

भ्रम विभ्रम
सुनील भगत
वेगवेगळे बुवा-महाराज विविध चमत्कार करुन दाखवतात आणि लोकांचा विश्वास संपादन करतात. यातून भक्तांची एक साखळी तयार होते. ही साखळी तोडायची असेल तर चमत्कारांमधील विज्ञान ओळखायला हवे. लोकांना विज्ञान साक्षर करायला हवे.
अंधश्रद्धेविषयी काही बोलण्याआधी सर्वप्रथम, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सचिन नायक आणि भोपाळचे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रीतेश. गौतम यांच्या मते, श्रद्धा ही एक अशी भावना आहे जी एखाद्या व्यक्तीची किंवा तत्त्वाची तपासणी केल्यानंतर स्वीकारली जाते. त्यामागे तर्क असतो. दुसरीकडे, अंधश्रद्धा म्हणजे अशी श्रद्धा ज्याच्या मागे कोणतेही तर्क नसतो. ज्या चालीरीती आणि श्रद्धांना कोणतेही वैज्ञानिक कारण नसते त्यांना ‘अंधश्रद्धा’ म्हणतात. अंधश्रद्धा ही देश, धर्म, संस्कृती, समुदाय, प्रदेश, जात किंवा वर्ग-विशिष्ट नसते, ती व्यापक आहे आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात ती आढळते.
लोक तांत्रिक आणि बाबांच्या जाळ्यात सहज का अडकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधताना तीन कारणे आढळतात. लोकांच्या समस्या बऱ्या झाल्या की त्यांना वाटते, हे बाबा किंवा देव माणसामुळे झाले. उदाहरणार्थ, समजा एखाद्याला कावीळ झाली आणि ज्या केळीवर मंत्र म्हणण्यात आले होते ती खाल्ल्यानंतर त्यांची कावीळ बरी झाली, तर संबंधित व्यक्तीला वाटते की, केळी खाल्ल्याने ते बरे झाले, जे एरवीही १५ दिवसांत स्वतःहून बरे होणार होते. पण अशा घटनांमुळे लोकांचा विश्वास वाढतो आणि अशा लोकांची एक साखळी तयार होऊ लागते.
शिक्षणाचा स्तर आणि ज्ञानाच्या अभाव हेही एक कारण आहे. ज्ञानाच्या अभावामुळे लोकांना अनेक गोष्टी माहित नसतात आणि ते सहजपणे अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात. शिवाय दैवी चमत्कार करणाऱ्या बाबांचे पेरलेले भक्त आजूबाजूला असतात आणि ते बाबाच्या नाटकाचे पात्र म्हणून काम करत असतात. बाबा दैवी आहे, अशी बतावणी ते इतरांकडे करतात. त्यामुळे इतर लोकांना बाबा खरोखरच दैवी आहेत असे वाटू लागते. त्यामुळे ते बाबांवर विश्वास ठेवू लागतात. ही मंडळी ब्रेन वॉशिंग करण्यात पटाईत असतात. लोकांवर त्यांच्या शब्दांचा प्रभाव पडतो.
मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे पोटदुखीसारखी समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही पोटाच्या डॉक्टरांना दाखवले तर बरं वाटणार नाही, कारण समस्या मानसिक आहे. अशा परिस्थितीत रुग्ण अस्वस्थ होतो आणि नंतर बाबा किंवा देव माणसाकडे गेल्याने त्याला शांती मिळते आणि पोटदुखी बरी होते. अशा प्रकारे त्याची श्रद्धा आणखी मजबूत होते. रुग्णाला वाटते की तो फक्त बाबांमुळेच बरा झाला आहे.
बाबांच्या जाळ्यात अडकल्यास समस्या उद्भवू शकतात. बराच काळ लोकांना हे कळत नाही की ज्या बाबाला ते मानतात तो त्यांची फसवणूक करत आहे. बराच काळ आणि नुकसान सहन केल्यानंतर लोकांना समजते की त्यांची फसवणूक झाली आहे. यानंतर त्यांना राग येतो आणि ते हा राग बाबांवर किंवा त्यांच्या कुटुंबावर काढतात.
बाबांनी फसवल्यानंतर, बरेच लोक नैराश्यात जातात आणि काही जण आत्महत्या देखील करतात.
पुढील तीन गोष्टींद्वारे आपण लोकांना मदत करू शकतो. आपण स्वतःला अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकतो.
जागरूकता
लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की देवी माता, भूत, आत्मा (जिन) हे सर्व मानसिक आजार आहेत आणि उपचारांद्वारे बरे होऊ शकतात. यासाठी जाणीव जागृती करणारी शिबिरे चालवली पाहिजेत.
शिक्षण
बाबा, तांत्रिक बुवा ही मंडळी अशा अनेक गोष्टी बोलतात आणि करतात ज्यांच्यामागे काहीही तर्क नसतो. ते अशा अनेक युक्त्यांना ‘चमत्कार’ म्हणतात ज्यांच्या मागे खरे तर विज्ञान असते. आपण योग्य शिक्षणाद्वारे हे सर्व जाणून घेऊ शकतो.
