भ्रम-विभ्रम
- प्रभा पुरोहित
विज्ञानाचे नाव घेत वेगवेगळ्या थेरपी, वेगवेगळी शास्त्र उदयाला आलेली आहेत. आम्ही जे सांगत आहोत ते वैज्ञानिक आहे, असा दावा करत भ्रामक विज्ञान आपला विस्तार करत आहे. विज्ञानावर असलेल्या लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत भ्रामक विज्ञान लोकांची फसवणूक करत असते. लोकांच्या आरोग्याशी, भावनांशी खेळतानाच आर्थिक शोषणही केले जाते. म्हणूनच छद्म विज्ञानाचे हे सोंग ओळखणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पारखणे, पडताळणी करणे आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक द्दष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे.
छद्म विज्ञान हे खऱ्या विज्ञानाचे एक सोंग असते. त्याला ‘फसवे विज्ञान’ वा ‘भ्रामक विज्ञान’ असेही म्हणता येईल. ह्या भ्रामक विज्ञानाचे एक उदाहरण प्रसिध्द आहे. २००० साली चेन्नई येथील रामन पिल्लई नावाच्या व्यक्तीने आपण शास्त्रज्ञ असल्याचा आव आणून आपल्याला पाण्यापासून डिझेल बनविण्याची एक पद्धत अवगत आहे,असा दावा केला होता. आय.आय.टी. मधील तज्ज्ञांनी केलेल्या चाचणीत त्याची फसवाफसवी उघडकीस आली. पाणी ढवळण्यासाठी पिल्लई जो दांडा वापरत होता तो पोकळ होता. त्यात थोडे डिझेल आधीच भरून घेऊन तो ते अलगद पाण्यात मिसळत असे. पुढे सीबीआयने त्याची चौकशी केली आणि आपण फसवाफसवी करीत असल्याचे त्याने कबूल केले.
छद्म विज्ञानाची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत. मुख्य म्हणजे फसवे विज्ञान कुठल्याही मान्यवर संस्थांमधून शिकविले जात नाही. छद्म विज्ञानाचे दावे कधीच मान्यताप्राप्त जर्नल्समधून, संशोधन पत्रिकांमधून प्रसिध्द केले जात नाहीत. विज्ञानातील आरोग्यविषयक संशोधन ‘लॅन्सेट’ (Lancet) मध्ये आणि भौतिकशास्त्रासंबंधीचे शोध ‘नेचर’ (Nature) मध्ये छापले जातात. या दोन्ही जागतिक पातळीवरची मान्यता असलेल्या संशोधन पत्रिका आहेत. त्यामुळे इथे ज्या बाबी संशोधनाच्या मान्यताप्राप्त पद्धतीशास्त्रानुसार संशोधकांनी पडताळून पाहिलेल्या आहेत, असेच संशोधनविषयक लेख प्रसिद्ध होतात. परंतु छद्म विज्ञानातील दावे सरळ सरळ टेलिव्हिजन अथवा वर्तमानपत्रे अशा सत्यता न पडताळता तत्काळ प्रसिद्धी देणाऱ्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले जातात. विज्ञानाचा आभास निर्माण करण्यासाठी वापरलेल्या तांत्रिक शब्दांची ते व्याख्या करीत नाहीत. त्यांनी पुढे केलेले पुरावे वादग्रस्त असतात. फोटो दिलेले असलेच तर ते अस्पष्ट असतात. त्यात तांत्रिक वा शास्त्रीय परिभाषेऐवजी काव्यमय भाषा असते. ते वर्णन सुरस, चमत्कारिक गोष्टींसारखे वाटते. उदा. सूक्ष्म देह धारण करून मंगळावर गेल्याचा दावा करणारे डॉ. पु. वा. ओक अशी वर्णने करतात. आपले मौलिक संशोधन दाबून टाकायचा प्रयत्न जगातील मान्यवर संस्था करीत आहेत अशी तक्रार छद्म वैज्ञानिक करतात. उदा. परदेशी तेल कंपन्या माझे मौलिक संशोधन दडपून टाकायचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा रामन पिल्लई करत असे. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याऐवजी ही मंडळी टीकाकारावरच हल्ला करतात.
