
मत आमचेही
ॲड. श्रीनिवास बिक्कड
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राची स्थापना झाली. मात्र आजच्या नेत्यांनी ‘जय गुजरात’ घोषणेद्वारे महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका निर्माण केला आहे. सत्तेसाठी इतिहास, संस्कृती व स्वाभिमानाचा अपमान होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषावार प्रांतरचना झाली. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ उभी राहिली. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र मिळवण्यासाठी १९५६ ते १९६० या काळात प्रचंड आंदोलन झाले. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. त्या क्षणापासून ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेचा गजर अखंडपणे सुरू आहे. ही केवळ घोषणा नाही, ती मातृभूमीच्या अभिमानाची आणि हुतात्म्यांच्या स्मरणाची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, मराठी माणसाच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाच्या संघर्षाची साक्ष आहे. ‘जय महाराष्ट्र’ म्हणणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, संघर्ष आणि स्वाभिमानाला नमन करणं होय. पण आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पावनभूमीवर ‘जय गुजरात’च्या घोषणा देत असतील तर ते स्वाभिमानी महाराष्ट्राच्या छातीत गुजरातचा खंजीर खुपसत आहेत, असेच म्हणावे लागेल.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ‘जय गुजरात’?
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या या मातीला, मराठी माणसाला स्वाभिमानाचा साज चढवला. त्यांच्या शिकवणीवर चालणारा महाराष्ट्र कधीही परकीय आक्रमणासमोर झुकला नाही. हा महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास आहे. भाषावार प्रांतरचना होत असताना मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा मोरारजी देसाई यांचा डाव याच महाराष्ट्राने हाणून पाडला. मुंबई आणि महाराष्ट्र एक असतील, हे ठामपणे सांगणारा हा भूभाग आजही ‘जय गुजरात’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या गुलामीला स्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेला धडा शिकवण्यासाठी आणि लुटून गेलेली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी सुरतेवर स्वारी केली होती. सत्ताधीशांचे अभय मिळवण्यासाठी त्याच सुरतेत जाऊन बसलेल्या लोकांना इतिहासाचे विस्मरण झाले आहे. ‘जय गुजरात’ म्हणणं हे शिवरायांच्या परंपरेशी बेईमानी करणं आहे. सत्तेच्या स्वार्थापोटी इतिहासाची उलथापालथ करून महाराष्ट्राच्या अस्मितेची बोली लावण्याचे पाप आहे.
यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आणि शिंदेंचा मार्ग
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा स्वतंत्र विचार, स्वाभिमान आणि विकासाचा मार्ग आखला. त्यांच्या काळापासून महाराष्ट्र हे राज्य राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रणी राज्य म्हणून ओळखले जाते. ते दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, तरी त्यांच्या कृतीतून महाराष्ट्राची मान आणि शान कुठेही झुकवली नाही. उलट हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, अशी प्रशंसा झाली. त्यांच्या देशपातळीवरील कार्याने महाराष्ट्राची मान उंचावली. यशवंतराव चव्हाण ज्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होते, शिंदेही त्याच सातारा जिल्ह्यातले; पण शिंदेंना कृष्णेच्या पाण्यापेक्षा नर्मदेच्या पाण्याची ‘चव’ आवडते, हे सह्याद्रीचे दुर्दैव.
गुजराती उपकारांपुढे झुकलेले
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘तुमच्या समोर आमचे शीर झुकते’ असे म्हणत ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. ही फक्त घोषणा नसून, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या विचारधारेची आणि मोदी-शहा या गुजराती नेत्यांच्या प्रति त्यांच्या मनात असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. शिंदेंना शिवसेना फोडण्यासाठी ज्यांनी बळ दिलं, बेईमानीचे बक्षीस म्हणून ज्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं, त्या नेत्यांना खुश करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व शिंदे करत आहेत. ते या नेत्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली इतके दबले आहेत की या उपकाराची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्राचा बळी द्यायलाही ते अजिबात मागे-पुढे पाहणार नाहीत, हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे.
