सत्तेच्या वाटमारीत सारेच मदमस्त !

आजवर पावसाच्या आस्मानी संकटाला पुरून उरलेली रयत आता सुलतानी संकटाशी झुंजतेय.
सत्तेच्या वाटमारीत सारेच मदमस्त !

दिवाळी....! सणासुदीचे दिवस. पूर्वीच्या काळी ती मोठ्या उत्साहानं साजरी होई. आज मात्र त्याची चाहुलदेखील नकोशी झालीय. शेतकरी नागवलाय, उद्योग अडचणीत आलेत, व्यापार उद‌्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळतेय. अशावेळी समाजातल्या सर्व घटकांना सांभाळणारा, त्यांची काळजी वाहणारा राज्यकर्ता, 'जाणता राजा' कुठं दिसतच नाही. सगळीकडं बेफिकिरी, बेपर्वाई, अराजकसदृश्ा स्थिती जाणवू लागली आहे. एकीकडे रयतेच्या हातात पैसा येईनासा झालाय, तर दुसरीकडे त्याच्या हातातला पैसा हिसकावण्यासाठी सरकार सरसावलंय. आजवर पावसाच्या आस्मानी संकटाला पुरून उरलेली रयत आता सुलतानी संकटाशी झुंजतेय. शिवरायांच्या, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या आशीर्वादाची भाकणूक करीत एकनाथ शिंदे सरकार भाजपेयींच्या मदतीनं सत्तेवर आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता तेव्हा 'शिवशाही' अवतरली असं म्हणण्यात भाजपेयी अग्रभागी असत. आज मात्र असं म्हणण्याचं ते टाळताहेत. आजचा कारभार हा शिंदे सेना-भाजपचा असला तरी तो त्यांचा कारभार समजलाच जात नाही. शिवसेनेच्या साथीदारांचं सरकार उलथवून टाकून हे सरकार आलं असलं, तरी ते मोदी-शहांच्या कृपेनं आलंय असंच ही मंडळी समजत असल्यानं राज्यात 'मोदीशाही'च सुरू आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शिवशाहीत जसं घडत होतं तसं सध्या घडत नाही. शेती, शेतकरी आणि रयतेच्या प्रश्नांचा आगडोंब उसळला असतानाही संवेदनाहीन बनलेलं केंद्र आणि राज्य सरकार मात्र ढिम्म आहे.

राज्यात सत्ता येऊन शंभर दिवस उलटले आहेत. रयतेच्याच नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या पदरातही काही पडलं नाही. जे काही झिरपलं ते सारं 'आयारामां'नी गिळलं. शिवरायांच्या शिवशाहीला साडेतीनशेहून अधिक वर्षे उलटली, पण आजही त्या राजवटीची आठवण काढली जातेय. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली ती पहिली शिवशाही! आज राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावानं महाराष्ट्राचा कारभार चालतो, असं मुख्यमंत्री म्हणतात. मंत्रालयाची पायरी चढल्यावर समोरच छत्रपतींचं भव्य तैलचित्र आहे. महाराजांना मुजरा करूनच प्रत्येक राज्यकर्त्यास आणि नोकरशहास पुढं जावं लागतं. छत्रपतींना लवून मुजरे करणाऱ्यांनी छत्रपतींसारखे शुद्ध आचरण ठेवावं असं सामान्य जनतेस-रयतेस वाटतं. शिवरायांनी आपल्या सैनिकांवर जे निर्बंध लादले होते ते शेतकरी आणि रयतेची काळजी करणारे, कदर बाळगणारे होते. सैनिकांना त्यांची सक्त ताकीद असे की, 'दाणागोटा वगैरेची व्यवस्था आम्ही पुरेशी केली आहे, मात्र तो जपून वापरीत जा. नाहीतर आहे तोपर्यंत उधळेगिरी कराल आणि मग तुटवडा पडला म्हणजे घोडी उपाशी माराल किंवा 'शेतकऱ्यांना' छळाल. मग कुणी कुणब्यांकडे जातील, कोणी दाणे, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कुणी पाते असं करू लागतील, तर जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरू लागतील. म्हणजे त्यांना असं होईल की, 'मोगलांपेक्षा हेच लोक अधिक वाईट! असा तळतळाट होईल!' शिवाजीराजांनी त्यांच्या शिवशाहीत प्रामुख्यानं कोणत्या गोष्टी केल्या ते पाहा- आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली, जमीनदारांचं उच्चाटन करून रयतवारी जारी केली. अष्टप्रधान संस्थापना करून राज्याला स्थैर्य आणि राज्य कारभाराला व्यवस्थितपणा आणला. न्यायदानाची उत्कृष्ट पद्धत घालून दिली. किल्ल्यांचा कारभार योग्य प्रकारे चालावा म्हणून नियम करून दिले. हिंदूंना आपल्या राज्यात आणि काही अंशी बाहेरही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राज्य शासनाचे सर्व व्यवहार मराठीत चालावेत म्हणून राज्य व्यवहार कोश तयार करविला. थोडक्यात असं की, शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. ते टिकवलं आणि वाढवलं. 'हे तो श्रींची इच्छा' असं सांगत रयतेचं राज्य म्हणून ते चालवलं. ही ती शिवशाही...! आजची काय स्थिती आहे? शिवरायांच्या आशीर्वादानं आम्ही राज्य करू असं म्हणत मतांचा जोगवा मागणारे मातले का आहेत? राज्यकर्त्यांचे सरदार आणि सुभेदारच भ्रष्ट वर्तन करू लागले, तर राज्य बदनामीच्या भारानं कोलमडून पडतं. राजेशाही, सरंजामशाही संपली असं म्हणतात; पण लोकशाहीत नवीन राजे आणि सरंजामदार निर्माण झालेत. राज्य ही आपली खासगी मिळकत नसून 'जनतेची अमानत' आहे असं समजून राज्यकर्ते वागू लागले, तर जनता राज्य आपलं आहे असं मानते. राज्याच्या हितासाठी झटते, पण जनता-रयत कस्पटासमान लेखून 'राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खासगी दौलत आहे' असं समजून राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथवून टाकते. हा या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे. याची चुणूक अनेक निवडणुकांत जनतेनं दाखविली आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रात आणि देशात साठ-पासष्ट वर्षे वतनदारी केली. त्यांची वतनदारी जनतेनं उलथवून टाकली. आठ वर्षांपूर्वी देशात आणि साडेसात वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रयतेनं अशीच काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली ती शिवरायांच्या नावानं! सत्तेवर आलेल्यांनी शिवशाहीचा आणि शिवशाहीतल्या आज्ञापत्रांचा अभ्यास करावा अशाप्रकारच्या अनेक आज्ञापत्रांतून 'शिवशाही'च्या कारभाराची दिशा स्पष्ट होतं. शिवरायांचं मन उघड होतं. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी राष्ट्र निर्माण केलं. रयतेच्या ठायी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. राजकारणातील आजचे चित्र भयावह आहे. जनतेची काळजी नसलेले राजकारण आणि सत्ताकारण सर्वच स्तरावर सुरू आहे. दिल्लीतील राजकारण्यांनी तर रयतेलाच वेठीला धरलं आहे.