विज्ञानात गृहितक,अनुमान, प्रयोग, प्रचिती, पुनःपुन्हा पडताळणी आणि प्रचिती अशा पायऱ्या असतात. त्यानंतरच निष्कर्ष काढला जातो. नवीन पुरावे मिळाले तर आधीच्या निष्कर्षात योग्य तो बदल केला जातो. त्याच्या मर्यादा मान्य केल्या जातात. खरे विज्ञान असे नम्र असते. याउलट फसव्या विज्ञानात कार्यकारणभाव नसतो आणि प्रश्न विचारता येत नाहीत.
प्रत्येक विज्ञानशाखेशी संबंधित एक छद्म विज्ञान उदयाला येते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाचा उदय झाल्यावर विविध प्रकारच्या उर्जांचा शोध लागला. जेम्स वॅट यांचा वाफेच्या ऊर्जेचा शोध प्रसिद्ध आहे. अणू ऊर्जा , सूर्य ऊर्जा, आघातातून निर्माण होणारी ध्वनी ऊर्जा अशा विविध ऊर्जा भौतिक शास्त्रात अभ्यासल्या जातात. ह्या ऊर्जा मोजण्याची शास्त्रीय एकके असतात. जसे ध्वनी ऊर्जा ही डेसिबल्समध्ये तर विद्युत शक्ती वॉट्समध्ये मोजतात. परंतु छद्म विज्ञानामध्ये मंगळ, शनी अशा ग्रह गोलांपासून वैश्विक ऊर्जा निघते आणि ती निवडक माणसांचे भविष्य ठरविते, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्र या छद्म विज्ञानात प्रत्येक वास्तूमध्ये ‘धन’ आणि ‘ऋण’ ऊर्जा खेळत असते, असे सांगितले जाते. रेकीत ‘तरंग’ ऊर्जा रोग-उपचाराचासाठी वापरली जाते, असा दावा केला जातो. थोडक्यात, कोणतेही वैज्ञानिक मोजमाप करता न येणाऱ्या ऊर्जा वेगवेगळ्या नावाने ह्या फसव्या विज्ञानात धुमाकूळ घालत असतात. रसायनशास्त्राशी निगडीत अल्केमी (alchemy) हे छद्म विज्ञान खूप जुने आहे. त्यात धातूचे सोने बनविणारा परिस असल्याचा दावा केला जातो.
स्थापत्यशास्त्राशी नाते सांगणारे फसवे वास्तुशास्त्र सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. त्यात आग्नेय दिशेला अग्नी म्हणजे शेगडी/चूल असावी तर पक्ष्चिम दिशेला वेस्टपेपर बास्केट असावे म्हणजे घरात समृध्दी नांदेल, असे हास्यास्पद दावे केले जातात.
मॅग्नेटिझमशी संबंधीत चुबंकीय उपचार पद्धती हेही छद्म विज्ञानाचे एक खूप प्रचलित उदाहरण आहे. सर्व प्रकारचे रोग दूर करणारे चुबंकीय पट्टे, माळा, गाद्या ह्यांचे जोरदार मार्केटिंग चालते. ह्या उपचार पध्दतीने बऱ्या होणाऱ्या मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंतच्या शंभर एक रोगांची यादी आपल्याला इंटरनेटवरील त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळते. ह्या उपचार पद्धतीमागील गृहितकच चुकीचे आहे. आपल्या रक्तात हिमोग्लोबिन असते व त्यात लोहाचा अंश असतो हे खरे. पण हे लोह धनभारीत आणि रेणुबंधित असते. त्याला चुंबक आकर्षित करू शकत नाही. त्यामुळे चुंबकाचा रक्तावर परिणाम होऊन रक्ताभिसरण सुधारते हे खरे नाही. खगोलशास्त्राशी संबंधित छद्म विज्ञान म्हणजे ज्योतिष. त्यात माणसाच्या कुंडलीत राहू, केतू ह्या काल्पनिक बिंदूना आणि सूर्य ह्या ताऱ्यालाच ग्रह मानलेले आहे. आणि त्या आधारे तयार केलेल्या कुंडलीवरून माणसाचे भविष्य सांगितले जाते. पंचांगावरून शुभ-अशुभ मुहूर्त ठरविले जातात. वैद्यकशास्त्राशी निगडीत रेकी, कुंडलिनी जागृत करणे, गर्भसंस्कार करणे आणि अनेक फसव्या उपचार पद्धती पर्यायी उपचार पद्धती म्हणून धुमाकूळ घालत आहेत.
