रेवण्णांच्या निमित्ताने नवी शोषणगाथा

व्हाइट कॉलर पिता-पुत्र, असहाय्य मुली आणि अनेक अश्लील व्हिडीओ असलेला पेनड्राइव्ह. देशात खळबळ माजवणाऱ्या या कथेचे खलनायक आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा.
File Photo
File PhotoANI

- श्रीनिवास राव

दखल

व्हाइट कॉलर पिता-पुत्र, असहाय्य मुली आणि अनेक अश्लील व्हिडीओ असलेला पेनड्राइव्ह. देशात खळबळ माजवणाऱ्या या कथेचे खलनायक आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा. असंख्य मुलींचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच अश्लील व्हिडीओ बनवून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या निमित्ताने महिलांच्या लैंगिक शोषणाची दुष्प्रवृत्ती नव्याने समोर आली आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब वादाच्या मोठ्याच भोवऱ्यात सापडले आहे. देवेगौडा यांचा मुलगा आणि नातू लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी आहेत. कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना हे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण ‘हाय प्रोफाइल’ आहे. लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या स्पष्ट झालेली नाही; परंतु सुमारे तीन हजार अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. अशा स्थितीत ही बाब समोर येताच राज्य सरकारने ‘एसआयटी’ स्थापन करून तपास सुरू केला. हा लैंगिक घोटाळा प्रकाशझोतात येताच प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रज्वल रेवण्णा हे देश सोडून पळून गेले आहेत. सध्या ते जर्मनीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडणुकीच्या मोसमात हा घृणास्पद प्रकार कसा उघडकीस आला, असा प्रश्न आता पडला आहे. ‘एसआयटी’ प्रज्वल रेवण्णा आणि त्याच्या वडिलांची चौकशी करेल, गुन्ह्याचे आरोप आणि कलमे जाणून घेईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी म्हणजे २० एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आला. कर्नाटकात २६ एप्रिल रोजी लोकसभेच्या १४ जागांसाठी मतदान होणार होते. पण त्याच दरम्यान हासनमधून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे संस्थापक, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हॉट्सॲपवर फिरू लागले. त्यानंतर काही वेळातच ते संपूर्ण कर्नाटकमध्ये व्हायरल झाले.

दरम्यानच्या काळात दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका झाल्या आणि तरीही रेवण्णा मत मागत राहिले. मात्र प्रज्वल यांना परिस्थिती उमगली होती. इकडे निवडणुका संपल्या आणि तिकडे रेवण्णा जर्मनीला निघून गेले; मात्र त्यांच्या विरोधी पक्षांनी हल्लाबोल सुरू केला होता. दरम्यान, रेवण्णा कुटुंबात काम करणाऱ्या एका पीडित महिलेने एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यात वडील आणि मुलाच्या गैरकृत्यांशी संबंधित अनेक स्फोटक आणि धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आले. कार्तिक गौडा हा रेवण्णा कुटुंबाचा जुना ड्रायव्हर होता. त्यांनी सुमारे १५ वर्षे रेवण्णा कुटुंबाची वाहने चालवली. हळूहळू रेवण्णासोबतचे त्यांचे संबंध बिघडू लागले. कार्तिक यांनी नोकरी सोडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, रेवण्णा कुटुंबाने त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. त्यांनी विरोध केल्यावर प्रज्वलने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाणही केली. आपल्यावर झालेल्या या अत्याचाराविरुद्ध त्याला न्याय हवा होता. रेवण्णा कुटुंबाच्या काळ्याकुट्ट कृत्यांची माहिती असल्याने त्याने वेगवेगळ्या मुलींसोबत रेवण्णाच्या अश्लील व्हिडीओंनी भरलेला पेनड्राइव्ह तयार केला. त्यांनी भाजप नेते देवराज गौडा यांची भेट घेतली. दुसरीकडे, प्रज्वल यांनी एक जून २०२३ रोजी याबाबत न्यायालयात धाव घेतली आणि व्हिडीओच्या मदतीने आपली प्रतिमा खराब केली जात असल्याचे सांगितले. हा पेनड्राइव्ह भाजप नेत्याला देण्यात आला. यानंतर न्यायालयाने कोणतेही व्हिडीओ किंवा फोटो शेअर करण्यावर बंदी घातली. माध्यमांनाही तसे करण्यास बंदी घातली होती.

