मन : ऊर्जा स्रोत

आपल्याला स्वतःच्या प्रगतीसाठी ऊर्जेची आवश्यकता असते, ती ऊर्जा आपल्यातच असते, फक्त ती जागृती कशी करावी याविषयी थोडेसे...
मन : ऊर्जा स्रोत

आपल्याला स्वतःच्या प्रगतीसाठी ऊर्जेची आवश्यकता असते, ती ऊर्जा आपल्यातच असते, फक्त ती जागृती कशी करावी याविषयी थोडेसे...

लेखक : अनिकेत भालेराव

दिवसभरात आपल्या मेंदूत सुमारे ६२०० विचार येत असतात. आपण जेव्हा झोपतो त्यावेळीही आपला मेंदू काम करत असतो. पण मेंदू त्यावेळी आठवणी साठवून ठेवणे, घटनाक्रम व्यवस्थितीत स्मृतीकोषात जतन करून ठेवणे वगैरे अशी बरीच कामे करत असतो. त्याच घडामोडीत आपल्याला स्वप्नही पडत असतात. आपले मन आणि मेंदू हे अगदी विजेपेक्षा जास्त वेगाने कार्य करीत असतात.

आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही विचार येतच असतात. मनात जे विचार येत असतात त्यावर मेंदू काम करत असतो. आपल्यातील ऊर्जा स्रोत ‘मन’ आहे. जसे आपल्याला मनातून वाटेल कि आता आपण आपले वजन कमी करावयास हवे, तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने कामाला लागतो. आपला मेंदू त्यादृष्टीने विचार करायला लागतो. आधी कधी मिळालेली माहिती स्मृतीकोषातून शोधली जाते. मिळालेल्या माहितीची सुसंगतवार पद्धतीने मांडणी करून काही एक निर्णय ठामपणे घेतला जातो. आधी कोठेतरी वाचलेले असते, ‘सकाळीच उपाशीपोटी मध, लिंबू व पाणी प्राशन केल्याने वजन कमी होते.’ मग मध, लिंबू व पाणी सकाळीच प्यावे असा निर्णय मेंदूद्वारे घेतला जातो. त्यांनतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शरीराच्या हालचाली आपण करू लागतो. मध घरी नसेल तर बाजारातून आणणे, सकाळीच न विसरता मध, लिंबू व पाणी पिणे, अशा हालचाली आपण करतो. पण आपण मनावरच घेतले नाही, आणि वाढू दे माझे वजन वाढले तर मला चालेल... तर आपण बाजारातून मध घरी आणणारच नाही. येथे एक लक्षात घ्यायला हवे की, मध, लिंबू व पाणी पिण्यासाठी सर्व अनुकूल परिस्थिती असतानाही आपण केवळ मनाने ठरविले नाही तर ती कृती आपण करीतच नाही. म्हणजेच आपले खरे ऊर्जा स्रोत ‘मन’ हेच आहे हे सहज लक्षात येते.

हा ऊर्जा स्रोत प्रत्येक मानवाकडे आहे. आपल्याला ह्याच ऊर्जेचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावयाचा आहे. नकारात्मक विचार जास्त प्रबळ ठरू न देता सकारात्मक विचार प्रबळ करून उन्नती साधायची आहे. जेव्हा आपण स्वतःची प्रगती करण्याचे ठरवू तीच तर आपली पहिली, महत्त्वाची पायरी आहे.

आपल्या मनाची ऊर्जा एवढी प्रभावी आहे की, आपण आपली शारीरिक क्षमताही ऐनवेळी वाढवू शकतो. बर्‍याच वेळेला आपण एखादी कृती करून मोकळे होतो. नंतर आपलेच आपल्याला आश्चर्य वाटू लागते की आपल्याला कसे काय जमले. समजा रस्त्याने जात असताना आपल्या डोळ्यांसमोर एखादी चारचाकी गाडी उलटली. आपण लगेच पळत जाऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपली सर्व शक्ती पणाला लावून ती अवजड गाडी एकट्याने सरळ करून मोकळे होतो. येथे आपल्याला आपले मन अगदी ‘करो या मरो’ अशी आज्ञा आपल्या मेंदूला व शरीराला देऊन टाकते. आपण त्या आवेशात जे काम दोन-तीन माणसे एकत्र येऊन करण्यासारखे असते ते एकटे करून मोकळे होतो. पण सामान्य परिस्थितीत ती गाडी आपण सरळ करू शकणार नसतो. कारण ‘करो या मरो’ची परिस्थिती नसते, म्हणूनच आपले मनही तेवढ्या तीव्रतेने शरीराला आज्ञा देत नाही. हीच ती ‘मनाची ऊर्जा’ की ज्यामुळे आपण आपली शारीरिक क्षमता अल्प कालावाधीसाठी वाढवू शकतो. अशाच ऊर्जेचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावयाचा आहे.

