सेल्फीच्या आनंदात स्वप्नांचा अंत

मोबाईलच्या तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यच पार बदलून गेल्याचे चित्र दिसते.
सेल्फीच्या आनंदात स्वप्नांचा अंत
Freepik

-डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले

दखल

आज तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने बदलत आहे. रोज नवनवीन आविष्कारांची नांदी दिसून येत आहे. अशातच मोबाईल जगतात मार्केटमध्ये राेज वेगवेगळी फीचर्स येत असल्याने नवनवीन मोबाईलचा ग्राहकांना लळा लागलेला दिसतो. कारण मोबाईलच्या तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यच पार बदलून गेल्याचे चित्र दिसते. हे दृश्य पाहून मोबाईलशिवाय जगणेच अशक्य की काय? असे वाटायला लागते. कारण मोबाईल दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. या मोबाईलच्या तंत्रज्ञानाने प्रत्येकालाच एवढी भुरळ घातली आहे की, मोबाईल हातातून सुटायला तयार नाही. सध्या तर मोबाईलच्या माध्यमातून सेल्फी घेण्याचे एक युग सुरू झाल्याचे दिसते. तरुणांबरोबरच ज्येष्ठांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही अशी परिस्थिती आहे. कोणताही क्षण असो तो सेल्फीत कैद करून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याशिवाय राहावत नाही. परंतु सेल्फीतून जीवनाचा आनंद घेत असतानाच सेल्फीच्या नादात अनेक दुर्घटना घडून अनेकांचे प्राण गेले आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. याचा विचार करता सेल्फीचा आनंद वाढतोय की, सेल्फीमुळे जीवनाचा अंत होत आहे हे कोडे मात्र सुटत नाही. त्यामुळे आनंदाच्या क्षणांना सेल्फीत कैद करताना स्वतःच्या जीवाचे व कुटुंबाविषयी आपल्या कर्तव्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

मोबाईलच्या आविष्काराने मानवी जीवनात मोठी क्रांती घडून आली असली, तरी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वापरामुळे मोबाईलचे मानवी जीवनावर फार मोठे वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. खरे पाहता कोणत्याही तंत्रज्ञानाचा आविष्कार झाल्यानंतर त्याचे चांगले-वाईट असे परिणाम असतातच. मोबाईलच्या आविष्कारातून सुद्धा चांगल्याबरोबरच काही वाईट परिणामही समाजासमोर येत आहेत. मोबाईलचा खरा उपयोग हा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी होतो. परंतु तंत्रज्ञानाच्या जादुई दुनियेत आज मोबाईलमध्ये विविध फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे आज मोबाईलचा वापर कॅमेरा म्हणूनच बहुतांश होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येते. मोबाईलचा महत्त्वाचा भाग म्हणजे मोबाईलचा कॅमेरा असेच समीकरण दिसते. मग ज्या मोबाईलचा कॅमेरा चांगला त्याला ग्राहक जास्त पसंती देतात. मोबाईलमध्ये असलेल्या या फोटो तंत्रज्ञानात आलेला नवाविष्कार म्हणजे सेल्फी. तो जीवघेणा ठरत आहे. सेल्फीच्या या जगात आज प्रत्येकालाच फोटो काढायचा आहे. मग ही हौस पूर्ण करण्यासाठी मोबाईलच्या कॅमेऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मग एकट्याने असेल किंवा मित्र-मैत्रिणींसोबत समूहाने किंवा कुटुंबासोबत असेल, सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. परंतु या सेल्फीच्या नादात कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता केवळ सेल्फीत दंग होऊन दुर्घटना घडल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सेल्फी काढताना तो अधिक चांगला निघावा, त्यात मागचा देखावा अधिक सुंदर व चांगला यावा म्हणून भान हरपून सेल्फी काढणाऱ्या अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. कधी-कधी तर सेल्फीत सर्वांना सामावून घेण्यासाठी मागेपुढे होताना तोल जाऊन जीवितहानी झालेली दिसते. सेल्फीचे हे वेड दिवसेंदिवस अधिक वाढत असून तरुणाई त्याला बळी पडत आहे. आता तर किशोरवयीन मुला-मुलींनाही याचा लळा लागलेला दिसतो. एक प्रकारे सोशल मीडियावर सेल्फीची जणू पैज लागली असावी, असे वातावरण असते. एखाद्याने एखादी पोज देऊन सेल्फी काढला तर आपणही तसेच काहीतरी नवीन करावे अशी चढाओढ दिसून येते. कार्यक्रम लहान असो की मोठा असो, सेल्फी हवाच. कुठे बाहेर पर्यटन स्थळी फिरायला जायचे असेल, तर मग पाहिजे तसा देखावा सेल्फीत कैद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पोज घेतली जाते. या पोजमुळे अचानक कुणाचा पाय घसरून पडतो, कोणाचे इतर नुकसान होते, तर कुणाचा जीवच जातो.

अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात सुद्धा केवळ सेल्फीसाठी प्रवेश केला जातो. त्यातूनही दुर्घटना होताना दिसतात. बोटीत बसून समूहाने सेल्फी काढल्याने बोट बुडाल्याचे प्रसारमाध्यमांतून अनेकांनी वाचले आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी मोटारसायकल चालवत सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारमाध्यमातून झळकली. अशा अनेक दुर्घटना प्रसारमाध्यमातून वारंवार समोर येतात. हे अनावश्यक बळी आहेत. यातून नागरिकांनी भानावर येणे अपेक्षित आहे. पण तसे न होता सेल्फीचे वेड आणि त्याच त्या चुका पुन्हा-पुन्हा होताना दिसतात.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोबाईलमध्ये बंदिस्त करण्याची खरेच इतकी गरज आहे का? हा प्रश्न आपण कधीतरी स्वत:ला विचारणार आहोत की नाही? मोबाईलपूर्व जगात आपण आयुष्य जगत नव्हतो का? आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा असा सार्वजनिक करणे आवश्यक आहे का? सेल्फी घ्यायचा आणि तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करायचा, हेच आयुष्य आहे का?

सेल्फीच्या नादात जेव्हा जीविताची हानी होते तेव्हा एका कुटुंबाचा आधार हिरावलेला असतो. उच्च शिक्षणासाठी घराबाहेर राहणाऱ्या तरुणाचा किंवा तरुणीचा प्राण जेव्हा सेल्फीच्या नादात जातो तेव्हा त्या तरुण-तरुणीच्या आईवडिलांनी आपल्या अपत्यासाठी पाहिलेली स्वप्नही भंग होतात. त्यांचा वृद्धापकाळाचा आधार हरवतो. म्हणूनच जीवघेण्या सेल्फीचा अतिमोह टाळून चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या मोबाईलच्या अति वापराला आपण वेळीच आळा घातला पाहिजे. सेल्फीचा आनंद जरूर घ्या, पण आपल्या कुटुंबाचा, आईवडिलांचा आधार हिरावू नका. तुमच्या क्षणिक आनंदासाठी त्यांचा आयुष्यभराचा आनंद गमावला जाईल, हे लक्षात घ्या.

(dr.nileshingole222@gmail.com)

logo
marathi.freepressjournal.in