समाजातील स्त्री-पुरुष समानता

समानता ही केवळ तोंडी घोषणा न राहता ती आपल्या वर्तनात आणि दैनंदिन जगण्यात उतरायला हवी, हा या लेखाचा मुख्य संदेश आहे. स्त्री-पुरुष समानता ही कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यदायी वाढीसाठी आवश्यक आहे. संसाररूपी रथाच्या दोन्ही चाकांना समान महत्त्व दिले गेले नाही, तर तो रथ सक्षमपणे पुढे जाऊ शकत नाही.
समाजातील स्त्री-पुरुष समानता
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

समानता ही केवळ तोंडी घोषणा न राहता ती आपल्या वर्तनात आणि दैनंदिन जगण्यात उतरायला हवी, हा या लेखाचा मुख्य संदेश आहे. स्त्री-पुरुष समानता ही कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यदायी वाढीसाठी आवश्यक आहे. संसाररूपी रथाच्या दोन्ही चाकांना समान महत्त्व दिले गेले नाही, तर तो रथ सक्षमपणे पुढे जाऊ शकत नाही. लहान वयातच मुली आणि मुलांमध्ये करण्यात येणारे भेदभाव, मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, आर्थिक हक्कांपासून त्यांना वंचित ठेवणे आणि रूढी-परंपरांच्या नावाखाली त्यांच्यावर बंधने घालणे यामुळे समाजात महिलांचे स्थान दुय्यम राहते.

आपल्याला समाजात समानता आणता येईल, समानता ही काही दिसणारी गोष्ट नाहीये ती आपल्या वर्तणुकीत असावी लागेल. दुसऱ्याला कमी न लेखता वर्तन करणे म्हणजे दुसऱ्याचे अस्तित्व बरोबरीचे आहे, असे मान्य करणे. अशी समानता कुटुंबांतर्गत असेल तरच मग समाज अधिक आरोग्यदायी बनेल. सहज बोलताना म्हटले जाते की, संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. एक पुरुष आणि दुसरे स्त्री. आता तुम्ही सांगा एक चाक आपण मागे ठेवले आणि दुसरे चाक पुढे केले तर रथ नीट चालेल का? एक चाक निर्णय घेण्याच्या ताणामुळे, व्यसनाधीनतेमुळे, पैशापाण्याच्या महागाईच्या काळजीने झिजत आहे आणि दुसरे चाक दिवसभराच्या काबाडकष्टाने आणि मिळालेल्या दुय्यम वागणुकीमुळे आणि हिंसेमुळे पिचले आहे, तर संसाररूपी रथ नीट चालेल का? जर आपल्याला संसाररूपी रथ नीट चालायला हवा असेल, तर स्त्रियांनी मी बाई आहे म्हणून रडत न बसता आणि पुरुषांनी मी पुरुष आहे या अहंपणातून बाहेर यायला पाहिजे आणि आपण माणूस म्हणून एकमेकाला समजून घेत संसार उभारला पाहिजे, टिकवला पाहिजे. अधिक विकसित केला पाहिजे. अशी भूमिका स्त्री-पुरुष दोघांनीही घेतली, तर आणि तरच समानता कुटुंबांतर्गत प्रस्थापित होऊ शकणार आहे. तू तू-मैं मैं करण्याने कुटुंबांतर्गत कलह वाढेल. वाद विकोपाला जातील आणि कुटुंब दुभंगू शकते. म्हणून दोघांचीही भूमिका एकमेकाला पूरक असायला हवी. निर्माण होणाऱ्या ताणाची आणि वादाची साधक-बाधक चर्चा लोकशाही मार्गातून व्हायला हवी. घरातल्या पुरुषानेही आपल्या मनातील ताणतणाव आणि द्वंद्व पुरुषी अहंपणा न दाखवता मोकळेपणाने बोलले पाहिजे, तसेच स्त्रियांनीही आपले म्हणणे आक्रस्ताळीपणा न करता शांतपणे सांगितले पाहिजे आणि तिने सांगितलेले, बोललेले तिचे म्हणणे समोरच्याने माणुसकीच्या भूमिकेतून समानतेच्या भूमिकेतून ऐकून घेतले पाहिजे. असा संवाद हा जर पती-पत्नींमध्ये घरातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत मुलांच्या उपस्थितीत झाला, तर घरामधील लोकशाही मार्गाने झालेला हा संवाद देशातील लोकशाही समाजातील लोकशाही टिकवण्यासाठीही उपयोगी ठरेल. दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करण्यासाठी, दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सवय लागण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. घटस्फोट कमी होतील, कोर्टकचेरी, पोलीस स्टेशन यांच्यावरचा ताणही कमी होईल आणि आपल्या घरातील मुलांनाही समानतेने वागण्याच्या, दुसऱ्याच्या ऐकून घेण्याच्या सहिष्णू वागणुकीची सवय लागेल. हे अधिक सजग आणि जागृत समाजाचे लक्षण असणार आहे. लहान वयातच स्त्री-पुरुष समतेचा संस्कार बालकांवर झाला पाहिजे. आपण मुलगी असेल, तर तिला भेटवस्तू म्हणून फ्रॉक घेऊन जातो किंवा बाहुली नेतो किंवा चहा कप-बशीचा सेट घेऊन जातो किंवा संसार सेट नेतो आणि मुलगा असेल तर त्याला आपण शर्ट-पँट नेतो, बॅट-बॉल देतो, बंदूक नेतो. का बरं आपण असे करतो? असे कुठे लिहिले का एखाद्या धर्मग्रंथांमध्ये की मुलीला हीच वस्तू न्या, मुलांना तीच वस्तूंना, बाळ जर दोघांना होणार असेल, तर बार्बी डॉल सांभाळण्याचा खेळ मुलाला द्यायला काय हरकत आहे? पण आपण तसे करत नाही, आपल्या कळत-नकळत आपण आईपणाचे, बाईपणाचे संस्कार लहानपणीच मुलींवर सुरू करतो आणि मुलांवर मात्र खेळ, व्यवहार, अशा गोष्टींचे संस्कार होतात. मुले मोठी होतात. मुलगा रडायला लागला, तर आपण त्याला काय मुळूमुळू मुलीसारखे रडतोय असे म्हणतो आणि मुलगी पाय पसरून बसली, तर आपण तिला मुलींनी कसे अंग सावरून नीटनेटके बसले पाहिजे असे सांगतो. डाग अच्छे है मुलींसाठी नाही, तर मुलांसाठी, पुरुषांसाठी. म्हणजे निसर्गतः बालक एकाच आईच्या पोटी समान जन्माला येतात; आपण मात्र त्यांचा सामाजिकीकरण करत असताना संस्कार नावाखाली बाईपणाची आणि पुरुषपणाचे संस्कार करतो. ज्या कामांना थँक्यू म्हणायची गरज नाही, अशी सगळी कामं बाईच्या वाट्याला येतात आणि ज्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक संसाधनांची मालकी आहे, ज्याच्यामध्ये बाहेरच्या जगात वावरण्याचा व्यवहार आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवायला लागतो. सायकल चालवणं, दुकानात जाणं, पैशाचा हिशेब करणं अशा सगळ्या गोष्टी मुलांना करू दिल्या जातात. यामुळे मोठे झाल्यावर देखील मुलगी हे परक्याचं धन म्हणून वाढवली जाते आणि मुलगा मात्र वंशाचा दिवा म्हणून कौतुक आणि वाढतो यातूनच कुटुंबांतर्गत दुय्यमपणाच्या वागणुकीला केला सुरुवात होते. तिला ना सासरी न माहेरी कशाचेही मालक होता येत नाही. निर्णय क्षमता तिची वाढवली जात नाही. तिला सोसण्याचे जागाचे कष्ट करण्याचे धडे दिले जातात. तसं केलं नाही तर स्त्रियांच्या जगातही तिला स्थान नसतं. अशी कधी बाई असते का, असं म्हणून तिला हणवलं जातं. स्वयंपाक प्रत्येकीला आलाच पाहिजे. मुलीचं लग्न झालंच पाहिजे असे काही अलिखित आपल्याकडे नियम आहेत. आपल्या भावकी-गावकीमध्ये ते पाळावे लागतात. या सगळ्या बाबतीत आपण विचार करायला हवा. मुलीला मुलाच्या बरोबरीने आपल्या स्थावर जंगम मालमत्तेमध्ये मालकीय दिली पाहिजे. मुलींना हुंड्याचा धोंडा नको, हुंडा मागणाऱ्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्नच नको करायला. किंबहुना हुंड्यापेक्षा अधिक मुलीला मुलाच्या बरोबर आपल्या सगळ्या मालमत्तेमध्ये हक्क देऊया. हिंसा ही गोष्ट वाईटच आहे. पण द्यायचेच झाली, तर बंदूक, तलवार मुलीला भेट द्यायला काय हरकत आहे? तिला स्वसंरक्षणाचे धडे यांची गरज आहे. पण आपण ती भेटवस्तू मुलांना देतो. बॅट-बॉल मुलींना द्यायला काय हरकत आहे आणि बार्बी मुलाला देऊ आणि त्यालाही चांगला पालक होण्याचा धडा मिळाला तर कुठे बिघडले? अशा छोट्या छोट्या बदलातूनच मोठे परिवर्तन घडत असते.

स्त्रिया या स्त्रियांच्या शत्रू आहेत हे वाक्य खोटे आहे, असलीच तर स्त्रियांच्या अवतीभोवतीची परिस्थिती त्यांची शत्रू आहे. माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे हे वाक्य मनातल्या मनात आणि अगदी मोठ्या आवाजात रोज म्हणूया आणि ते वाक्य त्यातल्या आशयासहित जगण्याचा प्रयत्न करूया. बेटी बचाव, बेटी पढाव ही फक्त घोषणा नको, तर खरंच मुलींच्या जन्माचे स्वागत करूया. मुलींना शिकूया, त्यांना चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायचं धाडस देऊया. स्त्रीविषयक विविध कायद्यांची माहिती करून घेऊया. केवळ आधुनिक कपडे घालू नये, तर आधुनिक विचाराने अंधश्रद्धा मुक्त होऊया. चुकीच्या रूढी, परंपरा, व्रतवैकल्यांना दूर सारूया. संपूर्ण समाजाने आणि विशेषत्वांनी म्हणजे स्त्रियांनी आतापर्यंत आपण स्त्रिया म्हणून काय मिळवले आणि अजून कोणती आव्हाने आपल्यासमोर आहेत याचा लेखाजोखा घ्यायचा दिवस म्हणजे महिला दिन. अलीकडे त्याला फक्त उत्सवाचे स्वरूप आले आहे. त्याच्यातली वैचारिकता सांभाळणे त्याच्या मागचा उद्देश समजून घेणे आणि त्याच्यावरही विचारमंथन करणे ही एक समाज म्हणून आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे. भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. त्यामुळे हाही दिवस उत्सवासारखा साजरा झाला आणि सर्वदूर सर्वच थरातील महिलांपर्यंत पोहोचला तर आनंदच आहे. परंतु आजच्या दिवशी घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, लाखो महिलांना त्यांच्या कामात मजुरी अगर पगार मिळणारच नाहीये. शेतावर राबणाऱ्या शेतमजूर महिला, बिडी कामगार, वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिला, स्वच्छता कामगार, विविध कारखान्यांमध्ये संघटित किंवा असंघटित क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना महिला दिन आहे हे माहीत तरी होते का? ज्या दिवशी त्यांच्या मानवी हक्काची आपण समाज म्हणून नोंद ठेवू, त्यांच्या हक्काची पायमल्ली होणार नाही याची समाज म्हणून देश म्हणून ग्वाही देऊ शकतो का? तो दिवस महत्त्वाचा ठरेल. जाणीवपूर्वक आपल्यातल्या ज्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या महिलांना, विद्यार्थिनींना महिला दिन असतो हे माहीत आहे का? त्यांनी महिला दिन साजरा करत असताना आपणा सर्वांसाठी राबणाऱ्या अगदी शेवटच्या थरातल्या राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना किमान शुभेच्छा दिल्या का? खऱ्या अर्थाने आपण बहीण भाव व्यक्त केला का? आणि सर्वच थरातील आपल्या बहिणींना, महिला दिनाच्या उत्सवात सहभागी करून घेतले का? केवळ आपण बाई आहोत म्हणून नेहमीच रडारड करण्याची गरज नाही. मी बाई आहे म्हणून असं अभिमानाने सांगत संपूर्ण सजीवसृष्टीतील सर्वांग सुंदर आणि सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर तो माणूस आहे आणि त्या माणसाच्या निर्मितीत सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल, तर ते स्त्रियांचं आहे, त्यांनी शेतीचा शोध लावला आहे. त्या करतात ती प्रत्येक गोष्ट सृजन असते. त्या निर्मितीक्षम आहेत. त्या आज विकासाच्या या सर्व प्रक्रियेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. स्त्रिया म्हणून असणाऱ्या पारंपरिक भूमिका पार पाडतात. त्याच वेळेला आपल्यावरती असणाऱ्या प्रोफेशनल जबाबदारी तितक्याच सक्षमपणे पार पाडतात. म्हणून अशा मल्टीटास्किंग करणाऱ्या स्त्रिया या मॅनेजमेंटच्या खऱ्या गुरू आहेत, असे म्हटले तर वावग ठरणार नाही. त्यांच्या या सहभागाची नोंद घेऊन समाजातील पुरुष वर्गाने देखील सजगपणे वर्तन केल्यास, माणूस म्हणून वर्तन केल्यास स्त्रिया सुरक्षित होतील. समाज म्हणून आपण अधिक उन्नत होऊ आणि अशाच एका स्त्री-पुरुषांच्या निकोप नात्यासहित विकसित होऊ पाहणाऱ्या भारतीय समाजाची आपण कामना करूया.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक

logo
marathi.freepressjournal.in