महायुतीसमोर आता स्वकीयांचेच आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० पारचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात महायुतीने मिशन ४५ निश्चित केले आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून महायुती अधिक सक्षम केली.
महायुतीसमोर आता स्वकीयांचेच आव्हान
संग्रहित छायाचित्र, पीटीआय

- राजा माने

राजपाट

जागावाटप आणि उमेदवार निवड हा सर्वच राजकीय पक्षांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. वंचित आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेण्यात महाआघाडीला यश आलेले नाही. महायुतीतही पक्षांची गर्दी झाल्याने इच्छुक उमेदवारांना आवरणे मुश्कील झाले आहे. जागावाटप झाल्यानंतर देखील महायुतीसमोर नाराज झालेल्या स्वकीयांना थोपविणे, हे आव्हान उभे आहे. महायुती आपणच विणलेल्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० पारचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात महायुतीने मिशन ४५ निश्चित केले आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून महायुती अधिक सक्षम केली. त्यानंतर आता मनसेलाही सोबत घेतले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड देता यावा, यासाठी रणनीती आखली जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसनेही सक्षम उमेदवार मैदानात उतरवून महायुतीसमोर तगडे आव्हान उभे करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे महायुतीने विरोधी पक्षांशी दोन हात करण्याची तयारी केली आहे. तथापि त्यांच्यासमोर विरोधी पक्षांसोबतच नाराज असलेल्या महायुतीतील नेत्यांचे मोठे आव्हान असणार आहे. फोडाफोडीचे राजकारण, मित्रपक्षांतील इच्छुकांची दावेदारी यातून एक तर बंडखोरीला ऊत येऊ शकतो आणि बंडखोरी टाळली तरी ऐन निवडणुकीत वाढत्या असंतोषाचा फटका बसण्याचा धोका आहे.

राज्यात भाजपची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत. यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही शहरी, ग्रामीण भागात मोठी ताकद आहे. याचाच विचार करून भाजपने प्रथम शिवसेनेला मोठे खिंडार पाडून राज्यात युतीची सत्ता आणली आणि त्यानंतर राष्ट्रवादीला धक्का देत अजित पवार यांना सोबत घेऊन महायुती अधिक मजबूत केली. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि याच्या जोरावरच भाजपने राज्यातील एकूण ४८ जागांपैकी ४५ जागांवर विजय मिळविण्याचा निश्चय केला आहे आणि त्यादृष्टीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. परंतु विरोधी पक्षांतील शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही भाजपचे मनसुबे उधळण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राज्यात अभूतपूर्व फोडाफोडी करूनही विरोधी पक्षांचे आव्हान कमी होताना दिसत नाही. त्यामुळे महायुतीचे नेते नवनवीन रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी सातत्याने मतदारसंघनिहाय सर्वेक्षण केले जात आहे आणि त्याच्या आधारे जुन्या-नव्या उमेदवारांची सांगड घालत तयारी सुरू आहे. यात कमी म्हणूनच की काय आता मनसेलाही दोन जागा देऊन सोबत घेण्याची रणनीती आखली जात आहे. आता महायुतीला मनसेची देखील साथ मिळेल. त्यामुळे राज्यात महायुतीच्या रूपाने तगडे आव्हान उभे ठाकू शकते, यात शंका नाही. परंतु तोडीस तोड नेते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा कुरघोडीच्या राजकारणात अनेकदा आपलेच डाव आपल्यावर उलटू शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत त्याचीच प्रचिती येत आहे.

मुळात भाजपचे जाळे जवळपास प्रत्येक मतदारसंघात मजबूत स्थितीत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर फास टाकत प्रमुख पक्षांना हादरे देतानाच अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात पक्षीय दावेदारांसोबतच मित्रपक्षांचे दावेदारही लढायला सज्ज झाले. त्यामुळे जागावाटपाची गुंतागुंत वाढली. भाजपसोबत शिंदे गटाचे १३ आमदार आलेले आहेत. मात्र शिंदे गटाच्या खासदारांच्या बऱ्याच जागा धोक्यात असल्याचे भाजपच्या सर्वेक्षणात आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बऱ्याच विद्यमान खासदारांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यातून भाजपने थेट शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची नाराजी ओढवून घेतली आहे. सध्या भाजपची चलती असल्याने कोणी आवाज उठवत नसले, तरी अंतर्गत नाराजी खूप आहे. बऱ्याच मतदारसंघांत असेच चित्र आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, मावळ, यवतमाळ-वाशिम, अमरावती, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, रायगड, परभणी यासह बऱ्याच मतदारसंघांची नावे सांगता येतील. यावरून चांगलाच वाद वाढला आहे.

