ग्राम्शी : शिक्षणातील प्रभुत्वशाली विचारसरणी

शिक्षण व्यवस्थेवर कायम समाजातील प्रभुत्वशाली वर्गाचे वर्चस्व असते, हे महत्त्वाचे सूत्र ग्राम्शी यांनी मांडले. म्हणूनच वर्गान्त करायचा असेल तर समाजातील सर्व घटकांना शासकीय खर्चाने समान शिक्षण मिळायला हवे.
ग्राम्शी : शिक्षणातील प्रभुत्वशाली विचारसरणी
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

शिक्षण व्यवस्थेवर कायम समाजातील प्रभुत्वशाली वर्गाचे वर्चस्व असते, हे महत्त्वाचे सूत्र ग्राम्शी यांनी मांडले. म्हणूनच वर्गान्त करायचा असेल तर समाजातील सर्व घटकांना शासकीय खर्चाने समान शिक्षण मिळायला हवे.

जगात तीन प्रकारच्या शासन संस्था अस्तित्वात आहेत.

  • पितृसत्ताक वर्गव्यवस्था

  • पितृसत्ताक जातवर्ग व्यवस्था

  • समाजवादी व्यवस्था

या तिन्ही व्यवस्थांचे चारित्र्य भिन्न असले, तरी प्रभुत्वाची धारणा समान आहे. सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी वर्ग आपले प्रभुत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. भौतिक व्यवस्थेवर नियंत्रण आणि सांस्कृतिक वर्चस्व या दोन्ही अंगाने सत्ताधारी क्रियाशील असतात. प्रभुत्वाचे वर्गीकरण दोन छावणीत करता येते. सत्ताधारी वर्गातील हितसंबंधाचे वर्चस्व व शोषित वर्गातील हितसंबंधाचे वर्चस्व अशा दोन छावण्या असतात. या दोन्ही छावण्यांतील संघर्ष शत्रूभावी असतो. या दोन्ही छावण्या स्व आंतरद्वंदातून विकसित होत असतात.

ग्राम्शीने प्रभुत्वाचा सिद्धांत मांडला. त्यात मुख्यत: प्रभुत्वशाली वर्ग सत्तेच्या समर्थनात जनतेची विचारसरणी व संस्कृती घडवत असतात हा मुख्य गाभा त्याच्या मांडणीत दिसतो. विचारसरणी व संस्कृती आणि भौतिक पाया एकमेकांवर प्रभाव गाजवतात व विकसित होत असतात ही महत्त्वाची मांडणी ग्राम्शीने केली. सामंती उत्पादनाची मागास साधने व पुराणमतवादी विचारसरणी ते आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक विचारसरणीपर्यंत बदल होऊनही सत्ताधारी वर्गाचे प्रभुत्व कायम आहे. हे वास्तव लक्षात घेता ग्राम्शीच्या सिद्धान्ताची महत्ता स्पष्ट होते.

