इथे भावना विकत मिळतात

अलिकडे माती आणि नाती दोन्हीकडे दुर्लक्ष केलं जातं. भौतिक सुखाच्या वस्तूना मोठी किंमत दिली जाते
इथे भावना विकत मिळतात

घटस्थापनेला घट भरण्यासाठी बाजारात छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये माती विक्रीसाठी ठेवलेली असते. काही जणांकडेच ती अंगणात, शेतात सहज मिळते. घटस्थापना हा सण माणसाला मातीच्या जवळ आणतो. सणासुदीचा काळ हा तसा उत्साहाचा, आनंदाचा आणि खरेदीचा असतो. वर्षातून एखादा तरी सण असा असायलाच हवा. परंतु काहीजण सतत खरेदी करत राहतात. त्यापेक्षा, सणासुदीच्या निमित्ताने खरेदीचा मृदगंध अनुभवायला हवा.

अलिकडे माती आणि नाती दोन्हीकडे दुर्लक्ष केलं जातं. भौतिक सुखाच्या वस्तूना मोठी किंमत दिली जाते. निसर्ग अनेक गरजा पूर्ण करत असतो. परंतु माणसांचा गरजेपेक्षा इच्छापूर्तीकडे कल असतो. मातीपेक्षा भौतिकतेकडे मान वळवणं माणसाला आवडतं. त्यामुळे मातीपासून सुरु झालेली खरेदी हळूहळु मॅनिया (खरेदीचं व्यसन) मध्ये कधी बदलते ते कळतच नाही. मनात निर्माण होणाऱ्या खरेदीच्या विचारांची बुलेट ट्रेन सुसाट धावायला लागते. खरेदीला निमित्त लागत नाही असं म्हणत वर्षभर खरेदी करणारे सणासुदीलाही खरेदी करतातच.

खरेदीचा उद्देश लक्षात न आल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी होते. विशेषत: महागडे कपडे परत परत वापरले जात नाहीत. त्यांची लगेचच अडगळीत रवानगी होते. नवरात्र आणि महिलांचा आवडता ड्रेस प्रकार घागरा यांचा खूप जवळचा संबंध आहे. काहीजणी दरवर्षी घागरा खरेदी करतात. तर काहीजणी एखादा दुसराच अतिशय महागडा घागरा पसंद करतात. असा घागरा कपाटात असेल तर इतर कपड्याना जागाही पुरत नाही. मग हा घागरा दुसरीकडे कुठेतरी एकटाच पडून राहतो. अशा बऱ्याच नव्या चांगल्या वस्तू वर्षानुवर्षे अडगळीत पडून राहतात. तरीही खरेदीवर कुठलीही तडजोड केली जात नाही. पाहिजे म्हणजे पाहिजेच याचं व्यसन सणासुदीला थोडं जास्तच वाढतं. मी दररोज घेत नाही पण ओकेजनली थोडं जास्ती घेत असतो, असं म्हंटल्यासारखंच आहे.

कपडे, दागिने, चपला, शोभेच्या वस्तू, क्रोकरी, फर्निचर, महागडे मोबाइल्स, गाड्या इ. वस्तूंची खरेदी तर होतेच. परंतु प्रत्यक्षात मान सन्मान, प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा मिळविण्याचा किंवा टिकवण्याचा प्रयत्न आपण करतोय का, ह्याबद्दल सजग राहण्याची गरज आहे. चार लोकांच्यात उठून दिसलं पाहिजे, या मानसिकतेमुळे वस्तू खरेदीबरोबर अनेक छोटे मोठे ताण घरात येतात. त्याचा परिणाम म्हणून सगळं असूनही सुख उपभोगता येत नाही, असा होतो. त्यामुळे आपल्याला खरेदीचं व्यसन तर लागलेलं नाही ना, ते तपासत राहण्याची गरज आहे.

एका काकूंना अस्वस्थ होतंय म्हणून हाॅस्पीटलमध्ये अॅडमिट केलं होतं. सगळे उपचार करुन झाले होते. त्यांना काही फरक पडत नव्हता. शेवटी समुपदेशकांच्या सहाय्याने उपचार सुरू केले. गप्पा मारताना समुपदेशकाच्या लक्षात आलं की, या काकूंना खरेदीची प्रचंड आवड आहे. समुपदेशकाने काकूंबरोबर मानसिक खरेदीचा फंडा वापरायला सुरुवात केली. खरेदीवर गप्पा व्हायला लागल्या की काकूना बरं वाटायचं. खरेदीच्या गप्पांमुळे काकू लगेच हिंडू फिरू लागल्या.

