ही फुकाची चर्चा...

सत्यपाल मलिक यांनी २०१८ मध्ये मोदी हेच सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचा दावा केला होता. आता तेच मोदींच्या जम्मू आणि काश्मीर प्रश्नाच्या हाताळणीवर टीका करत आहेत.
ही फुकाची चर्चा...

सत्यपाल मलिक यांनी २०१८ मध्ये मोदी हेच सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचा दावा केला होता. आता तेच मोदींच्या जम्मू आणि काश्मीर प्रश्नाच्या हाताळणीवर टीका करत आहेत. भूतकाळात मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय संदर्भ असणारे ट्विट केले होते. हे सर्व त्यांच्या बोलघेवड्या स्वभावाचे तसेच वारंवार विचार बदलत असल्याची वृत्ती समोर आणते यात शंका नाही.

काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याच्या हाताळणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले. पुलवामासंदर्भात आपण चूक लक्षात आणून दिली असताना पंतप्रधानांनी काहीही न बोलता शांत राहण्याचे सांगितल्याचे स्पष्ट करून मलिक यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता त्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मुळात सत्यपाल मलिक यांनी २०१८ मध्ये मोदी हेच सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचा दावा केला होता. आता तेच मोदी यांनी केलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाच्या हाताळणीवर टीका करत आहेत. अर्थात असे असले तरी आता या प्रश्नावर राजकारण तापले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार आणि प्रवक्ते शक्ती सिंह यादव म्हणतात, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर पुलवामामध्ये ४० जवानांना प्राण गमवावे लागणे हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या गुन्हेगारी चुकीचा परिणाम होता, असे तथ्य समोर आले.

सीआरपीएफने मागणी करूनही सैनिकांना विमान पुरवले नाही, असेही सत्यपाल मलिक यांनी आपल्या खुलाशात म्हटले असल्याचे शक्ती यादव यांनी सांगितले. त्यामुळेच जवानांना रस्त्यावरूनच प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान पुलवामामध्ये लष्कराच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमान का देण्यात आले नाही, असा प्रश्न राष्ट्रीय जनता दलाने विचारला आहे. खेरीज शहीद जवानांच्या विधवा आणि देशातील जनता पंतप्रधानांकडे विचारणा करत आहेत की, ते स्वत: ८४०० कोटी रुपयांच्या विमानातून प्रवास करतात, मात्र शूर जवानांसाठी मागूनही विमान का देण्यात आले नाही? सैनिकांना कोणत्या परिस्थितीमुळे विमान पुरवण्यास नकार दिला गेला हे भाजपने सांगावे, असेही राजदने म्हटले आहे.

थोडक्यात, मलिक यांच्या मते, जवानांच्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांनी पंतप्रधान आणि सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या दोघांना आपल्या निष्काळजीपणामुळे जवानांना जीव गमवावा लागल्याचे मत व्यक्त केले तेव्हा त्यांना गप्प राहण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रतिपादन केले. सैनिकांच्या सुरक्षेसाठी केवळ पाच विमानांची गरज होती. लष्कराचा ताफा मोठा होता. याआधी एवढा मोठा ताफा कधीच रस्त्याने गेला नव्हता. मात्र तरीही गृह मंत्रालयाने विमान देण्यास स्पष्ट नकार दिला, असेही मलिक यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात जनता पंतप्रधानांच्या उत्तराची वाट पाहणार असल्याचेही त्यांचे प्रतिपादन आहे.

एकंदरच, जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेला पुलवामा येथील दहशतवादी हल्ला म्हणजे संपूर्ण भारतीय यंत्रणेचे अपयश असल्याचे सांगितल्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले. मलिक यांनी थेट पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर संशय व्यक्त केल्यामुळे या विषयावर राजकीय वादळ निर्माण झाले. याविषयी बोलताना ज्येष्ठ अभ्यासक अनिल आठल्ये म्हणतात, या गृहस्थांचा बोलघेवडेपणा तसेच कोणती ना कोणती विधाने करून सतत चर्चेत राहण्याची वृत्ती लक्षात घेता या विधानांकडे फारसे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही, असे वाटते. मुळात सीआरपीएफ वा सैन्यातली बरीचशी वाहतूक अजूनही रस्तेमार्गानेच केली जाते. काश्मीरमध्ये दहशतवाद असूनदेखील ही परिस्थिती बघायला मिळण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यानिमित्ताने रस्त्यांची कसून पाहणी केली जाते आणि दुसरी बाब म्हणजे याद्वारे संबंधित भागामध्ये जाणीवपूर्वक आपला वावर दाखवला जातो. याची गरज असतेच. अशा भागांमधून सैन्याने हालचाल केली नाही तर तो प्रदेश वा संबंधित रस्ता दहशतवाद्यांना खुला सोडल्यासारखेच होऊ शकते. म्हणूनच ठरावीक हेतूने सैन्यदल जमिनीवरून प्रवास करते.

