बहुस्तरसत्ताक समाजातील शिक्षण प्रश्न

माफुआं हे तत्त्वज्ञान आहे. कोणतेही तत्त्वज्ञान व्यवस्थेला लावून वास्तव समजून घेता येते. माफुआं जातवर्गीय उत्पादन संबंध व जातभांडवली पितृसत्ताक संस्कृती उलगडून दाखवते. जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचा पर्याय देते.
 बहुस्तरसत्ताक समाजातील शिक्षण प्रश्न
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

माफुआं हे तत्त्वज्ञान आहे. कोणतेही तत्त्वज्ञान व्यवस्थेला लावून वास्तव समजून घेता येते. माफुआं जातवर्गीय उत्पादन संबंध व जातभांडवली पितृसत्ताक संस्कृती उलगडून दाखवते. जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचा पर्याय देते.

'सत्ताधारी वर्ग सत्तेच्या समर्थनात जनतेची विचारसरणी व संस्कृती घडवतो.’ या सूत्रावर आधारित लेख श्रुंखलेत गेली वर्षभर आपण चर्चा करत आहोत. यात प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन व वासाहतिक काळातील शिक्षण सिद्धांत व आंतरद्वंद समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. अंतोनिओ ग्राम्शी आणि पाओलो फ्रेरे यांनी मांडलेली वर्गीय समाजातील शिक्षण पद्धती व त्यातील आंतरद्वंद समजून घेतला. फुले-आंबेडकरांची पितृसत्ताकजाती समाजातील शिक्षण व्यवस्थेची चिकित्सा आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका समजून घेतली. मध्यममार्गी गांधींच्या भूमिकेची चर्चाही आपण केली. शरद् पाटलांनी मांडलेल्या बहुस्तरसत्ताक समाजरचनेची चर्चा आपण करणार आहोत. भारतातील समाज रचना केवळ जातीय, वर्गीय किंवा पुरुषसत्ताक नाही, तर जातवर्गीय पुरुषसत्ताक आहे. बहुस्तरसत्ताक समाजरचना आहे. या समाजरचनेतील शिक्षणाची वैशिष्ट्ये व स्वरूप समजून घ्यावे लागतील.

जातवर्गपुरुषसत्ताक समाज व्यवस्था भारतात असल्याचे सिद्धांकन शरद् पाटलांनी केले. मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद या तत्त्वज्ञानाची उभारणी केली. वर्गजातीस्त्रीदास्य अंताचा दृष्टिकोन मांडला. बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादातून समाजविकासाचा क्रम त्यांनी मांडला. स्त्रीसत्ताक समाज, मातृसत्ता, पितृसत्ताक वर्ण व्यवस्था (द्वैवर्ण, त्रैवर्ण, चातुरवर्ण), पितृसत्ताक जाती व्यवस्था व जातवर्ग पितृसत्ताक व्यवस्था असा समाज विकासाचा क्रम असल्याचे त्यांनी मांडले. बहुसंस्थात्मक शासन आणि शोषणाची व्यवस्था कार्यरत असून या संस्था एकात्मपणे शोषण आणि शासनाची व्यवस्था टिकवून ठेवतात. उच्च जातीय, भांडवलदार व जमीनदार यांचे हितसंबंध एकच आहेत. याचे विश्लेषण करताना ते म्हणतात, ‘भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यत: हिंदू बनिया जातींमधून विकसित झाला, तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध, जाती व्यवस्था अबाधित ठेवायची असल्याने व्यक्तिस्वातंत्र्याधिष्ठित पाश्चात्य लोकशाहीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते.’ जमिनीचा मालकी-अमालकी संबंध जाती व्यवस्थेशी जवळचा आहे. जाती व्यवस्थेचा शोषणाधिष्ठित भौतिक साचा तयार करण्यात जमिनीचे मालकी संबंध महत्त्वाची भूमिका बजावतात.

