
भ्रम-विभ्रम
सावनी गोडबोले
लोकांच्या मनातल्या चुकीच्या समजुती काढून टाकायचा प्रयत्न ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या आपल्या संतांपासून ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या साहित्यिकांपर्यंत अनेकांनी केला आहे. अंधश्रद्धांविरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. या लेखमालेत अशा अनेक साहित्यिकांचे विचार आपण पाहणार आहोत.
अंधश्रद्धा निर्मूलन असे शब्द वाचले की, बऱ्याच जणांच्या कपाळावर आठी चढते. अंधश्रद्धा निर्मूलन हे काहीतरी पाश्चात्य फॅड आहे, बाहेरून आलेले आहे, आपल्या संस्कृतीतले नव्हेच, असा गैरसमज लोकांमध्ये प्रचलित आहे. पण हे काही खरे नव्हे.
विज्ञानातील अनेक शोध, सिद्धांत, पाश्चात्यांकडून आपल्याकडे आले म्हणून आपल्याला वाटते की, विज्ञान ही पाश्चात्यांची मक्तेदारी आहे. पण प्रत्यक्षात आपल्याकडेही अगदी आर्यभट्ट आणि चार्वाकापासून ते वि. दा. सावरकरांपर्यंत वैज्ञानिक विचार करणाऱ्यांची परंपरा आहे. लोकांच्या मनातल्या चुकीच्या समजुती काढून टाकण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या आपल्या संतांपासून ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या साहित्यिकांपर्यंत अनेकांनी केला आहे.
अगदी आपल्या प्राचीन साहित्यात, म्हणजे ऋग्वेदातील नासदीय सूक्तात म्हटले आहे की, “या सर्व सृष्टीचा निर्माता देव आहे का? की सृष्टी आपोआप जन्माला आली आणि त्यानंतर देव जन्मला? कुणास ठाऊक? ज्याने हे निर्माण केले त्यालाच माहीत किंवा कदाचित त्यालाही माहीत नसेल.” आपल्याला प्रश्नाचे उत्तर माहीत नाही, हे मान्य करणे हीच उत्तर शोधण्याची पहिली पायरी असते आणि हा एक प्रवाह, हा प्रांजळपणा आपल्याकडे वेदकाळापासून होता!
खरेतर भोवतालच्या जगाचे निरीक्षण करताना असे जाणवते की, कधी कधी आपल्याला शिकवले गेलेले आणि समोर दिसत असलेले, यात तफावत आहे. अशा वेळी या निरीक्षणाची नोंद घेत त्यावरून वेगळा निष्कर्ष आला, तर तो स्वीकारता आला पाहिजे.
उदा. समजा आपल्याला सांगितले गेले आहे की, शनिवारी नखे कापू नयेत किंवा सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये, तसे केले तर काहीतरी वाईट घडते. जेव्हा असे करूनही वाईट घडत नाही, तेव्हा आपला अगोदरचा निष्कर्ष चुकला होता, असे न लाजता मान्य करता आले पाहिजे. विज्ञानाचे हे पहिले तत्त्व आहे.
आपण जे समजून चाललो होतो, ते खोटे ठरले किंवा माणसांच्या वागण्या-बोलण्यात काही विरोधाभास आढळला किंवा विसंगती आढळली, तर तेही कवी, लेखक निर्भीडपणे मांडत असतात. साहित्य म्हणजे आपल्या जगण्याचा आरसा. त्यामुळे आपल्या विचारांचे, भावनांचे, जगण्याचे प्रतिबिंब साहित्यातून पडत असतेच. जेव्हा जेव्हा रूढ विचारांपेक्षा वेगळे विचार समोर येतात तेव्हा ते पचवायला समाजाला नेहमीच जड जाते. पण समाज म्हणून आपली निकोप वाढ व्हायची असेल, तर ते आवश्यक आहे.
अगदी प्रत्येकच काळात विचारवंतांनी साहित्यातून, म्हणजे लेखातून, नाटकांतून, कवितांतून, अभंगातून भोवतालच्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या-त्या वेळी त्यांना विरोध झाला. काहींवर जीवघेणे हल्ले झाले आणि काहींच्या बाबतीत त्यांचे वैज्ञानिक विचार बासनात गुंडाळून त्यांची दुसरीच बाजू प्रकाशात राहील, अशी व्यवस्था केली गेली. पुढच्या काही लेखांमधून आपण ‘आपल्या’ साहित्यात असलेले हे समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन पाहणार आहोत.