ते पुढे म्हणतात, तसे बघायला गेले तर सध्या आपल्या देशातील हवाई दलाकडे उपलब्ध असणाऱ्या विमानांमधून ही वाहतूक करणे सहजशक्य आहे, मात्र तसे न करता आर्मीच्या बटालियन्स रस्तेमार्गेच जातात. शक्य असूनही त्यांना विमानाद्वारे पाठवले जात नाही. याद्वारे संबंधित भागांमध्ये आपले अस्तित्व दाखवून वचक निर्माण करण्याचा उद्देश असतो. दंगलग्रस्त भागांमध्ये पोलिसांकडून ‘फ्लॅग मार्च’ काढण्यामागेही असाच उद्देश असतो. याच हेतूने तेव्हाही पुलवामामध्ये सैन्याच्या वाहनांची वाहतूक केली जात होती आणि आजही केली जात आहे. मलिकांचा दुसरा आरोप गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याबाबत आहे. मात्र इथे लक्षात घ्यायला हवे की, गुप्तचर यंत्रणा नेहमीच मोघम स्वरूपाचा इशारा देत असते. कोणताही तपशील न देता दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवून ते आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकतात. पण हल्ला कुठे, कधी होणार; तो कोण करणार यापैकी काहीच ते सांगत नाहीत. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दर दोन-तीन महिन्यांनी गुप्तचर यंत्रणेकडून येणारे इशारे आपण पाहात आहोत. पाकिस्तानात कट शिजत आहे, अतिरेकी देशात घुसले आहेत अशा स्वरूपाच्या त्यांनी दिलेल्या इशारेवजा सूचना आपण ऐकत असतो. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक इशाऱ्यानंतर सगळे व्यवहार बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधीच कोणताही हेतू साध्य होणे शक्य नाही.

मलिक यांनी पंतप्रधानांवर आरोप केले आहेत, मात्र प्रसिद्धीझोतात राहणे हाच त्यामागील हेतू असू शकतो. कारण तेच नव्हे तर, अनेकजण असे आरोप करत राहतात. खेरीज मलिक यांचा स्वत:चा एक राजकीय अजेंडा आहे. असे आरोप करून ते तो पुढे रेटू पाहात आहेत. विमानातून जाणे सहजशक्य असताना मी स्वत: अनेकदा रस्तेमार्गे प्रवास केला आहे, असे आठल्ये सर सांगतात. ते पुढे म्हणतात, अभ्यास करताना परिस्थितीची शहानिशा करण्यासाठी रस्तेमार्गे प्रवास करणे गरजेचे असते. खेरीज सामान्य जनतेला लष्करी डावपेचातील प्रत्येक खाचाखोचा माहिती असण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्याची आवश्यकताही नसते, मात्र मलिकांसारखे लोक त्याचा अशा प्रकारे फायदा घेत सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पंतप्रधान कार्यालय प्रत्येकाच्या आरोपांना उत्तर देणे योग्य नाही वा शक्यही नाही. बालाकोटवर हल्ले झाले आणि नंतर त्याविषयीची सविस्तर माहिती देऊन झाल्यानंतरही अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. असे हल्ले झालेच नाहीत, किती हल्ले झाले ते सांगा, पाकिस्तानही अशा प्रकारे हल्ले झाल्याचे नाकारत आहे. असे सांगत अनेकांनी त्या सर्जिकल स्ट्राइक्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे वाचकांच्या स्मरणात असेल. हल्ले झालेल्या भागाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यानंतर ती कुठून घेतली, कशी घेतली, ती उपग्रहाद्वारे घेतली का, या प्रश्नांची उत्तरे देणे अनेक कारणांमुळे शक्य नसते. अशी माहिती देण्यास संरक्षणाच्या दृष्टीने अनेक बंधने असतात. पण हे समजून न घेता अशा अनेक शंका उपस्थित केल्या जातात.

कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये प्रतिक्रियेचा समारोप करताना सांगतात, इथे एक उदाहरण लक्षात घेण्याजोगे आहे. आपल्याकडे १९७१ पासून रशियन बनावटीची मीग-२५ विमाने होती. ती खूप उंचावरून उडायची. त्यांचा वेग इतका जास्त होता की, कोणतीही क्षेपणास्त्रे त्यांच्यावर लागू पडायची नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अगदी आत्ता-आत्तापर्यंत ही विमाने पाकिस्तानवर उड्डाणे करून तेथील छायाचित्रे घ्यायची. असे असताना कोणत्याही सरकारने सार्वजनिकरीत्या आपण हे करत असल्याची कबुली वा माहिती दिलेली नाही. मात्र हे सत्य आहे. आता उपग्रहांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जाते, मात्र उपग्रहांकडून छायाचित्रे न येण्याच्या त्या काळात ही विमाने दर आठवड्याला संपूर्ण पाकिस्तानवर फेरफटका मारत राहायची. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ती रडारवर आली तरी अतिशय उंचावर आणि प्रचंड वेगात असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षेपणास्त्राचा मारा यशस्वी होणे शक्य नव्हते. इतकेच कशाला, अमेरिकेलाही हे विमान पाडता आलेले नाही. हवाई दलातून निवृत्त झाल्यामुळे माझ्यासारख्या अधिकाऱ्याला या गोष्टींची जाहीर चर्चा करता येऊ शकते, मात्र ते वापरात असताना अशा बाबी कधीच सार्वजनिकरीत्या बोलल्या गेल्या नाहीत, मात्र मलिकसारखी मंडळी अशाच गोष्टींचा फायदा घेतात आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in