
मागील काही दिवस राज्यात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, ती नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावानंतर संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवर्य आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ व आनंद आश्रमावर जाऊन नतमस्त झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत झाले आहे. आता या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक चर्वितचर्वण न करता, तसेच, मुख्य म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र विकास आघाडीने काही केले नाही, अशी जपमाळ न ओढता राज्यापुढील ज्वलंत प्रश्नांना हात घालून ते सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. महाराष्ट्राची विकासाच्या व समृध्दीच्या मार्गावरील घोडदौड यापुढेही तितक्याच तडफेने पुढे नेण्याची जबाबदारी या नेतेमंडळींवर येऊन पडली आहे. मुख्य म्हणजे आता आभाळाकडे डोळे लावून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. राज्यभरात शेतीची कामे जोरात सुरू झाली आहेत. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आला आहे. मुंबईला ऑरेंज, तर दक्षिण कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नद्या इशारापातळीच्या वर वाहत असून स्थानिक जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दरड कोसळण्याच्या वाढत्या धोक्याबरोबरच, कॉंक्रीटच्या रस्त्यालाच भेगा पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसर वाहतुकीकरिता बंद करण्यात आला असून तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे. तसेच, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यामधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी स्थानिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचले आहे. तसेच, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पाऊस आणि पीकपाण्याचा हालहवाला जाणून घेतला. तसेच, त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला भेट देऊन आपत्कालीन परिस्थितीचाही प्रत्यक्ष आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नवे सरकार अशाप्रकारे सतर्क झाले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण कार्यकर्ते आहोत, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. राज्यातील ज्वारी, उडीद, सोयाबीन, तूर, भुईमूग, बाजरी, नाचणी पिकांचा पेरा वेगाने व वेळेत व्हावा, पेरणीसाठी बी-बियाणे, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, तसेच पेरणीसह शेतातील इतर कामासाठी रोख मदत देण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. त्या लक्षात घेता, या सरकारने बी-बियाणे, खताच्या पुरवठ्याबाबत ज्या काही अडीअडचणी असतील, तर त्या त्वरित सोडवून शेतकऱ्यांना सर्वप्रथम दिलासा देण्याच्यादृष्टीने पावले उचलायला हवीत. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जे काही अडथळे आहेत, तेही विनाविलंब दूर करायला हवेत. महाराष्ट्रासह देशात बेरोजगारी, महागाईचा ‘अग्निपथ’ सुरू असून त्यात सामान्य माणूस अक्षरश: होरपळून निघतोय. ही सामान्यांची होरपळ थांबवून राज्याचा वेगाने विकास घडवून आणण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. हे आव्हान नवे सरकार कसे पेलते, यावरच राज्याच्या विकासाची आगामी दिशा ठरणार आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या लक्षात घेता, रोजगाराभिमुख उद्योग आणण्यासाठी नव्या सरकारला अधिक नेटाने प्रयत्न करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. राज्यातील तत्कालीन मविआ सरकार व आताचे सरकार याच्या कार्यपध्दतीमधील नेमका फरक काय, हे सिध्द करण्याची जबाबदारी आता शिंदे-फडणवीस सरकारवर येऊन पडली आहे. तेव्हा त्यांनी विनाविलंब कामाला लागणे उत्तम.