माफुआं हे तत्त्वज्ञान आहे. कोणतेही तत्त्वज्ञान व्यवस्थेला लावून वास्तव समजून घेता येते. माफुआं जातवर्गीय उत्पादन संबंध व जातभांडवली पितृसत्ताक संस्कृती उलगडून दाखवते. जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचा पर्याय देते. भारतात सामंती (जातीगत), अर्धसामंती (मूळ साचा जातिगत, परंतु आधुनिक साधन व कौशल्याचा समावेश) आणि भांडवली (औद्योगिक उत्पादन, तंत्रज्ञान, ऊर्जा, मशीन इत्यादी) उत्पादन व्यवस्था अस्तित्वात आली आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे ६८.८९ टक्के लोकसामंती व अर्धसामंती उत्पादन करत होते. ३० टक्क्यांच्या आसपास भांडवली उत्पादन अस्तित्वात आले होते. या वास्तवातून दोन बाबी स्पष्ट होतात - १) सामंती उत्पादन नष्ट करून औद्योगिक उत्पादन अंमलात आणण्याची भूमिका घेतली नाही, तर मूळ साचा कायम ठेवून काही सुधारणा घडवल्या. २) ७० टक्क्यांच्या आसपास जाती उत्पादन संबंध कायम ठेवून जातीव्यवस्था टिकवली गेली. इथला भांडवलदार वर्ग जाती चौकटीतून आला असल्यामुळे जाती वर्चस्वातून भांडवली हितसंबंध टिकवणे त्यांना अपरिहार्य झाले. जाती व्यवस्था टिकली तर इथला भांडवलदार वर्ग टिकून राहणार, हे जातवर्गीय जैविक व एकात्म संबंध आज अस्तित्वात आले आहेत.

याची दुसरी बाजू सांस्कृतिक रचनेची आहे. भारतातील सांस्कृतिक रचना जाती व्यवस्था टिकवण्यासाठी उभी केली गेली. आजही केली जात आहे. जगभर संस्कृतीच्या निर्मात्या स्त्रिया होत्या. भारत याला अपवाद नव्हता. निसर्गाशी एकात्म पावलेली व समतेची संस्कृती स्त्रियांनी निर्माण केली होती. शाश्वत संस्कृती निर्माण केलेल्या स्त्रियांवर कृत्रिम संस्कृती जाती व्यवस्थेने लादली. योनीशूचिता लादून पितृसत्ताक बंधने स्त्रियांवर आणली. मानव समाजाची अर्धी शक्ती मुख्य प्रवाहातून बाहेर करून गुलाम केली. सतीप्रथा, बालविवाह, विधवा विवाहास बंदी, जातीतच विवाह, सौभाग्यवती, पतीव्रता याचे गौरवीकरण केले गेले. चूल-मूलपर्यंत मर्यादित असणे हेच जीवनाचे सर्वस्व आहे, अत्युच्य मूल्य आहे अशी धारणा जाती संस्कृतीने घडवली. भांडवली उत्पादन पद्धती आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून स्त्रियांनी उंबरठा ओलांडला, परंतु पुरुषसत्ताक नेणीव कायम राहिली. वडाच्या झाडाभोवतीच्या फेऱ्या, गळ्यातील मंगळसूत्र, कपाळावरील कुंकू, (आता टिकली) हाताच्या बांगळ्या, पायातील जोडवे व चूल-मूलची जाणीव कायम राहिली आहे. धार्मिक सण आणि कर्मकांडातून जाती संस्कृतीची जाणीव-नेणीव घट्ट केली जाते. संस्कृतीचा हा पोत केवळ स्त्रियांपुरता मर्यादित आहे असे समजणे चूक होईल. संस्कृती समाजाचा जगण्याचा भाग बनते. ती सगळ्यांची बनते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, नीती-अनीती संस्कृतीच्या माध्यमातून व्यक्ती ठरवत असतो. ब्राह्मणी संस्कृतीने व्यक्ती व समाजाला जाती व्यवस्था समर्थक दृष्टी दिली व भांडवली नीतिमूल्यांशी हातमिळवणी घडवली.

