शिक्षण...महर्षी सम्राट ते माफिया

सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी पहिल्या वहिल्या स्री शिक्षिका म्हणून स्वतःची इतिहासात नोंद करणे भाग पाडले.
शिक्षण...महर्षी सम्राट ते माफिया

महात्मा जोतिबा फुले यांनी अविद्येचे अनर्थ म्हणजे शिक्षण न घेतलेचे दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे सांगितले. ते पण दीड-दोनशे वर्षांपूर्वी सांगितले. ते तेवढ्यावर थांबले नाहीत, तर स्त्री शूद्रातिशूद्रानी शिक्षण घेतले पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्या घटकांच्यासाठी शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाची दारे खुली केली. प्रस्तापितांचा रोष ओढावून घेऊन त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले व त्यांना इतरांना शिकवायला लावले. उच्चवर्णीयांची अवहेलना सहन केली. सावित्रीबाईंनी अभिजनांचे शेणगोळे झेलले. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी पहिल्या वहिल्या स्री शिक्षिका म्हणून स्वतःची इतिहासात नोंद करणे भाग पाडले. महात्मा फुले यांनी लावलेल्या या स्त्री शूद्रातिशूद्रासाठीच्या शैक्षणिक रोपट्याचा कालांतराने वटवृक्ष झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व प्रश्नाचे मूळ अज्ञानात असलेचे कथन करून ग्रामीण भागात शिक्षणप्रसार केला. त्यांनी शिक्षण क्लासमधून मासमध्ये आणले. माधुकरी म्हणजे भीक मागून शाळा शिकायच्या जमान्यात कर्मवीरांनी काम करून शिकायला सांगितले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ‘कमवा व शिका’ हा संदेश देऊन त्यांनी राबणाऱ्या बहुजनांच्या हातात खुरप्याबरोबर लेखणीची दिली. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेकडो समाजसेवक पुढे आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा अन‌् संघर्ष करा’ हा मंत्र दिला. त्यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात अन‌् अगदी वाड्यावस्त्यात नेली. त्यामुळेच ग्रामीण महाराष्ट्र अन‌् तिथं असणारा राबणारा बहुजन शैक्षणिक प्रवाहात आला. शिक्षणाला राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या सारख्या प्रजाहितदक्ष राजांनी राजाश्रय दिला. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात वेगवेगळ्या जात घटकासाठी वसतिगृहे उभारली. शिक्षण सक्तीचे केले. शिक्षणासाठी अहोरात्र झगडणाऱ्या समाजसुधारकांना अत्यंत मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय होता. राजे रजवाडे, सरदार, सरंजामदार, संस्थानिक यांनी त्यांचे राजवाडे अन‌् जमिनी दिल्या, तर सामान्य घरातील महिलांनी मूठमूठभर धान्य दिले. समाजाच्या सर्व थरातून भरीव मदत शिक्षणासाठी होत होती. ‘जेवणाचे ताट मोडा,भाकरी हातावर घेऊन खा; पण मुलांना शिकवा’ असा अत्यंत हृदयस्पर्शी उपदेश संत गाडगेबाबांनी समाजबांधवांना केला होता. इसवी सन १८८०मध्येच महात्मा फुले यांनी तत्कालीन हंटर कमिशन पुढे प्रदीर्घ स्वरूपाची साक्ष देऊन शिक्षणाचे महत्त्व, त्याची दुरवस्था व त्यावरील उपाययोजना जगासमोर मांडल्या होत्या. ‘एक दिन तरी मद्य वर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी,’ असं महात्मा फुले कळकळीने सांगत होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जनमानसात शिक्षणाविषयी आस्था निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणूनच समाजाच्या सर्व थरातून शिक्षण संस्थांना मदत होत होती. उदारहस्ते देणग्या दिल्या जात होत्या. अशा देणग्या देताना समाजात शिक्षणप्रसार झाला पाहिजे हा विचार होताच. त्याचबरोबर शिक्षण संस्थाचालकांवर लोकांचा मोठा विश्वास होता. आपण दिलेली देणगी वा मदत शिक्षणासाठीच वापरली जाईल, असा त्यांना दुर्दम्य विश्वास होता. तो संस्थाचालक सार्थ ठरवत होते. ते सर्व संस्थाचालक समाजासाठी काम करत होते. म्हणून त्यांना समाजानेच ‘शिक्षण महर्षी’ अशी उपाधी दिली होती. ती सार्थ होती. कालांतराने काही पुढारीपणाची खुमखुमी असणारा घटक शिक्षण क्षेत्रात कार्यरत झाला. त्यात समाजशिक्षण कमी अन‌् आपले राजकीय नेतृत्व जास्त हा हेतू होता. शिक्षण हे त्यांचे साध्य नव्हते. तर ते साधन होते. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा व पद हे त्यांचे साध्य व ध्येय होते. त्यांना समाजातून उत्स्फूर्तपणे देणग्या मिळत नव्हत्या, तर देणग्या गोळा करण्याची त्यांची अनोखी खुबी होती. शिक्षण संस्था स्थापन करणे हा त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यांचा हेतू निखळ समाजसेवा नव्हता. समाज शिकला पाहिजे यास त्यांनी गौण स्थान दिले होते. त्याऐवजी त्यांचे पुढारीपण हाच त्याचा केंद्रबिंदू होता. समाजाने अशा संस्थाचालकांना कधी शिक्षण महर्षी म्हटले नाही. त्यांनी शिक्षणाचे साम्राज्य निर्माण केल्यामुळे त्यांना ‘शिक्षण सम्राट’ अशी उपाधी दिली गेली. अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांना खुलेआम परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचा परिणाम म्हणून शिक्षण संस्थांचे भरघोस पीक आले. गोरगरीब घटकांची पोरं शिकावीत म्हणून संस्था काढणारे कालबाह्य झाले. पैसे मिळविण्यासाठी संस्था सुरू झाल्या. ज्याना साखर कारखाना काढणे शक्य नाही, त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. त्यातून साखर कारखान्यापेक्षा जास्त फायदा व्हायला लागला. तो एक धंदा झाला. त्यातून सेवा, समाजसेवा असले शब्द व त्यांचे हेतू हद्दपार झाले. निखळ नफा पाहूनच व्यवहार व्हायला लागले. शिक्षणाचा बाजार झाला. नि:स्वार्थी समाजसेवकांची जागा स्वार्थी व व्यापारी वृत्तीच्या घटकाने घेतली. गुरुदक्षिणा या शब्दाचा अर्थ बदलला. शिष्यांनी शिक्षणाच्या बदल्यात गुरूला दिलेली बिदागी म्हणजे गुरुदक्षिणा. हा व्यवहार संपुष्टात आला. त्याऐवजी गुरुजी होण्यासाठी संस्थाचालकांनी घेतलेल्या भरघोस बिदागीला गुरुदक्षिणा म्हटले जाऊ लागले. असे संस्थाचालक मग ‘शिक्षण माफिया’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दीड-दोनशे वर्षांत आपण शिक्षण संस्थाचालकांची शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट अन‌् शिक्षण माफिया अशी तीन रूपे बघितली. स्वतःच्या खांद्यावरून ग्रामीण बहुजनांची पोरं शाळेत आणणारे कर्मवीर आणि स्वतःच्या अंगावरील सौभाग्य अलंकार विकून मुलांना शिकवणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील, कुठं अन‌् आताचे शिक्षणाचं बाजारीकरण करून बायको, सुना, लेकी यांना अलंकाराने मढवणारे, ऐश आरामात जीवन जगणारे कोट्यधीश शिक्षण माफिया कुठं?म

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in