हिंदुत्व आणि कणखर नेतृत्व आम्ही चालवू हा पुढे वारसा...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा न्याय हक्क यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
हिंदुत्व आणि कणखर नेतृत्व आम्ही चालवू हा पुढे वारसा...

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

शिवसेनेचा आज वर्धापनदिन. शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्दिष्टांसाठी शिवसेनेची स्थापना केली आणि अविरतपणे ज्या हिंदू तसेच मराठी माणसासाठी ते लढत राहिले त्या विचारांना पुढे नेण्याचे कार्य आज जर खऱ्या अर्थाने कोणी करत असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज शिवसेना ५८ वर्षे पूर्ण करत आहे. दोन वर्षांत शिवसेना हीरक महोत्सव साजरा करेल. शिवसेनेच्या या वाटचालीत कुठे असेल हिंदुत्व आणि मराठी माणूस? भविष्याचा वेध घेताना आजपर्यंतच्या वाटचालीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी कशी योग्य हाती सोपवली होती, त्याचा हा आढावा.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा न्याय हक्क यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शिवसेना, शिवसैनिक आणि महाराष्ट्र हाच त्यांचा श्वास असेपर्यंत एकमेव जिव्हाळ्याचा विषय राहिला. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या आड कोणी येऊ नये म्हणून त्यांनी शिवसेनेची एक जबरदस्त तटबंदी निर्माण केली. सुरुवातीला ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या मूलमंत्रावर इतिहास रचणारी शिवसेना पुढे पुढे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातील एक अविभाज्य भाग बनली. शिवसेनाप्रमुखांच्या मताला महत्त्व प्राप्त होऊ लागले आणि शिवसेना राजकारणात अधिक सक्रिय होत गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक राजकीय तडजोडी केल्या. अगदी काँग्रेसला थेट पाठिंबा देण्यापर्यंत ते आणीबाणीचे समर्थन करून तिला ‘शिस्तपर्व’ म्हणण्यापर्यंतच्या भूमिका त्यांनी घेतल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही भाजपने जेव्हा त्यांना राजकीय व्यवस्थेतून उखडण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकीय धोबीपछाड देत काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेचा नवा डाव मांडला आणि भाजपला शिवसेनाच आव्हान देऊ शकते हे दाखवून दिले.

बाळासाहेब आणि काँग्रेस

शिवसेना स्थापन कशी झाली याचा इतिहास आता सर्वश्रुत आहे. ‘मार्मिक’मुळे ‘शिवसेना’ आणि शिवसेनेमुळे ‘सामना’ असा प्रवास प्रसारमाध्यमातून अनेकदा प्रसारित झाला आहे. त्या काळात माधव देशपांडे, वसंत प्रधान हे बाळासाहेबांचे सहकारी अधिक सक्रिय होते. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मारोतराव कन्नमवार अशा तत्कालीन दिग्गज काँग्रेस नेत्यांना एकीकडे बाळासाहेब विविध विषय घेऊन आव्हान देत, प्रसंगी रस्त्यावर उतरत आणि शिवसेनेच्या मार्फत मराठी माणसाला, भूमिपुत्राला न्याय मिळायलाच हवा, यासाठी आग्रही राहत. पण त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण, रामराव आदिक, अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले, मुरली देवरा अशा अनेक काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंधही होते. शिवसेनेच्या पहिल्या सभेत व्यासपीठावर काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते रामराव आदिक होते, हे अनेकांना माहीत आहे.

बाळासाहेब, रजनी पटेल, मुरली देवरा आणि इंदिरा गांधी

काँग्रेसचे मुंबईतील तत्कालीन नेते होते रजनी पटेल. यांनी शिवसेनेवर बंदी आणावी, असा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावामागे शिवसेनेची वाढती ताकद आणि निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा होणारा दमदार प्रवेश हे एक कारण होतेच, पण आणखी एक कारण होते. ते म्हणजे बाळासाहेबांचे बॉलिवूडमध्ये वाढत जाणारे प्रस्थ. त्याचा त्रास काँग्रेसच्या काही नेत्यांना होऊ लागला आणि रजनी पटेल यांनी शिवसेनेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदिरा गांधींनी मात्र रजनी पटेल त्यांच्या विश्वासातले असूनही बाळासाहेब आणि शिवसेनेच्या कार्याबाबत खरी माहिती जाणून घेतली आणि रजनी पटेल यांचा प्रस्ताव धुडकावला. बाळासाहेबांची व्यक्तिशः भेटही घेतली आणि त्यांचे कार्य समजून घेतले. त्यानंतर बाळासाहेबांनीही मुरली देवरा यांना महापौरपदी बसवून आपल्या मैत्रीची चुणूक दाखवून दिली.

