद्यतम असून, ज्ञान शाखांचा उदय वेदांतिक परंपरेत झाला, असा दावा केला आहे. त्यामुळे स्त्रीसत्ताक काळातील ज्ञान प्रणाली समजून घेणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी आपण शेतीचा शोध, सामूहिक शेती, जमीन व अन्नधान्याचे समान वितरणाचे तंत्र, सचित्र लिपीसह आर्षभाषा व तिचे व्याकरण याचा शोध स्त्रीसत्ताक काळात लागल्याचे पाहिले. गर्भार काळात व प्रसूतीनंतरचा काही काळ स्त्रियांना स्थिर होऊन विशिष्ट ठिकाणी थांबावे लागायचे. त्या काळात निसर्गत: विशिष्ट काळी (विशिष्ट वनस्पती) उगवणारे अन्नधान्य निरीक्षणातून व अनुभवातून स्त्रियांना उमगले. पाऊस पडल्यावर पुन्हा- पुन्हा ते उगवते व हे खाऊन जगता येते, हे स्त्रियांना कळले होते. हे ज्ञान स्त्रीसत्ता उगमाचा आधार ठरली. शेतीचे हे प्राथमिक ज्ञान होते. शेतीचे हे ज्ञान क्रमाक्रमाने विकसित झाले. नदी, खोऱ्यात शेती चांगली पिकते, कोरड्या पडलेल्या तलावात पीक घेता येते इथपासून ते काठीचा वापर व नांगरसारख्या अवजाराचा वापर शेतीत करण्यापर्यंतचा विकास स्त्रीसत्ताक काळात झाला.
गाळपेराची व हस्तपेराची शेती स्त्रिया करत. मुख्यत: भाताचे पीक घेतले जात होते. पीक येण्यासाठी पाणी, जमिनीचा पोत, हवामान, ऋतू, मानवी श्रमाची आवश्यकता असते यांचे ज्ञान स्त्रियांना झाले होते. याला कृषिमाया (कृषितंत्र) म्हणतात. कृषिमायेत शेतीचे ज्ञान-विज्ञान अंतर्भूत होते. या अत्यंत महत्त्वाच्या ज्ञान विकासाबरोबर शरीर शास्त्राचे ज्ञानही उदयाला आले होते. या काळात तांत्रिकांनी शरीर विज्ञानाचा शोध लावला होता. चरक व सुश्रृत जाणीव हृदयात होते असे मानत होते, तर तांत्रिक जाणिवेचे अधिष्ठान मेंदू असल्याचे सांगत होते. भारतातील अनार्यांचे हे आद्य उत्पादक ज्ञान-विज्ञान होते.
स्त्रीसत्ताक (वैराज्य) काळातील सापेक्ष समतावादी व्यवस्थेत तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली होती का? याचे उत्तर शरद पाटील पुढीलप्रमाणे देतात. या काळात तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली होती व ते भारताचे पहिले सांख्य तत्त्वज्ञान होते. या तत्त्वज्ञानाची निर्माती तांत्रिक पंथीय कपिला होती, असे शरद पाटील सांगतात. वेदांतिक श्रृतीपूर्वी तांत्रिक श्रृती स्त्रियांनी निर्माण केल्या होत्या. ज्याची दखल जैन, बौद्ध व ब्राह्मणी तत्त्वज्ञानाला घ्यावी लागलेली आहे याचे पुरावे शरद पाटील देतात. सांख्य योगीनी गार्गीने तत्त्वज्ञानात्मक प्रतिवाद केल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. भारताच्या तात्त्विक दर्शनाचा संघर्ष ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीमध्ये झालेला आहे. वृद्ध सांख्य तत्त्वज्ञान अब्राह्मणी विचार दर्शनाचे प्रक्षेपण करतो. त्याच तत्त्वज्ञानाचे पुढे ब्राह्मणीकरण घडवले गेले. स्त्रीसत्ताक काळातील ज्ञान परंपरा विकृत वा लुप्त करण्याचा प्रयत्न झाला. समाजव्यवस्था बदलण्यासाठी अब्राह्मणी पंरपरेचे व संस्कृतीचे विकृतीकरण समजून घेणे व अब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणे, मुक्तीदायी समाज निर्मितीकडे जाण्यासाठी आवश्यक आहे. हे लक्षात घेतल्यास शिक्षणाच्या वाटचालीची दिशा निश्चित करणे सोपे होईल.
