मतांच्या स्पर्धेत कुणाचे किती नुकसान?

लोकसभा निवडणुकीचे प्रमुख टप्पे पार पडले. आता भाजपप्रणीत ‘एनडीए’ आणि काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीत कुणाला किती जागा मिळतील, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे.
मतांच्या स्पर्धेत कुणाचे किती नुकसान?

विश्लेषण- जनार्दन पाटील

लोकसभा निवडणुकीचे प्रमुख टप्पे पार पडले. आता भाजपप्रणीत ‘एनडीए’ आणि काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीत कुणाला किती जागा मिळतील, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपकडे अचूक माहिती जमा करणारी यंत्रणा आहे. सरकारी यंत्रणांकडून त्यांच्याकडे गोपनीय माहिती येत असते. त्या तुलनेत विरोधकांकडे प्रभावी यंत्रणा नाही. या वळणावर देशाचा कल जाणून घेण्याची उत्सुकता दिसत आहे. अर्थात तो अचूक असणार नाही. निकाल काहीही लागला तरी विरोधक बलवान मानल्या जाणाऱ्या सत्ताधारी आघाडीला शह देत आहेत, हेच मतदानानंतर दिसून येत आहे.

मतदानाच्या महत्त्वाच्या टप्प्यांनंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल वगळता बहुतांश राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. अजूनही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे; परंतु यावेळी कोणतीही लाट नाही. मतांच्या ध्रुवीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी दोन्ही बाजू यशस्वी होताना दिसत नाहीत. भाजपने स्वतःला ३७० जागा आणि मित्रपक्षांना मिळून ‘चारसो पार’चे उद्दिष्ट ठेवले होते; परंतु एकूणच पाच टप्प्यांनंतर प्रत्यक्ष झालेले मतदान, वेगवेगळे दावे आणि सट्टाबाजारातला कल लक्षात घेतला तर काही ठिकाणी भाजपचे नुकसान होताना दिसत आहे. काही ठिकाणी ते भरून निघेलही, परंतु होणारे एकूण नुकसान आणि भरून येणारे नुकसान यात किती तफावत राहते, यावर ‘चारसो पार’ होते की अडीचशे-तीनशेपर्यंतच मजल जाते, हे ठरणार आहे. काँग्रेसचे अंतर्गत मूल्यांकन करणाऱ्या वृत्तपत्राने लिहिले आहे की, ‘एनडीए’ला बिहारमध्ये १६, कर्नाटकमध्ये १५ आणि महाराष्ट्रात २४ जागांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये ‘एनडीए’चे नऊ जागांचे नुकसान होऊ शकते. काँग्रेस राजस्थानमध्ये चार आणि हरयाणामध्ये पाच जागा जिंकेल, असा अंदाज आहे. राजकीय पक्षांचे स्वतःचे मूल्यांकन हे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अभिप्रायावर आधारित असते. त्यामुळेच ते अनेकदा चुकीचेही सिद्ध होते. तथापि आता भारतीय जनता पक्षाचे शीर्ष नेतृत्वदेखील एनडीए चारशेच्या आकड्याला स्पर्श करणार असल्याचा दावा करताना दिसत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये ‘चार सौ पार’चा नारा देत नाहीत, तर ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’चा नारा देत आहेत.

मोदी यांनी सतराव्या लोकसभेच्या आकडेवारीचा उल्लेख केला तेव्हा बीजू जनता दलाच्या १२, वायएसआर काँग्रेसच्या २२ आणि टीडीपीच्या तीन जागा ‘एनडीए’च्या ३५३ जागांमध्ये धरल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांचा ‘टीडीपी’ हा पक्ष ‘एनडीए’मध्ये सामील होऊन निवडणूक लढवत आहे; परंतु वायएसआर आणि बीजू जनता दल ‘एनडीए’मध्ये सामील झाले नाहीत. निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतात, ही वेगळी बाब आहे; पण सतराव्या लोकसभेच्या तुलनेत या दोन्ही पक्षांची स्थिती कमकुवत होणार आहे. पंतप्रधान मोदी टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि बीजू जनता दल यांना एकत्र करून ४००चे लक्ष्य गाठण्याची चर्चा करतात, तेव्हा लक्ष्य फार मोठे दिसत नाही. ओरिसा, बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ईशान्येकडील आठ राज्ये तसेच बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमधील ३० जागांचे संभाव्य नुकसान भरून काढण्याची अपेक्षा भाजपला आहे. ओरिसामध्ये भाजप आठवरून १५ जागांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये १८ वरून २४ पर्यंत, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी, जनसेना आणि भाजप एकत्रितपणे २५ पैकी २०-२२ जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवून आहेत, तर तेलंगणामध्ये भाजपला चारऐवजी आठ जागा जिंकण्याचा अंदाज आहे.

