श्रद्धा डोळसच असावी !

या दोन्हींनी आपल्याला नसलेले ज्ञान देऊन आपल्याला जगण्यालायक बनविलेले असते.
श्रद्धा डोळसच असावी !

नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. अनेकांनी आपापल्या गुरूंचे मनोभावे पूजन, स्मरण केले असेल. आयुष्यात अनेक गुरूंकडून आपण अनेक क्षेत्रातील ज्ञान मिळवीत असतो. बऱ्याचदा अशा गुरूंचे आपल्याला विस्मरणसुद्धा होत असते; पण अशा कोणत्याही गुरूंपेक्षा माणसाच्या मनात अपार श्रद्धा असते, ती आपल्या आध्यात्मिक गुरूंबद्दल! श्रद्धा कोणावर ठेवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी या विषयावर चर्चा करणे गैरलागू ठरू नये. आई-वडील तर आपले जन्मजात गुरू असतात. शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रत्येकालाच गुरू असतात. या दोन्हींनी आपल्याला नसलेले ज्ञान देऊन आपल्याला जगण्यालायक बनविलेले असते. त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे कोणाचे नुकसान झाले असे कधीच होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून त्यांच्याबद्दल आदर बाळगायलाच हवा. खरा प्रश्न आहे तो अध्यात्मातल्या तथाकथित गुरूंचा आणि त्यांच्यावर ठेवण्यात येणाऱ्या श्रद्धेचा! आपल्याकडे आध्यात्मिक बाबांचा, गुरूंचा नुसता सुळसुळाट झालेला आहे. पावसाळ्यात जागोजागी जशा कावळ्याच्या छत्र्या उगवलेल्या दिसतात तसे दूरदर्शनवर दररोज नवनवे गुरू उगवत असतात. रामायण, महाभारत, गीता यांचे जुजबी ज्ञान आणि बोलबच्चनगिरी या भांडवलावर आपल्या देशात आध्यात्मिक गुरू होणे हे प्राथमिक शिक्षक होण्यापेक्षाही सोपे आहे. आपल्याकडची जनता तशी देवभोळी, चमत्कारांवर, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणारी; तशात वाढती महागाई, बेरोजगारी, गरिबी, आजारपण, समाजातील फसवेगिरी, गुंडगिरी आणि माणसातून संपत चाललेले माणूसपण यामुळे अशा आध्यात्मिक गुरूंकडे खच्चून गर्दी जमत असते. आपल्याकडे सुशिक्षित असणे आणि बुद्धी असणे यांचा काहीच संबंध नसतो, म्हणूनच अशा गुरूंकडे सुशिक्षितांच्याही रांगा लागलेल्या दिसतात आणि इतका शिकलेला माणूस त्याच्या पायावर डोकं टेकवतो म्हणजे नक्कीच काहीतरी असणार, अशा समजुतीतून अशिक्षित, अर्धशिक्षित तेथे गर्दी करतात. राजकीय पुढाऱ्यांचा अशा बाबा-महाराजांच्या दरबारात जाण्याचा हेतू निव्वळ त्यांच्या शिष्यगणांकडून आपली मतपेटी जड व्हावी हा असतो, तर या बाबा-महाराजांना राजकीय पुढाऱ्यांकडून आपली दानपेटी जड करून घ्यायची असते. माणसाला हवी असते ती भौतिक प्रगती आणि ती प्राप्त करण्यासाठी तो जातो अध्यात्माच्या वाटेला! अध्यात्माच्या वाटेने सांसारिक समस्या सुटत नसतात, हे अशा भाबड्या लोकांना कळतच नाही. बरे, हे ज्या बाबा-महाराजांच्या नादी लागलेले असतात ते तरी कुठे अध्यात्माच्या वाटेवर असतात? घरदार - संसार, पैसा-अडका, कीर्ती-प्रसिद्धी हे सर्व व्यर्थ आहे असे सांगणारे सर्व बाबा- महाराज मात्र याच सर्व गोष्टींमध्ये लिप्त होऊन पंचतारांकित