गोल्डी लॅारेन्स गॅंगचा उच्छाद !

ज्या गँगनं हे सारं हत्याकांड घडवलं, त्यासाठीची योजना आखली ती सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरची आहे
गोल्डी लॅारेन्स गॅंगचा उच्छाद !

राज्यसभा निवडणुकांचा देशभरातला खेळ, त्याचबरोबर भाजपच्या प्रवक्त्यांचा वाचाळपणा आणि त्याविरोधात इस्लामी राष्ट्रांमधून उठलेला गदारोळ! हा गोंधळ सुरू असताना भारतातल्या गुन्हेगारी जगतात धडकी भरवणारा प्रकार उघडकीस आलाय. दाऊद, सलीम, छोटा शकील, छोटा राजन यांच्या टोळ्यांपासून पुण्या-मुंबईतल्या छोट्या-मोठ्या टोळ्या पाहिल्यात; पण ही गँग काही विचित्रच आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला या सेलिब्रिटीची ज्याप्रकारे हत्या केली, तो अत्यंत भयानक निर्घृण प्रकार होता! ‘‘मैं तेरे सर पे गोली मारुंगा.., ये मेरा वादा रहा.., तब तुम्हे पता चलेगा..!’’ अशी खुलेआम धमकी देऊन ज्याप्रकारे गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्यानं थरकाप उडायला झालं; पण त्याहून अधिक भयानक म्हणजे ज्या गँगनं हे सारं हत्याकांड घडवलं, त्यासाठीची योजना आखली ती सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरची आहे.

पाकिस्तानात बसून दाऊद इब्राहिम जे काही घडवतो ते किरकोळ वाटावं असे अनेक गुन्हे कॅनडातून गोल्डी ब्रार नावाच्या गुंडानं घडवले आहेत. पंजाबी गायक आणि काँग्रेस कार्यकर्ता सिद्धू मुसेवाला याची सांगून हत्या करण्यात आलीय. गोल्डी ब्रारच्या गँगची भारतातली सूत्रं लॉरेन्स बिष्णोई चालवतो. त्याच्या या गँगमध्ये ७०० हून अधिक शार्पशूटर्स आहेत. त्या गँगकडं अत्याधुनिक शस्त्रं, हत्यारं आहेत. खुंखार समजली जाणारी केवळ एके ५६ नाही, एके ५७ च नाही तर एके ९४ असॉल्ट रायफल सारखी आधुनिक हत्यारं आहेत. यात आणखी एक भयानक बाब ही की, ज्याची हत्या केली जातेय, त्याची ‘लाईव्ह कॉमेंट्री’ सोशल मीडियावरून केली जाते. फेसबुकवर त्याची दृश्यं प्रसारित केली जातात. यांचं फेसबुक अकाउंट धुंडाळलं तर आढळून येईल की, हे गुंड बेधडकपणे हत्येची धमकी देताहेत. यूट्युब, फेसबुकवर बिनधास्तपणे सांगितलं जातं की, आम्ही अमक्याला यादिवशी, यावेळी मारणार आहोत आणि त्यावेळी त्याची हत्या केली जाते. मुसेवाला यालाही अशीच हत्येची धमकी देण्यात आली होती आणि ती प्रत्यक्षात आणली. हे सारं फेसबुकवर दाखवलं गेलं. अगदी लाईव्ह..!

प्रश्न असा पडतो की, हे सारं सोशल मीडियावर प्रसारित होत असताना पोलीस कुठं आहेत? इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं? गुप्तचर खातं कुठं हरवलं होतं? सायबर क्राईम शोधणारं खातं कुठं विसावलं होतं.

अशा या हत्याकांडाचं नियोजन आणि अंमल हे सारं जेलमधून होतं आणि त्याचं संचलन लॉरेन्स करतो. एकेकाळी भव्य सांस्कृतिक वारसा आणि शूर पराक्रमी वीरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या भूमीत गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाची विक्री आणि विदेशातून आलेल्या पैशाची रेलचेल सुरू झाल्यापासून तरुण पिढी बिघडू लागली. महागड्या कार-जीपमधून चंडिगढ-अमृतसरच्या कॉलेज-खास करून गर्ल्स कॉलेजबाहेर रुबाब दाखवणाऱ्या तरुणांची दृश्यं नित्याचीच आहेत. २०१६ मध्ये आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात ड्रगच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमधल्या युवा पिढीचं वास्तववादी चित्रण करण्यात आलं होतं. तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रातलं ग्लॅमर खुणावत असतं. याचपायी पुणे जिल्ह्यातले दोघे तरुण या गँगकडे आकर्षिले गेले. त्याची नुकतीच धरपकड झालीय. संतोष जाधव आणि सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ अशी दोघा शूटर्सची नावं आहेत. मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तीन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते.

