पेट्रोल पंपावरील सुविधा

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात खूप लोक दोन-चार दिवसांच्या सहलीला जातात. वर्षअखेर आणि नवीन येणाऱ्या वर्षाचा आरंभ साजरा करायचा असतो. अशा वेळी स्वतःचे खासगी वाहन अथवा भाड्याने वाहन घेऊन प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण अशा सहलीला जाताना काय अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी एक सजग ग्राहक म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्यात, ते समजून घेणे आवश्यक आहे.
पेट्रोल पंपावरील सुविधा
एएनआय
Published on

ग्राहक मंच

अंजली पोतदार

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात खूप लोक दोन-चार दिवसांच्या सहलीला जातात. वर्षअखेर आणि नवीन येणाऱ्या वर्षाचा आरंभ साजरा करायचा असतो. अशा वेळी स्वतःचे खासगी वाहन अथवा भाड्याने वाहन घेऊन प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण अशा सहलीला जाताना काय अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी एक सजग ग्राहक म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्यात, ते समजून घेणे आवश्यक आहे.

गणेश हा चाळीशीच्या वयाचा तरुण मुलगा. तो आपले आईवडील आणि कुटुंबाला घेऊन सुट्टीत कोकणात जायला निघाला होता. कोकणात विमान सेवा सुरु झाली आणि गणेशने आई-बाबांना आता कोकणातील जुन्या घरी नेऊन आणायचे म्हणून विमानाची तिकीटे काढून तिथून पुढे गाडीही बुक केली. आई-बाबाही खुश होते. विमान प्रवास मस्त झाला. गाडीत बसतानाच गणेशने ड्रायव्हरला विचारले, ‘पेट्रोल बिट्रोल भरलंयस ना रे गाडीत?’ त्यावर ‘साहेब, जवळच पेट्रोलपंप आहे. जाता-जाताच भरू.’, असे उत्तर ड्रायव्हरने दिले. सगळे पेट्रोलपंपावर पोहोचले, पण ही मोठी रांग बघून गणेश जरा खट्टू झाला. विमानतळाजवळ तो एकच पेट्रोलपंप असल्यामुळे सगळी वाहने तिथेच पेट्रोलसाठी थांबणे साहजिकच होते.

गणेश गाडीतून पाय मोकळे करण्यासाठी म्हणून उतरला. पेट्रोलपंपाचे निरीक्षण करताना त्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या -

टायरमध्ये हवा भरण्यासाठी तिथे दहा रुपये घेतले जात होते.

पिण्याच्या पाण्याची काहीही सोय नव्हती.

शौचालयाची काहीही सोय नव्हती.

गणेश हा हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीमध्येच काम करत असल्यामुळे त्याला पेट्रोलपंपावर कशा प्रकारे काम चालते याचा अंदाज होता. त्याच्या गाडीच्या पुढे अजूनही चार गाड्या रांगेत होत्या. त्यामुळे त्याच्याकडे वेळ होता. तो पेट्रोल ज्या नळीने भरले जाते तिथे जाऊन उभा राहिला. सहज त्याने त्या पंपावर पाच लिटरचे माप आहे का, याची चौकशी केली. त्याबरोबर तो पेट्रोल भरणारा माणूस खूपच रागावला. ‘तुमचा विश्वास नाही का आमच्यावर?’ ‘तुम्हाला कशाला हवे आहे पाच लिटरचे माप?’, वगैरे बडबड करू लागला. गणेशने त्याला शांतपणे खिशातील ओळखपत्र (ID कार्ड) दाखवले. त्याबरोबर तो माणूस जरा नरमला. पण माप आणायला टाळाटाळ करू लागला. गणेशने त्याला माप आणायला लावलेच. शिवाय पंपातून पाच लिटर त्यात भरायला लावले. माप पावणेपाच लिटरचेच भरले, पण मीटर मात्र पाच लिटर भरल्याचे दाखवत होता. म्हणजे इथे मापातही पाप होते. गणेशच्या रागाचा पारा जरा चढू लागला. ऐवीतेवी वेळ आहेच तर जरा पेट्रोलची शुद्धताही तपासूनच पाहू म्हणून गणेशने फिल्टर पेपर परीक्षा करायची ठरवली. एरवी तर एखाद्या सामान्य ग्राहकाला पेट्रोलपंपच्या कर्मचाऱ्याने उडवून लावले असते. पण गणेशचे ओळखपत्र पाहिल्यामुळे त्याने चुपचाप फिल्टरपेपर टेस्ट करण्यासाठी दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलावले.