मागच्या वेळी भाजपला ईशान्येत २५ पैकी १५ जागा मिळाल्या होत्या. आता ‘एनडीए’ला तिथे २० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. बंगालबाबत परस्परविरोधी दावे केले जात असले तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओरिसा या तिन्ही राज्यांमध्ये भाजप आणि ‘एनडीए’ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार असल्याबाबत कोणालाही शंका नाही. छत्तीसगड आणि झारखंडमध्ये भाजपला चांगले निकाल अपेक्षित आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील चार राज्यांकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफच्या जागा ‘इंडिया’ आघाडीकडे जातील. काँग्रेसचा अंदाज आहे की ‘इंडिया’ आघाडी येथे सर्व २० जागा जिंकेल आणि भाजप खातेही उघडणार नाही. त्याचप्रमाणे तामिळनाडूतील सर्व ३९ जागा आपण जिंकू असा ‘इंडिया’ आघाडीचा दावा आहे. काँग्रेसच्या मते ‘एआयएडीएमके’ किंवा भाजपला येथे एकही जागा मिळणार नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसला २८ पैकी १८ जागा मिळण्याचा, तर तेलंगणामध्ये १७ पैकी १५ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, तेलंगणामध्ये भाजपच्या जागा चारवरून दोनवर येतील आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या खात्यात जातील. गेल्या वर्षभरात ही दोन्ही राज्ये काँग्रेसने जिंकली आहेत.

दोन्ही पक्षांसाठी उत्तर प्रदेश सर्वात महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशबाबत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे आणि मूल्यांकन केले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र लढले तेव्हा भाजपच्या जागा ७१ वरून ६२ वर आल्या, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलाने दोन्ही जागा राखल्या. बसपला या आघाडीचा सर्वाधिक फायदा झाला. कारण त्यांच्या जागा शून्यावरून दहावर गेल्या. समाजवादी पक्षाला त्यांच्या पाच जागा राखण्यात यश आले असले तरी २०१४ च्या तुलनेत मतांची टक्केवारी ४.२४ टक्क्यांनी घसरून १८.११ टक्क्यांवर आली. यावेळी काँग्रेस-सप मिळून ८० पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. २०१९ च्या तुलनेत समाजवादी पक्ष कमकुवत झाला असताना काँग्रेस असा दावा कसा करत आहे, असा प्रश्न पडतो. राष्ट्रीय लोकदल, सुभासपा आणि निषाद पक्षानंतर महान दल आणि जनवादी पक्षानेही सपपासून वेगळे होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

‘अपना दल’ (कामरावादी) पक्षानेही सपची साथ सोडली. हे सर्व छोटे पक्ष विविध मागास जातींचे प्रतिनिधित्व करतात. या सर्व पक्षांमुळे विधानसभा निवडणुकीत सपला फायदा झाला; जो यावेळी सपऐवजी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो. पण काँग्रेस दावा करत आहे की, उत्तर प्रदेशमधील ६२ पैकी २६ जागा भाजपने अत्यंत कमी फरकाने जिंकल्या होत्या. त्या सगळ्या जागांवर काँग्रेस-सप युती पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे; यात बसपचाही एक कोन आहे. त्या पक्षाने गेल्या वेळी समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता; मात्र यावेळी बसपने सप-काँग्रेस आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील निकाल आपल्या मूल्यांकनानुसार लागल्यास ‘एनडीए’ला लोकसभेत बहुमत मिळणार नाही; मात्र त्रिशंकू लोकसभा निर्माण होईल, असा काँग्रेसचा विशास आहे. पण दोन्ही आघाड्यांमध्ये सामील नसणाऱ्या बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांची सत्ता जवळपास संपुष्टात येत असताना त्रिशंकू लोकसभा कशी होणार, असा प्रश्न पडतो. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये ७१ चा आकडा गाठेल आणि मित्रपक्ष म्हणून लढत असणाऱ्या पाचही जागा जिंकेल अशी आशा आहे.

दुसरा कल म्हणजे किमान गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा आवाज कमी असून निवडणुकीच्या घोषणा कमी ऐकू येत आहेत. त्यामुळे केवळ मतदानाच्या आकडेवारीच्या आधारे कोणतेही भाकीत करणे योग्य नाही. सत्य हे आहे की तपशीलवार बूथ लेव्हल डेटाशिवाय एखाद्या विशिष्ट सीटसाठी योग्य अंदाज व्यक्त करता येत नाही. असे असले तरी वेगवेगळ्या आधारांवर मूल्यांकन सादर केले जाऊ शकते. यावेळी लाट नसल्याचे आतापर्यंतच्या मतदानावरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत कोणत्याही मुद्द्यावर मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे प्रदेश-राज्य किंवा जात-समुदायाच्या आधारावर कोणत्याही चेहऱ्याभोवती विभागणी झालेली नाही. एकूणच, ‘एनडीए’च्या बहुमताचा आकडा सहज ओलांडण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने हे चिंताजनक मूल्यांकन आहे. मोदींच्या चेहऱ्याचे उदात्तीकरण करून भाजपने ‘राम मंदिर’ आणि ‘मोदींची हमी’ या मुद्द्यांआधारे आपला प्रचार पुढे नेला. २०१४ मध्ये ‘अच्छे दिन’ आणि २०१९ मध्ये ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ या मुद्द्यांमधून पक्षाने आपले उद्दिष्ट साध्य केले होते. आताच्या ‘इस बार ४०० पार’ या घोषणेने हिंदी पट्ट्यातील दलितांची कोंडी केली असली तरी उच्चवर्णीय आणि मागासवर्गीयांचा उत्साह वाढवला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये एनडीए वेगात पुढे जात आहे. पण कर्नाटक आणि महाराष्ट्रात मात्र अस्थिरतेची भावना आहे. निकाल काय येतील ते कळेलच, पण बलवान मानल्या जाणाऱ्या एनडीएला विरोधकांनी, इंडिया आघाडीने स्पर्धा निर्माण केली आहे, एवढे तरी स्पष्टपणे सांगता येते.

( लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in