हिमनद्या कोरड्या पडण्याचा धोका

पृथ्वीवरील पर्यावरणजतनासाठी हिमनद्या आवश्यक आहेत. जगाचा दहा टक्के पृष्ठभाग हिमनद्यांनी व्यापला असून त्या जगासाठी ताज्या पाण्याचा महत्वाचा स्त्रोत आहेत.
हिमनद्या कोरड्या पडण्याचा धोका

पृथ्वीवरील पर्यावरणजतनासाठी हिमनद्या आवश्यक आहेत. जगाचा दहा टक्के पृष्ठभाग हिमनद्यांनी व्यापला असून त्या जगासाठी ताज्या पाण्याचा महत्वाचा स्त्रोत आहेत. पर्यावरणातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालले आहे. त्यामुळे हिमनद्या वितळत आहेत. या धोक्याचा फटका संपूर्ण जगाला बसणार असून २०५० पर्यंत भारत जलसंकटाने त्रस्त झालेल्या देशांमध्ये आघाडीवर असेल.

यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पडणारा अवकाळी पाऊस अन् गारपीट नेमक्या याच धोक्याचे संकेत तर देत नाहीत ना? यासारखे हवामान बदल आता जगभरात दिसून येत आहेत. भविष्यात आशियाई देशांवर त्याचा सर्वात वाईट परिणाम होणार आहे. आशिया खंडामध्ये उबदार दिवस वाढू शकतात किंवा हिवाळ्याच्या दिवसांची संख्या वाढू शकते. अचानक मुसळधार पाऊस किंवा अचानक ढगफुटीच्या घटना घडू शकतात. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल दिसून येतात. तब्बल पाच दशकांनंतर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या जल परिषदेमध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या गंगेसह दहा प्रमुख नद्या कोरड्या पडण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला होता की हवामान संकटामुळे हिमनद्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे येत्या काही दशकात भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या कोरड्या पडू शकतात. गंगा आणि ब्रह्मपुत्रेसह आशियातील दहा नद्यांचा उगम हिमालयाच्या पायथ्याशी असून त्यात झेलम, चिनाब, बियास, रावी आणि यमुना यांचाही समावेश आहे. या सर्व नद्या २२५० किलोमीटर पाणलोट क्षेत्रात वाहतात आणि तेथील कोट्यवधी लोकांना ताजे पाणी पुरवतात. पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांपैकी ऐशी टक्के लोक आशिया खंडातील आहेत. ही समस्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनमध्ये सर्वाधिक आहे. गंमत म्हणजे पाण्याची उपलब्धता कमी होत असतानाच पाण्याचा वापरही वाढत आहे. भारतामध्ये जगाच्या लोकसंख्येच्या १७.७४ टक्के लोकसंख्या आहे तर गोड्या पाण्याचे केवळ ४.५ टक्के स्त्रोत आहेत. त्यामुळेच कालांतराने नद्या कोरड्या पडण्याची बातमी नक्कीच चिंताजनक आहे.

यापूर्वीही कॅनडामधील स्लिम्स नदी कोरडी पडणे आणि त्यामुळे झालेले नाट्यमय बदल हे एक ठोस सत्य म्हणून सहा वर्षांपूर्वी समोर आले होते. तेव्हा या घटनेला भूवैज्ञानिकांनी ‘नदीची चोरी’ असे संबोधून हवामानातील बदलांमुळे ही नदी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. याच प्रकारे तापमानात वाढ झाल्यामुळे कास्कवुल्श नदीची जन्मदाती हिमनदी वेगाने वितळू लागल्यामुळे ३०० वर्षे जुनी आणि तब्बल १५० मीटर रुंदीचे पात्र असणारी स्लिम्स नदी २६ ते २९ मे २०१६ दरम्यान कोरडी पडली होती. अशा प्रकारे नदी कोरडी पडणे ही आधुनिक जगातील पहिलीच घटना होती. पुराणकाळातील भारतातील सरस्वती नदीच्या नामशेषाची कथा आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये नोंदलेली आहे.

