धास्तावलेल्या बाबांचे ओझ्याने वाकलेले खांदे

पुण्यातील भीषण अपघातामुळे अल्पवयीन मुलगा आणि त्याचे पिता तसेच त्याच्या पित्याचे पिता असे तिघेही चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा १६ जूनचा ‘फादर्स डे’ अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.
धास्तावलेल्या बाबांचे ओझ्याने वाकलेले खांदे
Published on

- उर्मिला राजोपाध्ये

विशेष

पुण्यातील भीषण अपघातामुळे अल्पवयीन मुलगा आणि त्याचे पिता तसेच त्याच्या पित्याचे पिता असे तिघेही चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा १६ जूनचा ‘फादर्स डे’ अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. सध्याच्या चंगळवादी जीवनशैलीत पाल्यांवर योग्य संस्कार करण्याची, त्यांना सजग, सुजाण आणि जबाबदार बनवण्याची जबाबदारी आईप्रमाणेच वडिलांच्या शिरावरही आहे. आता पित्याची भूमिका आमूलाग्र बदलत आहे.

मातृत्व असो की पितृत्व, ते स्वीकारणे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे पालन करणे, ते करताना प्रसंगी स्वत:च्या जीवाची बाजी लावणारे प्रसंग पेलणे अनिवार्य असते. अनेक पालक ही जबाबदारी पार पाडत असतात. पूर्वी कळत्या वयापासून मुले पालकांचे ऋण मानत होती आणि अखेरच्या क्षणापर्यंत साथ देऊन त्याची बूजही ठेवत होती. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने वेगवेगळ्या नात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या एकेका दिवसाची उत्पत्ती झाली आणि त्या धबडग्यात पित्यालाही एक दिवस मिळाला..!

आता या दिवशी म्हणजे ‘फादर्स डे’ला काही घरांमध्ये तरी पिता आणि मुलांचा मोकळा संवाद होतो. रिवाजाप्रमाणे भेटींची आणि शुभसंदेशांची देवाणघेवाण होते. एखादे सरप्राईज डिनर आयोजित केले जाते आणि आपण पित्याप्रति किती जागरूक आहोत, हे सिद्ध करणारी स्टोरी वा त्याच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून या दिवसाची सांगता होते. काळाचा महिमा म्हणून आपण हे सगळे स्वीकारले आहे. मात्र या सगळ्याच्या पलीकडे पित्याचा विचार करणे ही काळाची खरी गरज आहे, असे आता तीव्रतेने जाणवते.

सध्या एका किशोरवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत घरातील आलिशान गाडी चालवत दोघा दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गेले काही दिवस चर्चेत आहे. त्यानिमित्ताने या पिता-पुत्राच्या अटकेबरोबरच संबंधित मुलाचा आजोबादेखील अटकेत असल्यामुळे या घटनेकडे समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. म्हणजेच पिता-पुत्राच्या दोन जोड्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. हे घराणे पैसेवाले असल्याने मीडियाही मागे लागला आहे, असे क्षणभर गृहीत धरले तरी आता घराघरातले चित्र फारसे वेगळे राहिलेले नाही. एकीकडे आत्तापर्यंत समाजाने पित्यावर कर्तव्यकठोर असल्याचे लेबल लावले. त्याच्या शिस्तीच्या बडग्याचा धिक्कार केला. त्याच्या धाकाला अयोग्य मानले. मुलांनी मागितले की तत्काळ कधीच द्यायचे नाही, हे ब्रीद जपणाऱ्या मागील पिढीतील अनेक पित्यांनी पुढे आयुष्यभर मुलांच्या आयांचे भलेबुरे बोल ऐकले. म्हणजे तेव्हाही त्यांच्यावर टीकाच झाली. मुले आईशी लगटून राहिली, त्यांनी तिला आपल्या भावविश्वात मानाचे स्थान दिले. पण दुसरीकडे त्यांनी पित्याला मात्र दोन हात दूर ठेवले. हे पाहून आजचा पिता मुलांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे लाड पुरवतो, त्यांना हवे ते सर्व देतो. पण त्यानंतर काय घडते, हे सध्याची स्थिती दाखवून देत आहे. त्यामुळेच ‘फादर्स डे’ साजरा करताना मुलांच्या आयुष्यात पित्याची भूमिका नेमकी कशी असायला हवी, याबद्दल गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

