रामलीला मैदानावरील ‘हास्य जत्रा’!

हल्ली ‘घमंडिया’ आघाडीचे जेव्हा मेळावे होतात, तेव्हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकत्र येतात आणि गुपचूप मिळेल त्या खुर्चीवर निमूटपणे बसलेले दिसतात. नाव पुकारले गेले की, उठून पाच मिनिटे भाषण करतात. सर्वांचा एकच मुद्दा असतो की, या देशासाठी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हा फार मोठा धोका आहे.
रामलीला मैदानावरील ‘हास्य जत्रा’!
Published on

- केशव उपाध्ये

मत आमचेही

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेला ‘हास्य जत्रा’ हा बहारदार कार्यक्रम संपूर्ण देशवासीयांचे भरपूर मनोरंजन करून गेला. ‘घमंडिया’ आघाडीतील २६ घटक पक्षांचा हा जाहीर कार्यक्रम! अगदी ‘याल तर हसाल, न याल तर फसाल’च्या धर्तीवरील! ‘लोकतंत्र बचाओ’ हा कथानकाचा गाभा होता, तर नेहमीचाच ‘मोदी हटाव’ हा नारा होता. या सर्व घटक पक्षांना नरेंद्र मोदी यांना हटवायचे आहे, पण काँग्रेसला मोठे होऊ द्यायचे नाही किंवा त्यांच्या नेत्याला पंतप्रधान होऊ द्यायचे नाही. सर्वांचा वैचारिक घोळ सुरू आहे. हे शक्ती प्रदर्शन म्हणजे ‘पोकळ’ ताकद आहे.

नरेंद्र मोदी यांना विरोध करणारे देशातील झाडून सगळे विरोधी पक्षनेते रामलीला मैदानावरील व्यासपीठावर प्रचंड दाटीवाटीने बसलेले दिसले. थोडा वेळ का होईना, उद्धव ठाकरेसुद्धा एका खुर्चीवर अंग चोरून बसले होते आणि वाट्याला आलेल्या पाच मिनिटांमध्ये नेहमीची टेप वाजवून गेले. त्यांना हल्ली ‘तडीपार’ हा शब्द अतिशय आवडू लागला आहे आणि तेवढा शब्द व्यासपीठावरून घोषित करण्याएवढाच वेळ त्यांना देण्यात आला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार हेही उपस्थित होते. ते काय बोलले, हे कोणालाच कळले नाही. पण देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, याशिवाय ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे रणरणत्या उन्हात बसलेल्या पब्लिकने ते समजून घेतले असावे! काश्मीरमधील डॉ. फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यापासून ते दक्षिणेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण जमले होते. नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिल्याप्रमाणे खरोखर त्यांनी ‘४०० पार’ केले तर आपले काय? ही विवंचना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. किंबहुना व्यासपीठावर चर्चा सुद्धा तीच होती! आपण सर्वांनी खरोखरच एकदिलाने, एकमताने लढायला हवे, नाहीतर यापुढे काहीच खरे नाही, ही भीती प्रत्येकजण दुसऱ्याजवळ बोलून दाखवत होता आणि माइकवरून नाव पुकारल्यानंतर पाच मिनिटे समोरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता. पाच मिनिटांत काय बोलणार? ‘मोदी हटाव’चा नारा देत आणि दोन-तीन फालतू उदाहरणे देत किंवा आरोप करत आपली पाच मिनिटे कशी निघून गेली, हे कोणालाच कळायचे नाही. संपूर्ण देशवासीयांचे मनोरंजन करण्यासाठी ही मंडळी जमली असावीत, असा समज करून ‘हास्य जत्रे’च्या या भागाचा अनेकांनी लाभ घेतला आणि सुट्टीच्या दिवशी स्वतःचे मनोरंजन करून घेतले, हे मात्र नक्की!

