आरोग्य चर्चा : वारंवार लघवी होते? वेळीच सावध व्हा!

वयाच्या चाळिशी ते पन्नाशीदरम्यानचे प्रौढ स्त्री-पुरूष आणि गर्भवती स्त्रिया यांना वारंवार लघवीला जाण्याची समस्या त्रास देते.
आरोग्य चर्चा : वारंवार लघवी होते? वेळीच सावध व्हा!

लेखक : डॉ. राजेश श्रीमाळी

वयाच्या चाळिशी ते पन्नाशीदरम्यानचे प्रौढ स्त्री-पुरूष आणि गर्भवती स्त्रिया यांना वारंवार लघवीला जाण्याची समस्या त्रास देते. कधी कधी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ किंवा कॅफिनच्या सेवनानेही वारंवार लघवी होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार केले पाहिजेत. वारंवार लघवीला जावे लागणे हा समस्या एखाद्या गंभीर आजाराचा संकेतदेखील असू शकते. होमिओपॅथिक औषधांचा वापर करून लघवीशी संबंधित समस्यांवर मात करणे शक्य आहे.

पुरुषांमध्ये लघवीच्या समस्यांचे एक कारण म्हणजे प्रोस्टेट ग्लँडची जळजळ किंवा वाढ. साधारणपणे ४० ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. प्रोस्टेटमध्ये सूज आल्याने मूत्रमार्गावर दाब पडतो आणि लघवी मुक्तपणे बाहेर पडत नाही. याशिवाय प्रोस्टेट वाढण्याची आणखीही काही लक्षणे आहेत. त्यात अचानक लघवीची इच्छा होणे, रात्री वारंवार लघवी होणे, लघवी करण्यात अडचण येणे किंवा पातळ प्रवाह येणे आणि लघवी करण्यासाठी जास्त ताण द्यावा लागणे ही लक्षणे वेळीच ओळखली गेली तर ही समस्या होमिओपॅथिक औषधांनी बरी होऊ शकते, अन्यथा नंतर ही समस्या प्रोस्टेट कॅन्सरमध्ये बदलू शकते.

किडनी स्टोन हे लघवीच्या समस्यांचे आणखी एक कारण आहे. काही लोक पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांच्या मूत्रपिंडात यूरिक अ‍ॅसिड वाढू लागल्याने आणि त्यातून नंतर कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स जमा होत राहिल्याने किडनी स्टोन तयार होतात. होमिओपॅथिक औषधांच्या सेवनाने किडनी स्टोन नष्ट होतात; मात्र त्यांचा आकार वाढल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ म्हणजेच ‘यूटीआय’ ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे; पण ती पुरुषांनाही जडू शकते. त्यामुळे वारंवार लघवी करावी लागते आणि लघवी करताना जळजळ आणि वेदना होतात. सामान्यतः होमिओपॅथी औषध घेतल्याने ‘यूटीआय’ विकार सहज बरा होतो. हा रोग टाळण्यासाठी अंतर्गत अवयवांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेहामध्ये लघवीशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात. मधुमेहाचा त्रास असलेल्यांना वारंवार लघवीला जावे लागते. याचे कारण म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी त्यावर पूर्णपणे प्रक्रिया करू शकत नाही आणि साखर लघवीद्वारे शरीराबाहेर पडते. त्यामुळे जळजळ होते. या विकारात लघवीद्वारे भरपूर पाणी पडल्यामुळे वारंवार तहान लागते आणि पाणी पिऊन पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागते. मिलिसिमल पॉटेंसी हे होमिओपॅथिक औषध यावर खूप प्रभावी आहे. गरोदरपणात शरीरात होणार्‍या बदलांमुळेही लघवीच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय, वाढत्या बाळासाठी गर्भाशयात जागा अडवली गेल्यामुळे मूत्राशयावर दबाव येतो. मूत्राशयाच्या लहान आकारामुळे, ते जास्त लघवी साठवू शकत नाही आणि गर्भवती महिलेला वारंवार लघवीला जावे लागते. गर्भधारणेदरम्यान,स्त्र्रीचे शरीर अधिक रक्त तयार करते आणि मूत्रपिंड अधिक द्रवपदार्थावर प्रक्रिया करते. परिणामी, जास्त लघवी होते. गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यतादेखील वाढते.

अतिक्रियाशील मूत्राशय:- या समस्येदरम्यान, मूत्राशयाचे स्नायू आपोआप आकुंचन पावू लागतात आणि पीडित व्यक्तीला वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. म्हातारपणामुळे स्नायू कमकुवत झाल्यामुळे ही समस्या उद्भवते असे सामान्यतः मानले जाते. या आजाराची वेळीच तपासणी होणे गरजेचे आहे. जीवनशैलीत बदल करूनही ही समस्या टाळता येऊ शकते. लघवीच्या समस्या इतर आजारांसारख्याच असतात आणि वेळीच उपचार केल्यास त्या बर्‍या होऊ शकतात. होमिओपॅथीमध्ये या आजारांवर सहजसोपे आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधल्यास अधिक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात, वेळेत उपचार न केल्यास प्रोस्टेट कर्करोग किंवा किडनीचे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in