दिवाळी.. आली तशी गेली. दिवाळीतही आता काही मूड राहिला नाही पहिल्यासारखा. गावाकडं तर सारं भकास होतं. पिकं पाण्याखाली गेलेली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचलेलं. सारी दिवाळी चिखलातनं सोयाबीन आणि कुजलेली कडधान्य काढण्यात गेली. अजून मळणीचा पत्ता नाही. ऐन दिवाळीत पाऊस बरसत राहिला आणि आता गेला तर जाताना सारं रान कुजवून गेला. मळायची वाट बघत खळ्यात पडलेलं कुजलेलं सोयाबीन बघत कशी करावी दिवाळी? कसा खावा लाडू कानुला? कशी घालावीत नवी कापडं? कुणाच्या नावानं वाजवाव्यात फटाकड्या?..सारी दिवाळी वावरात गुडघाभर चिखलात गेली. बहिणीकडं पण जाता आलं नाही. रिकाम्या हातानं जावं तरी कसं? ती बिचारी कधी काय मागत नाही, पण भाऊ म्हणून आपणाला काय रितभात आहे का नाहीच? पण भावानं तरी काय करावं आता? हाताला कायच लागलं नाही यंदा. काय तरी कारणं सांगून भाव गेलेच नाहीत बहिणीकडं. भाऊबीज राहिली आवंदा.
आमचं शिरक्या एसटीत कंडक्टर. तो सांगत होता, भावबीज म्हंजे आमचा फायद्याचा दिवस. साऱ्या सालातला महत्वाचा दिवस. चार पाच दिवस प्लॅनिंग चाललवतं. भल्या पहाटंला पुण्याकडं गाड्या सोडल्या. एकामागं एक. एकामागं एक. एसट्या अजून पुण्यात पोचत्यात तवर पुण्यातनं आपल्या माणसांचं फोन यायला लागलं. गाड्या पाठवू नगा. हितं कायबी गर्दी नाय. उगाच हेलपाट्यानं मरायची गत करु नगा.
एरवी भावबीज म्हंटलं की एसटी स्टँडवर माणसांची ही गर्दी असायची. लाडू कानुल्यानं भरल्याल्या पिशव्या घेऊन माणसं बहिणीच्या गावाला जायला लागायची. गर्दी नुसती उसळायची. गाड्यावर गाड्या सोडायला लागायच्या. नाकी नऊ याचं. पहाटेपासनं ते मध्यरातीपर्यंत सगळी कंडक्टर, डायवर, झालंच तर अधिकारी माणसं खडी असायची स्टँडवर. पोत्यानं पैसा साठायचा, पर यंदा सारं सामसूमच. माणसंच नायत एसटीला. समदी भावबीज तोट्यात गेली. रिकाम्याच गाड्या पळत होत्या नुसत्या. भावांची परिस्थिती कुठाय बहिणीकडं जायची? पावसानं शेतीच नाय तर नातीगोत्यावर पण पाणी पाडलं समदं.
पयलं दिवाळी म्हंटलं का की पुण्या मुंबईची चाकरमानी माणसं गावाकडं यायची. मजा असायची. गाड्या भरुन गावात यायच्या. माणसाला माणसं भेटायची. विचारपूस व्हायची. आईला लेक भेटायचा. भावाला बहिण भेटायची. ख्यालीखुशाली समजायची. दिवाळीच्या निमित्तानं सारं गणगोत एकत्र यायचं. पहाटे उठायचं. दिस उगवायच्या आत आयाबाया साऱ्या गडी माणसाना तेलानं चोळायच्या. चुलीवर पाण्याला उकळी फुटायची. गरम गरम पाणी अंगावर पडायचं, आई तिच्या हातानं साबण लावायची. उटणं चोळायची. आयुष्यभराचा थकवा निघून जायचा. पर यंदा पोरं आलीच नाहीत मुंबईवरनं. पोटामागं कुठल्या कुठल्या मुलखात गेलेली पाखरं दिवाळीला सुध्दा घराकडं परतली नाहीत. आयाबाया दिवसातनं सतरांदा चौकटीत यायच्या, रस्त्यावर यायच्या. आपलं कुणी आलंय का बघायच्या. कुणी दिसलं नाय की परत खाल मानेनं घरात यायच्या. पोरानं तिकडनंच पैसा गुगल पे केला हिकडं. झोकात दिवाळी साजरी करा म्हणाला. आता पोरंच नायत तर दिवाळी कशी साजरी करावी हे इथं आय बा ला समजना. त्यांनी मग काहीच केलं नाय. ना नवी कापडं, ना फराळ. भर दिवाळी दिवशी म्हातारा म्हातारीनं भाकर तुकडा बांधला आन् रान गाठलं. दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाल्याल्या बातम्या झळकल्या समदीकडं पर दिवाळी साजरीच झाली नाय त्याच्या बातम्या काय कुठं आल्या नायत..
