शुभेच्छा शिमग्याच्या

चुलतराजेंनी रात्री झोपण्यापूर्वी आठवणीने लावलेला सकाळचा ६ वाजेचा गजर वाजतो
शुभेच्छा शिमग्याच्या

स्थळ - ‘शिवतीर्थ’ नामे ‘राज’महाल. अर्थात अनेक राजकारण्यांचं विरंगुळा शोधण्याचं आणि एका ‘राज’कारण्याचं निवासस्थान.

काळ - कोणावर तरी झडप मारण्याच्या तयारीत असलेला.

वेळ - तमाम सर्वसामान्य (पोटार्थी) लोकांच्या दृष्टीने पहाटे ६ वाजेची; पण ‘शिवतीर्थ’ नामे ‘राज’महालाच्या मालकाच्या दृष्टीने मध्यरात्रीची!

चुलतराजेंनी रात्री झोपण्यापूर्वी आठवणीने लावलेला सकाळचा ६ वाजेचा गजर वाजतो आणि चुलतराजे आपल्या मंचकावर उठून बसतात. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्कीलभाव उमटलेले आहेत. ते समोरच्या कॅलेंडरवर नजर टाकतात आणि आजची तारीख पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अजूनच मिश्कीलभाव उमटतात. ते शेजारच्या टिपॉयवर ठेवलेला मोबाइल उचलतात आणि एक नंबर डायल करतात. समोरच्या मोबाइलची कॉलरट्युन वाजू लागते.

सोचता हूँ के वो कितने मासूम थे

क्या से क्या हो गए देखते देखते

हमने पत्थर से जिनको बनाया सनम

वो खुदा हो गए देखते देखते

वो जो कहते थे बिछड़ेंगे ना हम कभी

लापता हो गए देखते देखते

कोई पूछे के हमसे ख़ता क्या हुई

क्यूँ खफ़ा हो गए देखते देखते

आते जाते थे जो साँस बन के कभी

वो हवा हो गए देखते देखते

जीने मरने की हम थे वजह और हमीं

बेवजह हो गए देखते देखते.

कॉलरट्युन संपते; पण फोन काही उचलला जात नाही. चुलतराजे परत तोच नंबर डायल करतात. यावेळी मात्र फोन उचलला जातो.

चुलतराजे - (मिश्कीलपणे) हॅलो बंधुराज, गुड मॉर्निंग.

उधोजीराजे - (वैतागाने) अरे, आमची तर आता पहाट झाली. दिवस उजाडतोय; पण एवढ्या मध्यरात्री उठून तू कसा काय फोन केलास बुवा?

चुलतराजे - (टवाळीच्या सुरात) अरे, आश्चर्य आहे बुवा. दिवस उजाडतोय? मी तर ऐकलंय की, एका माणसाचं सर्वच काळवंडून गेलंय.

उधोजीराजे - (संतापून) टिंगलटवाळी करण्यासाठी फोन केला आहेस का?

चुलतराजे - (कुत्सितपणे) टोमणे मारण्याचा ठेका का तुम्हालाच मिळाला आहे का, बीएमसीकडून, जाता जाता?

उधोजीराजे - (चिडून) लवकर बोल काय बोलायचं आहे ते. मला वेळ नाही. सकाळी ८ वाजता पोहोचायचं आहे मला.

चुलतराजे - (शांतपणे) काय पाठांतर सुरू आहे वाटतं, कोणाकडून तरी लिहून घेतलेल्या भाषणाचं, ८ वाजेसाठी; पण तुम्हाला तसं काही कठीण नाही. ते साप, विंचू, गिधाडं, गद्दार, ५० खोके, बाप चोरणारी औलाद, विष्ठा, मर्द सगळं कसं नेहमी नेहमी बोलून तोंडपाठ असेल ना?

उधोजीराजे - (आवाज चढवून) उगाच शहाणपण करू नकोस. काय बोलायचं ते लवकर बोल.

चुलतराजे - (मिश्कीलपणे) काही नाही रे, म्हटलं आपले बंधुराज काळाच्या पुढे चार पावलं चालले आहेत. शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता.

उधोजीराजे - (गोंधळून) काळाच्या पुढे चार पावलं, म्हणजे?

चुलतराजे - (शांतपणे) म्हणजे, हे बघा बंधुराज आज काय आहे?

उधोजीराजे - (चिडून) मला काय विचारतोस? मी शुद्धीवर असतो २४ तास. आज दसरा आहे. मी ‘शिवतीर्था’वर जाणार आहे, मेळावा घेण्यासाठी.

चुलतराजे - (डिवचत) अरे हो, समोरच माझं घर आहे. त्याचंही नाव ‘शिवतीर्थ’च आहे. नीट लक्ष द्या. नाहीतर जास्त गर्दी पाहून मैदानावर जाण्याऐवजी याल माझ्याच घरी.

उधोजीराजे - (रागाने) फालतू बडबड नकोय मला. ते आजच्या दसऱ्याबद्दल काय बोलत होतास?

चुलतराजे - (शांतपणे) हे बघ, दसऱ्यानंतर दिवाळी येते. दिवाळीनंतर होळी येते. होळीला समोरच्याच्या नावाने बोंबाबोंब करायची असते. शिमगा करायचा असतो ना?

उधोजीराजे - (गोंधळून) मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं. सरळ सांग ना की, चुकून सुबुद्धी झाली आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला म्हणून.

चुलतराजे - (मिश्कीलपणे) तेच तर सांगत होतो ना की, आज सगळ्यांचा दसरा आहे; पण तुम्ही सकाळी ८ वाजता ‘शिवतीर्था’वर शिमगा करणार आहात, त्यासाठी माझ्या शुभेच्छा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in