पंजाबमधल्या सुस्थित कुटुंबातला सुशिक्षित गोल्डी ब्रार आपल्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, यासाठी नोकरीच्या शोधात कॅनडात गेला. तिथं त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. तो ड्रग माफियांच्या हाती सापडला आणि फसला. आज तो ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ करतोय. त्याचाच एक साथीदार लॉरेन्स बिष्णोई ज्याचं नाव पोलीस आणि मीडियामध्ये आज गाजतंय.

शिकली सवरलेली; पण वाईट मार्गाला लागलेली ही मुलं सोशल मीडिया सर्रास वापरतात. यूट्युब, फेसबुक पोस्ट करतात, बंदूक चालवताना, पिस्तूल हाताळताना, गोळ्या झाडताना, ड्रॉईंगरूममध्ये बसले असताना, बागेत फिरताना, गुन्हे घडवताना, एखाद्याचा मुडदा पडताना अशा अनेक प्रकारची ही व्हिज्युअल्स आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात. केवळ मौजेखातर ते करत नाहीत तर ते जी हिंसा करतात, गुन्हे करतात ते दहशत निर्माण करण्यासाठी! हे गँगस्टर्स या कारवाया कधी, केव्हा, कुठं करणार हे ते सांगतात. गोळ्या घालून ठार मारतानाचे फुटेज ते फेसबुक, यूट्युबवर पोस्ट करतात. मग त्या गुन्ह्याची जबाबदारीही घेतात. आव्हानही देतात. ही लाईव्ह कॉमेंट्री आहे गुन्ह्यांची! प्रधानमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या तोंडून एक नाव ऐकलं असेल, मुख्तार अन्सारी, अतिक अहमद..! त्यांच्या दृष्टीनं हे देशातले सर्वात मोठे माफिया आहेत. योगीजींनी यांच्यावर बुलडोझर चालवलेत. अशा हाय प्रोफाइल गँगमध्येही ३०-४० हून अधिक शार्पशूटर्स नाहीत; पण गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमध्ये ७००...हो, हो ७००हून अधिक शार्पशूटर्स आहेत. हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं म्हणणं आहे.

सिद्धू मुसेवाला लोकप्रिय होता; पण तो चंडिगढ वा मुंबईला गेला नाही. पंजाबातले तरुण अमेरिका, कॅनडाला जाण्यासाठी धडपड करत असतात; परंतु सिद्धू कॅनडातून परत येऊन आपल्या गावात शेती करत होता. सर्वाधिक टॅक्स भरणारा युवा शेतकरी सिद्धू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सिस्टीम विरोधात लढत होता. लॉरेन्स बिष्णोई आपल्या फेसबुकवर लिहितो, ‘जब तक हमारा नाम रहेगा, तब तक कांड होते रहेंगे...!’ २१ फेब्रुवारी २२ला, यांचा आणखी एक गँगस्टर, साथीदार काला जठेरी हाही कुख्यात गुंड आहे, त्यानं ३०हून अधिक खून केले आहेत. तो लिहितो, ‘जो हमारे खिलाफ हैं, वोह अपना ख्याल रखे। क्यूँकी गोलिया कहीसे भी बरस सकती हैं।’ यासोबत त्यानं आपल्या काही साथीदारांचे फोटो टाकलेत, नावं लिहिलीत. कोणकोणते गुन्हे केलेत त्याचे फुटेज टाकलेत. काला राणा हा आणखी एक गँगचा सदस्य असलेला शार्पशूटर फेसबुकवर लिहितोय, ‘हर जखम गहरे देंगे, तुम थोडा सब्र तो करो..!’ एके ठिकाणी तो लिहितो, ‘जिंदगी तो खुदके दमपर जी जाती हैं।’ समाजमाध्यमावर अशाप्रकारे लिहित कुणाच्या हत्येबाबत बोलणं, त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणं आणि त्याची जबाबदारी स्वीकारणं. हे अगदी सहजरीत्या होतं.

नॅशनल इन्व्हेस्टिकेशन एजन्सी-एनआयए ही तपास यंत्रणा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेकी कारवाया, गुन्हेगारी, हत्यारं, ड्रग वाहतूक तपासाचं काम करते. आंतरराज्य गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी वेगळ्या पोलिसी इन्फ्रास्ट्रक्चर गरज आहे. ती निर्माण करून त्यांच्याकडं हे गुन्हे सोपवले जायला हवेत. राज्यातले पोलीस, एसआयटी यांच्या क्षमतेच्या बाहेर या गँगच्या कारवाया आहेत. ७००हून अधिक शूटर्स, मल्टिनॅशनल कंपनीसारखी गुन्हेगारी टोळी याला रोखायला हवंय. मुसेवाला याच्या हत्येचं दुःख आहेच; पण सलमान व इतर बॉलिवूडच्या ज्या लोकांना धमक्या आल्या आहेत त्यांना कडक सुरक्षा द्यायला हवीय. त्याचबरोबर या गँगच्या घडामोडीवर लक्ष ठेवायला हवंय. हे ७०० शार्पशूटर्स आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. जे कॅनडात आहेत, त्यासाठी आरसीएमपीशी बोलायला हवंय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in