फसवे अंकशास्त्र

मानवी जीवन प्राचीन काळापासूनच अंधश्रद्धांनी ग्रासलेले आहे. विज्ञानपूर्व काळातील मानवाचे अंधश्रद्धाळू असणे आपण समजू शकतो, पण विज्ञानयुगातही माणूस अंधश्रद्धांच्या आहारी जातोय, ही क्लेशदायक बाब आहे. संख्या आणि अंक यांबाबतच्या अंधश्रद्धा जशा प्राचीन आहेत, तशा सार्वत्रिकही आहेत. गणितासारख्या तर्कनिष्ठ शास्त्राचा पाया असलेले अंक मानवाच्या अविवेकामुळे अंधश्रद्धेने घेरले गेले आहेत.
फसवे अंकशास्त्र
Published on

भ्रम-विभ्रम

वाघेश साळुंखे

मानवी जीवन प्राचीन काळापासूनच अंधश्रद्धांनी ग्रासलेले आहे. विज्ञानपूर्व काळातील मानवाचे अंधश्रद्धाळू असणे आपण समजू शकतो, पण विज्ञानयुगातही माणूस अंधश्रद्धांच्या आहारी जातोय, ही क्लेशदायक बाब आहे. संख्या आणि अंक यांबाबतच्या अंधश्रद्धा जशा प्राचीन आहेत, तशा सार्वत्रिकही आहेत. गणितासारख्या तर्कनिष्ठ शास्त्राचा पाया असलेले अंक मानवाच्या अविवेकामुळे अंधश्रद्धेने घेरले गेले आहेत.

विज्ञानाद्वारे निर्मित साधनांचाही उपयोग अंधश्रद्धांच्या प्रसारासाठी होताना पाहून हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो. या अंधश्रद्धांचे प्रकारही अनेक आहेत. काही अंधश्रद्धा गरीबांच्या आहेत, तर काही श्रीमंतांच्या आहेत. काही सुशिक्षितांच्या तर काही अडाण्यांच्या, काही शहरवासीयांच्या तर काही खेडुतांच्या, काही स्थानिक तर काही सार्वत्रिक, काही इथल्याच तर काही आयात केलेल्या आहेत. अशा या अंधश्रद्धांनी मानवी जीवनाची बहुतेक क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. अगदी गणितातील अंक आणि संख्याही अंधश्रद्धांच्या विळख्यातून सुटल्या नाहीत. त्यांनाही मानवाने आपल्या आंधळ्या श्रद्धेमध्ये वेढून टाकले आहे. गणितासारख्या तर्कनिष्ठ शास्त्राचा पाया असलेले अंक मानवाच्या अविवेकामुळे अंधश्रद्धेने घेरले गेले आहेत.

संख्या आणि अंक यांबाबतच्या अंधश्रद्धा जशा प्राचीन आहेत, तशा सार्वत्रिकही आहेत. आपल्याकडील ‘तीन तिघाड काम बिघाड’ ही म्हण संख्येबाबतची अंधश्रद्धाच दर्शवते. भारतात १, २, ३, ५, ७, १०, ११, ५०, ५१, १०१ अशा काही संख्यांना स्थल, कालानुसार शुभ-अशुभ मानले आहे. त्याची उदाहरणे आपणाला पदोपदी आढळतात. लग्नातील आहेर किंवा देणग्या नेहमी ११, २१, ५१, १०१, १००१, ११०१ अशा स्वरूपातच का असतात, हे अनाकलनीय आहे. वरचा एक कशासाठी वाढवायचा तेच समजत नाही. आपल्याप्रमाणेच युरोप-अमेरिकेतही संख्यांच्या अंधश्रद्धा आहेत. तिकडे १३ ही संख्या अशुभ मानली जाते. त्यामुळे तेथील हॉटेल्स वगैरेंमध्ये १३ नंबरची खोलीच नसते म्हणे. १२ नंतर थेट १४ नंबर! संख्यांच्या अंधश्रद्धा गमतीशीर वाटत असल्या तरी त्यातील घातकता त्यामुळे तसूभरही कमी होत नाही. म्हणून या अंधश्रद्धांचा समाचार घेणे आवश्यक ठरते. अलीकडच्या काळामध्ये आणखी एका प्रकारच्या अंधश्रद्धेचा मोठ्या धुमधडाक्यात प्रचार केला जातोय. ती अंधश्रद्धा म्हणजे ‘अंकशास्त्र’ होय. वर्तमानपत्रे, टीव्ही वाहिन्या वेगवेगळ्या अंकशास्त्रींना जागा आणि वेळ देत आहेत. आपल्या बॉलीवूडला तर या अंकशास्त्राने पुरते झपाटून टाकले आहे. अंकशास्त्राचे हे स्तोम सध्या श्रीमंतांपुरतेच मर्यादित असले, तरी त्याचा प्रसारमाध्यमांवरील प्रभाव पाहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि सर्वसामान्य लोक फसवणूक करून घेण्यासाठी नेहमीच तयार असतात, हा इतिहास आहे. हा लेख वाचून त्यांना काही सद्बुद्धी आली, तर लिहिण्याचे कष्ट सार्थकी लागतील.

अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा जन्मांक काढला जातो. हा जन्मांक म्हणजे जन्मतारखेच्या अंकांची एकांकी बेरीज असते. उदा. २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा २+९=११ नंतर १+१=२ अशी बेरीज करून २ हा जन्मांक समजला जातो. अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा जन्मांक तिच्या जीवनातील घटनांवर परिणाम करत असतो. बऱ्याचदा व्यक्तीचा जन्मांक हाच त्या व्यक्तीचा शुभांक मानला जातो. उदा. ३ जन्मांक असणाऱ्या व्यक्तीसाठी ३, १२, २१, ३० या संख्या शुभ असतात. या अंकाशी संबंधित व्यक्ती, तारीख, इ. गोष्टी ३ नंबर व्यक्तींसाठी फायदेशीर असतात. तसेच प्रत्येक अंकावर विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्याचाही परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. तुमच्या नावाच्या स्पेलिंगवरून ते नाव किती नंबरवर आहे ते ठरवले जाते. तो नंबर तुमच्या शुभांकाशी जुळत नसेल, तर अंकशास्त्री स्पेलिंगमध्ये काही बदल करून देतात आणि त्या बदलानुसार तुम्ही तुमचे नाव लिहायला सुरुवात केली की, तुमचे नशीब फळफळलेच म्हणून समजा. प्रत्येक जन्मांकाच्या व्यक्तीचा स्वभाव, काही गुणवैशिष्ट्ये अंकशास्त्री सांगतात. उदा. चार क्रमांकाच्या व्यक्तींना उपजतच असाधारण बुद्धिमत्ता लाभलेली असते. रूढी-परंपरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आणि क्षमता या लोकांमध्ये असते. संशोधन कार्यात त्यांना रस असतो, इ. विशिष्ट जन्मांकाच्या व्यक्तींना विशिष्ट रत्न धारण करण्याचा, विशिष्ट रंग वापरण्याचा तसेच मंत्र जपण्याचाही सल्ला अंकशास्त्रींकडून दिला जातो. अंकशास्त्राचे एकंदरीत स्वरूप हे असे आहे. आता या शास्त्रावर सगळ्यांचाच विश्वास बसेल असे नाही. म्हणून त्याला वैज्ञानिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. अंकशास्त्री सांगतात की, तुमचे शुभांक तुमच्याभोवती वलय निर्माण करतात, त्यातून अदृश्य शक्तीचे तरंग निर्माण होतात. अंकातून विशिष्ट ऊर्जा बाहेर पडते आणि ती तुमच्या जीवनातील घटनांवर भलाबुरा परिणाम करते, असे अनेक दावे ही मंडळी करतात. हे ऐकून सामान्य माणूस हे काहीतरी शास्त्रीय सत्य आहे, असा समज करून घेतो.

अंकशास्त्राचे एकंदर स्वरूप बघितले, तरी त्यातील फोलपणा लगेच लक्षात येतो. अंकशास्त्र जगभरातील व्यक्तींचे १ ते ९ या नऊ अंकांमध्ये वर्गीकरण करते. प्रत्येक जन्मांकाच्या व्यक्तीची काही गुणवैशिष्ट्ये अंकशास्त्र सांगते. याचा अर्थ जगातील १/९ व्यक्ती सारख्याच स्वभावाच्या असतात. पण अर्थातच हे चुकीचे आहे. उदा. जगातील चार क्रमांकाच्या सर्वच व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात हे संभवत नाही. चार जन्मांकाइतक्याच इतर जन्मांकामध्येही बुद्धिमान व्यक्ती आढळतात. अंकशास्त्राचा हा पायाच चुकीच्या गृहीतकावर आधारलेला आहे. इतर सिद्धांतही असेच अवैज्ञानिक आहेत.

विशिष्ट अंकावर अमुक या ग्रहाचा प्रभाव असतो, हे कशाच्या आधारे ठरवले जाते? आणि ग्रहाचा प्रभाव असतो म्हणजे नेमके काय होते? फलज्योतिषातील ग्रहांच्या प्रभावाचा फोलपणा अनेक वेळा सिद्ध झाला आहे. (भलेही ज्योतिषी ते मान्य न करोत.) ग्रहांची मदत घेणारे हे अंकशास्त्री आणि लबाड ज्योतिषी यांच्यात फरक तो काय? विशिष्ट रंग, शुभ रत्न, मंत्र या गोष्टी तर उघड उघड अंधश्रद्धा आहेत. अमक्या रंगाचे कपडे घातल्यावर किंवा न घातल्यावर माझी भरभराट होईल, असे मानणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तीच गोष्ट नावाच्या स्पेलिंगबद्दलची. तुमच्या नावाचे स्पेलिंग बदलले म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीत काडीचाही फरक पडत नाही. इतकेच नव्हे, तुमच्या सवयी, स्वभाव, कार्यपद्धती यांतही अजिबात फरक पडत नाही. मग स्पेलिंग बदलले म्हणून यश मिळेल, असे समजणे किती शहाणपणाचे आहे तुम्हीच ठरवा.

खरे तर अंक, संख्या या संकल्पना माणसाने निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःचे असे गुणवैशिष्ट्य किंवा अस्तित्वही नाही. त्यांचे अस्तित्व केवळ मानवी मनात आहे. त्या पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष कल्पना आहेत. एखाद्या व्यक्तीने ३ या चिन्हाला आठ आणि ८ या चिन्हाला तीन असे म्हणायचे ठरवले तर तो म्हणू शकतो. अशी व्यक्ती खेळाडू असेल (खेळाडूंना अंकशास्त्री सल्ले देताना दिसतात.) आणि तिने तिच्या जर्सीवर ३ हे चिन्ह लिहिले असेल, तर त्यातून कोणती ऊर्जा बाहेर पडेल? त्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव पडेल? कारण त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते ‘आठ’ आहे. अशा वेळी ते ग्रह ‘कन्फ्यूज’ होणार नाहीत का? मग पृथ्वीवरचे अंकशास्त्री ग्रहांना मार्गदर्शन करायला अवकाशात जाणार काय? की त्या व्यक्तीला ३ ला तीनच म्हणण्याची सक्ती करणार? थोडक्यात, अंक, संख्या या मानवी कल्पना आहेत. त्यांचे अर्थ फक्त मानवी मनालाच समजतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव टाकणे, त्यानुसार फळ देणे ग्रहांना शक्य नाही.

अंकशास्त्री सांगतात की, अंकातून विशिष्ट प्रकारची ऊर्जा बाहेर पडते आणि ती तुमच्या जीवनातील घटनांवर भलाबुरा परिणाम करते. खरे तर अंकातून ऊर्जा बाहेर पडण्याची कल्पनाच हास्यास्पद आहे. अंकशास्त्र्यांनी आता कोणतीही पळवाट न शोधता ही कल्पनाच चुकीची आहे हे मान्य केलेले बरे. ‘अंकशास्त्र’ हा शब्द ‘संख्याशास्त्र’ या शब्दाला जवळचा वाटतो. त्यामुळे लोकांचा असा भ्रम होतो की अंकशास्त्र हे सुद्धा खरेच काहीतरी शास्त्रीय असावे. पण फलज्योतिषाप्रमाणे अंकशास्त्र हे सुद्धा थोतांड आहे. अनेक बाबतीत त्याचे फलज्योतिषशास्त्राशी साम्य आहे. म्हणून त्याला ‘अंकज्योतिष’ म्हणायला हवे. पण अंकशास्त्री हा शब्द वापरात आणणार नाहीत, याची खात्री वाटते. कारण अंकज्योतिष म्हटले की काही लोक तरी त्याकडे पाठ फिरवणार हे नक्की.

लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.

logo
marathi.freepressjournal.in