फसवणूक कशी टाळाल?

ई-मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस मार्फत काहीबाही भीती घालून किंवा आमिष दाखवून फसवणे जुने होऊ लागले.
फसवणूक कशी टाळाल?

अभय दातार

ग्राहक मंच

पुलंच्या ‘असा मी असामी’ या गाजलेल्या आत्मकथनसदृश पुस्तकातल्या एका प्रकरणात बेमट्याचा बाप बेमट्याला म्हणतो की, “ब्रह्मदेवाने माणसास जन्मास घातले, पण त्याचा आवडता प्राणी गाढव. त्यामुळे त्याने सगळ्या मनुष्यप्राण्यात गाढवाचे गुण घातले. तस्मात, तू कुंभार हो, गाढवास तोटा नाही.” हे आठवण्याचे कारण म्हणजे गेली काही वर्षे होत असलेले आणि बहुधा यापुढेही चालतील असे फसवणुकीचे प्रकार..

ई-मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस मार्फत काहीबाही भीती घालून किंवा आमिष दाखवून फसवणे जुने होऊ लागले. त्याला आता नवीन तंत्रज्ञानाचीही जोड मिळू लागली आहे. परंतु फसवणूक ही केवळ तंत्रज्ञान वापरूनच होते असे नाही. लोभ आणि भीती या दोन गोष्टी प्रत्येकामध्ये कमीअधिक प्रमाणात असतातच. आणि त्याचा पुरेपूर वापर करून, त्यामागची सर्वसामान्य माणसाची मानसिकता ओळखून असणारे ठग कोणालाही सहज वश करतात आणि आपला कार्यभाग साधून घेतात.

सिनेक्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण तरुणींची संख्या कमी नाही. ही आसक्ती इतकी प्रचंड असते की जीवनाचा फारसा अनुभव नसलेल्या, चार पावसाळे न पाहिलेल्या तरुणाईला एखाद्या बड्या स्टार बरोबर काम करण्याचे आमिष दाखवून सहज फसवता येते. फसवणुकीचा हा प्रकार पूर्वापार चालत आला आहे आणि तरीही मोहात पडण्याच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या फसवणुकीची एक तक्रार मुंबई पोलिसांनी दखल करून घेतली. बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे घेणाऱ्या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत. झाले असे की, अशाच एका कंपनीचे खोटे लेटरहेड छापून घेऊन एका दुकलीने एका तरुण मुलीला फसवले. तिला सांगितले गेले की आमची कंपनी चित्रपटांत कामे मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असून तुम्ही आमच्याकडे आलात तर नक्की काम मिळेल.

बरे, हे काम कोणाबरोबर? तर चक्क रजनीकांत या सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबर, त्याची मुलगी म्हणून. या दुकलीने त्या मुलीला सांगितले की, त्यांची कंपनी रजनीकांत यांना घेऊन दोन चित्रपट बनवित आहे. त्यात या मुलीची भूमिका रजनीकांत यांची मुलगी अशी असून ती सायबर चाचेगिरी करणारी आहे. आपली ऑफर खरी वाटावी म्हणून त्यांनी फोनवर गोडगोड बोलून त्या मुलीच्या मनात विश्वास निर्माण केला, हुबेहूब वाटतील अशी काही बनावट कागदपत्रे तयार केली. नंतर हळूहळू सरकारी नियमांची पूर्तता करणारी कागदपत्रे बनवायची आहेत, पासपोर्टची पडताळणी करायची आहे, परदेशी वापरता येईल असे क्रेडिट कार्ड बनवायचे आहे, इत्यादी सबबी सांगून त्या मुलीकडून काही लाख रुपये उकळले. त्यातल्या त्यात सुदैव म्हणजे त्या मुलीने आपल्या कुटुंबियांना हे सर्व सांगितले होते. काही दिवसांनी नुसताच वेळ जातोय, पुढे काही घडत नाहीये, आपण बहुधा फसलो, असा संशय आला, तेंव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी पुढे काय झाले, काम कधी मिळणार, चित्रपटाचे शुटींग कधी सुरु होणार, वगैरे चौकशी करायला सुरुवात केली, तेंव्हा त्या दुकलीने काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ सुरु केली. मग मात्र संशय वाढल्याने मुलीच्या कुटुंबियांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर तक्रार दखल केली.

