

श्रीनिवास बिक्कडमत आमचेही
श्रीनिवास बिक्कड
काशी हे हिंदू धर्माचे पवित्र केंद्र असून हजारो वर्षांपासून श्रद्धेवर उभे आहे, पण आज ‘विकास’ आणि ‘कॉरिडॉर’च्या नावाखाली चालणाऱ्या बुलडोझर प्रकल्पांमुळे तिचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात आला आहे.
काशी हे केवळ एक शहर नाही, तर तो हिंदू संस्कृतीचा श्वास, अध्यात्माचा गाभा आणि मोक्षाची संकल्पना आहे. ‘काश्यां हि काशते काशी’ असे सांगणारी ही नगरी हजारो वर्षांपासून अखंड श्रद्धेवर उभी आहे. इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवासात आक्रमणे झाली, सत्ता बदलली, राजे गेले; पण काशीचा आत्मा टिकून राहिला, कारण तो कोणत्याही राज्यसत्तेच्या कृपेवर नव्हे, तर हिंदूंच्या श्रद्धेवर आधारलेला आहे. काशीचा हा आत्मा बाह्य आक्रमणामुळे नव्हे, तर ‘विकास’, ‘सौंदर्यीकरण’ आणि ‘कॉरिडॉर’सारख्या आकर्षक शब्दांच्या आडून सरकारकडून सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे संकटात सापडला आहे. हे प्रकल्प काशीच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक रचनेवर घाव घालत आहेत. श्रद्धा, परंपरा आणि स्मृती उद्ध्वस्त करणारा हा विकास कोणासाठी केला जातोय, असा प्रश्न काशीच्या गल्लीबोळांतून विचारला जातोय.
कॉरिडॉरच्या नावाखाली मंदिरांचा संहार
केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले. त्यात शेकडो लहान-मोठी मंदिरे, पूजास्थळे, प्राचीन गल्ल्या प्रशासनाने ‘अतिक्रमण’ ठरवून तोडली. ती वाचवण्यासाठी साधू, संत, महंत यांच्यासह शंकराचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पण त्यांच्या बुलडोझरखाली चिरडून प्रकल्प रेटला. तोडलेली मंदिरे अनधिकृत नव्हती; ती काशीच्या धार्मिक रचनेचा अविभाज्य भाग होती. पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. शेकडो- हजारो लोकांची उपजीविका यावर अवलंबून होती. काशीची परंपरा ही एकाच भव्य मंदिराभोवती केंद्रित नाही, तर ती असंख्य छोट्या देवळांमध्ये, गल्लीबोळांत आणि घाटांमध्ये विखुरलेली आहे. हा आत्मा समजून न घेता केवळ सिमेंट-कॉंक्रीटचा भव्य देखावा उभा करणे म्हणजे काशीचे रूप बदलणे नव्हे, तर तिचे अस्तित्वच पुसून टाकणे होय. आता ‘कॉरिडॉर–२’च्या नावाखाली पुन्हा एकदा तोच प्रकार सुरू आहे. मंदिरे, मूर्ती, घाट, ऐतिहासिक रचना पुन्हा एकदा बुलडोझरखाली जात आहेत.
मणिकर्णिका घाट : मोक्षाची जागा की पर्यटन प्रकल्प?
मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मातील मोक्ष-संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे. या घाटावर ज्यांचे अंत्यसंस्कार होतात त्यांची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते, असे हिंदू धर्मीय मानतात. त्यामुळे देश-विदेशात मृत्यू झालेल्या लाखो हिंदूंच्या इच्छापत्रात आपले अंत्यसंस्कार मणिकर्णिका घाटावर व्हावेत, असे लिहिलेले असते. हजारो वर्षांपासून येथे अखंड पेटलेली चिता, तारक मंत्राची परंपरा आणि अंत्यसंस्कारामध्ये डोम समाजाची भूमिका या साऱ्यांमुळे मणिकर्णिका घाट अद्वितीय ठरतो. याच मणिकर्णिका घाटावर जीर्णाेद्धाराच्या नावाखाली बुलडोझर चालवून विध्वंस सुरू आहे. प्राचीन रचना मोडल्या, शिवलिंगे काढली, मंदिरे तोडली गेली. स्मशानभूमीला पर्यटनस्थळात रूपांतरित करण्याची ही संकल्पना हिंदू तत्त्वज्ञानाच्या विरोधी आहे. मोक्ष ही भावना आहे; ती फोटोसेशन किंवा व्ह्यू-पॉइंटसाठी नसते याचे भान सत्ताधाऱ्यांना राहिले नाही.
