नियम पर्यावरणाचे पाळा चंगळवाद आवरा

आमच्या बेटांना मौज-मजेच्या सहलीसाठी भेट देणाऱ्या सहलकरी मंडळींच्या संख्येवर काही मर्यादा घाला. समुद्र किनाऱ्यांच्या आसपास सतत नव्याने उभी राहणारी हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांच्यावर बंदी आणा.
नियम पर्यावरणाचे पाळा चंगळवाद आवरा

वसुंधरा देवधर

ग्राहक मंच

आमच्या बेटांना मौज-मजेच्या सहलीसाठी भेट देणाऱ्या सहलकरी मंडळींच्या संख्येवर काही मर्यादा घाला. समुद्र किनाऱ्यांच्या आसपास सतत नव्याने उभी राहणारी हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांच्यावर बंदी आणा.’ अशा मागणीसाठी एखाद्या परिसरातील नागरिक आंदोलने आणि उपोषणे करू लागले तर, विकासाला विरोध करणारे अशीच त्यांची संभावना होण्याची शक्यता आहे. पण तरीही स्पेनच्या कॅनरी बेटावरचे नागरिक एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात रस्त्यावर उतरले, ते याच मागण्या घेऊन! बेटांवरच्या आर्थिक उलाढालीत टुरीझम व्यवसायाचा हिस्सा अंदाजे ४० टक्के आहे. तरीही या मागण्या तेथील नागरिक करताना दिसत आहेत. कारण प्रचंड प्रमाणात येणाऱ्या पर्यटक मंडळीना खुश ठेवताना तेथील निसर्गाची हानी होते आहे. जणू ‘तुमचा खेळ होतो आणि आमचा जीव जातो’, अशी गत. तेथील स्थानिक संस्कृती आणि नैसर्गिक वैविध्य धोक्यात येते आहे. २०२३ मध्ये या बेटावरील लोकसंख्येच्या सहापट पाहुणे कॅनेरी बेटावर मौज-मजा करून गेले. मग आणखीन हॉटेल्स आणि रिसोर्ट उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यावर आक्षेप घेत स्थानिकांनी मोर्चे काढले, आंदोलन छेडले.

प्रवास करणे आणि नवनवीन स्थळांना भेट देणे, ह्यासाठी जगभरातील अगणित टुरिस्ट कंपन्या ग्राहकांना परोपरीची आमिषे दाखवत स्वत:कडे खेचायला सज्ज असतात. पण या उपक्रमातून निसर्गावर आघात होतात आणि त्याची पर्वा ‘चार दिवस मौजेचे’ या वृत्तीचे नागरिक सहसा करीत नाहीत. स्थानिकांनी आवाज उठवला तर त्यांना ‘विकासात’ अडथळा आणणारे अशीच त्यांची संभावना होते. आपल्या देशात पर्यटन या व्यवसायाची वाढ काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कामाख्या अशी होत असताना, स्पेनच्या स्थानिकांची भूमिका पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून समजून घेणे, आवश्यक आहे. ग्राहक म्हणून तिथे सजगतेने काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

वास्तविक वस्तू असो की सेवा, कोणतीही गोष्ट खरेदी करताना प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत आपण सर्वानीच पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील असणे आणि त्या अनुषंगाने निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. जगभरातील विविध व्यावसायिक, महाबलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या ते एखादी लघु-उद्योजक आस्थापना यातील प्रत्येकासाठी पर्यावरणरक्षण विषयक काही नियम, धोरणे आहेतच. मात्र त्यापैकी बऱ्याच बाबी कागदावरच राहतात. पर्यावरण ओरबाडूनच माणसाने भौतिक प्रगती केली आहे. औद्योगिक क्रांतीचे स्वागत करताना, सर्व प्रकारच्या उत्पादनात व एकूणच शहरीकरणात सातत्याने वाढ होत असताना आणि तंत्रज्ञानाचा वेग अनावर होत जाताना पर्यावरणावर सतत आघात होत राहिले. ते सहन करण्याची निसर्गाची स्वत:ची एक पद्धत आणि क्षमता आहे. क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया आहेच. मात्र तिचे आकलन आणि गांभीर्य समजण्यासाठी निसर्गाला जणू आपले अति उग्र रूप प्रकट करावे लागते आहे. जगभरात विविध ठिकाणी येणारे पूर, कोसळणारा पाउस, खचणारी जमीन, घोंघावणारी वादळे, असह्य तापमान आणि बरेच काही आपण सर्व अनुभवत आहोत. या सर्वाला ग्राहक म्हणून आपल्याकडून काही हातभार लागलाय का, याचा विचार करून आवश्यक ती कृती करण्याची वेळ अजूनही निघून गेलेली नाही. त्यासाठी मुळात आपले पर्यावरण विषयक आकलन सखोल करणे आणि त्याद्वारे कोणते उपाय व्यक्तिगत/ सामाजिक पातळीवर करायला हवेत, ते सतत करत राहणे हा प्रमुख उपाय आहे. आज आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे भान आपण ठेवले पाहिजे.