मानसिक खरेदीला आपण विंडो शाॅपिंग म्हणूया. बाजारात फेरफटका तर मारायचा; पण आवडलं म्हणून लगेच खरेदी करायची नाही, ही सवय स्वत:ला लावून घ्यायला हवी. खरेदीचा विचार मनात आल्याबरोबर गरजेचाही विचार केला तर खरेदीच्या इच्छेची तीव्रता कमी होते. बऱ्याचवेळा सोबत मैत्रिणी असतील तर गरजेपेक्षा खूपच जास्त खरेदी केली जाते. शक्यतो अशावेळी घरातून बाहेर पडतानाच स्वत:ला खरेदी न करण्याविषयी ठामपणे सांगायला हवं. बाहेर पडल्यावरही सतत स्वयंसूचना घ्याव्यात. अनेकवेळा खरेदी करणं आपल्या हातात नसतं, अशी परिस्थिती उद‌्भवते, म्हणजे खरेदीसाठी मित्र-मैत्रिणी अक्षरश: भरीस पाडतात. त्यामुळे आपण खरेदी करतो. मला इतकं सगळं घ्यायचंच नव्हतं, ती ऐकलीच नाही म्हणून मी घेतलं, असं स्पष्टीकरण कुणालातरी द्यावं लागतं. अशावेळी हा काही जेवणाच्या पंगतीतला आग्रह नाही हे लक्षात घ्यायला हवे. जेवताना आग्रहाचे दोन घास खाणे आणि कुणाच्यातरी आग्रहाने दोन साड्या, पर्स अशा कोणत्याही वस्तू विकत घेणे यात फरक आहे. खरंतर दोन घास जास्ती खाण्याने शारीरिक आणि खरेदीने मानसिक हानी होते. त्यामुळे आग्रह परवडणारा नसतो हे समजून घ्यायला हवं. अशा खरेदीने नंतर पश्चाताप होतो. खर्च झाल्याचं वाईट वाटतं म्हणजेच खरेदीतून आनंद नाहीच उलट ताण विकत घेतला जातो. बऱ्याचवेळा स्पर्धेतून, तुलनात्मक मानसिकतेतून खरेदी होते याचाही विचार करावा.

आकर्षक बाजारपेठ हाही एक असाच मुद्दा आहे. त्याकडे बघितल्याबरोबर खूपवेळा मेंदूमध्ये केमिकल लोच्या होतो. विंडो शाॅपिंगमधून वस्तूंना स्पर्श करण्याचा मोह टाळता येत नाही. व्यसन ते व्यसनच. सहजासहजी सोडता येत नाही. बाजारपेठा गिऱ्हाईकांना खुष करतात हा गैरसमज आहे. माणसाला खुष करणं, आनंदी करणं हे बाजारपेठेचे कामच नाही, कारण कोणतीही भावना बाजारपेठेत विकत मिळत नाही. बाजारपेठेतील जाहिराती बारकाईने पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की, हल्ली कंपन्या वस्तू विकण्यापेक्षा भावनांचं चित्रण प्रभावी करतात. उदाहरणार्थ शीतद्रव्य प्या आणि फॅमिली पार्टी आनंदाने साजरी करा. आमच्याकडे घर घ्या, आनंदाची स्वप्नपूर्ती करा. गरजांच्या पूर्ततेपेक्षा भावनिक आवाहन करण्याकडे जाहिरातींचा कल दिसून येतो. जणुकाही या कंपन्या सांगत असतात की, ह्या वस्तु खरेदीमध्येच तुमचा आनंद दडलेला आहे. आपण अशा भावनिक आवाहनाला बळी पडतो.

खरेदी छोटी असो किंवा मोठी, त्यातला नेमकेपणा, आवाका लक्षात घ्यायला हवा. अव्वाच्या सव्वा खरेदी टाळायलाच हवी. सध्या तर स्क्रीन शाॅपिंगचा जमाना आहे. काहीजण ठरवून आॅनलाईन खरेदी करतातच. परंतु शाॅपिंग साईटवर अनावधानाने कुठेतरी क्लिक होतं आणि नको त्या वस्तू घरी येऊन पडतात. अशा साईट्समुळे प्रचंड ताण येतो. तेव्हा अशा साईट्स जपून, समजून घेऊन वापराव्यात. दिवाळीसारख्या सणाला आधी घरात बसून शाॅपिंग केली जाते. नंतर आणखी काहीतरी हवं म्हणून बाजारपेठेतही चक्कर मारली जाते. अनेकविध प्रदर्शनात नुसतं जाण्यानेही खरेदीच्या व्यसनथेंबाचे शिंतोडे अंगावर उडतातच. हे टाळता येऊ शकतं.

नवीन वस्तुवर मालकी हक्क स्थापित झाल्याचा क्षणिक आनंद आपल्याला होतो. विक्रेत्याच्या विक्री कौशल्याचं गमक म्हणून तो गिऱ्हाईकाला भाव देतो. त्याचं विशेष वाटून माणसं खरेदीत वाहवत जातात. जाहिरातींचं आपल्यावर असलेलं गारुड हे किती भयंकर आहे हे स्वीकारायला हवं. गरजा आणि चैन यामधली सीमारेषा स्पष्ट असावी.

घटस्थापनेला मातीपासून सुरू झालेली खरेदी दिवाळीपर्यंत कुठे जाऊन पोहोचेल याचा विचार आत्तापासून केला तर खरेदीसाठी मानसिक स्पेस मिळेल. माती खरेदी करताना किंवा रस्त्यावर माती विक्रेत्याला बघून साधी मातीसुद्धा विकत आणावी लागते, काय दिवस आलेत, हा छोटासा ताण उगीचच अस्वस्थ करतो. मोठ्या खरेदीनंतर पैसे खर्च झाल्याचा ताण आणि भविष्यातील आर्थिक ओढाताण डोक्यात प्रवेशतात. खरेदीचा आनंद तेव्हा होतो जेव्हा गरजांची पूर्तता होते. अनावश्यक खरेदीला शुन्य किंमत असते. अशा शुन्य किमतीच्या अनेक वस्तूंची खरेदी करणं टाळता आलं तर दीपावलीसारखा मोठा सण आनंदात साजरा होईल. नात्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी सणांची निर्मिती झाली. तेव्हा नाती जपूया. खरेदीचा अतिरेक टाळूया आणि आनंदी राहूया.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in