जनतेला अंकित ठेवण्याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांची असते. त्यासाठी संस्कृती आणि शिक्षणाचा वापर जगभरातील सत्ताधारी करत आलेले आहेत. ग्राम्शीने शिक्षणातील प्रभुत्वशाली विचारसरणीची चर्चा केली आहे. ‘शिक्षणात प्रभुत्वशाली विचारसरणी व संस्कृतीचे वर्चस्व असते’ हा सिद्धांत त्यांनी मांडला. वर्गीय समाजरचनेचे शिक्षणाशी असलेले सहसंबंध, व्यापारीकरण, स्तरीकरण व चेतना घडवण्याची प्रक्रिया शिक्षणातून घडत असते. याची विस्तारित चर्चा करताना ग्राम्शीने हक्क आणि कर्तव्याशी संबंध जोडला. हक्क आणि कर्तव्याची जाणीव विकसित करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार त्यांनी केला. या पुरस्कारात राजकीय विचार अंतर्भूत होता. हक्क आणि कर्तव्याच्या सिद्धान्ताला दोन बाजू असतात. प्रभुत्वशाली वर्ग त्यांच्या हितसंबंधाच्या चौकटीत हक्क आणि कर्तव्याचा सिद्धान्त मांडत असतात. यातच सर्वांचे कल्याण आहे, असे ते जनतेला पटवून देतात व जनमत घडवत असतात. हक्क आणि कर्तव्याची दुसरी बाजू समता-विषमता, न्याय-अन्याय, प्रगती-अधोगती या कसोट्या लावून तपासली जाते व दुसरी बाजू मांडली जाते. हक्क कर्तव्याच्या द्वैत सिद्धान्ताचा संबंध ग्राम्शीने चेतन मनाशी जोडला. शिक्षणातून चेतना जागृत होत असते; परंतु कोणती चेतना, असा प्रश्न उपस्थित करून जाणिवेला दुहेरी अंग असते, असे त्याने अप्रत्यक्षपणे मांडले. विद्यार्थ्याची चेतना जागृत करायची म्हणजे ती ‘व्यक्तिगत’, ‘वस्तुगत’ बाब नाही. ती सामाजिक क्षेत्र व सामाजिक संबंधाचे प्रतिबिंब असते. कुटुंब, नाते-गोते, गाव, गावातील घडामोडी इत्यादींचा प्रभाव विद्यार्थ्याच्या जाणीव-नेणिवेवर होत असतो. थोडक्यात, विद्यार्थ्याचा जगण्याचा परिघ त्याचे चेतन आणि अचेतन मन घडवत असतो. विद्यार्थी ज्या वर्गातून आला असेल त्या वर्गचेतनेचे प्रभुत्व विद्यार्थ्यावर असते. विद्यार्थी त्याच्या अनुभवाचे संचित घेऊन शाळेत आलेला असतो. वर्गखोलीत विद्यार्थ्याची चेतना, अनुभव समजून घेतले जात नाही. उलट बहुसंख्य विद्यार्थ्याच्या अनुभव विरोधी प्रक्रिया वर्गखोलीत घडत असते. वर्गखोली घडवू पाहत असलेली चेतना आणि विद्यार्थ्याला परिचित असलेली चेतना भिन्न असते. परस्परविरोधी असते. ही भिन्नता म्हणजे परस्परविरोधी विचारसरणी होय. ग्राम्शी ती वर्गीय किंवा वर्गांतवादी असते, असे म्हणतो.

इटलीचे उदाहरण देऊन वर्गीय संरचना शाळेत कशी काम करते ते ग्राम्शीने मांडले. स्तरीकरणात विशेषत्व व भेदतत्त्व अंतर्भूत असतात. शाळांच्या भौतिक रचनेत आणि शिक्षण आशयात स्तरीकरण अस्तित्वात आणले जाते. हे इटलीच्या शिक्षण क्षेत्राचे उदाहरण देऊन त्याने स्पष्ट केले. इटलीच्या शिक्षण क्षेत्रात शास्त्रीय आणि व्यावसायिक विद्यालये असे दोन भिन्न प्रकार होते. हे मुख्य विभाजन होते. प्रभुत्वशाली वर्गरचनेचे हे विभाजन होते, असे ग्राम्शी म्हणतो. या मूलभूत विभाजनातून विद्यार्थी केवळ दोन भिन्न शाळांमध्ये विभागले जात नव्हते, तर भौतिक लाभ व सांस्कृतिक संपन्नता यातही विद्यार्थ्यांची विभागणी होत होती. शास्त्रीय विद्यालय प्रभुत्वशाली वर्गाचे बुद्धिजीवी तयार करण्यासाठी आणि व्यावसायिक विद्यालय उत्पादन कौशल्य विकसित करण्यासाठी आकाराला आणले होते, असे निरीक्षण ग्राम्शीने नोंदवले. ज्ञान आणि कौशल्य या भिन्न बाबी आहेत. कौशल्यातून उत्पादन घडवता येऊ शकते; परंतु त्या उत्पादनातील व्यापक ज्ञान आत्मसात होतेच असे नाही. उत्पादक ज्ञानात विज्ञान, तंत्रज्ञान, मालाची मागणी व वितरण, बाजार यंत्रणा, साठवणूक व्यवस्था, संस्कृती, उत्पादन वितरणाशी संबंधित समाजकारण व राजकारण याचा समावेश असतो. असा समग्र विचार टाळून कौशल्य शिक्षणाची रचना आखली जाते. या रचनेमुळे श्रमिकांना धोरणकर्ते होण्यापासून रोखले जाते. भारतातील शिक्षण व्यवस्थासुद्धा याला अपवाद नाही. आताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने हीच भूमिका घेतली आहे.

विशेषत्व व भेदतत्त्वावर आधारित वर्गीय शिक्षण व्यवस्था नाकारून ग्राम्शीने वर्गांतवादी शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यांनी प्रचलित शिक्षण व्यवस्थेची ऐतिहासिक चिकित्सा केली. शिक्षणाचा ऐतिहासिक भौतिकवाद द्वंदात्मक असून समाज विकासाच्या द्वंदात्मक इतिहासाचा तो भाग होता हे लक्षात घेऊन शिक्षणाचे सिद्धान्त त्यांनी मांडले. सामाजिक चरित्र घडवणारी, जीवन शिक्षण देणारी, एकस्तरीय शाळा पद्धती (समान शाळा पद्धती) तसेच हितनिरपेक्ष, रचनात्मक अशा सार्वजनिक (शासकीय खर्चावर आधारित) शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार ग्राम्शीने केला. ग्राम्शीच्या शिक्षण चिंतनाची संगती वर्गांताशी जोडलेली आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊन वर्गविहीन समाजनिर्मितीसाठी शिक्षण आशयाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा ते करतात. शासकीय खर्चाने चालवली जाणारी एकस्तरीय शाळा पद्धती (समान शाळा पद्धती) विशेषत्व व भेदतत्त्व नष्ट करते. शिक्षणातील समान भौतिक वाटा मिळण्याची रचना उभी करते. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करण्यासाठी विनामूल्य समान शिक्षण पद्धती आवश्यक असते. त्याशिवाय सार्वत्रिकीकरण साध्य करता येत नाही. समाजवादात समान भौतिक वाटा व व्यक्तीची प्रतिष्ठा अंतर्भूत असते. हे उद्दिष्ट समान शाळा पद्धतीतून साध्य होऊ शकते.

ग्राम्शीच्या चिंतनाचा दुसरा महत्त्वाचा भाग शिक्षण आशयाशी संबंधित आहे. वर्गांताची चेतना, आकलन व विचारसरणी या बाबी संस्कृती शिक्षणातून घडवण्याचा विचार त्यांनी मांडला. सामाजिक चरित्र, रचनात्मक आणि जीवन शिक्षण यातून वर्गांतवादी चेतना घडवण्याचे संकेत त्यांनी दिले. नवी चेतना संस्कृती रुजवताना दुहेरी आव्हान असते. प्रचलित व्यवस्थेच्या धारणेची चिकित्सा व नवा पर्याय उपलब्ध करणे हे एक आव्हान असते. तसेच विद्यार्थ्याच्या जीवनात, त्याच्या जगण्याच्या परिघात विषमतामूलक व कालबाह्य अशा अनेक धारणा कार्यरत असतात. त्यांची कारणमीमांसा करणे, त्यांचे सैद्धान्तीकीकरण करणे, राजकीय व सामाजिक चेतना जागृत करणे आवश्यक असल्याचे ग्राम्शींनी मांडले.

व्यापक समाजव्यवस्थेचा भाग म्हणून शिक्षण व्यवस्था काम करते, हे महत्त्वाचे सूत्र ग्राम्शीच्या शिक्षण चिंतनात होते. ग्राम्शींनी वर्गीय समाज रचनेचा अभ्यास केला असल्यामुळे शिक्षणाची चिकित्सा व पर्याय वर्ग चौकटीत येणे स्वाभाविक आहे. व्यापक समाजव्यवस्थेशी जोडून शिक्षण व्यवस्थेचा केलेला विचार महत्त्वाचा आहे. कुठल्याही समाज व्यवस्थेतील शिक्षण व्यवस्था समजून घेण्यासाठी हे सूत्र उपयोगी पडते.

शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक

rameshbijekar2@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in