वापरा आणि फेका अशा उत्पादनांमुळे जगभर कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. उत्पादकसुद्धा त्यांची उत्पादने अमुक एका काळानंतर बाजारातून गायब करताहेत. त्यासाठी जागरूक ग्राहक ‘दुरुस्तीचा हक्क’ मागत आहेत. तसेच दुरुस्त होण्यायोग्य उत्पादनांचा आग्रह धरीत आहेत. वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधने वापरतो आणि प्रदूषणसुद्धा करतो. पण दुकाने विविध प्रकारच्या कपड्यांनी सतत सजलेली आणि भरून वाहत असलेली दिसतात. तिथे ग्राहकांना ही तोटा नाही. याला जाहिराती मोठाच हातभार लावतात. ग्राहकांच्या अहंकाराला कुरवाळून त्याला खरेदीसाठी उद्युक्त करतात. त्याचवेळी मोठाले ब्रँड आपली जादा उत्पादने विकसित देशातून काढून अविकसित देशात नेतात आणि चक्क जाळून टाकतात.

या आणि अशा अनेक कारणांनी पर्यावरणाचा तोल सतत डळमळीत होत राहतो. त्यातून नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. त्या खरेच नैसर्गिक आहेत की माणसाच्या विविध प्रकारच्या बेजबाबदार, विधिनिषेधशून्य आणि अर्थप्रेरीत हावरटपणातून निर्माण झाल्या आहेत, हे आपण ग्राहक म्हणून नीट समजून घेतले पाहिजे. नवे म्हणून हवे या मानवी स्वभावाचा पुरेपूर फायदा सर्व सेवा-वस्तू पुरवठादार घेत असतात. आम्ही जे देतोय तेच तुम्हाला हवे आहे अशी ग्राहकाची खात्री पटविण्याचे अगणित उपाय आणि युक्त्या तिथे असतात. पण रात्रंदिवस चालणाऱ्या या ‘सप्लाय पुशला डिमांड पुलचे उत्तर’ जागरूक ग्राहकाने दिले पाहिजे. खरेदी करण्याची क्षमता असणाऱ्यांनी हा डिमांड पुल अमलात आणायला हवा. यातूनच पर्यावरण हानी कमी होईल. खरेदी कोणतीही असो, ती आपली गरज कशी आहे ते सिद्ध करण्यात आपण पटाईत असतो. पण अनेक ग्राहकांनी विचारपूर्वक आपल्या गरजा पर्यावरणस्नेही पद्धतीने पूर्ण करण्याचा निश्चय केला, तर बेजबाबदार उत्पादकांना त्याची दाखल घ्यावीच लागेल, हे नक्की. विकसित समजल्या जाणाऱ्या देशातील चंगळवादी जीवनशैलीचे अंधानुकरण करणे, हे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे ठरेल. अति सर्वत्र वर्जयेत, ह्या पारंपारिक शहाणपणाचे आपण पाईक व्हायला हवे. हा चंगळवाद आहे असे लक्षातही येऊ नये इतक्या सहजपणे नवी जीवनशैली आत्मसात केली गेली आहे. त्यामुळे एके काळच्या लक्झरी आता गरजा बनल्यात. हे जाणून अनावश्यक खरेदीला सुजाणपणे आळा घालूया.

Email : mgpshikshan@gmail.com

मुंबई ग्राहक पंचायत

logo
marathi.freepressjournal.in