हाय हाय ये मजबुरी

हाय हाय ये मजबुरी

पाण्यात भिजलेली नायिका दाखवल्याशिवाय तो चित्रपट पूर्ण करूच शकत नसे.

हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दूरी’ हे गाणं तसं जुनं असलं तरी अजूनही ते ऐकायलाच काय; पण बघायलाही चांगलंच वाटतं. हे गाणंच फक्त मजबुरीवर आहे असं नाही, तर असलं गाणं आपल्या चित्रपटात घेणं हीसुद्धा निर्माता मनोजकुमारची मजबुरीच होती की! पाण्यात भिजलेली नायिका दाखवल्याशिवाय तो चित्रपट पूर्ण करूच शकत नसे. चित्रपट कोणत्याही विषयावरचा असो, त्यात पाणी पावसात भिजलेली नायिका दाखविता येईल असा प्रसंग, असं गाणं ओढूनताणून का होईना; पण बसविण्यात त्याचा हातखंडा होता. ‘शोर’सारख्या संवेदनशील विषयावरच्या चित्रपटातही त्याने उपाशीपोटी ‘भूख हड़ताल’वर बसलेल्या, दुष्काळी दिसणाऱ्या गिरणी कामगारांच्या बायका (जणू काही गिरणीमालक फक्त या कामगारांच्या बायकांसाठीच स्पेशल जेवणाचे डबे पाठवत असावा, अशी शंका यावी, अशा दिसणाऱ्या) पाण्यात भिजवून नाचवल्या होत्या! अर्थात, असं दाखवणं ही मनोजकुमारचीही मजबुरीच होती. आता आपणच बनवत असलेल्या चित्रपटात प्रेक्षकांना (आणि आपल्यालाही!) जे आवडतं ते नाही दाखवायचं, तर काय दाखवायचं? फक्त त्याचीच काय; पण त्याच्या चित्रपटात काम करणाऱ्या नायिकांची आणि इतर बायकांचीही मजबुरीच होती ना! आता एकदा निर्मात्याकडून रग्गड पैसा मोजून घेतला की, तो सांगेल तसं करावं आणि दाखवावंच लागेल ना? तिथे, ‘नाचता येईना ओले कपडे’ असं कसं सांगणार?आणि मजबुरी ही काय फक्त चित्रपट निर्मात्यांची किंवा चित्रपटात काम मिळविण्यासाठी वाट्टेल तसे सीन करण्यास तयार असणाऱ्या कलाकारांचीच असते का? नाही, ती आपल्या दैनंदिन जीवनातही असते! आपल्या ऑफिसमध्ये असते, समाजात असते, अगदी आपल्या घरात आणि राजकारणात तर असतेच असते!आपल्याला कवडीची किंमत न देणाऱ्या बॉसला कवडीची अक्कल नाही, ‘चाटूगिरी’ करून त्याने प्रमोशन मिळवलं आहे, हे आपल्याला पक्क माहीत असतानाही त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला ‘येस सर’ म्हणणे आणि त्याने सांगितलेल्या प्रत्येक फालतू जोकवर हसणे, ही आपली मजबुरीच असते ना? हाच बॉस जेव्हा रिटायर होतो, तेव्हा त्याच्या सेन्डऑफच्या भाषणात, ‘बिनडोक, बेअकली होता साला. बरं झालं ब्याद गेली. आता उद्यापासून ऑफिसमध्ये कसं प्रसन्न वाटेल.’ हे मनातले विचार त्या रिटायर होणाऱ्या बॉसचा गळा समजून दाबून टाकून वरकरणी मात्र, ‘असे विद्वान साहेब लाभले हे मी माझं भाग्य समजतो. उद्यापासून ऑफिसमध्ये रोज साहेबांची अनुपस्थिती जाणवेल,’ असं काहीतरी बोलणं हीसुद्धा आपली मजबुरीच असते ना? ऑफिसमध्ये आपल्या शेजारच्या टेबलवर बसणाऱ्या आणि बघता बघता आपल्या हृदयात घर करून बसलेल्या मिस पूजाने तिचं लग्न ठरल्याची क्लेशदायक बातमी हसत हसत सांगितल्यावर, कोणीतरी आपल्याला बिना पॅराशूटचं विमानातून ढकलून दिल्याचे चेहेऱ्यावरचे भाव आणि पोटात उठलेला गोळा लपवत, ‘दिल के टुकड़े टुकड़े कर के, मुस्कराके चल दिये’ हे ओठांवर आलेलं गाणं मागे ढकलत, हसतमुखाने तिचं अभिनंदन करणं हीसुद्धा आपली मजबुरीच असते ना?सासू-सासरे आपल्याकडे महिनाभर राहायला येणार आहेत, ही बातमी बायकोने कितीही लाडात येऊन सांगितली तरी चेहेऱ्यावर येणारे, ग्लासभर कारल्याचा रस प्यायल्याचे भाव लपवून तोंडात रसगुल्ला ठेवल्यासारखे भाव आणणे हीसुद्धा विवाहित पुरुषांची मजबुरीच असते ना? सासू-सासरे येणार आहेत म्हटल्यावर बायकोने दिलेल्या, ‘ते असेपर्यंत नीट राहा जरा. रोज दाढी करत चला, फिराल नाहीतर नेहमीच्या सवयीने भिकाऱ्यासारखे. पडद्याला हात पुसणं बंद करा, काही दिवस. नॅपकीन वापरायला शिका जरा आणि टीव्हीवर त्या ओटीटीवरचे घाणेरडे चित्रपट पाहणं बंद करा, नाहीतर माझ्या मम्मी-पप्पांना मनस्ताप व्हायचा, मुलीला कुठे ढकलून दिली म्हणून. समजलं?’ अशा आपला सन्मान वाढवणाऱ्या सर्व सूचनांचे निमूटपणे पालन करणे, तसेच प्रत्यक्षात सासू-सासरे येणार असतात, त्या दिवशी दाराला कुलूप लावून पळून जावं, अशी कितीही तीव्र इच्छा होत असली तरी ती दाबून, गाडी घेऊन त्यांना स्टेशनवर घ्यायला जाणे, ते रेल्वेतून उतरल्यावर त्यांचे स्वागत करणे आणि त्यांची बॅग उचलून स्वहस्ते गाडीच्या डिकीत ठेवणे, हीसुद्धा विवाहित पुरुषांची मजबुरीच असते ना? राजकारणातल्या मजबुरीबद्दल काय आणि किती बोलणार? अहो, तिथे ‘वाघा’चं काळीज असणारी माणसं सत्तेच्या मोहापायी स्वतःला २५-२५ वर्ष सडवून घेतात, तसं बोलूनही दाखवतात तरी परत गळ्यात गळा घालून सत्तेवर बसतात, ती मजबुरीच असते ना? ज्याला ‘हिरवा साप’ म्हणून हिनवलं त्याला पक्षात घेऊन मंत्री बनवणं हीसुद्धा मजबुरीच असते ना? वैफल्य आल्यामुळे ज्यांना ‘गद्दार’, ‘विष्ठा’ असं हिनवलं त्यांच्यासाठीही आपली दारं २४ तास उघडी आहेत, असं जाहीर करण्यामागे मजबुरीच असते ना? मुख्यमंत्री बनण्यासाठी अडीच-तीन वर्षे आटापिटा केल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या एका इशाऱ्यावर कोणालातरी मुख्यमंत्री करून आपण उपमुख्यमंत्री बनणे ही मजबुरीच असते ना?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in