तृतीयपंथी समुदायाला आरोग्य सुविधा

सार्वजनिक आरोग्य विमा योजनेत आणखी एक महत्वाचा घटक जोडल्याची कामगिरी देखील आपण साजरी करू
तृतीयपंथी समुदायाला आरोग्य सुविधा

सार्वत्रिक आरोग्य व्यवस्था सगळीकडे लागू करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची सर्वसमावेशकता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, तसेच प्रशासनात पारदर्शकता असणेही आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ सप्टेंबर, २०१८ रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेचा (AB PM-JAY) शुभारंभ केला, तेव्हापासूनच आरोग्य सेवा सर्वांपर्यंत व्यापकपणे पोहोचवण्याची सुरुवात झाली. पुढच्या महिन्यात, ही योजना सुरु होण्याला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. जेव्हा आपण या योजनेचा चार वर्षांच्या यशस्वी अंमलबजावणीचा उत्सव साजरा करु, त्याचवेळी जगातील या सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य विमा योजनेत आणखी एक महत्वाचा घटक जोडल्याची कामगिरी देखील आपण साजरी करू.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभ आता तृतीयपंथी नागरिकांनाही मिळणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA, MoHFW) आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित नागरिकांना त्यांच्या उपजीविकेसाठी आणि उद्योगांसाठी सहाय्य करण्यासाठी स्माईल (SMILE) योजनेअंतर्गत, आयुष्मान भारत योजना आता तृतीयपंथीयांनाही लागू केली आहे. आयुष्मान भारत- पीएम जय योजनेच्या अंमलबजावणीद्वारे आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतांना समानता आणि सर्वसमावेशकता जपण्याच्या तत्वानुसारच तृतीयपंथीयांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तृतीयपंथी समुदायांच्या उत्थानासाठी मदत मिळणार आहे. या समुदायाबद्दल समाजात असलेल्या एकप्रकारच्या नकारात्मक भावनेमुळे, गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना देखील,आता व्यापक समाजाचा भाग म्हणून, आरोग्य सेवेचे लाभ मिळू शकतील. या सहकार्यामुळे कोणीही तृतीयपंथी व्यक्ती, जिच्याजवळ, राष्ट्रीय तृतीयपंथी व्यक्तींसाठीच्या पोर्टलवरुन जारी करण्यात आलेले ‘तृतीयपंथी प्रमाणपत्र’ असेल, तिला आयुष्मान भारत- पीएम जय आरोग्य योजनेशी निगडीत कोणत्याही रुग्णालयातून आरोग्य सेवेचे लाभ मिळू शकतील. २०११ मध्ये करण्यात आलेल्या देशव्यापी जनगणनेनुसार, देशातील तृतीयपंथीयांची एकूण संख्या, सुमारे ४,८७,८०३ इतकी आहे, असे निदर्शनास आले होते. आतापर्यंत ८१७२ तृतीयपंथीयांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली आहे. ह्या योजनेविषयी जनजागृती करणे आणि तृतीयपंथीयांना अधिकाधिक शिक्षित करण्याचे प्रयत्न सुरु असून, ह्या प्रयत्नांद्वारे आणखी अनेक व्यक्तींना येत्या काळात प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत, तृतीयपंथी व्यक्तींना अनेक महत्वाच्या उपचारांसाठी/शस्त्रक्रियांसाठी - ज्यात लिंग परिवर्तन शस्त्रक्रियांचाही समावेश आहे - कुठल्याही आरोग्य विमा योजनांचा लाभ मिळत नव्हता.अनेकदा तर, तृतीयपंथीयांना अशा शस्त्रक्रिया स्वतःच्या जोखमीवर करून घ्याव्या लागत असत. आरोग्य सुविधा केंद्रांनी त्याची कुठलीही जबाबदारी घेतली नाही. काही ठिकाणी तर, तृतीयपंथीयांना, शस्त्रक्रियेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या लोकांकडूनही घाईघाईत कठीण परिस्थितीत अशा शस्त्रक्रिया करवून घ्याव्या लागल्याची उदाहरणे आहेत. ही पद्धत बंद करून तृतीयपंथी समुदायातील लोकांना सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी या योजनेत संलग्नित रुग्णालयांत विविध आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येतील. या व्यतिरिक्त आयुष्मान भारत पीएम - जय, योजनेत अंतर्भूत असलेली जवळपास आणखी ५० पॅकेजेस खास तृतीयपंथीयांसाठी तयार करण्यात आली आहेत, ज्यात लिंग बदल शस्त्रक्रियेचा देखील समावेश आहे. या पॅकेजेसमध्ये जननेन्द्रीयांची शस्त्रक्रिया, हार्मोन उपचार, लेझर उपचार आणि काही विशिष्ट उपचारांसाठी पुनर्तपासणी पॅकेजेस उपलब्ध करून दिली जातील. ज्यामुळे तृतीयपंथीयांच्या उपचारात सातत्य राहील. या सोबतच, लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेषज्ञ निवडण्यात आले आहेत आणि त्यांना या योजनेअंतर्गत तज्ज्ञांच्या पॅनेलवर नोंदणीकृत करून आरोग्य सुविधांचे विस्तृत जाळे तयार करण्यात येईल.

या सोबतच आयुष्मान भारत पीएम - जय योजनेतील सर्व लाभार्थ्यांचा आरोग्य सेवांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसेच शहरी भागांतील लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ पोचवण्यासाठी, योजनेची व्याप्ती वेगाने वाढविण्यात येत आहे. आयुष्मान भारत पीएम - जय योजना लागू झाल्यापासूनच सातत्याने देशात तिचा विस्तार केला जात आहे; ज्यातून लाभार्थ्यांचे आयुष्य सुकर होत आहे. २९ ऑगस्ट २०२२ पर्यंत या योजनेत १८.९ कोटी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे आणि त्यांना आयुष्मान भारत कार्डे वितरीत करण्यात आली आहेत. या योजने अंतर्गत २५००० रुग्णालयांच्या जाळ्याच्या माध्यमातून अंदाजे ३.७८ कोटी लोकांना भरती करून उपचार करण्यात आले, ज्याचा एकूण खर्च ४५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.

भारतात आरोग्य विमा क्षेत्राचे एकत्रीकरण करण्याचे उद्दिष्ट्य देखील आयुष्मान भारत पीएम - जय योजनेचे आहे. इथून पुढे, आयुष्मान भारत पीएम - जय योजना लागू झाल्यानंतर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या माध्यमातून एनएचए आय टी प्लॅटफॉर्मद्वारे आरोग्य विमा योजनांचे एकत्रीकरण सुरु केले आहे. ज्यात ईएसआयएस, आयुष्मान सीएपीएफ, बीओसीडब्ल्यू, सीजीएचएस आणि मुलांसाठी पीएम केयर्स योजनांच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येत आहे.

सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी आरोग्यसेवा या धोरणानुसार ज्या समुदायांना प्रकर्षाने आरोग्य सेवेची गरज आहे अशा सर्व घटकांच्या मदतीला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण सज्ज झाले आहे. हा भव्य कार्यक्रम या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. तृतीयपंथीयांना समाजात सामावून घेणे आणि त्यांना समानतेची वागणूक देणे हा या समुदायाच्या विकासासाठी महत्वाचा मार्ग आहे, ज्यामुळे केवळ या समुदायाचा विश्वासच जिंकला जाणार नाही, तर आरोग्य सेवेच्या बाबतीत समानता येईल आणि तृतीयपंथीयांच्या बाबतील समाजात असलेली नकारात्मक भावना देखील कमी होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in