गांधी तीर्थ : गांधी समजावून देणारे आंतरराष्ट्रीय स्थळ

सत्य आणि अहिंसा यांचा आग्रह धरणारा एक विश्वमानव भारतीय भूमीवर जन्मला. त्याचे विचार आणि कार्य पुढच्या पिढ्यांसाठी जतन करणे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे महत्त्वाचे काम ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’च्या मदतीने करण्यात येत आहे. गांधीजींच्या आवाजातील भाषणांपासून ते त्यांच्या हस्तलिखितातील दुर्मिळ पत्रांपर्यंत अतिशय बहुमूल्य असा ठेवा इथे पाहायला मिळतो. आज गांधी जयंतीनिमित्त...
गांधी तीर्थ : गांधी समजावून देणारे आंतरराष्ट्रीय स्थळ
फेसबुक
Published on

प्रासंगिक

- विजय पाठक

सत्य आणि अहिंसा यांचा आग्रह धरणारा एक विश्वमानव भारतीय भूमीवर जन्मला. त्याचे विचार आणि कार्य पुढच्या पिढ्यांसाठी जतन करणे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे महत्त्वाचे काम ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’च्या मदतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ‘गांधी तीर्थ’ या ३१ विभागांत विस्तारलेल्या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. गांधीजींच्या आवाजातील भाषणांपासून ते त्यांच्या हस्तलिखितातील दुर्मिळ पत्रांपर्यंत अतिशय बहुमूल्य असा ठेवा इथे पाहायला मिळतो. आज गांधी जयंतीनिमित्त या अनोख्या संग्रहालयाची ओळख करून घेऊया.

विश्वातील मानव जातीसमोर असलेल्या विविध समस्यांचे समाधान हे केवळ म. गांधी यांच्या जीवन दर्शनात आणि विचारात आहे. हे समजून घेत गांधीजींच्या जीवनमूल्यांची स्थापना करणे, त्यांच्या सत्य, अहिंसा, शांतीपूर्ण सद्भावना आणि श्रमाचे महत्त्व या जाणिवांचा विश्वस्तरावर विकास करणे हा उद्देश समोर ठेवत भावी पिढीला गांधीजींचे विचार आणि त्यांचे कार्य यांची माहिती करून देत त्यांना संस्कारित करण्यासाठी जळगावला ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना झाली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘गांधी तीर्थ संग्रहालया’ची निर्मिती झाली. गांधी तीर्थ हे म. गांधींच्या विचारांनी भारलेल्या आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत पद्मश्री भवरलाल जैन यांचे स्वप्न होते. गांधीजी हे सामान्य माणसाला समजण्याची गरज असून गांधीजींचे विचार समजून घेत त्या विचारांनुसार कार्यरत राहणे यातच खरा ग्रामविकास असल्याची त्यांची धारणा होती. त्यामुळेच गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले. गांधी तीर्थ हा त्याचा एक भाग आहे. ८१ हजार चौरस फूट जागेवर जोधपुरी दगडांनी बांधलेले गांधी तीर्थ हे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.

मल्टी मीडियाच्या माध्यमातून हे संग्रहालय ३१ विभागांत विस्तारलेले आहे. महात्मा गांधींच्या जीवनाचे समग्र दर्शन केवळ भारतातच नव्हे तर विश्वातील पहिल्या ठरलेल्या या ऑडिओ गायडेड संग्रहालयातून होते. गांधीजींची ही जीवनयात्रा अत्याधुनिक टच स्क्रीन, बायस्कोप, डिजिटल बुक्स, थ्री डायमेंशनल भित्तीचित्र, ॲनिमेशन या माध्यमातून सादर केली गेली आहे. याचे आणखी नूतनीकरण केले गेले असून चरखा विभाग आणि मानपत्र विभाग नव्याने अस्तित्वात आले आहेत. सध्या ते विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. २५ मार्च २०१२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या गांधी तीर्थाचे उद‌्घाटन झाले. संग्रहालयात गांधीजींशी संबंधित पत्रे आणि अन्य दस्तावेजांचा तीन लाख सत्तर हजार डिजिटल पानांचा संग्रह असून गांधींनी संपादन केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या पाच हजारांवर पत्र-पत्रिकांचा संग्रह आहे. त्यांच्या आवाजातील १५२ भाषणे, त्यांच्या जीवनावर आधारित ८५ चित्रफिती, पाच हजारांवर गांधीजींशी संबंधित फोटो तसेच स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित व्यक्ती आणि घटनांवर दुर्मिळ असे ५,७५० फोटो असा हा सारा खजिना आपल्याला अचंबित करतो. गांधीजींवरील ११९ देशांनी प्रकाशित केलेली पोस्टाची तिकिटे, चलनी नोटा, स्मरणीय शिक्के, मेडल्स, त्यांनी वापरलेल्या वस्तू, १९३६ च्या फैजपूर अधिवेशन काळात वापरलेल्या वस्तू या सगळ्याचे इथे अत्याधुनिक पद्धतीने जतन केलेले दिसते. ‘गांधी’ या विषयावरील समृद्ध ग्रंथालय हे या संग्रहालयाचे वेगळेपण आहे. यामुळेच गेल्या बारा वर्षांत ६३ हून अधिक देशांतील आणि साडेसहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आजपर्यंत या गांधी तीर्थाला भेट दिली आहे. गेल्या बारा वर्षांतील ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’च्या कार्यावर नजर टाकली असता फाऊंडेशनच्या कार्याने देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गांधी विचारांचा यशस्वीपणे प्रसार केला आहे, हे दिसून येते. गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी या फाऊंडेशनने गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्याबरोबर सामंजस्य करार केलेला असून गांधी विचार आणि सामाजिक विचार या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पदवी दिली जात आहे. तसेच २०१५ पासून फाऊंडेशनने गांधी विचारावर आधारित सर्टिफिकेट कोर्स आणि समाजकार्य विषयात डिप्लोमा सुरू केला. येणाऱ्या पिढ्यांमध्ये शाश्वत जीवन मूल्यांचे, आदर्शांचे बिजारोपण करून त्यांना एक आदर्श नागरिक म्हणून घडवण्याच्या हेतूने भारतातील विविध राज्यांतील तसेच देश-विदेशातील विद्यालये आणि महाविद्यालये इथे ‘गांधी विचार संस्कार परीक्षे’चे आयोजन केले जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती या भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जात असून वीस हजारांपेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांतील पंचवीस लाखांहून अधिक विद्यार्थी यात आतापर्यंत सहभागी झालेले आहेत.

‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेने देश- विदेशातील प्रतिष्ठित विद्वानांना निमंत्रित करून ‘गांधी विचार’ आणि इतर समकालीन विषयांवर आधारित विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करत आपल्या कार्याचा वेगळा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे. हे कमी की काय म्हणून रंगभूमीच्या माध्यमातून कथा-नाट्यातून ‘गांधी दर्शन’ घडवण्यातही पुढाकार घेतला जातो. या संस्थेद्वारे अप्रकाशित, दुर्मिळ ग्रंथ व लेखांचे प्रकाशन केले जाते. त्याचबरोबर ‘खोज गांधीजी की’ या मासिकाचे नियमित प्रकाशन होत असते. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रचनात्मक कार्य सुधारित स्वरूपात ग्रामपातळीवर करण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत ग्रामविकास कार्यक्रम राबवण्यासाठी जिल्ह्यातील अकरा गावे निवडली गेली आहेत. म. गांधी या सगळ्या विश्वाचे महान नायक ठरलेल्या या अलौकिक पुरुषाचा मोहन ते महात्मा हा प्रवास, त्यांच्या जीवनकार्याचे ऑडिओच्या माध्यमातून दर्शन आणि त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य या संग्रहालयात पाहताना आपण रोमांचित होतो. जळगाव शहरातील या आगळ्यावेगळ्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश-विदेशातून नागरिक आवर्जून येत असतात. गांधी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी ‘गांधी तीर्थ’ पहायलाच हवे!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in