कायद्याची मदत
अंधश्रद्धेच्या प्रकरणांसाठी संपूर्ण देशात वेगळा कायदा नाही. यासाठी तुम्ही आयपीसीच्या या तीन कलमांची मदत घेऊ शकता. कलम ४२० - जर कोणी फसवणूक केली तर त्याच्याविरुद्ध कलम ४२० अंतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कलम ५०८ - आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगणे आणि इतरांना विधी करायला लावणे, अशा लोकांना दंडासह एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कलम ५११ आयपीसी - ज्या गुन्ह्यासाठी कोणताही कायदा नाही, त्यासाठी कलम ५११ अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते. यामध्ये, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. आता वरील कलमांची नावे बदलली आहेत.
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर २०१३ साली महाराष्ट्र हे ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ लागू करणारे पहिले राज्य बनले. ते चमत्काराला चमत्कार मानत नाही तर फसवणूक मानते. चमत्काराच्या नावाखाली विविध विधी करणे कायद्याच्या दृष्टीने फसवणूक आहे आणि असे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा आणि दंड होऊ शकतो. यात खालील विविध बाबींचा समावेश आहे - अघोरी प्रथा, दैवी शक्ती, अलौकिक शक्तींचा वापर, काळी जादू इत्यादी. यातील काळी जादू हा भाग समजून घ्यायला हवा.
काळी जादू
काळी जादू म्हणजे काय? सैतान किंवा दुष्ट आत्म्यांशी संबंधित जादूला ‘काळी जादू’ म्हणतात. त्याला ‘जादूटोणा’ असेही म्हणतात. जादुटोणा म्हणजे दुष्ट आणि स्वार्थी हेतूंसाठी अलौकिक शक्तीचा वापर करणे आणि एखाद्याचा शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नाश करण्यासाठी दुष्ट हेतूने काही विधी करणे. हे विधी पीडितेचे केस, कपडे, फोटो वापरून किंवा थेट डोळ्यात पाहून केले जाऊ शकतात. काळ्या जादूच्या नावाखाली विविध बनावट प्रकार केले जातात.
पाणी प्रज्वलन
यात पाण्यावर मंत्र मारून पाणी पेटवून दाखवले जाते. बाबा आणि तांत्रिक त्यात बेमलूमपणे सोडियमचे तुकडे टाकतात. सोडियमचे तुकडे पाण्यात टाकल्याने सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते, ज्यामुळे पाण्याचा पृष्ठभागावर आग लागते.
कार्बाइड दिवा
कार्बाइड दिवा किंवा ॲसिटिलीन वायू दिवा हा एक साधा दिवा आहे जो ॲसिटिलीन (C2H2 ) तयार करतो आणि जाळतो, जो कॅल्शियम कार्बाइड (CaC2 ) आणि पाण्यातील ( H2O ) अभिक्रियेद्वारे तयार होतो.
लिंबूमधून रक्तस्त्राव
प्रथम लिंबूमध्ये फेरिक क्लोराइड टोचले जाते. त्यानंतर, ज्या चाकूने ते कापले जाते त्यावर अमोनियम थायोसायनेट लावले जाते. या चाकूने लिंबू कापल्यावर, एक रासायनिक अभिक्रिया होते ज्यामध्ये फेरिक सल्फोसायनेट तयार होते, ज्याचा रंग रक्तासारखा लाल असतो.
कावीळ झाडणे
कावीळ झालेल्या रुग्णाचे हात पाण्याच्या भांड्यात टाकले जातात. यामुळे पाणी पिवळे होते. यामागील कारण म्हणजे हात प्रथम आंब्याच्या सालीच्या पाण्याने धुतले जातात. आंब्याच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल मोठ्या प्रमाणात आढळते. त्यानंतर, हे हात पाण्याच्या भांड्यात टाकले जातात ज्यामध्ये चुना मिसळला जातो, त्यामुळे पिवळा रंग तयार होतो. मग कावीळ काढून टाकलेली आहे, असे सांगितले जाते.
फोटोमधून राख पाडणे
अनेक तांत्रिक बाबा फोटोमधून राख पाडण्याचा चमत्कार करतात. यामध्ये ते भक्तांसमोर ॲल्युमिनियमच्या फ्रेममध्ये फोटो ठेवतात. ॲल्युमिनियमच्या फ्रेमला पाण्याने ओले केल्यानंतर या फ्रेमवर मर्क्युरी क्लोराइड लावला जातो. यामुळे रासायनिक अभिक्रिया होते. यामुळे ॲल्युमिनियम क्लोराइड तयार होते, ज्यामुळे पारा वेगळा होतो. हे दोन्ही राख, अंगाऱ्याच्या स्वरूपात खाली पडतात.
म्हणूनच जादुटोण्याच्या विविध प्रथांना आळा घालण्यासाठी लोक शिक्षित असण्यासोबतच जागरूक असणे आणि लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे खूप महत्त्वाचे आहे.
अंनिसचे कार्यकर्ते व विज्ञान प्रसारक