माणसं काय म्हणतील? शेजापाजारी काय म्हणतील? या लाजंकाजं बऱ्याच जणांनी गावाकडं दिवाळी केली. पर ती सारी रेडिमेड. हल्ली गावाकडं समदं रेडीमेड मिळतं. कापडापासनं ते फराळापर्यंत. फक्त प्रेमानं खाणारी माणसं तेवढी रेडीमेड मिळत नाहीत इतकंच. आज्जीला याचं लय वाईट वाटतं पण ती तरी काय करणार बिचारी? तिचं ऐकतं कोण? आज्जी म्हणायची, आरं दिवाळी याच्या आधी आमची सारी तयारी व्हायची. वीस वीस कीलूचं लाडू करायचो आमी घरात. सोताच्या सोता कळ्या पाडून. झालंच तर कानुलं घरातच करायचो. दहा बारा जणी पोळपाट लाटणं घेऊन बसायच्या की तासा दोन तासाच कानुलं तयार. चकल्या करायला तर काय मजा याची नुसती. पीठ मळण्यापासनं ते तळ्यापातूर सारी कसरत चालायची. हिची चकली चांगली का माझी.. नुसती शर्यत लागायची. रव्याचं लाडू..बेसनाचं लाडू..झालंच तर शंकरपाळ्या..चिवडा..सारं मिळून मिसळून करायचो आमी बायका. आता कशाचं काय आन् कशाचं काय? समदं इकत आणत्यात. घरच्या हाताची चव आयतं आणल्याल्याला आसती का कवा? पर बोलायचं कुणाला बाबा? खावा आता आणलंय तीच..असं म्हणत म्हातारी रुसून बसायची. यंदा तर तिनं फराळाचा एक घास बी खाल्ला नाय.
यंदा एकबी दोस्त फराळाला बोलावला नाय. आमालाबी कुणी बोलावलं नाय. फिटाफीट. दोस्त म्हंटला, मुडच नाय बोलवायला. मला बी घरचं खावना तर तुला कवा बोलवायचं..इकत आणलेला सारा फराळ तसाच पडलाय डब्यातनं. दोन दिवस पोरांनी खाल्लं आणि आता हातबी लावनात. मुलखाचं महाग आणायचं आणि हे असं टाकून द्यायचं जीवावर येतं, पर करायचं काय? आणलं खरं पर ते खायाला मुड नको का? ..पोरांना तर आता फटाकड्या उडवाय बी लाज वाटती. आमचं पिंट्या तिसरीत हाय तर ते म्हंटलं, लहान हाय का मी आता फटाक्या वाजवाय? त्यापरीस मला मोबाईल घ्या नवीन...आता काय बोलायचं?
महागाई लय वाढली दादा. परवडत नाय हल्ली सण साजरा करायला. ऋण काढून सण कवा साजरा करायचा सांगा की. म्हणून यंदा दिवाळीला जरा हात आखडताच घेतला. तसं बी, रोजच दिवाळी झाली आता माणसाची. पयलं कसं लाडू कानूलं, गोडाधोडाचं काय असंल ते दिवाळीलाच मिळायचं, पर आता तसं काय रायलं नाय. आमच्या वाडीत दोन चार बेकऱ्या झाल्यात. दिवाळीच्या फराळाचं सारं सालभर तयारच असतं बेकऱ्यातनं. लाडू पायजे? लगेच आणा. चकल्या पायजेत? लगेच मागवा. माणूस कशाला दिवाळीची वाट बघत बसल? रायली कापडं. त्याला तर मुहूर्त लागतच नाय. गावात चार पाच रेडिमेड फॅशनेबल कापडाची दुकानं सुरु झालीत. कवाबी जावा कायबी घेऊन या. सत्तर रुपयाला शर्ट, शंभर रुपयाला पँट..रोज नवं घातलं तरी बापाची बाभळ बुडत नाय.