कुटुंबाचा इतिहास...मुलांना सांगायचा की नाही

एका शाळेत सातवीतील मुलांना निबंध लिहिण्यासाठी विषय दिला, कुटुंबाचा इतिहास. हा विषय देण्यापूर्वी शिक्षकांनी त्याच वर्गातील मुलांना प्रश्न विचारला होता.
कुटुंबाचा इतिहास...मुलांना सांगायचा की नाही

एका शाळेत सातवीतील मुलांना निबंध लिहिण्यासाठी विषय दिला, कुटुंबाचा इतिहास. हा विषय देण्यापूर्वी शिक्षकांनी त्याच वर्गातील मुलांना प्रश्न विचारला होता. तुमच्या आजोबांचं नाव काय? ते काय करायचे? मुलांना उत्तर देता आलं नाही. काही मुलांना आजोबांचं नाव सांगता आलं, पण काम सांगता आलं नाही. त्यानंतर पणजोबा आणि खापर पणजोबा माहीत असण्याचं काही कारणच नाही हे लक्षात येऊन सुद्धा शिक्षकांनी त्यांच्याबद्दलही विचारलं. परंतु हे शब्दही त्यांना माहीत नव्हते. त्यानंतर शिक्षकांनी थोडा सोपा प्रश्न विचारला. तुमच्या वडिलांच्या आयुष्यातील त्यांना आवडलेली घटना कोणती? मुलांनी खूप वेगवेगळी आणि भन्नाट उत्तरं दिली. एक मुलगा म्हणाला, ‘टिचर, माझ्या वडिलांच्या आयुष्यात चांगलं काही घडलंच नव्हतं. त्यांना फक्त त्रासच होता.’

दुसरा एक मुलगा म्हणाला, ‘माझे वडील तर प्रचंड गरीब होते. ते शेजारच्या मुलांकडून पुस्तकं घेऊन अभ्यास करत.’ वर्गात त्यादिवशी मुलांना खूप मजा येत होती. मुलं भरभरून बोलत होती. आई-वडिलांच्या बालपणात त्यांना चपला मिळाल्या नव्हत्या. पायी शाळेला जावं लागायचं. रस्ता लांबचा असायचा. युनिफॉर्म एकच असायचा. तोही दिवाळीला नवीन कपडे म्हणून घेतलेला असायचा. पावसाळ्यात पोतं डोक्यावरून घेऊन शाळेत जावं लागायचं. छत्री नसायची. पेन, पेन्सिल, सगळं मोजकंच मिळायचं. जुन्या वहीतील रिकाम्या पानांची हाताने शिवून केलेली वही असायची. दप्तर म्हणजे आत्ताची स्कूल बॅग वर्षानुवर्षे एकच असायची, ती पण सिमेंटच्या किंवा धान्याच्या पोत्यापासून शिवलेली असायची. इ.इ. पालकांच्या गरिबीचं वर्णन मुलांना तोंडपाठ होतं.

अशी गरिबी म्हणजे पालकांना त्यांच्या बालपणाचं कौतुक वाटतं की काय? त्यांना त्याचा अभिमान वाटतो का? की त्यांच्यासाठी ती प्रेरणादायी गोष्ट वाटते? मुलांच्या तोंडून पालकांचं बालपण ऐकून शिक्षकांना असे अनेक प्रश्न पडले. खरंच त्यावेळी इतकी गरिबी होती का, की आपण किती कष्टात वाढलो; तुम्हाला आम्ही कुठेही काहीही कसे कमी पडू देत नाही; हे सांगायचं असतं आणि त्याबदल्यात परीक्षेतील मार्कांची अपेक्षा करायची असते. मुलांना आपला भूतकाळ सांगितल्याने खरंच त्यांच्या मार्कांमध्ये बदल होत असतो का. त्यांना जर आपले कष्ट नाहीच सांगितले तर मुलांना आपली किंमत कळणार नाही असं का वाटतं. पालक नक्की कोणत्या गोष्टीला घाबरतात याचा विचार व्हायलाच हवा.

सुयशची आई येता-जाता, उठता-बसता सुयशला त्याच्या बाबांच्या बालपणातील गोष्टी सांगायची. सुयशचे आजोबा खूप कडक शिस्तीचे होते. खूप रागीट होते. त्याच्या बाबांना थोडं चुकलं तरी मारायचे. त्यांची आई प्रेमळ होती, पण बाबांच्या या शिस्तीला वैतागायची आणि ती त्याच्या बाबांवर चिडायची. आमचं लग्न झालं तेव्हा त्यांना चिडायला आणखी एक माणूस मिळाला. दोघं मिळून त्यांनी आई-बाबांना प्रचंड त्रास दिला. म्हणून मग आपण गाव सोडून शहरात आलो. आम्हाला फक्त तू चांगलं शिकावंस ही एकच अपेक्षा आहे. तुझ्या आजी-आजोबांसारखं आम्ही करत नाही. तुला मारत नाही. वगैरे वगैरे.

सुयशला ही गोष्ट तोंडपाठ होती. सारखं ऐकून तोही कंटाळला होता. एकदा ही गोष्ट ऐकल्यावर तो आईला म्हणाला, ‘आई.. बास आता. मला कळली आहे तुमची तेव्हाची गोष्ट, पण एक सांग, आजोबा शाळेत असताना बाबांना किती मार्क पडले विचारायचे का? आमचा मुलगा कसा वागतो विचारायला ते कधी शाळेत जायचे का? आजीचा बाबांच्या मित्रांच्या आयांसोबत किटी पार्टीचा ग्रुप होता का? आजी-आजोबा तासन् तास मोबाईलवर असायचे का? आजीने बाबांना कपडे, चपला नसतील दिल्या, पण तिने बालपणात त्यांना घास भरवला असेल ना. आजही बाबांना बघितल्यावर आजीच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय. आई..परत ही गोष्ट नको सांगू. नवं काहीतरी सांग मी ऐकेन नक्की.’ सुयशच्या आईला खूप वाईट वाटलं.

सुयशच्या बोलण्यात तथ्य होतं की नाही? पालक मुलांना त्यांच्या सोयीचा इतिहास सांगतात. आपले कष्ट, आपली गरिबी, तेव्हाची बंधनं, तेव्हाची भांडणं, कडक शिस्त इ. मात्र त्या काळात घरात असणारी माणसांची संख्या आणि तुलनेने होणारे मतभेद यांच्यातलं अंतर ओळखायला शिकवलं जात नाही. तेव्हा आजच्यासारखी फास्ट फूडची उपलब्धताच नव्हती आणि असती तर एखाद्या वेळेला तरी त्यांनी खाल्लंच असतं. त्या काळात म्हशीचं ताजंताजं आकरी दूध कसं आम्ही पीत होतो, त्यात काय मजा होती, अशी चर्चा मित्रांमध्ये करतात, पण हा विषय मुलांपर्यंत पोहोचवत नाही. तेव्हा आम्ही नॅचरल्सचं आइस्क्रीम खाऊ शकत नव्हतो, पण बर्फाचा गोळा दररोज दारावर यायचा आणि बऱ्याच वेळा तो आम्ही कसा मजा घेऊन चोखायचो अशी रसभरीत श्रीमंत अनुभवांची शिदोरी मुलांना द्यायला पालक विसरतात. केवळ दारिद्र्यानुभव उगाळत बसतात. त्यामुळे मुलांना त्यांच्या त्याकाळातील कष्ट ऐकण्यात मजा येत नाही. शिवाय तेव्हाच्या कष्टाबरोबर आताच्या मार्कांच्या अपेक्षांचं ओझं मुलांना बरोबर कळतं. म्हणूनही अशा गोष्टी ऐकायला ते नकार देतात.

प्रत्येक पालकाला वाटतं, आम्ही फार कष्टात वाढलो. लहानपणी संघर्ष केला. कठीण परिस्थितीशी लढलो. आर्थिक परिस्थितीचा सामना केला. हे सगळं तेव्हाचं वास्तव होतं. ते खरंच होतं, पण जिकडे तिकडे सर्वसाधारणपणे अशीच अवस्था होती. त्या काळात शेजारी, नातेवाईक, सहकारी सगळे अशाच परिस्थितीत होते. म्हणजे समस्या एकसारखी होती. ती कुठल्या एका पालकाची नव्हती. तरीही अनेक घरांमध्ये हेच चित्र मुलांसमोर उभं केलं जातं. तेव्हाची गरिबी आणि आताची श्रीमंती सांगण्यातच पालकांचा वेळ जातो. तेव्हाचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकीची श्रीमंती हे सगळं मुलांना सांगायला हवं, पण ते कुणी सांगताना दिसत नाही. मग मुलांना आमचा इतिहास सांगायचाच नाही का?

सांगावा ना..जरूर सांगावा. खराखुरा इतिहास सांगावा. तो चित्रपटांप्रमाणे रंजक, रोचक करून सांगू नये. तो सांगताना लहानपणी पालकांकडून झालेल्या चुका, त्यामुळे मिळालेली शिक्षा, त्याचे भविष्यात झालेले दुष्परिणाम हे देखील सांगायला हवं. मुलं विचारतात, बाबा.. तुम्हाला शाळेत किती टक्के पडायचे. ज्यांना चांगले पडायचे ते आजही छाती फुगवून अभिमानाने मार्क्स सांगतात. जसं की, 'मला बघ... मी बघ... तेव्हा तुमच्या एवढ्या सोईसुविधा मिळत नसून सुद्धा...वगैरे वगैरे'.. पण ज्यांना मार्क्स पडत नव्हते ते प्रश्नच धुडकावून लावतात. चिडचिड करतात. उत्तर देणं टाळतात. सोशल मीडियावर एक गमतीशीर विनोद काही दिवसांपूर्वी फिरत होता.