एक तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे बऱ्याच ठिकाणची समीकरणे बदलली आहेत. त्यात बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरत असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. पुरंदरचे शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तर थेट अपक्ष मैदानात उतरून पवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना पवार कुटुंबीयांसह महायुतीतील नेत्यांसोबत लढण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरात शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी नाकारून भाजपचे समरजित घाडगे यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे हातकणंगलेचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना डावलून तेथे दुसरा उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केली जात आहे. साताऱ्यात भाजपचे नेते उदयनराजे भोसले इच्छुक असताना सातारा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला जात आहे. त्यामुळे उदयनराजे यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव तयारीला लागले होते. परंतु त्यांनाही कात्रजचा घाट दाखविला जात आहे. त्यामुळे साताऱ्यातही खदखद आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातही विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचा विरोध असतानाही त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यातही भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत यांच्याविरोधात उदय सामंत यांचे बंधू तयारी करीत असताना तिथे नारायण राणे यांना मैदानात उतरविले जात आहे. रायगडमध्ये भाजपचे धैर्यशील पाटील तयारी करीत असताना तिथे अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी जागा सोडली जात आहे. मावळमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे दावेदार असताना त्यांना एकदा कमळाच्या चिन्हावर लढण्यास सांगितले जात आहे, तर दुसरीकडे थेट त्यांच्या उमेदवारीला विरोध करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात शिंदे गटाची शिवसेना मैदानात उतरण्याची तयारी करीत असताना तिथेही भाजपने दावा केला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी दावा केलेला असताना हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला जात आहे. अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे आग्रही असताना त्यांच्याच विरोधात लढलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपच उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र तिथे गोडसे यांना विरोध केला जात असून भाजपचे दिनकर पाटील यांनी तिथे दावा ठोकला आहे. एवढेच काय, तर ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याची जागा भाजपला सोडण्याचा आग्रह धरला जात आहे. यासोबतच मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या अर्ध्या-अर्ध्या म्हणजे प्रत्येकी तीन जागा वाटून घेण्याऐवजी दक्षिण-मध्य मुंबईची एक जागा वगळता पाच जागांवर भाजपने दावा ठोकला आहे.

विशेष म्हणजे मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे रुजलेली आहेत. त्यात ठाकरे गटाचे अनेक शिलेदार मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडे खेचून आणले आहेत. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना मुंबईत मजबूत स्थितीत आहे. मुंबईतील बरेच शिवसेना आमदार सोबत असताना भाजपने मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी पाच जागा आपल्याकडे खेचून शिंदे गटाला कोंडीत पकडले आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी थेट शिंदे गटाच्या नेत्यांना डावलले गेले आहे. त्यामुळे असंतोष वाढत चालला आहे. अजूनही वादाच्या जागांवरील उमेदवार घोषित केलेले नाहीत. मात्र जेव्हा उमेदवारी घोषित होईल, तेव्हा स्फोट होऊ शकतात. याची सुरुवात माढा, सातारा, अमरावती आदी ठिकाणी झाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. जेव्हा आपल्याच पक्षाचे किंवा मित्रपक्षांचे नेते बंडखोरी करून मैदानात उतरतील, तेव्हा वेगळेच चित्र असेल. परिणामी याचा फटका थेट महायुतीला बसू शकतो. मग एवढी मोठी उलथापालथ करून नेमके काय मिळविले, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण एकूणच सद्यस्थिती पाहता बंडखोरी रोखण्याचे खरे आव्हान महायुतीसमोरच असणार आहे, यात शंका नाही.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in