वर्णव्यवस्थेतील शिक्षण

भारतीय समाजव्यवस्थेतील शिक्षणाचे स्वरूप आणि त्याचे वितरण हे प्राचीन काळापासून वर्णव्यवस्थेशी निगडित राहिले आहे. क्षुद्र आणि अतिक्षुद्रांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचा इतिहास अनेक उदाहरणांमधून दिसून येतो- शंबुकाचा वध आणि एकलव्याच्या अंगठ्याची कथा याचे उत्तम उदाहरण आहे. प्रस्तुत लेखात शिक्षणाच्या खासगीकरणाच्या संदर्भात गुरुकुल प्रणालीच्या प्रभावाची चर्चा करण्यात आली आहे.
वर्णव्यवस्थेतील शिक्षण
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

भारतीय समाजव्यवस्थेतील शिक्षणाचे स्वरूप आणि त्याचे वितरण हे प्राचीन काळापासून वर्णव्यवस्थेशी निगडित राहिले आहे. क्षुद्र आणि अतिक्षुद्रांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचा इतिहास अनेक उदाहरणांमधून दिसून येतो- शंबुकाचा वध आणि एकलव्याच्या अंगठ्याची कथा याचे उत्तम उदाहरण आहे. प्रस्तुत लेखात शिक्षणाच्या खासगीकरणाच्या संदर्भात गुरुकुल प्रणालीच्या प्रभावाची चर्चा करण्यात आली आहे. शिक्षण आणि वर्णव्यवस्थेच्या संघर्षाचा वेध घेताना, लेखात ब्राह्मणी आणि अब्राह्मणी ज्ञान परंपरांचे सामाजिक परिणाम स्पष्ट केले आहेत.

शंबुकाचा वध व एकलव्याचा अंगठा कापण्याची व्यथा ज्ञानबंदीच्या संघर्षाची होती. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून रामाने शंबुकाचा वध केला. वेदाचे अध्ययन करण्याचा अधिकार वेदांतिक श्रुतीप्रमाणे ब्राह्मणांना होता. शंबुकाने हा नियम मोडल्यामुळे रामाने शंबुकाला प्राणांतिक शिक्षा केली. एकलव्याचे शिष्यत्व द्रोणाचार्याने नाकारले. कारण एकलव्य क्षत्रिय नव्हता. स्वयं प्रज्ञेने एकलव्याने ज्ञान प्राप्ती केली. क्षत्रिय धर्म मोडल्यामुळे अंगठा कापून एकलव्याचे ज्ञान हिरावून घेतले गेले. एकलव्याप्रमाणे सत्यकाम जाबालाने स्वयंभू व उपकोसल कामलायन यांनी गुरुकुलात बारा वर्ष परिचर्या करून स्वयंभू ब्रह्मज्ञान प्राप्त केले, असे शरद पाटील सांगतात.

गुरुकुलात व गुरुकुलाबाहेर ज्ञानव्यवहाराचा हा संघर्ष शिक्षण बंदी व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या दोन भूमिकांचा संघर्ष होता. वर्णांतर्गत विवाहाच्या सक्तीमुळे वर्णसंकर रोखून वर्णव्यवस्था कर्मठ झाली. तसेच शिक्षण बंदीमुळे शुद्रांना मुख्य ज्ञान प्रवाहाचा भाग बनण्यास रोखले गेले. (ज्ञान व्यवहारात खुलेपण नसल्यास ज्ञान प्रवाही न राहता कुंठीत होते.) याच्या परिणामी मोठा समूह निर्णय प्रक्रियेतून बाहेर फेकला गेला व गुलामगिरी अवस्थेपर्यंत पतित झाला. दासप्रथाक गुलामगिरी व शुद्रप्रथाक गुलामगिरी अशा दोन अवस्था वर्ण व्यवस्थेत पहायला मिळतात. स्त्रीसत्ताक काळातील स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मूल्ये आणि जमिनीची, वंशाची व उत्पादित मालाची सामूहिक मालकी वर्ण व्यवस्थेत संपुष्टात आली. जमिनीची मालकी असलेला वर्ग व जमिनीची मालकी विहीन वर्ग अशी समाजरचना अस्तित्वात आली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या चार वर्णांत क्षुद्रवर्ण समाजरचनेत सर्वाधिक तळाशी आला. क्षुद्राला उपनयन संस्कार नाकारल्यामुळे क्षुद्रांचे अधिकार नाकारले गेले. शिक्षण बंदी हा त्यातील एक भाग होता. 'विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.' या विधानात जोतिराव फुलेंनी अविद्येतून स्त्रीक्षुद्रातीक्षुद्राच्या पतनाची लावलेली संगती तंतोतंत वर्ण व्यवस्थेतील गुलामगिरी प्रथेला लागू पडते.