अंधश्रद्धा काही नेहमीच धार्मिक असतात असे नाही. आपले हिशेब नीट तपासले नाहीत, फायदा-तोट्याचा नीट अभ्यास केला नाही, तर आर्थिक अंधश्रद्धा जन्माला येतात. उदा. अमुक नंबर माझ्यासाठी लकी आहे किंवा एखाद्या कंपनीचे शेअर नेहमीच फायद्याचे असतात. म्हणून तेच घेणे ही आर्थिक अंधश्रद्धाच होय किंवा घरात अमुक ठिकाणी आरसे लावले की, अमुक रोग बरा होईल ही वैद्यकीय आणि स्थापत्य शास्त्रात घुसलेली अंधश्रद्धा! त्यांचे निराकरण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ करत असतातच. अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मात असतात असेही नाही. सर्वच धर्मात आहेत. पण अर्थात आपल्या साहित्यामध्ये पाहायला गेलो, तर त्या-त्या लेखकाने त्यांना त्यांच्या भोवताली जे आढळले त्याबद्दलच लिहिले आहे. काहींनी उपरोधिक लिहिले, काहींनी विनोदाचे अस्त्र उगारले, काहींनी कवितांतून, अभंगातून मोठी वैज्ञानिक तत्त्वे सांगितली. पण साऱ्यांचा हेतू तोच होता, जो समर्थ रामदासांनीही सांगितला होता.
“आपणासि जे जे ठावे,
ते ते दुसऱ्यासि सांगावे।
शहाणे करून सोडावे, सकळ जन॥”
आपण अजूनही तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाश्चात्य देशांवर अवलंबून आहोत. पण स्वतःला मिंधे वाटू नये म्हणून एकेकाळी हे सर्व आपल्याकडे कसे होतेच, अशी आपणच स्वतःचीच समजूत करून घेतो.
गडबड अशी होते की, आपल्याला फक्त विज्ञान वृक्षावर लागलेली तंत्रज्ञानाची फळेच दिसतात. आपल्याला वाटते, यालाच विज्ञान म्हणायचे. म्हणजे तंत्रज्ञानाने दिलेल्या उपयुक्त वस्तू उदा. मोबाइल, विमाने, जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया यालाच आपण ‘विज्ञान’ समजतो. पण विज्ञान वृक्ष म्हणजे ‘विचार करण्याची वैज्ञानिक पद्धत’, जी आपल्याकडे नाही आणि मग आपल्याकडे हे सर्व शोध कसे अगोदरच लागलेले आहेत, हे आपण हिरिरीने मांडायला लागतो. पुष्पक विमान, कौरवांचा आयव्हीएफमधून जन्म होणे, गणपतीच्या डोक्याची शस्त्रक्रिया झालेली असणे, याविषयी केले जाणारे दावे ही त्यातील काही उदाहरणे आहेत. खरेतर या सर्व गोष्टी त्या-त्या लेखकाच्या कल्पनेतून आल्या आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीला दंडवत घालायलाच हवा. उत्तम साहित्य म्हणून, भारताचा सांस्कृतिक ठेवा म्हणून ते अजरामर आहे. पण त्यातील सर्व कथांना पुरावा नाही. सर्वात वाईट म्हणजे, जे नव्हते, ते होतेच हे सिद्ध करण्यात आपण वेळ दवडतो आणि जे खरे होते (म्हणजे चिकित्सेची परंपरा, वैज्ञानिक विचार) त्याच्याकडे आपले सोयीस्कर दुर्लक्ष होते. विमानासाठी इंधन, धातू कुठून आले किंवा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली भूल देण्याचे, रक्त तपासण्याचे तंत्र आणि शल्य चिकित्सा आपल्या पूर्वजांनी कुठून आणल्या? आणि त्यानंतर त्या कुठे अचानक लुप्त झाल्या, हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.
आपले पूर्वज थोर होतेच, पण त्यांना त्या काळीही आत्ताच्या सर्व गोष्टी ज्ञात होत्या, हे कसे काय खरे मानावे?
“ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा
जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा
विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात...”
या शब्दांत ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर पूर्वजांना आणि परंपरांना किती महत्त्व द्यावे हे सांगतात आणि विश्वासाचा अतिरेक (म्हणजेच अंधश्रद्धा!) नको असेही बजावतात.
हे लिखाण करण्यासाठी अनेक जुने (पण तरीही नवे!) लेख वाचले, अर्धवट माहीत असलेले अनेक अभंग, कविता पूर्ण वाचल्या. यातून कितीतरी नवीन गोष्टी कळल्या. या साहित्यिकांचे लिखाण वाचताना मनात कृतज्ञता दाटून आली. कित्येक वर्षांपूर्वी इतके मार्मिक आणि निर्भीड लिहिले आहे त्यांनी, की ते आताच्या काळातही ते आपल्याला विचार करायला लावते. आमची माहेरं इतकी श्रीमंत आहेत, तिथली ही शब्दांची रत्ने, ती इतरांनाही दाखवावीत, असे वाटले. तिथली ही शब्दांची शस्त्रे आताच्या काळात चालवून बघावीत, त्यासाठी ही लेखमाला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या.