स्त्रीसत्तेत एकगृही समितीत लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबवली जायची. मातृसत्तेच्या विकसित अवस्थेत एकगृही समितीचा विकास होऊन द्विगृही समितीत रूपांतरित झाली. या द्विगृही समितीत पुरुषांचाही सहभाग असायचा. सर्व निर्णय एकमताने होणे शक्य नसते याची जाण ठेवून मतभेदाच्या वेळी मतदान घेण्याची रचना अस्तित्वात होती. ही निवडणूक पार पाडण्यासाठी अधिकाऱ्याची निवड करण्यात यायची. त्याला शलाका-ग्राहापक (आजचा निवडणूक अधिकारी) असे संबोधले जायचे. या उच्च दर्जाच्या लोकशाहीचा विकास या समाजरचनेमध्ये पहायला मिळतो. निर्णय प्रक्रिया सामूहिक पद्धतीने व उच्च दर्जाच्या लोकशाहीने घडत असल्यामुळे कुल व ज्ञातीत अवैमनस्यभावी संबंध होते. उत्पादन, वितरण, ज्ञान निर्मिती व संस्कृती यात स्त्रियांचा पुढाकार असल्यामुळे त्या नेतृत्व स्थानी होत्या. स्त्रीसत्ता व मातृसत्ता यातील सुक्ष्म परंतु महत्त्वाचा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. मातृसत्तेत स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जायच्या. परंतु स्त्रीसत्ताक काळात स्त्रिया उपजत श्रेष्ठ मानल्या जायच्या. स्त्रीसत्तेकडून मातृसत्तेकडे संक्रमित होणाऱ्या समाजरचनेतील हे बदल होते, असा अंदाज आपण बांधून सृजन करू शकतो. हीच त्या समाजाची संस्कृती होती.
वैराज्यात राजकीय संकल्पनेचा केवळ उदय झाला होता असे नाही, तर समाजरचनेमध्ये ती रुजलेली होती. अलीकडे राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचार प्रवाहांना डोळ्यात अंजन घालायला लावणारी राष्ट्र संकल्पना स्त्रीराज्यात उदयाला आली होती. स्त्री राज्यातील राष्ट्र संकल्पना सामूहिक मालकीवर आधारित होती. गणभूमी व गणधनाची सामूहिक मालकी हे मूळ तत्त्व राजकीय व्यवस्थेचे होते. राजपदाची उत्पत्तीच राष्ट्रापासून झाली. राष्ट्रजमीन गणांमध्ये वाटल्या जाई. हे वाटपाचे काम स्त्री करत असे. म्हणून राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली, असे इतिहासकार सांगतात. राष्ट्र जमीन वाटपाचे काम स्त्री करत असल्यामुळे तिला राष्ट्री वा देवी संबोधले जाई. निऋती ही स्त्रीसत्ताक आर्यपूर्व सिंधुसंस्कृतीची आद्य राष्ट्री होती. हा दुर्लक्षित दुवा शरद पाटलांनी अभ्यासांती सिद्ध केला आहे.
भारतीय गण समाज प्राचीनतम समाज होता. या समाजाचे तत्त्वज्ञान, उत्पादक ज्ञान-विज्ञान, भाषा, संस्कृती, समाजकारण, राजकारण समाज जीवनातील एकात्म शिक्षण विस्ताराने समजून घेण्याची गरज होती. कारण यापुढील समाजव्यवस्था व त्यातील शिक्षण व्यवस्था समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्त्रीसत्ताक समाजातील या ज्ञानपंरपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीवर रुजवली जात होती. ही समाजव्यवस्था टिकवण्याचा भाग म्हणून पुढची पिढी घडवली जात होती. या व्यवस्थेतील एकात्म शिक्षण व्यवस्था स्त्रीसत्ताक व्यवस्थेचा भाग म्हणून कार्यरत होती. कुठलीही समाजव्यवस्था अपरिवर्तनीय नसते, तर तिच्या आंतरद्वंदात नव्या व्यवस्थेची नांदी असते. या नव्या व्यवस्थेतील अनेक बदलांपैकी शिक्षणातील बदल अंतर्निहीत असतात.
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र.
ramesh.bijekar@gmail.com