अपत्यावर जीवापाड प्रेम असणे हे केवळ मातेचे स्वभाववैशिष्ट्य आहे, असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण अपत्यजन्मानंतर पिताही त्याच भूमिकेतून जगायला शिकत असतो. त्यातच आपल्याकडील परंपरागत पुरुषसत्ताक पद्धती जन्मापासूनच मुलांवर तो जबाबदारी सांभाळणारा कर्ता पुरुष असल्याचे बिंबवत असे आणि याच संस्कारांची पेरणी झाल्यामुळे पुरुषाची मातीच काहीशी कठोर घडत गेली. पण काळ पुढे सरत गेला तसे त्याच्या स्वभावातही बदल दिसू लागले. पिढीसरशी पितृत्व अधिकाधिक कोमल आणि मृदू बनत गेले. सतत छडी घेऊन वावरण्याच्या अविर्भावात असणारा पिता मुलांच्या खांद्यावर हात टाकून चालू लागला. मुलींना वाऱ्यालाही थांबू न देणारा कर्मठ बाप लेकीला डोक्यावर घेऊन नाचू लागला. एकत्र कुटुंबात जाणीवपूर्वक जोपासली जाणारी निष्ठूरता आणि कर्मठता कमी झाली आणि पिता अधिक जवळचा वाटू लागला. आजचा पिता हा असा जवळचा मित्र आहे. एका पिढीचे अंतर असले तरी ते जाचक राहणार नाही, याची काळजी घेणारा आहे. मुलांसाठी सर्वस्व पणाला लावणारा आहे. त्यांच्यासाठी स्वर्ग निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारा आहे. घरात संपन्नता नांदण्यासाठी स्वतःला दावणीला बांधून घेणारा आहे. पण या सगळ्यात त्याचे स्वतःचे काय? त्याच्या स्वप्नांचे काय? त्याच्या मनाचे काय?

आज स्त्री सुपरवूमन झाल्याचे गोडवे गायले जातात. घर आणि ऑफिस सांभाळताना दाखवल्या जाणाऱ्या तारतम्याचे कौतुक केले जाते. मात्र हे कौतुक पुरुषांच्या वाट्याला येत नाही. वस्तुतः कुटुंबाचा भार सोसताना तोही सूपरमॅनच झालाय. आजकाल मुलांचे संगोपन ही कसोटी पाहणारी बाब ठरत आहे. मुलांचे विश्व बदलत आहे, प्रलोभने वाढत आहेत. त्याबरोबर त्यांच्या मागण्याही वाढत आहेत. पूर्वी साध्या राहणीचे कौतुक होते. किमान गरजा भागवल्या तरी पुरुषाला ‌‘कर्तृत्ववान‌’ हे बिरुद लावले जायचे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा बोलबाला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कुटुंबाचा स्टेटस सिम्बॉल जपताना बापाची चांगलीच दमछाक होत आहे. दारात मारुती असली तरी फोर्ड हवी असते. दरदिवशी नव्याने येणाऱ्या गॅझेटकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या मुलांच्या नजरा त्याला सतावत असतात. एक मागणी पूर्ण होण्याच्या आतच दुसरी तयार असते. त्या पूर्ण करताना त्याची छाती भरून येत असते. अपत्याचे आर्जव आणि लडिवाळता याचे आता ठोस मागण्या आणि हट्टात रूपांतर झाले आहे. घरातील सगळे डोळे स्वप्न बघतात आणि बहुतांश घरांमध्ये ती पूर्ण करण्याची जबाबदारी पुरुषावरच येते. मुलांच्या शाळा प्रवेशापासून सुरू होणारी ही जद्दोजहद उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू असते. भरमसाट वाढलेले शिक्षणशुल्क, अवांतर खर्चाचे वाढते प्रमाण, चंगळवादी जीवनशैलीत वाढत असणाऱ्या मुलांच्या मागण्या, आपली अपुरी स्वप्ने त्यांच्या रूपाने पूर्ण होताना बघण्याची भाबडी आशा या सर्वात पिता नावाच्या प्राण्याची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे खरेच तो दमतोय. घराघरातला बाबा ही कोंडी अनुभवतोय.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभराची माता असते, तसेच पुरुषदेखील फार थोड्या काळासाठी नवरा आणि दीर्घकाळासाठी बावरा असतो, असे म्हटले तर काय चुकीचे आहे? संसाराचा पहिला काळ पार पडला की त्याचे बावरेपण वाढतच जाते. ‌‘मेजॉरिटी विन्स‌’ या तत्त्वाप्रमाणे मायलेकांचे जमलेले सूत त्याचे बावरेपण आणखीनच केविलवाणे करून टाकते. कळत असूनही तो बोलू शकत नाही. सध्या अशा केविलवाण्या पित्यांची संख्या वेगाने वाढत आहे. बाहेरच्या जगात मुलींकडे पाहण्याच्या विखारी दृष्टीची जाण असल्यामुळे तोकडे कपडे घालणाऱ्या मुलीला दटावणारा पिता प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांचा, थोडक्यात ऑर्थोडॉक्स ठरतो. फिटनेसची महती कळल्यामुळे आळशी मुलाला व्यायाम करण्यास सांगणारा पिता ‌‘डोक्याची कल्हई‌’ ठरतो. मोकळेपणा आणि स्वैराचार यातील सीमारेषा ओलंडली जात आहे, हे कळल्यानंतर मुलांना सजग करणारा पिता त्यांना जाच करणारा वाटतो. त्यात पत्नीही मुलांना फितूर असेल तर विचारायलाच नको. पैसे मिळवणारे एक यंत्र, यापलीकडे त्याला फारशी किंमत राहत नाही. त्यातच अलिप्ततावादी धोरण पत्करणाऱ्या एकलकोंड्या घरात जवळच्या नातेवाईकांचीही वानवा असते. तेव्हा भावनेचा कोंडमारा होत असलेला हा पिता आतल्या आत धुसफुसत राहतो, रडत राहतो, पण जगत राहतो.

आजच्या पित्याला पांढरे होऊ घातलेले केस रंगवत जगणे क्रमप्राप्त आहे. गळेकापू स्पर्धेमध्ये ऊर फुटेपर्यंत पळत राहण्यासाठी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणे गरजेचे आहे. जीवघेणी टार्गेट्स पूर्ण करत, नोकरी टिकवण्यासाठी बारा-चौदा तास काम करणे गरजेचे आहे, बदलत्या जमान्याबरोबर जुळवून घेण्यासाठी अपटूडेट राहणे गरजेचे आहे. प्रतिष्ठेची मानांकने बदलत असताना शक्य होईल तोपर्यंत पैसे कमवत राहणे गरजेचे आहे. मागच्या पिढीने खांदापालट देऊन संसाराचा भार त्याच्या खांद्यावर ठेवला आहे आणि नव्या पिढीचे खांदे हा भार पेलण्यासाठी समर्थ होत नाहीत तोवर त्याला हा भार तोलून धरायचा आहे. पण त्या खांद्यांचा आधार मिळेलच याची शाश्वती नाही. पिल्लांना पंख फुटतील आणि ते दाणापाणी मिळवायला लागतील हे खरे... पण पंख फुटले की पाखरे दूरदेशी जाण्याच्या तयारीला लागतील, हे तो मनोमन जाणून आहे. त्यामुळेच मुलांचे भविष्य घडवत असतानाच त्याला स्वतःचे भविष्यही सुरक्षित ठेवायचे आहे. म्हणूनच आजचे पितृत्व अधिक धास्तावलेले आहे. फादर्स डेच्या निमित्ताने तरी अशा धास्तावलेल्या बाबांना आश्वस्त करायला हवे. ही भेटही त्यांच्यासाठी लाखमोलाची ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in