फिल्टरपपेरवर थोडे शुद्ध पेट्रोल टाकले तर ते बाष्पीभवनामुळे लगेच उडून जाते आणि फिल्टरपपेरवर जराही डाग शिल्लक राहत नाही, पण जर पेट्रोलमध्ये भेसळ असेल तर मात्र फिल्टरपपेरवर पिवळसर डाग राहतो. इथले पेट्रोल मात्र भेसळरहित होते.

तेवढ्यात गणेशच्या गाडीचा पेट्रोल भरायला नंबर लागला. मीटरवर जेवढे लिटर आले त्यापेक्षा पाच लिटरला पाव लिटर जास्त पेट्रोल भरायला लावून गणेशने पैसे दिले. पावती घेतली ज्यावर पेट्रोलपंपाचे नाव, पत्ता, किती लिटर पेट्रोल कधी भरले याची नोंद असते. गणेशने तक्रारपुस्तकाची मागणी करून त्यात आपल्या तक्रारीची नोंदही केली.

गणेश हा त्या क्षेत्रातील माहितगार होता, त्याच्याकडे वेळही होता म्हणून तो हे सगळे करू शकला. पण पेट्रोलपंपावर ग्राहकांसाठी म्हणून काय काय सुविधा मोफत उपलब्ध असतात हे एक जागरूक ग्राहक म्हणून आपल्याला माहीत असायला हवे.

पिण्याच्या पाण्याची सोय.

टायरमध्ये हवा भरणे आणि हवा तपासणे.

स्वच्छ शौचालय उपलब्ध असणे.

पेट्रोल अथवा डिझेलचे आकारमान तपासण्यासाठी पाच लिटरचे माप उपलब्ध असणे.

फिल्टर पेपर टेस्टसाठीचे साहित्य उपलब्ध असणे.

प्रथमोपचार पेटी, अग्निसुरक्षेची सोय, तक्रार पुस्तक उपलब्ध असणे.

या सर्व गोष्टींपैकी कुठलीही सुविधा उपलब्ध नसेल तर ग्राहक तशी नोंद तक्रार पुस्तिकेत करू शकतो.

pgpetrol.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रारही करता येते. तसेच पेट्रोलियम कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईन क्रमांकांवर तक्रार करू शकतो.

भारत पेट्रोलियम---१८००२२४३४४

इंडियन ऑइल ---१८००२३३५५५

हे हेल्पलाईन क्रमांक आहेत.

ग्राहक म्हणून पेट्रोलपंपावर आपणही काही गोष्टींचे पालन केले पाहिजे -

पेट्रोल भरताना गाडीतून खाली उतरावे.

मोबाईलचा वापर करू नये .

सुटे पेट्रोल देण्याचा आग्रह धरू नये. अगदीच अडचण असेल तर प्लॅस्टिकची बाटली न वापरता धातूच्या कॅनमधून पेट्रोल आणावे. कारण पेट्रोल ज्वालाग्राही असल्यामुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे शक्यतो पेट्रोल वाहनातच भरावे.

ग्राहकाच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास पेट्रोलपंप मालकास दंड होतो. अगदी परवाना रद्द होण्याची तरतूदही कायद्यात आहे. म्हणूनच ग्राहक म्हणून आपली ताकद ओळखूया आणि सजगतेने वागूया.

मुंबई ग्राहक मंच

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in