अखेर उपरती !

मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही
अखेर उपरती !

महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर आपली घोडचूक उमगली आणि त्यांनी आपल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल जाहीर माफी मागितली! राज्यपालपद हे घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे, सन्मानाचे पद आहे. त्या पदावरील व्यक्तीकडून त्या महत्त्वाच्या पदाचा आब राखला जावा, अशी अपेक्षा असते; पण महाराष्ट्राच्या राज्यपालांची विविध प्रसंगी केलेली वादग्रस्त वक्तव्ये, तसेच त्यांच्याकडून घडलेले वर्तन, निर्णय लांबणीवर टाकण्याची कृती आदींमुळे ते अनेकदा टीकेचे धनी झाले आहेत. खरे म्हणजे, त्या पदावरील व्यक्ती वादातीत असायला हवी; पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून तसे अपेक्षित वर्तन घडले नसल्याचे अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते. गेल्या २९ जुलै रोजी मुंबईत अंधेरीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच राहणार नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. राज्यपालांच्या त्या विधानावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली. सर्वच विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या त्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल त्या राज्यांमध्ये जाऊन राहावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे; मात्र काही महामहीम व्यक्तींनी दिल्लीतील श्रेष्ठींना खूश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट करावे लागले! राज्यपालांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज्यपालांना दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह विविध पक्ष आणि नेते यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ निदर्शने केली. भाजपलाही राज्यपालांच्या विधानाबद्दल असहमती व्यक्त करावी लागली. जे राज्यपाल एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते होते, एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्याच एका कृतीमुळे भाजपला कसे अडचणीत आणले, ते यावरून दिसून आले! आपल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना राज्यपाल महोदयांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीच नसतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी विनाकारण त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्याकडून तरी मराठी माणसाचा अवमान कधीच होणार नाही’, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण राज्यपालांच्या खुलाशाने कोणाचेच समाधान झाले नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचे होणारे दूरगामी विपरीत राजकीय परिणाम लक्षात घेऊन अखेर राज्यपालांनी त्यांच्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल आपला जाहीर माफीनामा सादर केला. ‘भाषणातून माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल, तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल, ही कल्पनाही मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणुकीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुन:प्रत्यय देईल, असा विश्वास आहे,’ असे राज्यपालांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे; पण कोणतेही वक्तव्य करताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात, त्याचा विचार एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने करू नये, याचेच आश्चर्य वाटते. ज्या राज्याचे आपण राज्यपाल आहोत, त्या राज्याच्या विकासामध्ये, त्या राज्याच्या निर्मितीमध्ये मराठी माणसांचे योगदान किती मोठे आहे, हे जाणून घ्यायला नको का? मराठी माणसाने रक्त सांडून या महाराष्ट्र राज्याची निर्मिती

केली, राज्याच्या विकासामध्ये प्रचंड योगदान दिले हे राज्यपालांनी जाणून घेतले असते, तर ते असे अवमानास्पद बोलले नसते! राज्यपालांनी आपले वक्तव्य अनवधानाने केले नसून त्यामागे दिल्लीचे राजकारण आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. आपल्या वक्तव्यावर टीकेची जी प्रचंड झोड उठली ती लक्षात घेऊन राज्यपालांनी आता तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. माफीनामा सादर करून या सर्व वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केला आहे; पण आपल्या शाब्दिक बाणांनी आपण मराठी माणसाच्या हृदयावर जी खोलवर जखम केली आहे ती अशीच भळभळत राहणार आहे, हे राज्यपाल महोदयांनी पक्के ध्यानात ठेवावे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in