अहिल्यादेवींच्या नावाचा वापर, कार्याचा अपमान
भारतीय इतिहासात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांनी देशभरात हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ मंदिर मणिकर्णिका घाटाचा जीर्णोद्धारही त्यांनीच केला होता. राजकारणात त्यांनी विध्वंसापेक्षा संरक्षण जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माणाला महत्त्व दिले. याच अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेला मणिकर्णिका घाट आज मोदी-योगी सरकारच्या बुलडोझरखाली गेला. इतकेच नव्हे, तर अहिल्यादेवींच्या मूर्तीही तोडल्या गेल्या. हजारो मूर्ती खंडित झाल्या, शेकडो मूर्तींना गंगेत जलसमाधी मिळाली. अहिल्यादेवींचे वंशज प्रिन्स यशवंत होळकर घाटावर जाऊन तुटलेल्या मूर्ती कापडाने झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमांत घाटाच्या विध्वंसाचे हजारो-लाखो व्हिडीओ आणि फोटो फिरत आहेत. पण हे सर्व कशासाठी केले जात आहे? तर जी माहिती मिळतेय त्यानुसार सरकारला मणिकर्णिका घाटावर बसस्थानक बांधायचे आहे. त्यासाठी हिंदू धर्माच्या आध्यात्मिक राजधानीचा विध्वंस सुरू आहे.
भाजप सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ३०० वे जन्मशताब्दी वर्ष मोठा गाजावाजा करून साजरे करत आहे. या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ नाणे जारी करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील भाजप सरकारने शासनाच्या अधिकृत लेटरहेडवरही अहिल्यादेवींचा फोटो छापला आहे. ज्या अहिल्यादेवी होळकरांचे नाव घेऊन भाजप राजकारण करते, त्याच अहिल्यादेवींच्या कार्यावर बुलडोझर चालवून भाजप सरकारने अहिल्यादेवींचा अवमान केला आहे.
दिखाऊ हिंदुत्व आणि प्रत्यक्ष विध्वंस
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे सरकार आज हिंदूंच्या अध्यात्मिक राजधानीचा आत्मा मोडीत काढत आहेत. एकीकडे मंदिर उद्घाटनांचे कार्यक्रम, धार्मिक भाषणं, प्रतीकात्मक पूजा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात मंदिरे पाडणे, घाट तोडणे, श्रद्धास्थळांचे व्यावसायिकीकरण आणि व्यापारीकरण करणे हा विरोधाभास जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. हिंदू धर्म आणि हिंदुत्व ही भाजपसाठी फक्त राजकीय फायद्याची घोषणा आहे. पण हिंदुत्व म्हणजे परंपरेचे रक्षण, श्रद्धेचा सन्मान आणि सांस्कृतिक सातत्य जपणे होय. जर विकासाच्या नावाखाली हा धार्मिक वारसा नष्ट होत असेल, तर असा विकास हा हिंदुत्वविरोधीच ठरतो.
‘पुनर्स्थापना’चा फसवा दावा
काशीमधील विध्वंसावर देभरातून प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर काशीचे प्रशासन तोडलेल्या मूर्ती, अवशेष ‘नंतर पुन्हा बसवले जातील’ असे सांगत आहे. पण कटरने तोटलेल्या, बुलडोझरखाली चिरडलेल्या मूर्ती पुन्हा मूळ स्वरूपात उभ्या राहू शकत नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे प्रशासनाचा दावा तांत्रिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्याही फसवा आहे. जागतिक वारसा शहरांकडे पाहिले तर लक्षात येते की, तेथे जुन्या रचनेचे जतन केले जाते. व्हेनिस, रोम, क्योटो, जगात कुठेही ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त करून सौंदर्यीकरण केले जात नाही. मग काशीमध्येच असे का केले जात आहे?
काशीचा आत्मा विक्रीस काढला जात आहे
आज काशीमध्ये जे घडते आहे, ते केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक-आर्थिक संकटही आहे. डाल मंडीसारख्या पारंपरिक बाजारपेठा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. हजारो कुटुंबांचे रोजगार धोक्यात आले आहेत. पुनर्वसनाच्या कोणत्याही योजना नाहीत. श्रद्धा, रोजगार आणि परंपरा या तिन्ही गोष्टी एकाच वेळी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. हे सगळे पाहता प्रश्न उभा राहतो, काशी कोणासाठी बदलली जात आहे? काशीवासीयांसाठी की कॉर्पोरेट पर्यटनासाठी? का सरकारच्या मर्जीतील कंत्राटदारांच्या फायद्यासाठी?
काशी शांत बसणार नाही
काशी नगरी प्रत्येक आघातानंतर उभी राहिली, इतिहास याचा साक्षी आहे. ती आजही उभी राहील. मात्र हा प्रश्न केवळ काशीपुरता मर्यादित नाही; तो भारताच्या सांस्कृतिक दिशेचा आहे. काशीचा आत्मा दगडात नाही; तो श्रद्धेत आहे. तो कोणत्याही बुलडोझरने पाडता येत नाही. एवढी किमान समज सत्ताधाऱ्यांना लाभावी, हीच अपेक्षा.
मीडिया कोऑर्डिनेटर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी