जनरेशन गॅप की...?

परिचयातून ओळख होते आणि मग त्या ओळखीचे रूपांतर आपलेपणात, प्रेमाच्या, आपुलकीच्या नातेसंबंधात होते
जनरेशन गॅप की...?

सकाळची वेळ.... नित्यनियमाप्रमाणे जगाचा व्यवहार सुरू झालेला. कुणाची दुधासाठी धावपळ तर कोणाची मुलांना शाळेत सोडण्याची ! कोणाची कामावर जाण्यासाठी लगबग तर कोणाची धंद्याची ! कोणी कुत्र्यांना फिरायला घेऊन तर कोणी बागेत " मॉर्निंग वॉक" साठी निघालेले ! रोज बागेत फिरायला येणाऱ्यांचे चेहरे एव्हाना एकमेकांच्या परिचयाचे झालेले असतात. त्या परिचयातून ओळख होते आणि मग त्या ओळखीचे रूपांतर आपलेपणात, प्रेमाच्या, आपुलकीच्या नातेसंबंधात होते.

अगदी नित्यनियमाने झुंजूमुंजू झाल्या बरोबर बागेत "मॉर्निंग वॉक"साठी येणारे नेहमीचे आजोबा गेल्या दोन दिवसांपासून मात्र आले नव्हते. याची इतरांना नसेल परंतु त्यांच्या बरोबर जिव्हाळ्याची मैत्री झालेल्या दुसऱ्या एका आजोबांना रुखरुख लागून राहिली होती. मैत्री केवळ बागेतील असल्याने नेमके कोण कोठे राहते याविषयी फारशी माहिती बहुदा त्यांना नसावी. दोन-तीन दिवसांच्या विरहानंतर आज मात्र ते आजोबा मॉर्निंग वॉकसाठी आले होते. बागेत फेर्‍या मारताना दुसऱ्या आजोबांनी त्यांना पाहिले ,ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.गेली दोन-तीन दिवस तुम्ही दिसला नाहीत, कुठे गेला होता? कुठे बाहेर गावी का ? दुसऱ्या आजोबांनी मनापासून सुरू केलेली चौकशीच गेल्या दोन-तीन दिवसांपासून मॉर्निंग वॉकसाठी न आलेल्या आजोबांच्या व्यथा वेदनांवर फुंकर घालणारी ठरली.

आजोबा म्हणाले की ,"अहो काय सांगणार, गेले दोन-तीन दिवस मला बरे वाटत नव्हते. सर्दी- खोकला ! त्यातच एक दिवस ताप आला. अहो आमच्या घरी मुलगी तिच्या छोट्या मुलीला घेऊन परवा राहायला आली. त्या दोघींनाही पंखा फुल केल्याशिवाय झोपच लागत नाही.तर दुसऱ्या खोलीत नातू (मुलाचा मुलगा) झोपलेला. त्याच्या आई-वडिलांनी तर त्याला दोन दोन पंख्यांची सवय लावलेली आहे. त्याला एक सिलिंग फॅन व एक टेबल फॅन लागतो. रात्रभर असे फुलपंखे चालू असल्याने मला ते सहन होत नव्हते. त्यामुळे झोप लागत नव्हती.बोललो तर उलट मलाच सांगितले, " तुम्हाला पंख्याची हवा सहन होत नसेल तर तुम्ही घराबाहेर जाऊन बसा". आता रात्री बाहेर कुठे बसणार ? आपल्याच घरात आपल्याला चोरी दुसरे काय ? नीट झोपताही येत नाही अन त्याबद्दल काही बोलून ही चालत नाही. त्यामुळे रात्र बसून काढली आणि आजारी पडलो. अखेर बरे होण्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागले. तेथे डॉक्टरांना पैसे मोजावे लागले.म्हणजे एकीकडे हे विकतचे दुखणेच घ्यावे लागले. आधीच तुटपुंजी पेन्शन त्यामधून घर खर्च भागवायचा, मेंटेनन्स भागवायचा, लाईट बिल भागवायचा की औषधांचा खर्च ! आमचे चिरंजीव यापैकी कोणताच आर्थिक भाग घ्यायला तयार नाहीत. यावरून घरात बोललो तरीही चालत नाही. म्हणजे काहीच बोलायचे नाही , फक्त "तोंड दाबून बुक्क्यांचा मार "मात्र निमूटपणे सहन करायचा. पण कुठवर हे सहन करायचं ?

उभं आयुष्य काबाडकष्ट करून पोटाला चिमटे घेत मुलांना मोठे केले,त्यांना शिक्षण दिले, मार्गी लावले. ते करतानाच पै पै गोळा करून स्वतःचे घर घेतले, कुटुंबासाठी हक्काचे छप्पर उभे केले, काय चूक केली? आज ते छप्पर माझ्यासाठी परके होत आहे. घरात काही बोललो तर "तुम्हाला काय कळतंय ?" तुमच्या वेळी वेगळे होते ,आता जमाना बदलला. जमाना बदलला म्हणून रक्ताच्या नात्यातील संबंध बदलले का ? रोजचा दिवस घालवताना खूप पश्चाताप होतो. पण काय करणार ? कुठे जाणार ? आणि हे सारे कोणाला सांगणार ? आजोबा बोलत होते, त्यांचा आवाज खोल खोल चालला होता. त्यांचे डोळे पाणावले होते ,असे सांगताना आजोबांचा कंठ दाटून आला होता. आपल्या वेदनांना वाट करून देण्याची संधी बहुदा अनेक दिवस वा महिन्यानंतर आजोबांना आज पहिल्यांदाच मिळाली असावी. कदाचित तशी संधी मिळाली असेलही; परंतु तितक्याच सहृदयतेने ऐकणारा , त्यांना समजून घेणारा कुणी मिळाला नसावा. आजोबांच्या या व्यथा ऐकून दुसऱ्या ही आजोबांचा बांध फुटला. इतका वेळ उभ्या उभ्याने आपले दुःख वाटणाऱ्या त्या दोघांनी तेथीलच एका बाकड्याच्या आधार घेतला. बहुदा आज त्यांचा दिवस "मॉर्निंग वॉक" चा नसावा. तर आयुष्याच्या संध्याकाळी वाट्याला आलेल्या वेदनांना वाट करून देण्याचा असावा. एक मेकाला वाटेकरी करून घेण्याचा असावा. एव्हाना रोज साडेसात आठ वाजेपर्यंत संपणारा त्यांचा मॉर्निंग वाॅक आज नऊ वाजून गेले तरी वेदनांची वाटणी करत आणि उभ्या आयुष्यातील साऱ्या सुख-दुःखाच्या आठवणींना उजाळा देत सुरू होता .

हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी ते समाजात वडीलधाऱ्या माणसांच्या वाट्याला काय आणि किती वेदना येऊ पाहत आहेत या वर्मावर बोट ठेवणाऱे आहे. सर्वच घरांमध्ये असे चित्र नसले तरी बऱ्याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असे चित्र दिसू लागले आहे. म्हातारी माणसे म्हणजे जणू काय घरातील अडगळच , असेच समीकरण बनत चालले आहे. दररोज वृद्ध आई-वडिलांच्या छळा विषयीच्या प्रसार माध्यमांमधून समोर येणाऱ्या करूण कहाण्या हेच दर्शविणाऱ्या आहेत. ज्येष्ठांनी देखील तरुणांबरोबर जुळवून जावयास हवे. परिवर्तन हा निसर्गाचाच नियम असेल तर त्याला माणूस तरी कसा काय अपवाद असू शकतो ? त्यामुळे काळाबरोबर बदलत, काही अंशी तरी नव्याचा स्वीकार करावयास हवा. याविषयी कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण जसे ज्येष्ठांनी जुळवून घेतले पाहिजे अशी जेव्हा अपेक्षा करतो तसे त्या प्रमाणे तरुणांनी देखील कधीतरी ज्येष्ठांच्या भूमिकेत जात त्यांना समजून नको का घ्यायला ? की नव्याचा विचार म्हणजे अगदी सर्वच प्रथा, परंपरा ,रीती-रिवाज या साऱ्याला तिलांजली द्यायची का ? जेथे अशी तिलांजली देण्याचा प्रकार वारंवार होतो तेथेच खऱ्या अर्थाने दोन पिढ्यांमध्ये अधिक संघर्ष उभा राहतो. आणि तेथूनच वडीलधाऱ्यांच्या वनवासाला सुरुवात होते. खरं तर कुटुंबातील सलोखा हा त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या विचार, आचार, वागण्यावर आणि एकमेकांना आपलेपणाने समजून घेण्यावर अवलंबून असतो. पण जर समजूनच घ्यायचं नाही असं ठरवलं तर कसं चालेल ? जिव्हाळा, आपलेपणा आणि संवाद हे कुटुंब एकसंघ ठेवण्याची त्रिसूत्रीचा म्हणावी लागेल. जेव्हा या त्रिसूत्री ला धक्का बसतो तेव्हा कुटुंबातील रक्ताची नाती एकमेकांची वैरी बनतात. हा आपलेपणा, जिव्हाळा आणि परस्परातील संवाद जेव्हा संपत येतो तेव्हा नात्यातील वीण सैल होत जाते आणि ही सैल होणारी वीण अनेक प्रकारच्या वादंगाला जन्म देणारी ठरते. परंतु वादंगा मागील मूळ कारणे काय हे मात्र समजून न घेता त्याला "जनरेशन गॅप " असे गोंडस नाव दिले जाते आणि हे असेच चालू राहते. .

आयुष्याच्या संध्याकाळी वाट्याला येणा-या वेदना अनेकांना जीवन नकोसे करणाऱ्या ठरताहेत. काळ बदलला आहे.त्या काळाबरोबर आपणही बदलायला हवे. हे जरी खरे असले तरी एक तर पैशाचे सोंग आणता येत नाही आणि दुसरे म्हणजे आयुष्याला लागलेल्या काटकसरीच्या सवयी मोडता ही येत नाहीत. आजोबांनी व्यक्त केलेल्या व्यथा सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात सारख्याच आहेत.त्यामुळे कोण बरोबर, मुले की आई-वडील हा प्रश्नच आहे. तरीदेखील संसाराचा गाडा सुख आणि आनंदाने पुढे न्यायचा असेल तर घरातील सर्वांनीच एकमेकांच्या भावना, मने समजून घेत त्यांचा आदर केला तरच आयुष्याच्या संध्याकाळी वाट्याला आलेले खडतर जीणे काहीसे सुसह्य होऊ शकेल. केवळ "जनरेशन गॅप" म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास वडीलधार्‍यांना जगणे अशक्य होईल.उद्या आपणही म्हातारे होणार आहोत. आज आपण सुपात असलो तरी उद्या जात्यात असू याचे भान जरी घरातील प्रत्येक तरुणाने ठेवले तरी पुरे होईल.मग जनरेशन गॅप चा प्रश्न काही अंशी तरी निकाली निघू शकेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in