दुसऱ्या एका प्रकरणात एका मध्यमवर्गीय महिलेला एका खऱ्या वाटणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजने फसवले. एका कंपनीत काम करणाऱ्या या महिलेला असा व्हॉट्सॲप मेसेज आला की ‘मी एका कंपनीच्या संचालकांबरोबर महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आहे. त्यांच्यासाठी मला काही गिफ्ट व्हाउचर्स घ्यायची आहेत, ती पाठवण्याची तातडीने व्यवस्था करावी. व्हॉट्सॲपचा संपर्क क्रमांक त्या महिलेसाठी नवीन होता, पण डीपीवर तिच्या बॉसचा फोटो दिसत होता. त्यामुळे विश्वासाने तिने सर्व व्यवस्था केली आणि डिजिटल गिफ्ट व्हाऊचर्स त्या व्हॉट्सॲप संपर्कावर पाठवली. काही वेळाने त्याच क्रमांकावरून आणखी पाच गिफ्ट व्हाउचर्स पाठवण्याबद्दल मेसेज आला, तेंव्हा मात्र तिला काही संशय आला. तो तिने कंपनीतील आपल्या एका वरीष्ठ सहकाऱ्याच्या कानावर घातला. त्यानेही तो मेसेज तपासला, बॉस कुठे आहे त्याची चौकशी केल्यावर आपण फसवले गेल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले आणि तिने लगेच पोलिसात तक्रार दाखल केली. सदर संपर्क क्रमांकाचा छडा लावून त्या ठगाला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

वाचकहो, पहिल्या प्रकारात पारंपारिक पद्धतीने फसवणूक केली गेली आहे, तर दुसऱ्या प्रकारात तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केली गेली आहे. अशा वेळी साहजिकच आठवतो तो समर्थ रामदासांचा ‘अखंड सावधान असावे’ हा मंत्र. थोडीशी सावधानता बाळगली, योग्य ठिकाणी चौकशी केली की अशा प्रकारची फसवणूक आपण टाळू शकतो. आपल्याकडून जी कृती होते, ती एकतर उत्तेजित झाल्यामुळे होते, किंवा घाबरल्यामुळे. अशावेळी सारासार विचार बाजूला पडतो आणि आपण चटकन काहीतरी कृती करून बसतो.

पहिल्या प्रकारात, मुलामुलींना सिनेसृष्टीचे आकर्षण वाटणे हा काही गुन्हा नाही. पण त्या तरुण मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी एकदम पैसे देण्याआधी कंपनीची नीट चौकशी करायला हवी होती. उदाहरणार्थ All Indian Cine Workers Association, Western India Cinematographers Association, अशा ठिकाणी चौकशी करता आली असती, म्हणजे सत्य उघडकीस येऊ शकले असते.

दुसरा प्रकार हा तंत्रज्ञानाशी निगडीत असल्याने उत्तरोत्तर अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. सायबर गुन्ह्यांचे आव्हान किती गंभीर आहे, हे आपण मागील एका लेखात वाचले असेलच. दुसऱ्या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यास बॉसचा संपर्क क्रमांक माहित नव्हता, तरीही तिने घाईघाईने तथाकथित बॉसने सांगितल्यावरून व्हाऊचर्स खरेदी केली. जरी डीपीमध्ये बॉसचा फोटो असला, तरी हा संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये कसा नाही? आपल्या वरिष्ठांच्या किंवा इतर सहकाऱ्यांच्या मोबाईलवर तो आहे का? थोडे धीर धरून हे जाणून घेतले असते, तर फसवणूक झाली नसती. बॉसचा जो संपर्क क्रमांक आपल्याकडे आहे, तो वापरून खात्री करून घेता आली असती. तंत्रज्ञान हे दुधारी अस्र आहे. म्हटले तर मानवजातीच्या कल्याणासाठी, म्हटले तर फसवणुकीसाठी. आपली काळजी आपणच घ्यावी.

मुंबई ग्राहक पंचायत mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in