जातभांडवली उत्पादन संबंधातून होणारे शोषण दडवण्यासाठी संस्कृतीचा वापर सत्ताधारी करत आलेले आहेत. समाजातील आर्थिक स्तरीकरणाची कारणमीमांसा न करता, नशिबाचे भोग म्हणून आर्थिक स्तरीकरणाचा विचार केला जातो. गरिबीरेषेखालील, गरीब, निम्न वर्गीय, मध्यम वर्गीय, उच्चमध्यम वर्गीय आणि उच्च वर्गीय अशी बहुस्तर आर्थिक, सामाजिक रचना अस्तित्वात आली आहे. जातवर्गीय उत्पादन संबंध व वितरण रचनेतून व्यवहारात शोषणाची जाणीव जनतेला होते, परंतु त्याची कारणमीमांसा होत नाही. वर्गीय समाजात शोषित वर्गाला शोषक वर्गाचा प्रतिनिधी बनण्याचे स्वप्न पाहता येते. जाती समाजात उच्च जात होण्याचे स्वप्न पाहता येत नाही. तो उच्च जातीचे प्रतिरूप बनण्याचे स्वप्न पाहतो. ते कधीच साकार होत नाही. तो आपल्या दु:खाचे उत्तर मोक्ष प्राप्तीत शोधतो. चराचर विश्व नाशिवंत असून मोक्ष हेच शाश्वत आहे. असे मानून जातवर्ग पितृसत्तेला शरण जातो.

ब्राह्मणी शिक्षणाचे प्रतिबिंब व बहुपदरी शिक्षण व्यवस्था समजून घेण्यासाठी, जातवर्गपितृसत्ता समाज रचनेतील भौतिक आणि सांस्कृतिक अंग विस्ताराने समजून घेणे गरजेचे होते. जाती व्यवस्थेची शिक्षणबंदीची भूमिका आणि भांडवली व्यवस्थेची जुजबी शिक्षण देण्याची भूमिका या दोन्हींची संमिश्र भूमिका शिक्षणात कार्यरत आहे. जाती उत्पादनाशी निगडित वर्गाची विशेषत: ग्रामीण भागाची शिक्षणबंदीची भूमिका घेतली गेली आहे. भारत सरकारचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल शिक्षण बंदीचा पुरावा आहे. भारतात ८ लाख ४९ हजार ९९१ मुले शाळाबाह्य (शाळा बंद झाल्यामुळे शिक्षणातून बाहेर फेकले गेले) आहेत. त्यातील ३ लाख ७८ हजार ८७७ मुली आहेत. महाराष्ट्रातील १५ हजार ३५७ किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण ३० हजार ७५४ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे हा अहवाल सांगतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात घेतलेल्या शिक्षण बंदीच्या भूमिकेचे हे प्रतिबिंब आहे.

हा अहवाल म्हणतो, शाळाबंदीचा सर्वाधिक परिणाम किशोरवयीन मुलींवर झाला आहे. शाळाबाह्यतेचा प्रश्न साडेआठ लाख विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही, तर गावची शाळा बंद झाल्यामुळे गावात शाळाबंदीचे पुनरुत्पादन घडणार आहे. पिढ्यान‌्पिढ्या शिक्षणबंदी घडवण्याची ही रचना आहे. किशोरवयीन मुली शाळाबंदीमुळे लग्नाच्या बेडीत व मुले कौटुंबिक सामंती, अर्धसामंती उत्पादनात ढकलले जातील. सामंती, अर्धसामंती उत्पादन आणि बालविवाह ही जाती व्यवस्थेची लक्षणे आहेत. शाळाबंदीतून जाती व्यवस्थेचे पुनरुत्पादन आणि बळकटीकरण केले जाईल. शाळाबंदीची सांस्कृतिक बाजू व भांडवली हितसंबंधाची चर्चा यापुढे आपण करणार आहोत.

rameshbijekar2@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in