वारीच्या वाटेवरील सोयीसुविधा

पावसाच्या धारांसोबत भक्तिरसाचा बाज आणि टाळ-मृदुंगाचा आवाज घेऊन येणारी आषाढीची वारी म्हणजे गेल्या साडेसातशे वर्षांपासून चालत आलेला अद्भूत संघटनाचा एक विलक्षण चमत्कार आहे. हे सगळे कितीही खरे असले, तरी त्याबरोबर निर्माण होणारे आजच्या काळाच्या संदर्भातले प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.
वारीच्या वाटेवरील सोयीसुविधा
Twitter/@micnewdelhi
Published on

- मेधा इनामदार

नोंद

पावसाच्या धारांसोबत भक्तिरसाचा बाज आणि टाळ-मृदुंगाचा आवाज घेऊन येणारी आषाढीची वारी म्हणजे गेल्या साडेसातशे वर्षांपासून चालत आलेला अद्भूत संघटनाचा एक विलक्षण चमत्कार आहे. हे सगळे कितीही खरे असले, तरी त्याबरोबर निर्माण होणारे आजच्या काळाच्या संदर्भातले प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

यंदा २९ जूनला ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीहून निघालेली पालखी पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे करत १५ जुलैला वाखरीला पोहोचेल. तिथून १६ तारखेला पंढरपूरला पोहोचेल. देहू येथून २८ जूनला निघालेली तुकाराम महाराजांची पालखीदेखील १६ जुलैला पंढरपूरला पोहोचेल. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच इतर सर्व संतांच्या मानाच्या पालख्या त्या त्या गावापासून निघतात आणि वाटेत मुख्य पालख्यांमध्ये सामील होतात. त्यात पैठणहून संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई, माता रुक्मिणी आणि इतर सुमारे २३ संतांच्या पालख्या असतात. सुमारे तीन आठवड्यांची ही पदयात्रा अनेक गावे आणि शहरे ओलांडत पंढरपूरला पोहोचते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत ३२९ दिंड्या असतात, तर माऊलींच्या पालखीसोबत ४५० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत दोनशेपासून हजार-पंधराशे वारकरी असतात. या दिंड्यांबरोबर जाणाऱ्या हजारो लोकांसोबत ‌‘मुक्त‌’ वारकरीही असता आणि त्यांची संख्याही तितकीच असते. याचाच अर्थ सुमारे दीड लाखांच्या आसपास भक्तगण पंढरीला जातात. अर्थातच, या इतक्या लोकांची सर्वच प्रकारची व्यवस्था म्हणजे खाणे-पिणे, रात्रीचा मुक्काम आणि नित्यविधीची सोय करणे हे अत्यंत कठीण काम आहे. कारण माणसांच्या महापुराने गावातल्या आणि शहरातल्या रहदारीबरोबरच या सगळ्या व्यवस्था कोलमडून जातात.

पाऊस पडला की रस्ते उखडणे महाराष्ट्रातल्या जनतेने जणू शांतपणे स्वीकारले आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना त्याचा त्रास होतोच. पण तरीही या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यात पडल्यामुळे पाय मुरगळणे, खरचटणे यांसारखे त्रास भक्तांना सोसावे लागतात. त्यावर एक ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या दिवेघाटात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार होत असतात. त्यामुळे पडलेला राडारोडा, दगडमाती महामार्गालगत आणि जवळच्या नाल्यामध्ये पडून राहिलेला आहे. दरडींना संरक्षण जाळ्या बसवणे, बॅरिगेट्स, गरज असेल तिथे धोक्याची सूचना देणारे फलक लावणे या गोष्टी केल्या जाव्यात, अशीदेखील मागणी आहे. रहदारी आणि वारकरी यांच्यासाठी ही बाब नक्कीच आवश्यक आहे

ह.भ.प शिवाजी महाराज मोरे यांनी संत तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून बराच काळ काम पाहिले आहे. ते म्हणाले की, पंढरीच्या वारीला साक्षात विठ्ठलाच्या आशीर्वादाचा स्पर्श लाभला आहे. त्यामुळे आजवर अन्नपाणी कधीही कमी पडलेले नाही. असंख्य अन्नदाते स्वयंस्फूर्तीने पुढे येतात आणि विठूरायाच्या वारकऱ्यांना अन्नदान करतात. एकही वारकरी उपाशी राहात नाही. या भक्तांना केवळ देवाच्या भेटीची ओढ असते. त्यामुळे त्यांच्याही फार अपेक्षा नसतात. त्यांना देवळाच्या ओवरीतही झोप लागते. एखाद्या झाडाखालीदेखील ते त्याच निर्लेपतेने झोपू शकतात. सकाळी विठ्ठलाच्या नामस्मरणाने नवा दिवस सुरू करताना त्यांना केवळ पांडुरंगाचे चरण दिसत असतात.’

वारीत सहभागी असलेल्या असंख्य वारकऱ्यांना प्रात:विधीच्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. वारीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी आणि अर्थातच पंढरपूरमध्ये यामुळे होणारी अस्वच्छता हा स्थानिकांसाठी आणि अर्थातच शासनासाठी फार मोठा प्रश्न होता. यामुळे चंद्रभागेचे वाळवंट घाणीच्या ढिगाऱ्याने भरून जाते. २०१५ मध्ये एका जाणत्याने याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. त्यातूनच निर्माण झाली ‌‘निर्मल वारी‌’. वारकऱ्यांना पुरवली जाणारी ही फिरत्या शौचालयाची संकल्पना सर्वांनाच भावली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ‌‘निर्मल वारी‌’ आता पूर्ण वारीसाठी लागू केली आहे. शिवाजी महाराज मोरे या निर्मल वारी अभियानामध्ये पहिल्यापासून सहभागी आहेत. एक संयोजक म्हणून त्यांनी हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि अजूनही घेत आहेत. सुरुवातीला पुण्याच्या सेवा सहयोग फाऊंडेशनच्या मदतीने सुमारे २०० फिरती शौचालये वारकऱ्यांना सेवा पुरवत होती. आज शासनाच्या मदतीने ही संख्या १५०० पर्यंत गेली आहे. वारी खरोखरच ‌‘निर्मल‌’ झाली आहे.

वारकऱ्यांना त्रासदायक ठरणारा दुसरा प्रश्न आहे, या दिवसांमध्ये काही ठिकाणी अनुभवायला मिळणारे कडक आणि कठोर ऊन. गेल्या काही वर्षांमध्ये जंगले नाहीशी झाली. रस्त्याच्या रुंदीकरणात लाखोंच्या संख्येने झाडे कापली गेली. पंढरपूरकडे जाणारा रस्ता अक्षरश: कोरडा पडला. त्या रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा जीव त्या उन्हाने कासावीस होऊ लागला. यातूनच पुढे आली ‌‘हरित वारी‌’ची कल्पना. पंढरपूरकडे येणाऱ्या दहाही रस्त्याच्या दोहो बाजूंना सावली देणारी प्रशस्त सुंदर झाडे लावून वारीचा प्रवास सुसह्य नव्हे, तर नयनरम्य आणि आकर्षक करायची ही सुंदर संकल्पना मोरे यांनी प्रत्यक्षात आणली आहे. पंढरपूरच्या लोकसंख्येइतकी म्हणजे ९८,९२३ झाडे लावायची ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. वारकऱ्यांनी, लोकांनी, सेवाभावी संस्थांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनीदेखील ती अंमलात आणली. वड, पिंपळ, चिंचेसारखी सावली देणारी मोठी झाडे मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यावर लावली गेली. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिंब्यामुळे हे काम आणखी सोपे झाले. ५ जून २०१८ रोजी हे काम सुरू झाले. शासनाकडून वृक्षरक्षणासाठीचे ९,२०० पिंजरे मिळाले. कर्मचारी नियुक्त केले गेले. शासनाने पाण्याच्या टँकर्सची सोय केली आणि पाहता पाहता ७५०० हजारपेक्षा जास्त झाडे लागली, मोठी झाली आणि आता तो रस्ता हिरवागार झाला आहे. आता दरवर्षी एकेका रस्त्याचे असे हिरवाईकरण करून ‘हरित वारी’ची संकल्पना लवकरच पूर्ण करायची आहे.

हरित वारी आणि निर्मल वारीच्या या संकल्पनेला वारकऱ्यांची, स्थानिकांची, अधिकाऱ्यांची आणि शासनाची संपूर्ण साथ आहे. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. याबरोबरच महाराष्ट्र सरकारने वारी आणि वारकऱ्यांसाठी या वर्षी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि मदतीसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापण्यात येणार आहे. पंढरपूर वारीच्या जागतिक नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यामुळे पंढरपूर वारीचे अनोखेपण संपूर्ण जगाला माहीत होईल आणि या अद्भूत सोहळ्याला जागतिक महत्त्व येईल. निर्मल वारीसाठी ३६ कोटींचा निधी दिला जाणार असल्यामुळे वारकऱ्यांची मांदियाळी ईश्वरभक्तीचा गजर करत पुढे जात राहणार आहे. ती अखंड चालू राहीलच, पण वृद्धिंगतही होत जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in