एक मुलगा गणितात नापास झाला म्हणून त्याचे वडील खूप ओरडतात. बराच वेळ आरडाओरडा सुरू असतो. मुलगा शांतपणे बाबांच्या रागाची प्रतिक्रिया न्याहाळत असतो. रागारागात बाबा त्याला विचारतात, ‘बोल की..एवढे कमी कसे पडले मार्क. क्लासपण लावलाय ना..काय करतोस तिथे जाऊन. उघड की तोंड आता...का लावू मुस्काटात.’ मुलगा म्हणाला, ‘बाबा..मार्क कमी कसे पडले मी कसं सांगू. ही तुमची आठवीतली मार्कलिस्ट आहे.’

आताची मुलं सर्जनशील आहेत. अनेक विषयांत प्राविण्य मिळवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मुलांसाठी तशा भरपूर संधीही उपलब्ध आहेत. मुलांना आजच्या गोष्टींवर लक्ष द्यायचं असतं. त्यांना भूत, भविष्याशी फारसं देणंघेणं नसतं. काही मुलांना पालकांच्या इतिहासाविषयी घृणा असते. पालकांविषयी कटुता, नात्यांविषयी कलुषित मन, आई-वडिलांबद्दल मनात सारख्या तक्रारी साठवणाऱ्या मुलांना यशासाठी मानसिक प्रेरणा मिळवताना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे मुलांना कुटुंबाचा इतिहास खराखुरा आणि काळजीपूर्वक सांगावा. कुटुंबाचं मूळ शोधावं-पिढीच्या मुळाशी जाणं जितकं शक्य आहे तेवढं अवश्य जावं. खापर खापर पणजोबा, खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा, बाबा अशा पद्धतीने मागे जाऊन आपल्या कौटुंबिक इतिहासाचा आढावा घ्यावा.

आडनावातील गंमत- आपलं आडनाव हे का पडलं किंवा आपलं आडनाव हेच का आहे याचं उत्तर मुलांना सांगायला हवं. ग्रामीण भागामध्ये आडनावाबरोबर एक पडनावही असतं. त्यावरूनच गावातील लोक त्या कुटुंबाला, कुटुंबातील सदस्याला, मुलांना सुद्धा ओळखत असतात. परंपरागत कामधंदा- आज्जा, पणजापासून कामात होत गेलेले बदल मुलांना सांगावेत. हे सांगत असताना मग आर्थिक परिस्थिती कशी होती, कशी झाली हे सांगावं. आत्ता पालक जे काही काम करतात, पैसे मिळवतात त्यासाठीच्या कष्टाची जाणीव करून द्यावी.

तेव्हाची प्रेमळ नाती - नात्यातील समंजसपणा, काहीवेळची सहनशक्ती, मतभेदामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, सततची छोटी-मोठी भांडणं इ. काहीही असलं तरी त्या नात्यात प्रेम होतं. त्याचमुळे नाती टिकून होती. काही अपवादात्मक कुटुंबात अस्थिरता निर्माण होऊन टोकाचे निर्णय झालेही असतील; परंतु त्याचं अगदीच तुरळक प्रमाण होतं. संवाद साधनं- त्याकाळी आजुबाजूला माणसांची संख्या भरपूर असायची. आईने मारलं तर आजी लाड करायची. बाबा ओरडले तर काकूच्या मागे लपायला जागा असायची. घरात आवडीची भाजी नसेल तर जेवायला शेजारी हक्काचं घर असायचं. एका वयाची, वयाने छोटी-मोठी मित्रमंडळी खेळायला कायम तयार असायची. शेती मोठ्या प्रमाणात असल्याने मैदानाची कमतरता नव्हती. प्राणी, पक्षी मित्र असायचे. निसर्ग असायचा. गप्पा मारायला कोणी नाही असं कधी व्हायचंच नाही.

इतिहास जसा सांगू तसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. आजचा दिवस उद्या इतिहास जमा होत असतो. कुटुंबाच्या इतिहासातील सत्य घटना मुलांसमोर आल्या तर ते त्याचा सहज स्वीकार करून पुढे जातील. नाहीतर कुटुंबाच्या इतिहासात त्याना कोणताच रस असणार नाही. कौटुंबीक इतिहास या विषयावरील निबंध लिहिण्यासाठी आठ दिवसाची मुदत होती. त्यासाठी मुद्देही दिले होते. आठ दिवसात घराघरात कधी आई बाबांमधे तुंबळ युध्द चाललं. तर कधी हास्य, प्रेम फुललं. कधी दु:ख उफाळून आलं तर कधी सुखद आठवणी दाटल्या. मुलांचा निबंध पालक अनुभवत होते. वार्षिक परिक्षेत या निबंधाला दहा मार्क होते. त्यामुळे निबंधातील पालकांचा हस्तक्षेप चांगल्या अर्थाने वाढला होता. मुलाना एक निबंधच तर लिहायचा होता. पण पालकाना जीवनाच्या परीक्षेत पुन्हा एकदा किमान पास होण्याइतपत गुणांक प्राप्त करायचे होते. मुलाना कौटुंबिक इतिहास सांगायलाच हवा या मताचा आग्रह धरणाऱ्या पालकांनी तो कसा सांगावा याची थोडी माहिती घ्यावी आणि मग हमारा खानदान...वगैरै उल्लेख करायला कुणाची काय हरकत असणार. नाही का..?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in