हल्ली ‘घमंडिया’ आघाडीचे जेव्हा मेळावे होतात, तेव्हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकत्र येतात आणि गुपचूप मिळेल त्या खुर्चीवर निमूटपणे बसलेले दिसतात. नाव पुकारले गेले की, उठून पाच मिनिटे भाषण करतात. सर्वांचा एकच मुद्दा असतो की, या देशासाठी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हा फार मोठा धोका आहे. यावेळी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अटक हा नवीन मुद्दा होता. अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली, याचा कोणी विचार करत नाही. पण त्यांच्याच पत्नीच्या तोंडून मोदीविरोधी उद‌्गार काढून घेण्यात या आघाडीला यश आले. आपल्या विजयाच्या मार्गात अडथळे आणणाऱ्यांना मोदी सरकार तुरुंगात टाकत आहे, हा नवा जावईशोध यावेळी ‘हास्य जत्रे’त ऐकायला मिळाला. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग हे या कथानकाचे उपकथानक होतेच. या खात्यांमार्फत छापे टाकून नेत्यांना घाबरवले जाते आणि भारतीय जनता पक्षात ओढले जाते, हा आरोप करायला ही मंडळी विसरली नाहीत. प्रत्येक ठिकाणी छाप्यामध्ये मोठमोठे घबाड सापडते, याचा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक कोणी केला नाही.

राहुल गांधींची (अ)न्याय यात्रा!

उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते एकदा आपल्या ठरावीक पत्रकारांपुढे बोलून गेलेत की, देशाचे भावी पंतप्रधान राहुल गांधी हेच असतील. (पूर्वी ते उद्धव यांचे, तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचे नाव घ्यायचे!) त्यामुळे राहुल गांधी हे देशाला काही नवी दिशा देणार का? याची उत्सुकता होती. पण, देशाच्या विकासाबाबत बोलण्याऐवजी ते फक्त आपल्या न्याय यात्रेत काय अनुभव आले, हेच मुद्दे मांडतात. वेळ मिळाला तर अदानी, अंबानी आणि केंद्र सरकारकडून होणारे अत्याचार याबाबत बोलतात. एकही नवा मुद्दा नसतो. अगदी पढवून घेतल्यासारखी इतरांप्रमाणेच त्यांची स्क्रिप्ट असते, हे वेगळे सांगायला नको.

या ‘घमंडिया’ आघाडीतील सर्व नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असली तरी त्यांच्यातील विचार मात्र एकच आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार हटवण्याबाबत सर्वजण सुरेल रडगाणे गात आहेत. अजेंडा ठरविण्याचा, नेता निवडीचा किंवा जागावाटपाचा मुद्दा येतो, त्यावेळी मात्र सर्वजण एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात, ‘मोदी हटाव’ म्हटले की हे सारे एक होतात, हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा लक्षात आलेले आहे. घटकपक्षांची एक गंमत लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे त्यांना नरेंद्र मोदी यांना हटवायचे आहे, पण काँग्रेसला मोठे होऊ द्यायचे नाही किंवा त्यांच्या नेत्याला पंतप्रधान होऊ द्यायचे नाही. सर्वांचा वैचारिक घोळ सुरू आहे.

भाजपचा प्रचाराचा धुमधडाका!

विरोधी पक्षांच्या आघाडीची ही अवस्था असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा मात्र देशभर धुमधडाका सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत ४०० जागा मिळवून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आणि देशाच्या विकासाची गती प्रचंड वेगाने वाढवून भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणायची, हा चंग बांधून भाजपचे कार्यकर्ते केव्हाच कामाला लागले आहेत. या विरोधी आघाडीचे आरोप काय हे ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही, एवढे ‘टाइट शेड्युल’ आहे.

‘ही आहे मोदींची गॅरंटी’ आणि ‘मोदी है तो मुमकीन है’ या दोन यशस्वी सूत्रांच्या आधारे देश पिंजून काढण्यात कार्यकर्ते स्वतःला झोकून देत आहेत. विरोधी पक्षांच्या ‘घमंडिया’ आघाडीचे शक्ती प्रदर्शन हे भीतीपोटी आहे आणि पुन्हा मोदी सरकार आले तर आपले काही खरे नाही, ही भीती त्यामागे आहे, हे आता लपून राहिलेले नाही. सगळे शरीराने एकत्र येत आहेत, पण मनातून दुभंगलेले आहेत, ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी. संपूर्ण शक्ती प्रदर्शन म्हणजे ‘पोकळ’ ताकद आहे. ही ताकद मतभिन्नतेमुळे दुभंगलेली आहे. पुन्हा मोदी सरकार येणार हे सर्वांना मान्य आहे, पण लोकशाही आहे, विरोध हा केलाच पाहिजे. याचसाठी अशा प्रकारच्या ‘हास्य जत्रां’चे आयोजन केले जात असावे!

(लेखक प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in