न्यायालयाच्या या आदेशाला कार्तिक यांनाही उत्तर द्यायचे असल्याने त्यांनी पुन्हा देवराज गौडा यांची भेट घेतली आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून पेनड्राइव्ह परत घेतला. त्यात प्रज्वल यांचे असंख्य मुली आणि महिलांसोबतचे अश्लील व्हिडीओ होते. कार्तिक यांच्या म्हणण्यानुसार, देवराज यांनी या व्हिडीओंचे काय केले, हे त्यांना माहीत नाही. महिनाभरानंतर त्याने देवराज यांना विचारले असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. कार्तिक यांनी त्यांच्याकडून व्हिडीओची प्रत परत मागितली. देवराज यांनी हे न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगितले. देवराज वकील असण्यासोबतच भाजपचे आमदारही आहेत. कार्तिक सांगतात की, निवडणुकीपूर्वी देवराज यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांना तिकीट न देण्याची मागणी केली होती. या पत्राची प्रतही त्यांनी कार्तिक यांना दिली आणि सांगितले की, न्यायालयात न्याय मिळेल. कार्तिक सांगतात, यानंतर देवराज यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. दुसरीकडे, या प्रकरणी रेवण्णा यांचे चालक कार्तिक काहीही म्हणत असले तरी त्यांनी पेनड्राइव्हच्या काही प्रती काँग्रेस नेत्यांनाही दिल्याचे देवराज गौडा यांनी म्हटले आहे. देवराज यांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे कार्तिक यांचे म्हणणे आहे. अश्लील व्हिडीओने भरलेला पेनड्राइव्ह त्यांनी देवराज गौडा यांच्याशिवाय कोणालाही दिला नाही. एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या गैरकृत्यांचा तपास करण्यासोबतच रेवण्णाचे ते अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर कसे व्हायरल झाले, याचा तपास आता एसआयटी करणार आहे.

रेवण्णा पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. रेवण्णा कुटुंबात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने ही फिर्याद दाखल केली आहे. ही महिला रेवण्णा यांच्या पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. तिने तक्रारीत म्हटले की, रेवण्णा कुटुंबात स्वयंपाकी म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर चार महिन्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू झाले. प्रज्वल स्वयंपाकी महिलेच्या मुलीशी आक्षेपार्ह बोलत असे. २०१९ मध्ये रेवण्णा कुटुंबातील सूरज या तरुणाचे लग्न होते, तेव्हा तिला कामासाठी बोलावले होते; परंतु त्यानंतर संधी मिळायची, तेव्हा रेवण्णा तिला एकटीला आपल्या खोलीत बोलावत असे. त्या कुटुंबात आणखी सहा महिला काम करत होत्या. प्रज्वल रेवण्णा घरात आल्यावर महिला घाबरायच्या. घरात काम करणाऱ्या काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही तिला काळजी घेण्यास सांगितले होते, असे या स्वयंपाकी महिलेने सांगितले. रेवण्णाची पत्नी घरी नसताना तो तिला स्टोअर रूममध्ये बोलावून अत्याचार करत होता. किचनमध्ये काम करत असताना रेवण्णाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. प्रज्वल आपल्या मुलीला व्हिडीओ कॉल करायचा आणि तिच्याशी आक्षेपार्ह गोष्टी बोलायचा, त्यानंतर त्याच्या मुलीने त्याचा नंबर ब्लॉक केला.

सध्या महिलेच्या जबाबाच्या आधारे, होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात वडील आणि मुलगा या दोघांविरुद्ध म्हणजेच एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय किंवा अन्य काही कामानिमित्त भेटायला येणाऱ्या महिलांचा गैरफायदा घेऊन प्रज्वल त्यांच्यावर अत्याचार करत होता. या मुलींमध्ये काही जिल्हा पंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी आणि इतर अनेक सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख, कर्नाटकचे एडीजीपी बी. के. सिंह यांनी याआधी पत्रकार गौरी लंकेश आणि सामाजिक कार्यकर्ते एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या तपासाचे नेतृत्व केले होते. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या १४ जागांची निवडणूक पार पडत आहे. काँग्रेस त्याचे भांडवल करण्याची शक्यता लक्षात घेऊन धर्मनिरपेक्ष जनता दलाने प्रज्वल यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हसन जिल्हा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. मंड्याव्यतिरिक्त हसन जिल्ह्याला वोक्कालिगा या प्रभावशाली समाजाच्या शक्तीचे केंद्र मानले जाते. अर्थात वोक्कालिगा समाज दक्षिण कर्नाटकमधील इतर जिल्ह्यांमध्ये विखुरला आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णा (एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा) याच्यासाठी एच. डी. देवेगौडा यांनी हसन मतदारसंघ सोडला होता आणि त्यांनी तुमकुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आपल्या कुटुंबात संतुलन राखण्यासाठी त्यांनी असे केले होते. कारण त्यांचा दुसरा नातू निखिल कुमारस्वामी (माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींचा मुलगा) मंड्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. निखिल कुमारस्वामी आणि त्याचे आजोबा दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला. एच. डी. रेवण्णा यांनी या प्रकरणाबाबत पत्रकारांना सांगितले की आता ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे. मी ‘एसआयटी’समोर हजर होईन. जेव्हा बोलावले जाईल तेव्हा प्रज्वल हजर होईल. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. नागलक्ष्मी यांनी एक पत्र लिहिले होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या दुर्दैवी प्रकारामुळे भाजपच्या हातात आलेल्या मुद्द्यामुळे ते भविष्यात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे खच्चीकरण करू शकतात. मात्र त्याआधी काँग्रेस या प्रकरणाचा फायदा कसा उठवतो, हे आता पहायचे.

logo
marathi.freepressjournal.in