जसे आपण आपल्या शरीराला जर सकस खाद्य पुरविले तर शरीर तंदुरुस्त व अधिक कार्यक्षम बनते, तसेच मनाचेही आहे. आपण आपल्याला जेथून म्हणून काही चांगले सापडेल ते ग्रहण करीत रहायचे, सतत चौकस राहून सभोवती काय घडत आहे याकडे लक्ष देऊन माहिती मिळवून ठेवायची. आपले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने सतत माहिती मिळवित रहावयाची. आपल्याकडे जेवढा माहितीचा साठा जास्त तेवढे आपले विचार हे परिपक्व होतात. आपण तेवढा जास्त अचूक निर्णय घेऊ शकू. ‘माहिती-ज्ञान’ हेच आपल्या मनाचे, मेंदूचे खाद्य आहे. असे सकस खाद्य पुरविण्याची सुरुवात अर्थात आपल्या मनातूनच होत असते. जर आपल्याला काही प्रश्नच पडला नाही, जर काही जिज्ञासाच दाखविली नाही तर आपणच आपल्यावर मर्यादा टाकत असतो, त्यामुळे आपल्याला कमी माहिती व ज्ञान मिळते. अशा कमी माहिती व ज्ञानाच्या आधारे आपण जास्त काही चांगले करू शकत नाही. म्हणूनच आपण आपल्यातील चौकसपणा वाढवायला हवा. कारण आपण कोणीच परिपूर्ण नाही. आपण कधीकाळी घेतलेली माहिती आज उपयोगी पडू शकते. कधी काळी आत्मसात केलेले कौशल्य आज उपयोगी पडू शकते. ‘जिज्ञासा निर्माण करणे’, ‘ही आपली गरज आहे हे ओळखणे’ हे काम मनच तर करत असते. हेच तर आपल्याला हवे आहे. हाच तो सकारात्मक दृीकोन.

पावसाचे सर्वच काळे ढग पाऊस काही पाडत नाहीत. कारण पाऊस पडण्यासाठीची अनुकूल परिस्थिती, वातावरण त्या ढगात तयारच झालेले नसते. जेव्हा अनुकूल परिस्थिती ढगात निर्माण होते तेव्हा ढगातून पाणी पडायला सुरुवात होते. सुरुवातीला अत्यंत क्षीण व अल्प प्रमाणात असलेली अनुकूल परिस्थिती बघता बघता एवढी जोर धरू लागते की अगदी धो-धो पाऊस पडायला सुरुवात होते. अनुकूल परिस्थितीतून आणखी अनुकूल परिस्थिती निर्माण होत जाते. सुरुवातीला केवळ डोक्यात आलेला विचार हा प्रत्यक्ष आणण्याच्या दृष्टीने आपण कृती सुरु करतो तस तशी अनुकूल परिस्थिती निर्माण होत जाते, कि लागले चक्र फिरायला ! एक चक्र फिरायला सुरुवात झाली कि त्यामुळे दुसरे चक्र फिरते, दुसरी गोष्ट अनुकूल होते. लागतात दोन चक्रे फिरायला ! मग दोनाचे चार, असे अनेक चक्र फिरायला लागतात. यातूनच आपण आपले लक्ष्य साध्य करून जातो. जेव्हा आपण डोळ्यांसमोर ठेवलेले लक्ष्य साध्य करतो तेव्हा त्या मोठ्या यशाची सुरुवात अशाच एका लहानश्या प्रेरणेने आपल्या मनातूनच झालेली असते. वट वृक्षाचे बी हे खसखशीच्या दाण्याहून बारीक असते. त्या एवढ्याश्या बीमध्ये अवाढव्य वृक्ष तयार करण्याची क्षमता असते.

आपण आपल्या मनोदेवतेच्या गाभार्‍यात बसून असेच वडासारखे ‘बारीकसे पण सकस बीज’ आपल्या मनात रुजवून उन्नतीच्या दृष्टीने आणखी एक पुष्प आपल्या मनोदेवतेला अर्पण करावयाचे आहे, की झाली सुरुवात आपल्या प्रगतीची. लागली चाके फिरायला...

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in