समाज जीवन जसे नैसर्गिक गती नियमाने चालते, तसेच ते सामाजिक गती नियमानेही चालते. हे सामाजिक नियम उत्पादन (सृजन) व वितरण नियमांशी बांधील असतात. चातुर्वर्ण व्यवस्थेत (उत्तर वैदिक) अतिरिक्त उत्पादन उदयाला येऊन खासगी मालमत्तेने जन्म घेतला व शोषण व्यवस्था अस्तित्वात आली. शोषण व्यवस्था समाज जीवनाचा भाग बनली. ती टिकवण्यासाठी ब्रह्मविद्येचा जन्म झाला. यातून परस्परविरोधी ज्ञान शाखा अस्तित्वात आल्या. या ज्ञान शाखा ब्राह्मणी-अब्राह्मणी ज्ञान शाखा म्हणून ओळखल्या जातात. अब्राह्मणी ज्ञानपरंपरा भारताची सर्वात प्राचीन ज्ञानपरंपरा होती. तंत्र व सांख्य हे अब्राह्मणी तत्त्वज्ञान स्त्रीसत्ताक व मातृसत्ताक काळातच जन्माला आले होते. ब्राह्मणी ज्ञानपरंपरा त्यानंतरची परंपरा असल्यामुळे अब्राह्मणी परंपरेशी तिचा संघर्ष होऊन वेदांत (उत्तर-मीमांसा) व पूर्व- मीमांसा हे तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. हा संघर्ष परस्परविरोधी दोन भिन्न समाज व्यवस्था प्रतिबिंबित करतो. अब्राह्मणी परंपरा स्वातंत्र्य, समता व लोकशाही मूल्यावर अधिष्ठित उत्पादन (सृजन) व समान वितरणाचा (वाटप) पुरस्कार करत होती व मुक्त लैंगिक संबंधातून मानवी वंशाचे पुनर्उत्पादन करत होती, तर चातुर्वर्ण व्यवस्थेत योनीशूचिता लादून मानवी वंश पुरुषप्रधान झाला, स्वामी-दास संबंधातून भौतिक शोषणाची व्यवस्था अस्तित्वात आली.

अब्राह्मणी-ब्राह्मणी तत्त्वज्ञानांना द्वैत-अद्वैत असेही संबोधले जाते. ही तत्त्वज्ञाने एकमेकांवर प्रभाव गाजवत क्रमाक्रमाने विकसित झाली आहेत. अब्राह्मणी तत्त्वज्ञाने विशेषत: तंत्र व सांख्य हे तत्त्वज्ञान उत्पादनाशी, (सृजन) पुनर्उत्पादनाशी, उत्पादन ज्ञानाशी एकात्म होते. ब्राह्मणी तत्त्वज्ञान सुरुवातीला जमिनीशी नाते जोडून होते. हळुहळु जमिनीशी हे नाते विलग होऊन आकाशाचे (ब्रह्मविद्येचे) नाते ब्राह्मणी तत्त्वज्ञानात प्रभावी झाले. त्यामुळे उत्पादक श्रमाशी ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे नाते तुटून उत्पादक ज्ञान व पारलौकिक ज्ञानाची एकमेकांपासून फारकत झाली. पारलौकिक ज्ञान मुख्य प्रवाहाचे ज्ञान बनल्यामुळे शिक्षणात पारलौकिक (वेदांतिक ब्रह्मज्ञान) ज्ञान मुख्य ज्ञान बनले. उत्पादक ज्ञानाला दुय्यमत्व प्राप्त झाले. ज्ञानाची अशी विभागणी समाजाच्या विभागणीला ही कारणीभूत ठरली. या विभागणीचे प्रतीक म्हणून स्वामी-दास संबंधाकडे आपण बघू शकतो. स्वामी (द्विजवर्ण) हा जमिनीचा मालक व जमिनीत राबणारा दास (क्षुद्र) अशी श्रम विभागणी अस्तित्वात आली. ही श्रम विभागणी ज्ञानाचा अधिकार रोखण्यापर्यंत गेली. स्वामीगणांनी क्षुद्रांना वेदाध्यन करण्यापासून रोखल्याचे उदाहरण इतिहासात सापडतात.

