'मुली'च्या बलात्काऱ्यांनाही गुजरात सरकारची सहानुभूती

घटनेतील आरोपीनाही मुक्त केले जाते यावरून गुजरातमधील सत्ताधारी किती निबर आणि निर्लज्ज झाले आहेत हे दिसून येते.
'मुली'च्या बलात्काऱ्यांनाही गुजरात सरकारची सहानुभूती

गुजरातच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व अकरा आरोपींना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. गुजरातमधील भाजप सरकारच्या शिक्षा माफ करण्याच्या धोरणाअंतर्गत सर्व आरोपींना सोडण्यात आले. सत्तेवरचे लोक किती निर्लज्ज पातळीवर उतरू शकतात याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येते. देशाच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाण्या समजल्या जाणाऱ्या घटनेतील आरोपीनाही मुक्त केले जाते यावरून गुजरातमधील सत्ताधारी किती निबर आणि निर्लज्ज झाले आहेत हे दिसून येते. गुजरात सरकारच्या या निर्णयाचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी हे मूळ प्रकरण समजून घेणे आवश्यक आहे.

प्रकरण २००२ सालातले आहे. गोध्रा येथे ट्रेनला आग लागल्यानंतरचा दुसरा दिवस होता. बिल्किस बानो स्वयंपाकघरात दुपारचं जेवण बनवत होत्या. तेवढ्यात त्यांची काकू आणि त्यांची मुलं धावत आले. त्यांचं घर जाळलं आहे आणि आता सगळ्यांनी इथून पळून जायला हवं, असं ते ओरडून सांगत होते. क्षणाचाही विलंब न लावता आहे त्या स्थितीत सगळे जिवाच्या आकांतानं घराबाहेर पडले आणि पळत सुटले. बिल्किसबानो आणि त्यांच्या कुटुंबातले १७ स्त्री-पुरुष होते. त्यांची दोन वर्षांची मुलगी सोहेलाही कडेवर होती. सगळ्यांनी गावच्या सरपंचाच्या घराकडं धाव घेतली, मात्र जमावानं सरपंचालाही धमकी दिल्यामुळं गाव सोडण्यावाचून त्यांच्यापुढं पर्याय नव्हता. पुढचे काही दिवस ते वनवाशासारखे गावोगावी भटकत होते. कधी मशिदीमध्ये, तर कधी ओळखीच्या हिंदू कुटुंबाकडं आसरा घेत होते. तीन मार्च २००२ रोजी सकाळी हे सगळेजण शेजारच्या गावाकडे निघाले असताना पाठोपाठ दोन जीप भरून माणसं आली आणि त्यांनी तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला. बिल्किस बानो यांच्याकडून लहानग्या मुलीला खेचून घेऊन जमिनीवर आपटलं. बिल्किस बानोनी पाहिलं, हल्ला करणारे कुणी अनोळखी नव्हते, तर गावातलेच होते. वर्षानुवर्षे एका गावात राहणारे होते. परंतु त्यांच्या डोक्यावर धर्माचं पिशाच्च स्वार झालं होतं. त्यांनी बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिल्किसची एक बहीण ओली बाळंतीण होती, तिच्यावरही बलात्कार करून तिच्या नवजात बाळाची हत्या करण्यात आली. सगळ्यांना ठार केलं. बिल्किस बानो बेशुद्ध पडल्याने त्या मेल्या आहेत, असं समजून जमाव निघून गेला. दोन-तीन तासांनी बिल्किस शुद्धीवर आल्या. तेव्हा त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. अवती भवती मृतदेहांचा ढिगारा होता. वेदना होत असतानाही उठून त्यांनी जवळच्या डोंगरातील गुहेत आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी तहान लागल्याने खाली उतरुन एका वस्तीवर गेल्या. गावकऱ्यांनी मदत केली. कपडे दिले. पाणी दिलं. गावकरी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना गोध्रा कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं. जवळपास पंधरा दिवसांनंतर बिल्किस यांचे पती याकूब आणि भाऊ त्यांना शोधत कॅम्पमध्ये पोहोचले. पुढचे चार-पाच महिने ते तिथेच होते. त्यानंतर बिल्किस यांचा न्यायासाठीचा लढा सुरू झाला. या दरम्यान, त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या, डॉक्टरांनी तर बिल्किसवर बलात्कारच झाला नसल्याचा अहवाल दिला. अखेर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर २००४ साली पहिली अटक झाली. आणि त्यानंतर सतरा वर्षांनी त्यांना न्याय मिळाला. अनेकांनी बिल्किस बानो आणि त्यांच्या पतीला ही अंतहीन लढाई बाजूला ठेवून आधी पोटापाण्याचं बघा, असा सल्ला दिला. परंतु आयुष्यातील स्थैर्यापेक्षा न्यायासाठीची लढाई महत्त्वाची आहे, असं दोघांनाही वाटायचं. त्यामुळेच ते न्यायासाठी संघर्ष करत राहिले.

