तो ,ती आणि समाज

पुढच्या पिढीवर होणारा परिणाम, समाज रसातळाला निघालाय, कुटुंब संस्था मोडकळीस आली आहे.
तो ,ती आणि समाज

मी तुला एकेरी हाक मारू का?” त्याने तिला विचारले.

ती म्हणाली, “का तुला मला एकेरी हाक का मारायची आहे. त्याने काय बदलणार.”

तो म्हणाला, “आपलं मैत्रीचं नातं आहेच. फक्त बोलतानाची घालमेल नाहीशी होईल. थोडं मोकळेपणाने बोलता येईल.” तिने त्याला होकार दिला आणि दोघं एकमेकांशी बोलताना एकेरी उल्लेख करू लागले. अनोळखी नात्याचं मैत्रीत रूपांतर होणं ही खूपच सामान्य बाब आहे; परंतु त्याची आणि तिची मैत्री लोकांना नेहमीच गप्पांचा, चर्चेचा विषय वाटतो. त्यात जर विवाहबाह्य मैत्री असेल तर समाज जणू अस्थिरच होतो. पुढच्या पिढीवर होणारा परिणाम, समाज रसातळाला निघालाय, कुटुंब संस्था मोडकळीस आली आहे. अशा समाजात आमच्या मुलांना ठेवायचंच नाही. इतक्या टोकाच्या चर्चेला उधाण येतं. त्यातून एका निखळ मैत्रीचा द एंड होतो. स्त्री-पुरुष मैत्री कशी असावी, यापेक्षा अशा मैत्रीकडे समाजाने कसे बघावे यावरचा दृष्टिक्षेप महत्त्वाचा असावा. एकदा तो आणि ती काॅफी प्यायला हाॅटेलमधे गेले. दोघांना ओळखणारे तसे फारसे कुणी नव्हते; पण एक दोघं कुणीतरी त्याला ओळखत असावेत. हाय, हॅलो करून ते निमूटपणे गेले. नंतर मात्र खबर वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या घरापर्यंत गेली. मैत्रीच्या मर्यादेत, समाजाच्या चौकटीत दोघांचं वर्तन असूनसुद्धा निखळ मैत्रीच्या नात्याला सुरुंग लागला. प्रत्येक व्यक्तीला मैत्रीच्या नात्याची गरज असते. प्रत्येकाला असं आनंद देणारं, परस्परांना समजून घेणारं, मनातल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी जागा देणारं, आपल्या भावनांचा आदर करणारं, योग्य-अयोग्य गोष्टीची जाणीव करून देणारं, आपल्यातील क्षमता आणि कमतरता लक्षात आणून देणारं, सातत्याने आपल्या विकासासाठी, प्रगतीसाठी प्रोत्साहन देणारं नातं हवं असतं; मात्र सगळ्यांना इतकं निखलंस मैत्रीप्रेम मिळतंच असं नाही. त्यामुळे दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निव्वळ मैत्री असू शकते, यावरच लोकांचा विश्वास बसत नाही किंवा किमान तसं मान्य करत नाहीत. बालपणापासूनची मैत्री, शाळेतली मैत्री, गल्लीतली मैत्री, काॅलेजमधील मैत्री, नोकरी-व्यवसायातली मैत्री, लग्नानंतर जोडीदाराच्या मित्र-मैत्रिणींबरोबरची मैत्री, मुलांच्या आई-वडिलांसोबतची मैत्री अशी मैत्रीची यादी न संपणारी असते. प्रत्येक वेळी त्या त्या स्तरावर मैत्रीची व्याख्या बदलते. जसजसं मैत्रीचं नातं अतुट होत जातं, तसतसं नात्यातील स्पष्टता, प्रामाणिकपणा, सकारात्मकता, आहे तसं स्वीकारण्याची मानसिकता, मैत्रीतलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढत जाते. ज्याला माणसं जोडायला आवडतात. ज्याला माणसांवर प्रेम करायला आवडतं, त्याचा लोकसंग्रह प्रचंड असतो. त्याची तीच संपत्ती असते. अशी माणसं स्री-पुरुष मैत्रीसंबंधाचा बाऊ करत नाहीत. ते अशा मैत्रीत फारसा फरक करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मैत्रीला महत्त्व असते. लोक काय म्हणतात याकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात; परंतु लोकांच्या अनावश्यक वायफळ बडीबडीला महत्त्व देत नाहीत. मित्र काय म्हणतात, त्यांना काय वाटतं, मित्रांचे विचार काय आहेत, त्यांची मतं, त्यांचा दृष्टिकोन इ. महत्त्वाचे असते. या पद्धतीने ते सतत लोकसंपर्कात राहतात. मैत्री, प्रेम, आकर्षण सगळं समजण्याच्या वयातही मैत्रीबद्दल गैरसमज असतात. अगदी तो आणि ती यांच्या मनातसुद्धा समाजाची थोडीफार तरी भीती असतेच. म्हणजेच निखळ मैत्रीचा स्वीकारही काही वेळा नि:संकोचपणे त्या दोघांना करता येत नाही. आशा आणि शशा म्हणजे शशिकांत यांची मैत्री होती. ते दोघे एकाच कार्यालयात काम करत होते. आॅफिस सुटल्यानंतर कुठेतरी थांबून चहा, सॅण्डविच असा बेत आठवड्यातून एकदा-दोनदा तरी असायचा. त्यांच्यामधे ‘तुझं तू, माझं मी’ अशी बिल भरण्याची पद्धत होती. म्हणजे बाहेर खातोय म्हणून शशानेच बिल भरलं पाहिजे, असं काही नव्हतं. त्यांचे आर्थिक व्यवहार गुंतागुंतीचे नव्हते. मानसिक गुंतवणूक नव्हती. भावनिक अतिरेक नव्हता. नात्याच्या मर्यादांची जाणीव होती. त्यांच्याजवळ समजूतदारपणाची चौकट होती. त्यांनी निखळ मैत्रीचं सौंदर्य जपलं होतं. याबाबतीत दोघांच्या कुटुंबीयांना मात्र उत्तर देण्यासाठी दोघेही बांधील होते. अशा मैत्रीकडे प्रकरण, लफडं, भानगड, प्रतारणा, फसवणूक याच वृत्तीने बघितले जाते. इतकेच नाही, अशा शब्दांनी मैत्रीचा अपमान करण्यात समाजातील घटक पुढाकार घेताना दिसतात. दोन मित्र, दोन मैत्रिणी एकत्र नाटक सिनेमा बघतात. हाॅटेलिंग करतात. सहलीला एकत्र जातात. बिनधास्त फिरतात. तोच बिनधास्तपणा एक मित्र एक मैत्रीण यांच्यात दिसला तर मात्र चर्चेला ऊत येतो. स्री-पुरुष मैत्रीला तौलनिक दृष्ट्या कुठला मापदंड नाही. किशोरवयीन वयातच मुला-मुलींना एकमेकांपासून दूर राहा ही शिकवण दिली जाते. हे अंतर का असायला हवे हे मात्र वडीलधाऱ्यांना सांगता येत नाही. मुलांची उत्सुकता तशीच राहते. पुढे आयुष्यात कळत नकळत मैत्रीचा शोध घेतला जातो. विवाहपश्चात भिन्नलिंगी मैत्री कुणालाच मान्य होत नाही. असं म्हटलं जातं, विवाहानंतर सूर्यस्पर्शानेही स्री कलंकित होते. अर्थात यात काही तथ्य नसले तरी पुरुषप्रधान संस्कृतीचा हा एक प्रकारचा धाक होता असं म्हणू शकतो. माकडाचा माणूस होण्याच्या संक्रमण कालावधीत स्रीचा विकास हा आकर्षक पद्धतीने झाला.

