विश्लेषण ; सत्तेचे सिंहासन

राजकारणाचा चिखल झाला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी अख्खा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला
विश्लेषण ; सत्तेचे सिंहासन

अजित पवार यांनी बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला दिलेल्या पाठिंब्यावर राज ठाकरे यांनी केलेले ट्विट खूपच बोलके आहे. जब्बार पटेल यांच्या ‘सिंहासन’ या कालातीत चित्रकृतीतील ‘दिगू टिपणीस’ या व्यक्तिरेखेचा राज यांनी दाखला दिला आहे. सत्ताचक्रावर आधारित हा सिनेमा चार दशकांपूर्वीचा असला तरी तो महाराष्ट्रात प्रत्येकवेळी घडणाऱ्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब वाटतो. या सिनेमातील कथेला अनुरूप अशीच अजित पवार यांच्या बंडाची घटना आहे. या चित्रपटातील राज ठाकरे यांनी उल्लेख केलेली व्यक्तिरेखा ‘दिगू टिपणीस’ या सिनेमात पत्रकार असतो अन‌् सत्ताचक्राचे चक्रावून सोडणारे घटनाक्रम पाहून त्याला अक्षरश: वेड लागते. राज ठाकरे यांच्या मते रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला भूकंप पाहून जनतेला वेड लागण्याची वेळ आली आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी अख्खा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला, असे चित्र असले तरी याला शरद पवार यांचा गुप्त पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे.

शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहिला तर शंकेला निश्चितच वाव आहे. शरद पवार यांनी २०१४ मध्ये भाजपला बिनशर्त देऊ केलेला पाठिंबा, २०१९ मध्ये भाजपसोबत सत्ता स्थापण्याबाबतच्या झालेल्या बैठका, नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या सततच्या भेटीगाठी या त्याच्याच निदर्शक आहेत. वास्तविक महाराष्ट्राला कर्तृत्वशील नेत्यांचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, मधू दंडवते, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यासारख्या नेत्यांनी पारदर्शक कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. शरद पवार मात्र याला अपवाद राहिले आहेत. गेली पाच दशके शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राजकारण स्वत:भोवती केंद्रित ठेवले आहे. मात्र, त्यांनी विश्वासाचे राजकारण केले नाही, हे सर्वच जण मान्य करतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले आमदार आणि नेते पाहिल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यातील बऱ्याच नेत्यांचे अजित पवार यांच्याशी कधीही पटले नाही. पक्षातील अंतर्गत विरोधक, अशी ओळख असणारे अनेक आमदार आणि नेते अजित पवारांसोबत कसे गेले? हा न सुटणारा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचे कधीही फारसे जमले नाही. पक्ष स्थापनेपासून त्यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. शरद पवार यांचा उजवा हात, अशी प्रफुल्ल पटेल यांची ओळख राहिली आहे. अजित पवार यांना त्यांचे स्थान नेहमीच खटकत आले होते. तेच प्रफुल्ल पटेल आज अजित पवारांसोबत कसे? याचे कुणाकडेही उत्तर नाही.

छगन भुजबळ यांच्या बाबतीतही असाच प्रश्न उपस्थित होत आहे. भुजबळ आणि अजित पवार यांच्यात कधी सख्य पाहायला मिळाले नाही. पक्ष स्थापन झाला, त्यावेळी १९९९ ला छगन भुजबळ पक्षात शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. लोकनेता अशी ओळख असणारे भुजबळ हे पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून गणले जातात. मात्र, पुढे पक्षात अजित पवार यांचे प्रस्थ वाढले आणि भुजबळ मागे पडले. त्यातून त्यांच्यात वितुष्ट येत गेले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार आणि भुजबळ यांच्यात अनेकदा खटके उडाले. याशिवाय तिकीट वाटपातही समर्थकांना उमेदवारी देण्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळाले. हेच भुजबळ आज शरद पवार यांना सोडून अजित पवारांसोबत गेले, हे न पटणारे आहे.

रामराजे निंबाळकर यांचेही अजित पवार यांच्याशी कधी फारसे पटले नाही. सातारा जिल्ह्यातील हस्तक्षेपावरून निंबाळकर यांचे अजित पवार यांच्याशी सातत्याने वाद झाले. त्यावर शरद पवार यांच्यावर अनेकदा मध्यस्थी करण्याची वेळ आली. ते रामराजे आज अजित पवार यांच्या समर्थनार्थ उभे आहेत, हे कोड्यात टाकणारे आहे. दिलीप वळसे-पाटील यांचे अजित पवार यांच्याशी उघड वाद नसले तरी वळसे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते देखील अजित पवार यांच्यासोबत आले आहेत.

दुसरी बाब म्हणजे अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील त्यांची देहबोली बरेच काही सांगत होती. त्यांनी अत्यंत शांत आणि संयमाने आपली भूमिका मांडली. कुणावरही टीकाटिप्पणी केली नाही. कारवाईचा इशारा दिला नाही. त्यांना फार मोठा धक्का बसला, असेही वाटत नव्हते. जनतेत जाऊन पुन्हा पक्षाची बांधणी करू, अशा आशयाची त्यांची भाषा होती. हे सर्व अनाकलनीय आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘उद्धव ठाकरेंचे ओझे शरद पवार यांना उतरवायचे होते. त्याचा पहिला अंक पार पडला. पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रूजू होईल,’’ असे घडले तर आश्चर्य वाटायला नको.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in