गुजरातमधील गोध्रानंतरच्या २००२ मधील हिंसाचारामध्ये सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या बिल्किस बानो यांना राज्य सरकारनं ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश एप्रिल २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं दिले. त्याशिवाय बिल्किस बानो यांना नियमानुसार घर आणि सरकारी नोकरीही देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यापूर्वी गुजरात सरकारनं बिल्किस बानो यांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही रक्कम दसपट वाढवून ५० लाख केली. या निकालानंतर बिल्किस बानो यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती खूप महत्त्वाची होती.

‘सुप्रीम कोर्टानं मला न्याय दिला आहे. मी समाधानी आहे. कोर्टानं माझ्या वेदना, माझं दुःख आणि माझा लढा समजून घेतला आणि मला न्याय दिला’, अशा शब्दात त्यांनी निकालानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या आदेशाचा उल्लेख करून त्यांनी, नुकसान भरपाईचे पैसे मी माझ्या मुलांचं शिक्षण आणि त्यांना स्थिर आयुष्य मिळावं, यासाठी खर्च करणार असल्याचं सांगितलं. शिवाय यातला काही निधी दंगल पीडितांसाठी खर्च करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. १७ वर्षं मी माझ्या सदसदविवेकावर, राज्यघटनेवर आणि न्यायपालिकेवर विश्वास ठेवला आणि सुप्रीम कोर्टानं मला साथ दिली. २००२च्या दंगलीनं माझे नागरी अधिकार हिरावून घेतले होते, ते सुप्रीम कोर्टानं मला पुन्हा बहाल केले असल्याची भावनाही बिल्किस बानो यांनी व्यक्त केली होती. भारतीय न्यायव्यवस्थेवर एवढा गाढ विश्वास व्यक्त केलेल्या बिल्किस बानो यांना जेव्हा बलात्कारातील आरोपीना सरकारने सोडल्याचे कळले असेल तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करता येणार नाही.

गोध्रा येथे कारसेवकांच्या रेल्वे बोगीला आग लावण्याच्या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. अनेक ठिकाणी अल्पसंख्य समाजाच्या लोकांची अक्षरश: कत्तल करण्यात आली. त्यांची घरे जाळण्यात आली. महिलांवर बलात्कार करण्यात आले. सत्ता आणि सरकारी यंत्रणेच्या पाठिंब्यावर अनेक आठवडे हा नंगानाच सुरू होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका भीषण घटनेचे एकेक पान नंतरच्या काळात उलगडत गेले. बिल्किस बानो प्रकरण हे त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे पान म्हणून ओळखले जाते. गोध्रानंतरच्या या हिंसाचारादरम्यान अहमदाबादच्या रंधिकपूर येथे १७ लोकांनी बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. त्या वेळी सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हल्लेखोरांचे क्रौर्य इथपर्यंतच सीमित राहिले नाही, तर बिल्किस बानो यांच्या दोन वर्षांच्या मुलीलाही ठार करण्यात आले. या हल्ल्यात बिल्किस बानो यांच्या कुटुंबातील एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी बिल्किस बानो १९ वर्षांच्या होत्या. बिल्किस बानोही मरण पावल्या म्हणून हल्लेखोर त्यांना सोडून गेले होते. परंतु सुदैवाने त्या जिवंत होत्या. अनेकांच्या मदतीने त्यांनी आपला न्यायासाठीचा लढाई सुमारे सतरा वर्षे जिवंत ठेवला. त्याची निष्पत्ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल. परंतु गुजरात सरकारने उलटा न्याय करून आपली मनोवृत्ती दाखवली आहे.

बलात्काराच्या घटनेमुळं बिल्किस बानो आणि पती याकूब या दोघांचंही आयुष्य बदलून गेलं. सतरा वर्षे जिवाच्या भीतीनं त्यांना वणवण भटकावं लागलं. ओळख लपवून राहावं लागलं. वीसहून जास्त घरं बदलावी लागली. या काळात त्यांना कधीही आपल्या गावी परत जाता आलं नाही. कुटुंबीयांशी, नातलगांशी संपर्क ठेवता आला नाही. नातेवाईकांच्या कोणत्याही मंगल कार्यात, लग्नसमारंभात सहभागी होता आलं नाही. बिल्कीस बानोला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मात्र, त्यांनाही या परिस्थितीचे चटके सहन करावे लागले. आपण बिल्किस बानोची मुलं आहोत, ही ओळख त्यांना कुठं सांगता आली नाही.

‘मी गुजराती आहे, गुजरातमध्येच माझा जन्म झाला. मी गुजरातची मुलगी आहे.' अशा शब्दात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बिल्किस बानो यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु धार्मिक विद्वेषाचे विष डोक्यात भिनलेल्या गुजरात सरकारने मात्र आपल्या या मुलीवर अन्याय केला असेच म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in