लोक अशा फसव्या छद्म विज्ञानाच्या मागे का जातात, तेही पाहिले पाहिजे. माणूस हा उपजतच एक भावनाशील प्राणी आहे. कशावर तरी श्रद्धा ठेवावी, अशी त्याची मानसिकता असते. प्रश्न विचारणे, खरे-खोटे पारखणे ह्या गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात.
बऱ्याच वेळा स्युडो सायन्सवरील विश्वास त्याला मोठेपणाची, आत्मगौरवाची भावना देतो. अनेकदा आजूबाजूचे लोक, मित्र, आईवडील विश्वास ठेवतात म्हणून चिकित्सा न करता इतरही अनेक त्यावर विश्वास ठेवतात. आजूबाजूचे सर्वच घरातल्या एखाद्या कार्यासाठी शुभमुहूर्त बघतात म्हणून इतर लोकही कसलीच चिकित्सा न करता मुहूर्ताच्या मागे लागतात.
वरकरणी वाटणारी ही श्रद्धा प्रत्यक्षात जरी अंधश्रद्धा असली तरी ती लोकांच्या मनात एक खोटी आशा निर्माण करते. विज्ञानाच्या कसोट्या लावून जर या पर्यायी उपचारपद्धती तपासल्या आणि त्यात काही तथ्य आढळून आले तर नक्कीच विज्ञान त्याचा स्वीकार करेल.
छद्म विज्ञानात केलेले सर्वच दावे फेटाळून न लावता त्याला चिकित्सकपणे सामोरे गेले पाहिजे. उदाहरणादाखल वास्तुशास्त्रात जमिनीची परीक्षा करण्याची एक पद्धत दिली आहे. त्यात म्हटले आहे की, घरासाठी जमीन निवडताना एक कंबरेइतक्या खोलीचा खड्डा खणा. मग त्यात पाणी भरा आणि शंभर पावले चालून परत या. पाणी जास्त खाली गेले नसेल तर जमीन चांगली. नंतर खड्ड्यातले पाणी काढून त्यात काढलेली माती परत भरावी. सर्व माती मावली तर जागा घर बांधण्यास योग्य नाही. थोडी माती उरली तर त्या जागेवर घर बांधण्यास हरकत नाही. वरील परीक्षेत अपरोक्षपणे जमिनीचा सच्छिद्रपणा आणि माती घट्ट आहे की भुसभुशीत आहे, हे तपासले जाते. जेव्हा जमिनीची पत तपासण्याची आधुनिक उपकरणे उपलब्ध नव्हती तेव्हा वापरण्यात येणारी ही पद्धत कौतुकास्पद आहे.
शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे हे अंनिसच्या पंचसूत्रीमधील एक सूत्र आहे. छद्म विज्ञानामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व शारीरिक नुकसान होते. प्रसंगी शोषण होते. तेव्हा या फसव्या विज्ञानाला आळा घालणे हे आपले काम आहे. त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक संज्ञांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ड्रग्ज अँड मेडिकल रेमेडिज् ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्टचा पण या कामात उपयोग होतो. थोडक्यात, पारखा, पडताळून पहा आणि मगच विश्वास ठेवा.
(लेखिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत.)