२५२६ किलोमीटर लांबीची गंगा ही देशातील सर्वात प्रमुख आणि पवित्र नद्यांपैकी एक आहे. अनेक राज्यातील सुमारे चाळीस कोटी लोक तिच्यावर अवलंबून आहेत. तिचे पाणी ज्या गंगोत्री हिमनदीतून जन्म घेते, त्या हिमनदीच्या तीस किलोमीटर लांबीच्या हिमखंडातील दोन किलोमीटरचा एक चतुर्थांश भाग वितळला आहे. भारतीय हिमालयीन प्रदेशात ९५७५ हिमनद्या आहेत. त्यापैकी ९६८ हिमनद्या एकट्या उत्तराखंडमध्ये आहेत. या हिमनद्या झपाट्याने वितळल्या तर भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये आपत्तीजनक पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अंटार्क्टिकामध्ये दर वर्षी सरासरी १५० अब्ज टन बर्फ वितळत आहे तर ग्रीनलँडचा बर्फ अधिक वेगाने वितळत आहे. तेथे दर वर्षी २७० अब्ज टन बर्फ वितळण्याचे आकडे नोंदवले गेले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, समुद्राची वाढती पातळी आणि नद्यांच्या पूरक्षेत्रात खार्‍या पाण्याचा प्रवेश यामुळे या विशाल डेल्टाचा मोठा भाग नष्ट होईल. अल्मोडा येथील ‘पंडित गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट अँड डेव्हलपमेंट’च्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की हिमखंड तुटलेल्या भागात बदल दिसून येत आहेत. गोमुख हिमखंडावरील चतुरंगी आणि रक्तवर्ण हिमनगांचा वाढता दाब हे त्याचे प्रमुख कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, २८ किलोमीटर लांब आणि दोन ते चार किलोमीटर रुंद गोमुख हिमखंड इतर तीन हिमखंडांनी वेढलेला आहे. गंगेच्या उत्पत्तीच्या स्त्रोतांचे हिमनग तुटण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यास, कालांतराने गंगेच्या सातत्यावर परिणाम होईल आणि तिचा नामशेष होण्याचा धोका वाढेल. गंगेचे संकट केवळ हिमखंड तुटल्यामुळे नाही तर औद्योगिक विकासामुळेही आले आहे. कानपूरमधील चामडे, ज्यूट आणि बाटलीबंद पाण्याचे कारखाने गंगेसाठी धोकादायक आहेत. टिहरी धरण हे सिंचन प्रकल्पासाठी बांधण्यात आले होते; मात्र त्याचे पाणी दिल्लीसारख्या महानगरात पिण्याचे पाणी म्हणून कंपन्यांना दिले जात आहे. गंगा नदीच्या लगतच्या भागात पेप्सी आणि कोकसारख्या खासगी कंपन्या बाटलीबंद पाण्यासाठी मोठमोठ्या ट्यूबवेलमधून पाणी काढून मोठा नफा कमवत आहेत तर दुसरीकडे शेतात उभी असलेली पिके सुकून चालली आहेत.

दिल्लीजवळच्या यमुना नदीतून दोन थर्मल पॉवर प्लांट ताशी ९७ लाख लिटर पाणी खेचत असल्यामुळे त्याचा दिल्लीतील ट्रान्स-यमुना क्षेत्रातील १० लाख लोकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यमुना नदीचे पाणलोट क्षेत्र झपाट्याने नष्ट होत आहे. यावर उपाय म्हणून ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ईएफ शूमाकर यांनी मोठ्या उद्योगांऐवजी छोटे उद्योग उभारण्याकडे जगाचे लक्ष वेधले होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी वापर आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावे, अशी सूचना त्यांनी केली. शूमाकर यांचा विश्वास होता की निसर्गामध्ये प्रदूषण सहन करण्याची मर्यादा आहे; पण सत्तरच्या दशकात त्यांच्या इशार्‍याची खिल्ली उडवली गेली. आता हवामान बदलावर काम करणार्‍या सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी मात्र त्यांचा इशारा स्वीकारला आहे. हवामानबदलाचा परिणाम आता जगभरात दिसून येत आहे. भविष्यात त्याचा सर्वात वाईट परिणाम आशियाई देशांवर होणार आहे. आशियामध्ये उबदार दिवस वाढू शकतात किंवा हिवाळ्याच्या दिवसांची संख्या वाढू शकते. अचानक मुसळधार पाऊस किंवा अचानक ढगफुटीच्या घटना घडू शकतात. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात.

या सर्व बदलांचा परिणाम केवळ परिसंस्थेवरच होणार नाही, तर मानवासह सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या जीवनावरही होईल. त्यामुळे वेळीच जागरूक होऊन हिमालयातून उगम पावणार्‍या दहा नद्या कोरड्या पडण्याचा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नद्यांच्या अस्तित्वावरचे संकट अधिक गडद होत आहे. अवैध उत्खननामुळे नद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मशिनने खाणकाम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या प्रमुख नद्या उन्हाळ्यात नाल्यांसारख्या दिसतात. पावसाळ्यातच या नद्या पूर्ण स्वरूपात दिसतात. एके काळी या नद्या जीवनवाहिनी होत्या. यंदा तर उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा ४० अंशांच्या जवळ पोहोचला. यमुनेसह अनेक नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली. काल्पी येथील रहिवाशांनी सांगितले की, पूर्वी यमुना नदीचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध होते; मात्र सध्या घाण आणि गढूळ पाणी वाहत आहे. केंद्रीय जल आयोगाच्या काल्पी केंद्राचे प्रभारी रुपेशकुमार यांनी सांगितले की, यमुना नदीच्या पाण्याची पातळी ऑगस्ट महिन्यात ११२ मीटरच्या पुढे गेली होती; मात्र २२ मार्च रोजी ती ९५ मीटरपर्यंत खाली आली. प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध विहारी घाटात यमुना नदीचे पाणी ३०० मीटर दूर गेले आहे. कानपूर देहाटमध्ये अनधिकृत खाणकामामुळे यमुना नदीच्या पाण्याचा प्रवाह अनिश्चित झाला आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्यात अशी परिस्थिती राहिल्यास मे-जूनमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होते. यमुनेच्या पाणीपातळीत घट झाल्यामुळे मैनुपूर, मंगरूळ, हिरापूर, देवकाली, मदारपूर आदी गावांमधील शेतकर्‍यांच्या पिकांना फटका बसू शकतो.

वाढत्या उष्णतेमुळे यंदा भारतातील काकडी, टरबूज, भाजीपाला आदींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे किनारी भागातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. जनावरांची तहान भागवण्यासाठी, तसेच आंघोळ, कपडे धुणे यासाठी लोक नदीवर अवलंबून असतात. नदीचे पात्र रिकामे झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गुरे कशी जगवायची, हा या काळात मोठा प्रश्न बनतो आहे.

logo
marathi.freepressjournal.in