निर्भय, निकोप वातावरणात निवडणुका व्हायला हव्यात!

निवडणुकांत पुराव्यानिशी भूमिका घेतली. तरच आदर्श आचारसंहिता आपण पाळायला भाग पाडू शकतो. आचारसंहिता अतिशय महत्त्वाची आणि आदर्श आहे. आपण एक नागरिक म्हणून आपले संविधान वाचवण्यासाठी, कायदा वाचवण्यासाठी वंचित, बहुजनांच्या बाजूने काम करणारे सरकार देशात आणण्यासाठी घेतला पाहिजे.
निर्भय, निकोप वातावरणात निवडणुका व्हायला हव्यात!
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

निवडणुकांत पुराव्यानिशी भूमिका घेतली. तरच आदर्श आचारसंहिता आपण पाळायला भाग पाडू शकतो. आचारसंहिता अतिशय महत्त्वाची आणि आदर्श आहे. आपण एक नागरिक म्हणून आपले संविधान वाचवण्यासाठी, कायदा वाचवण्यासाठी वंचित, बहुजनांच्या बाजूने काम करणारे सरकार देशात आणण्यासाठी घेतला पाहिजे.

लोकशाहीच्या देशात लोकशाहीतील सर्वोच्च उत्सव म्हणजे निवडणुका. महाराष्ट्रात आपण दिनांक २० नोव्हेंबर रोजी अतिशय निर्णायक अशा निवडणुकीला सामोरे गेलो, मतदान केले. मतदान केल्यानंतर आनंद होतो. या दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जाणीवपूर्वक निर्णय करून त्या सगळ्या प्रक्रियेत जवळून सहभाग घेतला. आम्ही नेहमीच म्हणत आलो की, ही निवडणूक देशाचे संविधान वाचवण्यासाठी आपण महत्त्वाची मानत आहोत. पण केवळ भाषणांमध्ये संविधान वाचवायचे, असे म्हणणे आणि तशी घोषणा देणे पुरेसे नाही. प्रत्यक्ष संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्याची पायमल्ली होत असताना प्रत्यक्ष फिल्डवर, जमीन स्तरावर कृती करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सर्वप्रथम ज्यावेळेला प्रत्येक बूथवर पोलिंग एजंट बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी जवळून अनुभवले, किती बाजारू पद्धतीने चालते. म्हणजे एका बुथवर एक पोलिंग एजंट बसवण्याचा उमेदवार दर लावतात. कोणतेही प्रशिक्षण नसताना, प्रत्यक्ष तिथे जाऊन काय करायचे? हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मी मतदानाला गेलेल्या वेळी विचार केला की, आपण हे या निर्णायक क्षणी का सहन करतोय?

मी संबंधित उमेदवाराच्या प्रतिनिधीला शांतपणे जिथे निवडणूक आयोगाने आखलेली रेषा खाली होती त्या रेषेच्या बाहेर उभा राहायला सांगितले. तुम्ही प्रतिनिधी आहात बाहेर उभे राहा. आलेल्या मतदारांशी बोलायचं काहीच कारण नाही आणि इथे जर तुम्ही प्रचार केलात, तर त्यावर माझी हरकत आहे. तेवढेच म्हणून मी थांबले नाही, तर सीव्हीजल नावाच्या ॲपवर मी त्या प्रतिनिधीच्या पुढच्या बाजूला उभे राहून माझा व्हिडीओ केला आणि ही तक्रार सीव्हीजलवर दाखल केली. त्या माझ्या तक्रारीत तीन गोष्टी नमूद केल्या. पहिली गोष्ट म्हणजे, उमेदवाराचा प्रतिनिधी अमुक-अमुक या ठिकाणी उभे राहून प्रचार करत आहे. दुसरी ज्या ठिकाणी त्या उमेदवाराचे गुंड जे विभागात, प्रभागात माहिती आहेत ते उभे आहेत. पण त्यांच्या उभ्या असण्याने दहशत निर्माण होते आहे. सांगायला हरकत नाही इथे त्यातले काही तर तडीपार होते ऑन रेकॉर्ड. त्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या पोलीस बाई होत्या, त्या शांतपणे विरुद्ध दिशेला तोंड करून त्यांच्या कोणातरी फॅमिलीतल्या नातेवाईकांशी फोनवर गप्पा मारत होत्या. हे सगळं व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करून मी तो व्हिडीओ अपलोड केला आणि त्यानंतर वीस मिनिटांच्या आत त्या बुथवर प्रत्यक्ष स्क्वाड आले. ज्यामध्ये प्रांताधिकारी स्तरावरचे महसूल अधिकारी, निवडणूक स्क्वाड म्हणून नेमलेले होते आणि त्याने त्वरित मला फोन करून सगळी माहिती घेतली. त्याच वेळेला मी अशीही तक्रार नमूद केली की, शंभर मीटरच्या आतमध्ये उमेदवाराचा बूथ लागलेला आहे की, जो त्यांनी तातडीने बाहेर काढला. केवळ संविधान वाचले पाहिजे, असे म्हणून चालणार नाही, तर संविधानाला अपेक्षित असणाऱ्या निर्भय आणि निकोप वातावरणात निवडणुका घडत असताना आदर्श आचारसंहितेच्या विरोधात घडत असलेल्या घटना जेव्हाच्या तेव्हा थांबवणे आणि आधी आपण निर्भयपणे भूमिका घेणे हे मला अतिशय महत्त्वाचे वाटते. हे असे करता येते आणि ते केले पाहिजे, तरीही आपण सुरक्षित राहू शकतो. याचे समाधान आणि आनंदही मिळतो.

चुकीचे वागणाऱ्यांच्या वरती वचक निर्माण होतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करून निघून गेलो, तर ती परिस्थिती बदलणार नसते. मग हळूहळू त्या संदर्भामध्ये बोगस मतदानापर्यंत प्रकरण जाऊ शकते. उमेदवाराच्या विरोधात मतदार येण्यापूर्वीच मतदान होण्याची शक्यता वाढते. या सगळ्या आमच्या कृतिशील भूमिकेचा एवढा चांगला परिणाम झाला की, आमच्या कॉलनीत कोणीही उमेदवारांनी पाठवलेल्या रिक्षात बसायला तयार होईना. एका ठिकाणी पैसे वाटत होते तिथले शूटिंग केले तक्रार दाखल केली. बऱ्याच जणांनी स्टेटसवर आपल्या उमेदवाराचे चिन्ह आणि मतदान करा, असे आवाहन केले होते. त्याला हरकत घेतली. त्यामुळे तातडीने लोकांनी तेही स्टेटस काढून टाकले. एका ठिकाणी तर थेट नगरसेविकाच बुथवर आतमध्ये बसून आपल्या नेत्याचे मतदान करून घेत होत्या. त्यांची तक्रार केल्याक्षणी त्यांनाही तिथून निघून जावे लागले. अशा अनेक गोष्टी सीव्हीजलच्या मदतीने आम्ही करू शकलो आणि संपूर्ण दिवसभर निवडणूक आयोगाने नेमलेले सीव्हीजलचे स्क्वाड मतदारसंघात फिरत राहिले आणि सगळे जे कमांडो होते ते परत जात होते. काश्मीर आणि झारखंडचे त्यामुळेही खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्यावर वचक निर्माण करणे शक्य झाले आणि म्हणूनच केवळ निवडणुका निकोप वातावरणात झाले म्हणणे पुरेसे नाही संविधान वाचला पाहिजे, म्हणणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष जमीनस्तरावर उतरून थेट बूथ पातळीवर उतरून कृती करू शकलो. या पुढील काळातही सीव्हीजल या ॲपच्या संदर्भात आपल्याला कृतिशील राहावे लागेल. परंतु हे मात्र नक्की की, तक्रार दाखल झाल्यानंतर वीस मिनिटांच्या आत साताऱ्यामध्ये तरी आम्ही अनुभव घेतला की, स्क्वाड ॲक्टिव्हेट होतं आणि परिस्थिती बदलते आणि चुकीचं वागणाऱ्यावर अगदी कायदेशीर कारवाई नाही, पण प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्टने समज तरी मिळते आणि परिस्थिती नियंत्रणाखाली येते.

७५ वर्षांनंतरही या लोकशाही देशात जातीचे नेते जेव्हा जातीनुसार आपल्या लोकांची बोली लावतात त्यावेळेला निराश व्हायला होते. निवडणुकांत पुराव्यानिशी भूमिका घेतली. तरच आदर्श आचारसंहिता आपण पाळायला भाग पाडू शकतो. आचारसंहिता अतिशय महत्त्वाची आणि आदर्श आहे. आपण एक नागरिक म्हणून आपले संविधान वाचवण्यासाठी कायदा वाचवण्यासाठी वंचित, बहुजनांच्या बाजूने काम करणारे सरकार देशात आणण्यासाठी घेतला पाहिजे. कोट्यवधी रुपयाचा जर निवडणुका दरम्यान उमेदवाराला खर्च करावा लागणार असेल, तर निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून आपण भ्रष्टाचाराशिवायच्या कामकाजाची अपेक्षा कशी करू शकतो. जाणीवपूर्वक आपण भ्रष्ट गोष्टी करणार नाही, हे आधी आपण ठरवले पाहिजे. तत्त्वनिष्ठ राजकारण होण्यासाठी आपल्याला एका फार मोठ्या राजकीय प्रक्रियेतून संपूर्ण समूहासोबत काम करावे लागेल, याची जाणीव देणारी ही निवडणूक होती. सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते हे सत्तेसाठी आसुसलेले आहेत. त्यांचा हा कमी कालावधीत प्रचंड पैसा मिळवण्याचा व्यवसाय आहे. केवळ लोकशाही संविधान धर्मनिरपेक्षता, असे शब्द ते तोंडी लावण्यासाठी वापरतात. त्यामुळे पक्षांवर जरी विश्वास नसला, तरी इथल्या मतदारांच्या सामूहिक शहाणपणाच्या वर्तनावर आपण नक्कीच विश्वास ठेवू शकतो.

लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या असून लेक लाडकी अभियानच्या संस्थापक सदस्य आहेत.

logo
marathi.freepressjournal.in