'रयतेच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागू नये' याची काळजी घेणारी शिवशाही कुठे अन‌् शेतकऱ्यांना संपावर जाण्याची पाळी यावी, आत्महत्या करण्याची वेळ यावी हे कशाचे द्योतक आहे? राज्ाकारणात मश्गुल असलेल्यांनी शेतकरी नागवलाय, आता उद्योगधंद्यावर संक्रांत आणलीय. व्यापारी नव्या कराच्या ओझ्याखाली पिचतो आहे. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा अंमल असावा, अंकुश असावा लागतो. इथं मात्र नोकरशाही वरचढ ठरते आहे. मतांचा जोगवा मागताना राणा भीमदेवी थाटात वल्गना करणारे, घोषणा देणारे, आश्वासनं देणारे राज्यकर्ते प्रशासनासमोर हतबल झाल्याचं चित्र दिसत आहे. मंत्रालयात जी अवस्था आहे तीच इथे अगदी पुण्या-मुंबईतही आहे, ग्रामीण भागातही आहे! इथली सुभेदारी कुणाची यासाठी वरून दिसत नसलं तरी वर्चस्वासाठी झगडताहेत. त्यांचा कारभार एकमुखी राहिला नाही, तर तो 'फडनविशी' ठरतो आहे. याचा गैरफायदा प्रशासनातले 'शुक्राचार्य' घेताहेत, पण सत्ताधारी सत्ता उपभोगण्यातच मश्गुल आहेत. दिवाळी सणात फटाके फोडण्यावरची बंदी सरकारनं मोडीत काढलीय. उत्सवप्रेमींना सर्व सण बहाल करून टाकलेत, मात्र राजकारणातले फटाके वाजताहेत. अंधेरीच्या निवडणुकीनं दमलेल्या ठाकरे सेनेच्या कुडीत ऊर्जा घातली गेलीय. भाजपला अस्मान दाखवून त्यांची मस्ती उतरवलीय. मुंबईत मनसेच्या दिवाळी मेळाव्यानं सत्ताधारी की सत्ताकांक्षी हे दाखवून दिलंय. या साऱ्या राजकीय फटाक्यांच्या दारुकामात इथल्या रयतेकडं मात्र कुणाचं लक्षच नाही. ती मरणासक्त झालीय, राज्यकर्त्यांकडून तिला सहाय्य मिळावं, तिला जगण्याची ताकद मिळावी असं वाटतं, पण ती मानसिकता दिसतच नाही. सगळेच सत्तेच्या वाटमारीत मदमस्त आहेत! शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, व्यापारी, कामगार, नोकरदार सारेच अस्वस्थ आहेत. हवालदिल झाले आहेत. त्यांना कुणीच वाली राहिलेला नाही. ही अस्वस्थता, उद्विग्नता वाढली, तर वैफल्यग्रस्त लोक काय करतील हे सांगता येत नाही अशी भयावह स्थिती निर्माण झालीय!

(

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in