संत साहित्य आणि लोकसाहित्याचे प्रवाचक; डाॅ.रामचंद्र देखणे

पुण्याच्या नेहरू सांस्कृतिक केंद्रात देखणे यांना ज्येष्ठ नाटककार गीतकार अशोकजी परांजपे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला
संत साहित्य आणि लोकसाहित्याचे प्रवाचक; डाॅ.रामचंद्र देखणे

रामचंद्र देखणे यांचे गेल्या सोमवारी पुण्यात निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीविश्वात ही वार्ता अतिशय धक्कादायक अशी होती. वयाच्या ६७व्या वर्षी देखणे यांची प्राणज्योत मालवली. देखणे यांच्या अनेक स्मृती मनात जाग्या होत आहेत. अगदी अलीकडे महाराष्ट्र कला संस्कृती मंच आणि अमरवाणी इव्हेंट फाउंडेशन यांच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी पुण्याच्या नेहरू सांस्कृतिक केंद्रात देखणे यांना ज्येष्ठ नाटककार गीतकार अशोकजी परांजपे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मी होतो. डॉ. देखणे यांनी अतिशय नम्रपणे, आपण पंढरीची वारी करणारा वारकरी आहोत. संतसाहित्य आणि लोकसाहित्य हा आपल्या चिंतनाचा विषय आहे, असे मनोगत व्यक्त केले. संतांच्या भारुडांनी समाजातले सौहार्द टिकविले. अशी नम्र भूमिका त्यांनी घेतली. त्याआधी एप्रिल महिन्यात पहिले विश्वात्मक संतसाहित्य संमेलन करवीर नगरीत आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचा पूर्वरंग बाळूमामाच्या पवित्र भूमीत आयोजित झाला होता, त्या दिवशी रात्री डॉ. देखणे यांनी कीर्तन केले. संमेलनाचा अध्यक्ष मी होतो. देखणे यांच्या कीर्तनात असा रंग भरला गेला होता की, मी टाळ घालून त्यांच्या कीर्तनात उभा राहिलो आणि त्यांच्यासोबत चाली म्हणू लागलो. देखण्यांचे कीर्तन ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ अशी प्रचिती देणारे होते. भावार्थ आणि निरूपण यांची सुरेख सांगड त्यांनी कीर्तनात घातली होती.

महाराष्ट्रात उत्तम ललित लेखक प्रवचनकार संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे संशोधक, कीर्तनकार, वक्ते अशा अनेक भूमिका पार पाडणाऱ्या देखणे सरांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राधिकरणात जनसंपर्क अधिकारी म्हणून ३७ वर्षे सेवा केली. ही सेवा करताना ‘पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी’ ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आणि पंढरीच्या वारीत कधी खंड पडू दिला नाही. इतकेच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी पालखी सोहळ्यात त्यांचा स्वतंत्र दिंडी सोहळा असे. त्यांचे वडील कीर्तनकार होते. बालवयातच देखणे यांना कीर्तनाची गोडी निर्माण झाली. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण या संत वचनाप्रमाणे देखणे वडिलांच्या कीर्तनात बालवयातच टाळ घालून उभे राहत आणि चक्क अभंगांच्या चाली म्हणत, ‘माझ्या वडिलांची मिराशी मिरविल गा देवा’ या संत उक्तीप्रमाणे त्यांनी वडिलांची वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. संत एकनाथांच्या भारुडातील तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली. मूळच्या विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले देखणे सर रमले ते संतसाहित्यात आणि लोकसाहित्यात अलीकडेच उत्तर प्रदेशमधील निमिश अरण्यात त्यांनी प्रवचन सेवा केली. देखणे सरांनी सुमारे २१०० भारुडाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर केले. इतकेच काय, अमेरिकेतील सॅन होजे येथे आयोजित झालेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनात त्यांनी संतसाहित्यावर व्याख्यान दिले, तसेच या साहित्य संमेलनाच्या दिंडीत पंढरीच्या वारीची अनुभूती घडविली. सुमारे ५० हून अधिक संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली तसेच ५० ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. हे ग्रंथ प्रामुख्याने संतसाहित्य विषयक आणि लोकसाहित्य विषयक असे आहेत. संतांच्या गवळणींवर अलीकडेच त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

ज्येष्ठ नाटककार अशोकजी परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण होताना देखणे सरांनी ‘राधा रंग’ हा कार्यक्रम पाहिला आणि या कार्यक्रमाची भरभरून प्रशंसा करताना असाच कार्यक्रम दुसऱ्या विश्वात्मक संतसाहित्य संमेलनात त्रिपुराला आपण करू, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर त्रिपुरातील कार्यक्रमाचे लेखन करायची तयारी त्यांनी दाखविली. देखणे सरांचा स्वभाव अतिशय रुजू आणि नम्र होता. जयांची विनय हीच संपत्ती असे, त्यांचे वागणे होते. त्यांनी कधीही आपण थोर लेखक असल्याची भूमिका आणि अहंता बाळगली नाही. संतसाहित्यातील लोकतत्त्व हा त्यांचा अतिशय आवडता विषय.

संतांची भारुडे म्हणजे जणू परमार्थाची विश्वात्मक रंगभूमी आहे, अशी भूमिका देखणे सरांनी नेहमीच घेतली. इतकेच काय, संतांच्या भारुडामागील तत्त्वज्ञान स्पष्ट करताना त्यांनी भारुडांचा अभिधामूलक अर्थ लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ यांचा सुरेख मेळ घातला. संत वाङ्‌मया‌तील पर्यावरण हा देखणे सरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. पुण्यात आयोजित झालेल्या पर्यावरण विषयक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. देखणे सरांचे संत वाङ्‌मय आणि लोकवाङ्‌मय एखाद्या दीपस्तंभासारखे महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती विश्वात चिरस्मरणीय राहील

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in