बाळासाहेब आणि हिंदुत्व

बाळासाहेबांनी ‘हिंदुत्व आणि मराठी माणसाला, भूमिपुत्राला प्रथम न्याय’ हे आपल्या राजकारणाचे सूत्र ठेवल्यामुळे पुढे काँग्रेससोबत त्यांचे खटके उडू लागले. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला शिस्तपर्व म्हणणारे बाळासाहेब नंतर काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून फेकण्यापर्यंतची टीका करू लागले. अर्थात त्यास कारण इंदिरापर्व संपल्यानंतरचा कालावधी, राजीव गांधी आणि त्यानंतरचा कालावधी अशी अनेक कारणे होती. त्याच कालावधीत आधी जनता पक्ष आणि मग भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांचा राजकारणात वाढलेला वावर आणि इतर अनेक बाबी कारणीभूत होत्या. भाजप हिंदुत्व या मुद्यावर शिवसेनेच्या जवळ आला आणि बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत झाला. बाळासाहेबांनीही हिंदुत्वासाठी भाजपसोबतच राजकीय व्यूहरचना आखली आणि भगवा फडकवून दाखवला.

भाजपच्या सत्तेच्या आट्यापाट्या

भारतीय जनता पक्षात त्यांचे शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झाला. भाजपने अनेक राजकीय पक्षांसोबत सरकारे स्थापली. ज्यामुळे त्यांचा अजेंडा केवळ सत्ताग्रहण इतकाच होता हे स्पष्ट झाले. अगदी ‘वंदे मातरम्’ म्हणायला नकार देणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद, भाजपचा द्वेष करणाऱ्या मायावती, संघमुक्त भारत करण्याची घोषणा करणारे नितीशकुमार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

हिंदुत्वात त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व

२०१४ साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती का तोडली गेली, याचे उत्तर देण्यासाठी भाजपकडे आजही तोंड नाही. जवळजवळ तीन दशके भाजपला चांगल्या-वाईट काळात सदैव पाठिंबा देणारी शिवसेना भाजपला स्वतःचे भविष्य उज्ज्वल दिसू लागल्यावर नकोशी झाली हा इतिहास भाजपला बदलता येणार नाही. आजच्या पेक्षा दिग्गज असलेल्या तत्कालीन भाजप नेत्यांसमवेत शिवसेना आणि मातोश्रीने कौटुंबिक संबंध जोपासले. मात्र भाजपमध्ये आलेल्या नवीन नेतृत्वाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या पुढे २०१४ नंतर क्षणात शिवसेना अचानक परकी ठरू लागली. शिवसेनेची गरज केवळ सत्तेपुरती मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्वात त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या भाजपमध्ये त्यागाचा लवलेशही दिसून येत नाही. कटकारस्थाने करून येनकेन प्रकारे सत्ता मिळवणे या एकमेव उद्देशाने भाजपची वाटचाल सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी त्यागाची परंपरा कायम ठेवली

सुसंस्कृत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली. मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी सहजतेने त्याग केला. यामुळे भाजपच्या सत्तालालसेचा खरा चेहरा उघड झाला. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना होऊनही त्याचा कोणताही अहंभाव उद्धव ठाकरे यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच जाणवला नाही, मुख्यमंत्रीपदाचा मोह त्यांना कधी शिवला नाही. ते उलट सांगत आले, मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतही नाही. दुसरीकडे ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे म्हणाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे भाजपने मोहाची परंपरा कायम ठेवली तर उद्धव ठाकरेंनी त्यागाची.

उद्धव यांनी देशातील नेत्यांनाही आपलेसे केले

काँग्रेसचे नवे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित झालेले दिसते. शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय इतकेच नव्हे, तर प्रशासकीय कौशल्याबाबत प्रशंसा करणे, हे काही साधे नाही. फारुख अब्दुल्ला हे देखील उद्धव ठाकरे यांच्या राजकीय रणनीतीला सलाम करत म्हणाले, लढत रहा. आपल्या वडिलांचे नाव असेच पुढे न्या. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या दिग्गजांनीही उद्धव ठाकरेंच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करणे, ही लहान बाब नाही.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in