आयुष्य जगताना दिसतात. करोडोंची माया जमविणाऱ्या, आपल्याच भक्त स्त्रियांच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या, लोकांना अध्यात्माचे डोस पाजून स्वतः मात्र सर्व विकारांनी भरलेले विलासी जीवन जगणाऱ्या आणि तरीही आत्महत्येच्या भेकड मार्गाने जाणाऱ्या अशा बाबा-महाराजांना गुरू मानून, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे पूजन करणे योग्य आहे का? ही सर्व बाबा मंडळी हवेतून अंगठी काढणे, हातातून विभूती काढणे, असे जे सडकछाप चमत्कार दाखवतात त्यापेक्षाही कितीतरी जास्त चांगले, तोंडात बोटे घालायला लावणारे चमत्कार रस्त्यावरचे जादूगार दाखवीत असतात; पण ते प्रामाणिक असतात म्हणून त्यांनी भगवे कपडे घालून अध्यात्माची झूल पांघरलेली नसते. ते रामायण, महाभारताचे दाखले देऊन लोकांना गंडवत नाहीत तर आपला मोबदला घेऊन लोकांचे घटकाभर मनोरंजन करतात. अशा फसव्या जादूगारांना आपण गुरू मानून बसतो. ते आपल्याला अडचणीतून सोडवतील म्हणून त्यांच्या चरणी आपली श्रद्धा, आपला पैसा वाहतो. ज्याने कधी संसार केला नाही, कष्टाने कधी दोन पैसे कमावले नाही तो काय आपल्याला मार्गदर्शन करणार? अशा बाबांना ना धड संसार जमलेला असतो, ना धड अध्यात्म. मुळातच अशा बाबा-महाराजांकडे जाणाऱ्यांपैकी एक टक्का लोकांनाही मोक्षप्राप्ती नको असते. सर्वांना भौतिक सुख, प्रगतीच हवी असते. त्यासाठी अशा कोणा बाबा-महाराजांच्या चरणी लीन होण्याची गरज नसते, तर शिक्षण, व्यावहारिक शहाणपण, संयम, चिकाटी,शारीरिक व बौद्धिक परिश्रम यांची गरज असते. अशा भोंदू बाबा-महाराजांच्या आशीर्वादाने जर पैसा, आरोग्य प्राप्त झाले असते, तर उद्योपतींनी अहोरात्र मेहनत केली नसती, वैद्यकीय महाविद्यालये, दवाखाने ओस पडले असते. आपण फक्त एखाद्या देवस्थानावर, संताच्या समाधीवर एखाद्या भक्ताने इतक्या तोळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला, इतक्या लाख रुपयांची देणगी दिली, अशा बातम्या वाचून/पाहून हरखून जातो. असा भक्त फक्त तीर्थयात्रा करीत फिरत होता की देवाचे, संतांचे नामस्मरण करून अहोरात्र प्रामाणिकपणे आपल्या उद्योगासाठी कष्ट करीत होता, हे कोण पाहणार? एकीकडे करोडो देशबांधवांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत तर दुसरीकडे अशा भोंदू बाबा-महाराजांच्या पायांवर करोडो रुपयांच्या राशी! ही विषमता आपणच निर्माण करून ठेवली आहे. या सर्व गोष्टींचा आपल्या आणि देशाच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असतो. आपल्या मुलांना शाळेत पाठविताना आपण चांगलीच शाळा निवडतो. त्यांना शिकवणीला पाठविताना हुशार, अनुभवी आणि मुख्य म्हणजे चरित्रवान शिक्षकाकडेच पाठवितो, मग आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी गुरू निवडताना आपण असे निर्बुद्धासारखे का वागतो? गुरू असावा, त्याच्यावर श्रद्धाही असावी; पण ती डोळस असावी. अंधळी कधीच नसावी!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in