पुरुषाना पक्के माहीत होते की, स्त्रिया पुरुषांपेक्षा वरचढ ठरणार कारण बुद्धी, मन आणि विचार प्रत्येक बाबीत ती पुरुषांना मागे टाकू शकते याची जाणीव होती. तेव्हापासून स्त्रीला दुय्यम ठरवून मनूनेही पुरुषी अहंकार जपला. त्यामुळे नातं कोणतंही असो. त्यातील कमतरतांचं खापर स्त्रीवर फोडून तिला अबला, दुर्बल, अक्षम, अपरिपक्व बनवण्यात पुरुषप्रधान संस्कृतीचा मोठा हात आहे. मैत्री हे स्वतंत्र नातं आहे त्यात बंधनं नाहीत आणि म्हणूनच स्त्री-पुरुषांच्या मैत्रीवर सामाजिक अडथळे निर्माण करण्याचं काम समाजातील काही घटक करतात. अशा संस्कृतीत स्री-पुरुष मैत्रीच्या नात्याचा विकास सतत अपूर्णच राहतो. पाश्चात्तीकरणाचं अनुकरण म्हणून स्त्री-पुरुष मैत्रीला हिणवलं जातं. एकीकडे दोष दिले जातात. चरित्रहीन सारखे शिक्के मारले जातात तर दुसरीकडे अशा नात्याबद्दल कुतूहल दाखवलं जातं. कसं जमतं त्यांना असं बिनधास्त वागायला. काय नशीबवान आहेत नाही दोघं. कसलं भारी जमतंय त्यांचं. असं आपल्याला जमायला हवं अशा भावना व्यक्त करणाऱ्‍यांची संख्या कमी नाही.

असं असताना स्त्री-पुरुष मैत्री संबंधाकडे संशयाने बघणे सोडून देता आले आणि अशी मैत्री समाजाने स्वीकारली तर लपवा-छपवी बंद होईल. अलीकडे तरुणाई त्यांची मैत्री लपवत नाहीत. बिनधास्त अशी मैत्री मिरवतात. एकमेकांना अडचणीत मदत करतात. बऱ्याच वेळा कुटुंबातूनही मैत्री स्वीकारली जात आहे. अशा वेळी मुलं सहज म्हणतात मला माझी मैत्री मान्य आहे. माझ्या घरच्यांना मान्य आहे. माझ्या मैत्रिणीला मी मान्य आहे. तिच्या घरच्याना मान्य आहे. तुमचा काय संबंध. तुम्हाला मान्य नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. आमचा नाही.

संस्कृती प्रवाही आहे. ती बदलत राहते. तिला एक आवेग आहे. तिला तिची दिशा आहे. गती आहे. तिला कुणी बांध घालू शकत नाही; परंतु हा प्रवाह जे स्वीकारतात त्यांना त्यात सौंदर्याचं प्रतीक दिसतं. आनंदाची लहर दिसते. नि:संशय मनाची खात्री असते.

प्रत्येक स्त्री-पुरुष मैत्रीने समाजाचे नुकसान होतेच असे नाही. स्त्री-पुरुष मैत्रीची कितीतरी चांगली उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. स्त्री-पुरुष मैत्री समजून घ्यायची असेल तर लहानपणापासूनच मुलामुलींचं परस्पर आकर्षण कुतूहल शमवायला पाहिजे. समाजाने मैत्रीतील उणिवा दूर करून जाणिवा जागृत करायला हव्यात. त्यामुळे स्त्री-पुरुष मैत्रीला सुंदर अशी झालर प्राप्त होईल जी समाजमान्य असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in