शिंदेंच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कार्यकाळात वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस यासारखे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. हे प्रकल्प महाराष्ट्रातच होणार होते, स्थानिक पातळीवर त्यासाठी जमीन आणि धोरण तयार होते, पण दिल्लीश्वरांच्या आदेशाने हे प्रकल्प गुजरातकडे वळवले गेले. त्यावेळी मोदीजी महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देतील, असे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. तो मोठा प्रकल्प कुठे अडकला आहे, याकडे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण आणि लघुउद्योग डोळे लावून बसले आहेत. पण याबाबतची माहिती महाराष्ट्राला देण्याऐवजी शिंदे आणि त्यांचे सहकारी ‘गुजरात पाकिस्तानात आहे का?’ असे प्रश्न विचारून राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात.
बाळासाहेबांच्या शिकवणीला हरताळ!
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना हरताळ फासला, अशी आवई उठवून शिंदेंनी शिवसेना फोडली. आमदारांना घेऊन ते गुजरातमध्ये पळाले. तिथून गुवाहाटीला गेले, मग महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवले. शिवसेना फोडण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना शिंदे सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन आपण त्यांच्या विचारांवर वाटचाल करतो, असे म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणसांच्या हक्कांसाठी काढली होती. याचाही विसर एकनाथ शिंदेंना पडला आहे. शिंदेंनी फक्त आपल्यावरील बेईमानीचा डाग धुण्यासाठीच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर केला. त्यांची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारांशी नाही, त्यांना संरक्षण देणाऱ्या केंद्रात सत्तेवर असलेल्या गुजराती सत्ताधाऱ्यांशी आहे, हे महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांपासून पाहत आहे.
महाराष्ट्रावर वाईट वेळ
महाराष्ट्रातील सत्ताधारी कायम दिल्लीच्या आदेशाकडे आणि हालचालींकडे डोळे आणि कान लावून बसलेले असतात. स्वयंकर्तृत्वाने नाही, तर दिल्लीच्या मेहेरबानीने आपल्याला सत्ता आणि पदे मिळाली आहेत, याची कल्पना त्यांना असल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांपेक्षा दिल्लीतल्या हालचालींकडे त्यांचे जास्त लक्ष असते. महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगाराची गरज आहे, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, मराठवाड्याला पाण्याची गरज आहे आणि विदर्भाला गुंतवणुकीची, रोजगार देणाऱ्या उद्योगांची गरज आहे. यासाठी काम करण्याऐवजी दिल्लीच्या आदेशाने बुलेट ट्रेन आणि शक्तिपीठ महामार्गासारखे कोणतीही मागणी आणि आवश्यकता नसलेले प्रकल्प महाराष्ट्रावर लादले जात आहेत. याचा महाराष्ट्राला फायदा होईल की नाही, माहिती नाही, पण नुकसान मात्र नक्की होणार आहे. इथला शेतकरी भूमिहीन होणार आहे. आज समृद्ध असणारा शेतकरी उद्या मजूर होणार आहे. याची सत्ताधाऱ्यांना चिंता नाही, हे भीतीदायक आहे.
देशाला दिशा देणारा महाराष्ट्र
महाराष्ट्र म्हणजे केवळ एक राज्य नाही, तर तो विचारांचा दीपस्तंभ आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला, महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आणि समतेचा प्रकाश दिला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले, राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया घातला. लोकमान्य टिळकांच्या प्रखर देशभक्तीने स्वातंत्र्यलढ्याला बळ दिलं. महाराष्ट्राने देशाला समता, न्याय, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता आणि प्रगतीची मूल्ये दिली. कृषीपासून उद्योगांपर्यंत, साहित्यापासून विज्ञानापर्यंत, सांस्कृतिक वारशापासून सामाजिक सुधारणांपर्यंत महाराष्ट्राने नेहमीच भारताला दिशा दाखवली आहे. आजही महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. काही सत्तालोलुप पुढाऱ्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्राचे हे मोठेपण कमी करण्याचा प्रयत्न केला, तरी तमाम मराठीजनांना ते जपावे लागणार आहे. जय महाराष्ट्र!
- माध्यम समन्वयक,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी