सुरक्षा कवच कायम ठेवणारा आरोग्य विमा

सर्वसाधारण महागाईच्या दोन ते तीन पटवाढ होत असल्याने नेमक्या किती रकमेचा आरोग्यविमा घ्यावा हा प्रश्न पडू शकतो
सुरक्षा कवच कायम ठेवणारा आरोग्य विमा

या पूर्वी आपण आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी हे मी लिहिलेल्या लेखांमध्ये वाचले असेलच. त्याची थोडी उजळणी करतो-

आरोग्यावर करायला लागणाऱ्या खर्चात कोविड १९ नंतरच्या काळात सातत्याने, सर्वसाधारण महागाईच्या दोन ते तीन पटवाढ होत असल्याने नेमक्या किती रकमेचा आरोग्यविमा घ्यावा हा प्रश्न पडू शकतो. प्रीमियम रकमेत झालेल्या वाढीमुळे घरातील प्रत्येकाचा वैयक्तिक विमा घेणे परवडणारे नसल्याने अनेकजण संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित (Family floater policy) घेतात. आरोग्य विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

१. करारातील नियम अटी.

२. दावे मंजूर करण्याचे प्रमाण.

३. प्रीमियम रक्कम इतर कंपन्यांचा तुलनात्मक प्रीमियम.

४. मिळणाऱ्या विविध सोई सुविधा.

५. शक्यतो सर्व कुटूंबाची एकच पॉलिसी घेऊन बरोबर रायडर घेणे अधिक फायद्याचे, जरूर तर विशेष योजना वेगळी घ्यावी

६. आजाराचा पूर्वेतिहास असल्यास त्याची भरपाई पात्रता कधी ते माहिती करून घ्यावे. हा कालावधी थोडी अधिक रक्कम भरून कमी करता येतो.

७. आरोग्य तपासणीची सुविधा

८. गरजेनुसार सुरक्षा कवच वाढवण्याची सोय

९. पॉलिसी पोर्ट करण्याची म्हणजेच इन्शुरंस देणारी विमाकंपनी बदलण्याची सोय

१०. तक्रार निवारण यंत्रणा.

हे सर्व पुन्हा देण्याचे कारण यामुळे असा आकस्मित खर्च उद्भवला तर त्याचा अतिरिक्त भार आपल्यावर पडत नाही.

आरोग्य विमा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने -

 नियामकांच्या संकेतस्थळावरील ग्राहक शिक्षण विभागात दिलेली माहिती वाचावी  

 आरोग्य विमा पुस्तिका डाउनलोड करावी.

 अर्ज स्वतः भरावा आणि सही करावी

 ऑनलाईन पॉलिसी खरेदी करणाऱ्यांनी तसेच मोफत उपलब्ध असलेल्या इन्शुरंस रेपॉजिटरी खाते उघडून त्यात पॉलिसी ठेवावी.

 आपल्या विमा कंपनीचा तसेच IRDA च्या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक मेल लिहून ठेवावा.

 पॉलिसी उपयुक्त नसल्यास मिळाल्यापासून १५ दिवसात परत करावी.

 कंपनीकडून आलेले करारपत्र, आधार पॅन सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवावेत म्हणजे मनस्ताप होणार नाही. पॉलिसी डिजीलॉकर या सरकारीअॅपमध्ये साठवून ठेवता येते. पोर्ट केलेल्या पॉलिसीचे पुरावे जपून ठेवावे.

 रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास २४ तासात कंपनीस माहिती द्यावी जर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असेल तर नियोजित तारखेपूर्वी कंपनीची मंजुरी घ्यावी.

 आवश्यकता असणाऱ्यानीच बाळंतपणाच्या खर्चाची भरपाई देणाऱ्या योजना विचारात घ्याव्यात.

 भरपाई दावे त्वरित सादर करावेत मुदत निघून गेल्यास योग्य ते स्पष्टीकरण करणारे टिपण सोबत जोडावे. रुग्णालयातून सोडल्यावर ३० दिवसांत सादर केलेल्या मागणीस काही अडचण शक्यतो येत नाही.

* विमा नविनीकरण मुदत संपण्यापूर्वी न विसरता करावे. यासाठी मोबाईल मध्ये रिमाईंडर लावता येईल.

पूर्वनियोजित उपचार करायचे असतील तर ते कॅशलेस पद्धतीनेच घ्यावेत, जर ही योजना नसती तर हॉस्पिटलमध्ये आपण कोणता क्लास स्वीकारला असता?  याचा विचार करावा आपल्याला मिळणारा खर्च ही वसुली नाही कारण औषधांच्या किमती सोडून इतर सर्व खर्च हे तुमच्या क्लासशी निगडित असतात. आपण अधिक वरचा क्लास स्वीकारला तर खर्च वाढतो, त्यामुळे आपण अडचणीत  येऊ शकतो.

आता विमा कालावधीत आजारामुळे मूळ विमा रक्कम पूर्ण वापरून झाल्यास तेवढ्याच रकमेची पुनर्स्थापना (Restoration benefit) करण्याची सोय थोडा अधिक प्रीमियम देऊन उपलब्ध आहे.  कुटुंबातील सदस्यांसाठी एकत्रित पॉलिसी घेणाऱ्यासाठी अशी सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये  अॅडमिट करायची वेळ आल्यास एक किंवा दोन वेळेतच पूर्ण रक्कम संपून जाण्याची शक्यता असते त्यामुळेच पुरेश्या रकमेची पॉलिसी नसल्याने पॉलिसी असूनही आर्थिक संकटाशी सामना करावा लागतो. आरोग्यविमा आपोआप पुनर्स्थापित करणारी ही योजना विमा रक्कम संपल्यावर पुन्हा पुन्हा जादू झाल्याप्रमाणे स्थापित होत असल्याने विमाधारकास कायमचे सुरक्षाकवच प्राप्त होत असते. 

ही योजना दोन प्रकारात आहे.

एका प्रकारात पॉलिसी रक्कम पूर्ण वापरून झाल्यावर पुनर्स्थापित होते. तर दुसऱ्या प्रकारात रक्कम अर्धवट वापरून झाल्यास लगेच पुनर्स्थापित केली जाते. म्हणजेच ५ लाखाचे सुरक्षाकवच असणाऱ्या एका कुटुंबातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे ४ लाख आणि ३ लाख रकमेचे दोन दावे असतील तर पहिल्या प्रकारात ७ लाखांऐवजी प्रथम ५ लाख रुपयांच्या कवचाबद्धल ५ लाख मंजूर होईल आणि पुन्हा ५ लाख रुपयांचे सुरक्षा कवच पुनर्स्थापित होईल जे यानंतर काही संकट आल्यास उपयोगी पडेल तर दुसऱ्या प्रकारात ४ लाख मंजूर झाल्यावर शिल्लख राहिलेले १ लाखाचे कव्हर ५ लाख होईल त्यातून ३ लाख मंजूर होऊन राहिलेल्या २ लाखाचे कव्हर पुन्हा ५ लाख होईल आणि ते पुन्हा काही प्रसंग आल्यास उपयोगी पडेल.

या योजनेत -

 वर्षभरात कोणताच दावा दाखल न झाल्यास त्याचा पुढील वर्षी काही फायदा होईल अशी तरतूद नसते.

 पहिला दावा दाखल करताना मर्यादेहून अधिक रकमेचा असेल तर तो मूळ प्रमाणात मंजूर होऊन नंतर पुनर्स्थापित होईल. म्हणजेच पॉलिसी कव्हर ५ लाख आणि पहिलेच बिल ८ लाख असल्यास फक्त ५ लाखच मंजूर होतील.

 सुरक्षा कवचाची पुनर्स्थापना वेगवेगळ्या आजारांनुसारही होऊ शकते. काही पॉलिसीत एकाच प्रकाराचा आजार एकास व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुनर्स्थापित होणार नाही अशी अट असते मात्र असा आजार अन्य व्यक्तीस झाल्यास सुरक्षा कवच पुन्हा पॉलिसी रकमेएवढे होते काही तर पॉलिसीत अशी अट नसते.

जे लोक संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित पॉलिसी घेतात ते लोक आपण कुठे राहतो त्यासाठी तेथे एका आजारास किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज घेऊन पुरेशा रकमेची विमा पॉलिसी घेऊ शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in