हत्तींशी बोलणारा माणूस

हत्ती आणि माणूस याचा संबंध तसा फार जुना. आपल्या संस्कृतीत हत्तीला भरभराटीचं चिन्ह मानलं जातं.
हत्तींशी बोलणारा माणूस

हत्ती आणि माणूस याचा संबंध तसा फार जुना. आपल्या संस्कृतीत हत्तीला भरभराटीचं चिन्ह मानलं जातं. आपला धर्म, कला, साहित्य आणि लोककथांमध्ये हत्ती ही सांस्कृतिक प्रतिमा आहे. युद्धांमध्ये शत्रुला नामोहरम करण्यासाठी हत्तींचा महत्वाचा वाटा असायला. वाघ जरी जंगलाचा राजा असला तरी जंगलात रुबाब असतो तो हत्तींचाच. मात्र आज हे चित्र थोडं विदारक आहे. हत्तींच्या दातांसाठी होणाऱ्या शिकारी विरप्पनच्या पतनानंतर काहीशा थांबल्या, असं बोललं जात असलं तरी काही ठिकाणी ते मानवी वस्तीत घुसत असल्याने पशुवत वागणारा माणूस या जंगलाच्या रुबाबदार प्राण्याच्या जीवावर उठला आहे. पर्यायाने आपल्या जंगलांतून हत्ती नामशेष होत चालले आहेत. अशाही परिस्थितीत आनंद शिंदे नावाचा माणूस मात्र या हत्तींच्या संवर्धनासाठी त्यांच्या मागे दत्त बनून उभा आहे. हत्तींशी संवाद साधणारा हा आपल्यातला, आपल्या ठाण्यातला माणूस जगभर ‘एलिफंट व्हिस्परर’ म्हणून ओळखला जातो, पण आपल्याला, आपल्या मुंबईला या माणसाची पुसटशीच ओळख आहे. ही ओळख थोडी आणखी व्यापक व्हावी, म्हणून हा शब्दप्रपंच.

आनंद शिंदे हे व्यवसायाने वृत्तपत्र छायाचित्रकार. घटना, घडामोडींचे फोटो काढता काढता त्यांना वन्यप्राण्यांवर त्यातही हत्तींवर विशेष प्रेम जडले. तसं बघायला गेलं तर ठाण्याचा आणि वन्य हत्तींचा काहीच संबंध नाही. इथं जंगल आहे, पण हत्ती नाहीत. तरीही हत्तींवर एवढा जीव कसा जडला, हा स्वाभाविक प्रश्न माझ्याही मनात आला. यावर आनंद सांगतात, “आठ वर्षांपूर्वी एलिफंट या शब्दाचं स्पेलिंग व हत्तीचा आकार यापलीकडे मला काही माहीत नव्हतं. पण काही घटना अशा घडत गेल्या, माझ्या संवेदनशील मनाने हत्तींचा, त्यांचा वर्तनाचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. मी इंटरनेटवर, ग्रंथालयांतून हत्तींवरची माहिती, पुस्तकं झपाटल्यासारखं वाचत गेलो. यातून हत्तींवर आधारीत एक छायाचित्र प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी देशात अनेक भागात फिरून हत्तींचे फोटो काढले. हत्तींविषयी वाचलेली माहिती आणि छायाचित्रे काढताना केलेलं हत्तींचं निरीक्षण यातून मला काही गोष्टी गवसत गेल्या. प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे सात रस आहेत, तसे हत्तींमध्येही राग, लोभ, मोह, माया, मत्सर, आनंद आणि भीती असे भाव असतात, हे लक्षात आले. मग मला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं झालं. मी त्यांच्या कसा मिसळू लागलो, याचाही किस्सा भन्नाट आहे.’’

आनंद सांगतात, ‘‘केरळमधील कोचीजवळच्या हत्ती संवर्धन केंद्रात मी गेलो होतो. तिथे हत्तींचे फोटो काढता काढता हत्तीच्या पिलांमुळे मी त्यांच्या जवळ जाऊ शकलो. पिलं वेगवेगळे आवाज काढून संवाद साधतात, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांच्या आवाजाची नक्कल करू लागलो. मग पिलांना मी त्यांच्यातलाच वाटू लागलो. माझी त्यांच्याशी गट्टी जमली. मी त्यांच्या खेळातला एक सवंगडी झालो. म्हणतात ना एखाद्याच्या हृदयात घुसायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो, मी मात्र हत्तींशी जवळीकता साधण्यासाठी त्यांच्या पिलांचा मित्र बनून त्यांच्या कळपात घुसलो. आणि सहज त्यांच्यात मिसळलो. त्यांचा मूड असेल, त्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तन केलं की संवाद सोपा होतो, हे लक्षात आलं. अगदी वर्षभराच्या अभ्यासातून मी केलेल्या या संशोधनाला एक दर्जा प्राप्त झाला.’’

"हत्ती हा सर्वात मोठा मेंदू आणि सर्वांत मोठं हृदय असलेला प्राणी आहे. त्याचा स्वभाव त्याच्या मेंदूत दडलाय आणि त्याचं हृदय केवळ प्रेमानं भरलेलं असतं. आपण ठरवायचं त्यातलं आपण काय मिळवायचं.’’ खरं पहायला गेलं तर जिथे दोन माणसातला संवाद हरवत चाललाय, तिथे आनंद शिंदे हे हत्तींशी संवाद साधतात, त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलतात, हे केवळ अदभूत आहे. हत्तींवर पूर्णवेळ संशोधन आणि हत्तींचे संवर्धन करण्यासाठी आनंद यांनी २०१४ मध्ये ‘ट्रंक कॉल : दि वाइल्ड लाईफ फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापना केली. हत्तींचे संवर्धन करणे का गरजेचे आहे, यावर आनंद सांगतात, ‘‘२०१२ मध्ये देशात काही कारणांनी अनेक हत्ती मृत्युमुखी पडले होते. त्याची छायाचित्रे बघून मन सुन्न झालं होतं. आपण काहीतरी करायला हवं, असं वाटत होतं. यातूनच आपला खारीचा वाटा असावा, या विचारातून मी या संवर्धनाच्या कामाला वाहुन घेतले."

मध्यंतरी कर्नाटक सीमाभागात कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शेतीत हत्तींनी घातलेला धुमाकूळ बातम्यांचा, चर्चेचा विषय बनला होता. हत्ती असे का वागत असतील? आनंद सांगतात, “याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या अधिवासावर आपण केलेला हल्ला. त्यांचा रहिवासच आपण नष्ट करत चाललोय. मग त्याने रहायचं कुठं? आपण त्याचं घर उद्धवस्त केलं तर तो आपल्या घराकडेच येणार ना? हेच सिंधुदुर्ग काय, कोल्हापूर काय किंवा तिकडे कर्नाटक, केरळमध्ये घडलं. त्यांना जंगलात हुसकावून लावण्यासाठी क्रूर मार्ग अवलंबणे, हा त्यावरचा उपाय नाही. त्यांचा अधिवास सुरक्षीत करणं, हा त्यावरचा मार्ग आहे. आणि महाराष्ट्र सरकारने नुकतीच व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे ‘हत्ती प्रकल्पा’ची घोषणा केली आहे. तिचे स्वरुप अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा फार महत्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय आहे. तो महाराष्ट्रापुरता असला तरी तो देशासाठी पथदर्शी ठरावा.’’

“कर्नाटक आणि केरळ राज्यांनी आधीच अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यांनी हत्तींच्या सहजीवनावर जोर दिला आहे. त्यांचे खाद्य आणि पाणी असणारी जंगले समृद्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. विशेषतः माड आणि बांबूसारख्या वनस्पतींची लागवड झाली तर हत्ती जंगलातच थांबतील. यामुळे शेताचे नुकसान निश्चितपणे टळणार आहे. शेतकरी, संस्था आणि शासन प्रतिनिधी यांच्या समन्वयातून हत्ती प्रश्नाची दाहकता कमी करता येईल”, असेही शिंदे सांगतात.

२०२० मध्ये केरळमधल्या पल्लकड इथे गरोदर हत्तीणीचा फटाके असलेलं अननस खाऊन मृत्यू झाल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त झाली होती. या घटनेबद्दल आनंद सांगतात, “हत्तीने माणसाला खूप समजून घेतलंय. हत्तीला जेव्हा कधी माणसाकडून खाद्यपदार्थ दिले जातात, तेव्हा ते खाणं, हेच त्याच्या मनात असतं. कारण त्याचा आपल्यावर तेवढा विश्वास आहे, पण आपण त्याचा घात करतो. आपल्याला या पृथ्वीवर राहण्याचा काय अधिकार आहे? दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे आणि हे असेच सुरू राहिले, तर एक दिवस आपल्याला केवळ चित्र, शिल्प यातूनच हत्ती पहायला मिळतील. २०२५ नंतर या भूतलावर हत्तीच नसेल, अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हत्ती नसेल, तर निसर्गचक्र कोलमडेल आणि हा निसर्ग उभा करण्याची ताकद माणसात नाही. आपणच ठरवायचं आहे, आपल्याला जगायचं आहे की एक एक करत आपण संपवत असलेल्या प्राणी, पक्ष्यांप्रमाणे आपल्यालाही संपून जायचंय."

logo
marathi.freepressjournal.in