उतरंडीची चातुर्वर्ण सामाजिक रचना, श्रम व श्रमिकांची विभागणी, विभागणी टिकवून ठेवण्यासाठी उभारलेले तत्त्वज्ञान व मनुस्मृतीने तयार केलेली दंडसहिता ही प्रमुख लक्षणे वर्ण व्यवस्थेची होती. या प्राचीन वैदिक समाजरचनेचा प्रभाव गुरुकुल शिक्षण पद्धतीवर पडला होता. गुरुकुलात आचार्य ब्राह्मणच होते. उपनयनाचा अधिकार असलेल्या वर्णांनाच गुरुकुलात प्रवेश होता. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांना उपनयनाचा अधिकार होता. क्षुद्रांना उपनयनाचा अधिकार नव्हता. त्यामुळे क्षुद्रांना गुरुकुलात प्रवेश नव्हता. क्षत्रिय व वैश्यांना क्रमाक्रमाने प्रवेश दिला गेला. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांना वेगवेगळे शिक्षण दिले जात होते. ब्राह्मणांना ब्रह्मविद्या (वेदाध्ययन), क्षत्रियांना युद्ध विद्या व वैश्यांना व्यापार विद्या शिकवली जात होती. यातून स्पष्ट दिसते की, ज्ञानव्यवहार मर्यादित व ज्ञानाची समग्रता संकुचित करण्यात आली होती.

वर्ण व्यवस्था टिकवण्याचा भाग म्हणून गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. क्षुद्रांना शिक्षण बंदी व वेदांतिक शिक्षण आशय, ही प्रमुख लक्षणे गुरुकुल शिक्षण पद्धतीची होती. ही पद्धती समाज विकासाला व ज्ञानाची प्रवाहिता राखायला अडथळा ठरली. गुरुकुलातील अध्ययन-अध्यापन पद्धती मौखिक व पाठांतर पद्धतीवर आधारित होती. गुरूचे (आचार्याचे) स्थान सर्वोच्च (देवस्थानी) स्थानी, सर्वज्ञानी, अंतिम ज्ञानी असल्यामुळे व्यवस्थेला आव्हान उभे करणारे प्रश्न उपस्थित होऊ शकत नव्हते. अध्ययन-अध्यापनात अभिजन (संस्कृत) भाषेचा माध्यम म्हणून स्वीकार झाला. गुरुकुलातील शिक्षण अभिजनांसाठीच असल्यामुळे लोकभाषेचा पुरस्कार केला गेला नाही. गुरुकुलातील शिक्षण क्रयवस्तू झाली होती, असा धक्कादायक खुलासा शरद पाटील त्यांच्या दासक्षुद्रांची गुलामगिरी भाग-२ मध्ये करतात. भारतात शिक्षणाचे खासगीकरण अधिकृतपणे १९८६पासून झाले. अशी समज शिक्षण अभ्यासकांसह माझीही होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अभ्यास करताना या समजुतीला धक्का बसला. गुरुगृही वा आश्रमात विद्यार्थ्याला सर्व प्रकारची कामे व गुरूची सेवा करावी लागायची. गुरुदक्षिणा द्यावी लागायची. ही कामे आश्रमातील किंवा गुरुगृहातील घटक म्हणून नव्हे, तर प्रवेशाची अट म्हणून बंधनकारक होती. महाभारतातील उदाहरण देऊन शरद पाटलांनी ते स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्याला विद्याध्ययनासाठी कोणत्याही स्वरूपाचा मोबदला चुकवण्याची प्रवेश अट शिक्षणाचे खासगीकरणच असते.

ब्राह्मणीकरण व खासगीकरणावर अधिष्ठित गुरुकुल शिक्षण व्यवस्थेत क्षुद्राच्या शिक्षण बंदीचे पा. वा. काणे समर्थन करतात. त्यांच्या मते वेदांचे सर्जन व संरक्षण ब्राह्मणांनी केले असल्यामुळे वेदाध्ययनाचा अधिकार ब्राह्मणांचाच आहे. वेदाध्ययनाच्या बंदीपासून ते वेदाध्ययनाच्या सक्तीपर्यंत गुरुकुल शिक्षण पद्धतीचे समर्थन आजही केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणात गुरुकुल शिक्षण पद्धतीचे गौरविकरण व मूल्य, नीतीचे समर्थन केले आहे. जे अप्रत्यक्षपणे शिक्षण बंदीचे व ब्राह्मणीकरणाचे समर्थन ठरते.

जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र.

ramesh bijekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in